घरफिचर्ससारांशआनंदयात्री...

आनंदयात्री…

Subscribe

खरं म्हणजे पैशांशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशांचा अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर आपण बघतो कितीही पैसे मिळाले तरी काही जणांचं समाधान होत नाही. बर्‍याचशा व्यावसायिकांना एक सवय असते. कधीही भेटलो तर एक वाक्य त्यांच्या तोंडात असतंच...काही मजा नाही.. धंद्यात काही राम राहिला नाही पूर्वीसारखा. खरा आनंद घेण्यासाठी नेहमीच पैशांची गरज भासत नाही. आनंदी राहणं हा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी.

माझा एक मित्र आहे. आनंदीदास त्यांचं नाव. नावाप्रमाणे सदा आनंदी. कधीतरी अधूनमधून भेटत असतो. भेटल्यावर पहिल्यांदा आपण काय विचारतो, काय कसं काय? कसा आहेस? तसंच त्यालाही विचारतो. तीच तर आपल्या बोलण्याची सुरुवात असते ना!
तर त्याला हे असं विचारलं की त्याचं नेहमीचं उत्तर.. मस्त..मजेत.
सवयीने असं बरेच जण म्हणत असतातच. ते तसं म्हणतात म्हणजे ते खरंच मजेत असता असंही नाही. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम तर असतातच ना! पण हा माझा मित्र आनंदीदास, त्यांचे प्रॉब्लेम काय मला फारसे माहीत नाही, पण खरोखरंच तो फारच मजेत असतो, आनंदात असतो. त्याच्या तोंडी कायम एक गाणं असतं. गुणगुणतच असतो तो..
आज कल पाँव जमींपर नहीं पडते मेरे
बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए…
हे असं आनंदी राहायला नेमकं काय लागतं? काही नाही. फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंद टिपण्याची सवय हवी. बहुसंख्य माणसं असं समजतात की खूप पैसा असलेली माणसंच अशी आनंदात राहू शकतात. तेच अधिक सुखी असतात.
पण खरं म्हणजे पैशांशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशांचा अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर आपण बघतो कितीही पैसे मिळाले तरी काही जणांचं समाधान होत नाही. बर्‍याचशा व्यावसायिकांना एक सवय असते. कधीही भेटलो तर एक वाक्य त्यांच्या तोंडात असतंच… काही मजा नाही.. धंद्यात काही राम राहिला नाही पूर्वीसारखा.
खरा आनंद घेण्यासाठी नेहमीच पैशांची गरज भासत नाही. आनंदी राहणं हा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. अमूक एक व्यक्ती नेहमीच आनंदात असते म्हणजे ती व्यक्ती श्रीमंत असते असं नाही, पण आनंदी राहणं.. छान वाटणं..मस्त वाटणं हा त्यांचा स्वभावच झालेला असतो.
आणि खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत तर असतो. कडक थंडीत कोवळ्या उन्हाचा आनंद काय कमी असतो? श्रावणधारा अंगावर झेलण्यातला आनंद किती सुख देऊन जातो. पावसात चिंब भिजल्यावर अचानक समोर आलेला वाफाळलेल्या चहाचा कप असो की चांदण्या रात्रीत भटकणं असो, आनंदच आनंद.
संगीताचा आनंद ज्यांना घेता येत नाही ते तर अभागीच म्हणायला हवे. लता..किशोर ऐकल्यावर मन टवटवीत व्हायलाच हवं. अगदी उदास मनस्थितीतही तलतची गाणी मनाला सहारा देऊन जातात. विविध प्रकारची झाडं..त्यांचे आकार.. त्या हिरव्या रंगाच्या विविध छटा बघितल्या तरी थक्क व्हायला होतं. जपानमध्ये म्हणे बर्‍याच घरांना छताला छोट्या खिडक्या ठेवलेल्या असतात. मग एखादा दिवस ठरवून बहुधा पौर्णिमेलाच ते एकत्र जमतात. त्या खिडक्यांच्या खाली चांदण्यात बसतात. चांदणं अंगावर झेलतात, गाणी म्हणतात. चंद्रदर्शनाची पार्टीच ती. आपणही कोजागिरी पौर्णिमेला हेच तर करतो.
पुस्तकांची सोबत म्हणजे तर आनंदी आनंद. यासाठी खूप पैसे लागतात असंही नाही. काही जण अस्वस्थ होतात.. उदास होतात तेव्हा परमेश्वराची आराधना करतात, तर काही जण अशा वेळी पुस्तकांना जवळ करतात. पुस्तकांच्या पानापानांतून..त्यातील सुंदर वाक्यांमधून मिळणारा आनंद त्यांची उदासी थोडीतरी कमी करतो. निसर्गाची सोबत..संगीताची साथ आणि पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही आनंदात राहू शकतो. अगदी तो एकटा असला तरी. म्हणून तर तात्यासाहेब शिरवाडकर एका ठिकाणी म्हणतात…
एखाद्या निर्जन बेटावर मला जाण्याची वेळ आली आणि मोजक्याच वस्तू सोबत घेऊन जाण्याचं बंधन असेल तर मी सर्वप्रथम निवड करीन ती टेपरेकॉर्डर आणि पुस्तकांची. संगीत आणि पुस्तके सोबत असतील तर मी कुठेही आनंदात राहू शकेन.

–सुनील शिरवाडकर

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -