घरफिचर्ससारांशपुरातन मंदिरं, लेण्यांमध्ये प्राचीन ‘खेळांचे पट’

पुरातन मंदिरं, लेण्यांमध्ये प्राचीन ‘खेळांचे पट’

Subscribe

प्राचीन काळात तंत्रज्ञानाचा अभाव असला तरीही मनोरंजनाची मुबलक साधनं उपलब्ध असल्याचे पुरावे लेण्यांसह काही मंदिरांमध्ये आढळले आहेत. मनोरंजनासोबतच बुद्धीला चालना देणार्‍या या खेळांचं वैशिष्ठ्य म्हणजे खेळती हवा, भरपूर प्रकाश अशा ठिकाणी ते तयार करण्यात आलेत. नाशिक शहरातील पांडवलेणी आणि सिन्नरचं गोंदेश्वर या ठिकाणीदेखील अनेक खेळ आढळले आहेत. हे खेळ कसे खेळले जात होते, त्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर होत होता अशा विविध बाजूंनी जाणून घेतलेला हा रंजन प्रवास...

आजकाल खेळांसाठी मोबाईल, व्हर्च्युअल गेमिंग, पीएसपी असे अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध असले तरीही, पूर्वीच्या काळात मात्र त्याला काही मर्यादा होत्या. मात्र, जमेची बाजू म्हणते काही खेळ मैदानी तर काही एका ठिकाणी बसून खेळायचे असल्याने यातून बौद्धीक आणि शारीरिक व्यायाम घडत होता.

विविध आकार आणि प्रकारांनी तयार केलेल्या पटांवर सोंगट्या व फासे अशा साधनांनी बैठे खेळ खेलले जात होते. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांमध्ये कालांतराने अनेक सुधारणा होत आजचे खेळ तयार झाले. पूर्वी जमिनीवरच पट आखून हाडे, गोट्या अथवा बियांच्या माध्यमातून हे खेळ खेळले जात. नाशिकमधील इतिहास अभ्यासक सोज्वल साळी सांगतात की, सर लेनर्ड वुली यांना अर येथील उत्खननात (इ. स. पू. सु. ३००० वर्षे) राजांच्या थडग्यात सर्वात प्राचीन पट आढळले. त्यात बुद्धिचातुर्यावर आधारीत खेळांमध्ये खेळाडूंचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्व, स्मरणशक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात. नशिबावर हवाला ठेवणारे, सोंगट्यांच्या खेळांचे अनेक प्रकार आहेत.

- Advertisement -

शोलो गुटी, वाघ बकरी ः
हा श्रीलंकेचा (पूर्वीचे सिलोन) दोन खेळाडूंमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. या खेळाचा एक प्रकार बांगलादेशातही लोकप्रिय आहे. त्या ठिकाणी हा खेळ शोलो गुटी (सोळा तुकडे) म्हणून ओळखला जातो. हेन्री पार्करने 1909 मध्ये हेवाकम केलिया किंवा वॉर गेम नावाने या खेळाचं दस्तावेजीकरण केलं होते. हा खेळ भारत आणि बांगलादेशात सोलाह गुटिया किंवा सोळा गोटी या नावानं खेळला जातो.

पचिसी ः
मोगलकाळात भारतात ‘पचीसी’ हा सोंगट्यांचा खेळ फार लोकप्रिय होता. त्यासाठी अधिक (+) चिन्हाच्या आकाराचा कापडी पट वापरत. अकबर बादशाहला या खेळाचा एवढी आवड होती की, त्याने आपल्या फतेपूर शिक्रीतील प्रासादाच्या प्रांगणाच्या एका भागात सोंगट्यांच्या पटासारखी रचना केली होती. जनानखान्यातील सोळा दासी विविध चिन्हदर्शक विविध रंगांचे कपडे परिधान करून सोंगट्यांच्या जागी उभ्या राहत. सोंगट्या जशा पडतील त्यानुसार त्या तितकी घरं पुढे सरकत. १८८० च्या सुमारास हा खेळ इंग्लंडमध्ये नेण्यात आला व तिथे त्याला ‘ल्यूडो’ या आधुनिक इंग्लिश खेळाचं रूप लाभलं.
मोबाईलवर जो ल्युडो खेळतो तोच पचिसी, चौपर, चौपट म्हणून प्रचलित होता. महाभारतात कौरव- पांडवांमध्ये हा खेळवण्यात आला. चार किंवा दोन लोकांमध्ये फासे व कवड्याच्या आधारे खेळला जातो. हा खेळ भारतात सर्वत्र खेळला जातो. हा खेळ आधुनिक प्रकारातील ल्युडोसारखा आहे.

- Advertisement -

बॅकगॅमॉन ः
हा प्राचीन खेळ इंग्लंडमध्ये १४ व्या शतकातही खेळला जात. १२ पंक्तींच्या खेळात (ट्वेल्व्हलाइन गेम) या खेळाचं मूळ असून, तो ग्रीक लोकांमध्ये आधीच प्रचलित होता व त्यांच्यापासूनच रोमन लोक तो शिकले. सोंगट्यांच्या खेळात पटाच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे सोंगट्या नेण्याची स्पर्धा असते

नवकंकरी ः
प्राचीन रोम आणि मध्ययुगीन काळात नवकंकरी (नाईन मेन मोरिस) खेळ लोकप्रिय होता. खेळाचा उगम कुठे आणि कधी झाला हे कुणालाही माहीत नाही. कुर्ना व इजिप्त येथील इजिप्शियन मंदिराच्या दगडांमध्ये ९ पुरुषांचा मॉरिस बोर्ड कोरलेला आहे. हा संदर्भ तब्बल इ.स. पूर्व १४०० असल्याचा अंदाज आहे. कुर्ना मंदिराच्या छताच्या स्लॅबमध्ये बोर्ड कोरण्यामागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. रोमन साम्राज्यात आणि अनेक मध्ययुगीन कॅथेड्रलच्या आसनांमध्ये अनेक नऊ पुरुष मॉरिस विविध इमारतींच्या दगडांमध्ये कोरलेले आहेत. हा खेळ मिल किंवा पवनचक्की अशा अनेक नावांनी ओळखला जातो. बहुधा, कारण बोर्डचा आकार पवनचक्कीसारखा दिसतो आणि मेरेल्स, लॅटिन शब्द मेरेलसचा अर्थ ‘गेमिंग पीस’ असा होतो. नाइन मेन्स मॉरिस हे नाव शेक्सपियरने त्याच्या अ मिडसमर नाईटस् ड्रीम या नाटकात घेतलंय.

मंकला / पलंगुळी :
हा शब्द नकाला या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ ‘हलवणे’ असा आहे. सामान्यत: पेरणी आणि कापणी दर्शविणार्‍या बोर्ड गेमच्या कुटुंबाच्या वर्णनासाठी वापरला जातो. एक-दोन खेळाडूंचा हा खेळ ‘खड्डे आणि खडे’ म्हणूनही प्रचलित आहे. यात खेळाडू कधीकधी बोर्ड उपलब्ध नसल्यास खेळण्यासाठी लहान छिद्रे खोदणे निवडतात. हा खेळ एवढा जुना आहे की त्याची उत्पत्ती अज्ञात आहे. प्राचीन सुदान किंवा घानामध्ये 3 हजार 600 वर्षांपूर्वी मंकला खेळला गेल्याचा पुरावा अस्तित्वात आहे. मंदिरांमध्ये सापडलेल्या काही प्राचीन पाट्यांवरुन विधी किंवा भविष्य वर्तवण्यासाठीही याचा वापर होत असल्याचा अंदाज आहे.

भाषा, प्रांत, वेशभूषा, आहार यावरुन जशी प्रादेशिक भिन्नता, संस्कृतीची ओळख होते. तसाच काहीसा इतिहास या खेळांमधून पुढे आला आहे. प्राचीन काळातही वेगवेगळे गेम्स प्रचलित होते आणि ते आजच्या डिजिटल गेम्सपेक्षाही अधिक आव्हानात्मक होते, हे अभ्यासातून पुढे आलंय.

– सोज्वळ साळी, इतिहास अभ्यासक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -