घरफिचर्ससारांश...तो एक सेलिब्रिटी!

…तो एक सेलिब्रिटी!

Subscribe

टवळ्या टवाळक्या सोडून आणखी दुसरंतिसरं काय करणार होता. शाळेत त्याने तेच केलं. कॉलेजात तर टवाळक्या करण्याच्या त्याच्या प्रतिभेला बहरच आला. त्याच्या टवाळकीतल्या नवनिर्मितीसाठी जणू खुला मंचच होता तो. कॉलेज संपलं तेव्हा तर त्याच्या प्रतिभेचा हा वारू चौखुर उधळला. एव्हाना अख्ख्या पंचक्रोशीत टवळ्याच्या टवाळक्या राजरोस दिसण्यात येऊ लागल्या. कामातून गेलेली केस अशी त्याची गणना होऊ लागली. टवळ्याच्या बरोबरीचे सगळी घासू पोरं कुठल्याशा एमएनसीमध्ये सीईओबीईओ झाली होती. टवळ्या त्यांच्याबरोबरच्या शर्यतीत मागे पडला होता. टवळ्याने स्वत:च्या भविष्याचं मातेरं करायचं टेन्डर घेतलंय अशी एक कुचकट कुजबूज आजुबाजूला जोरदार सुरू झाली होती.

…पण तिचा कर्कश्य गलका होण्याआधीच ते आक्रित घडलं.
अशाच एका सोनेरी संध्याकाळी आपल्या बरोबरच्या सगळ्या घासू पोरांना, सगळ्या टॉपरना मागे टाकून टवळ्या सेलिब्रिटी झाला.

- Advertisement -

हो…हो…खरंच सेलिब्रिटी झाला. टीव्हीवर चमकला. सुटाबुटात झळकला. डोक्यावर केसांचा गिर्रेबाज तुरा हलवत टवळ्या अँकरिंग करू लागला. तो तर्‍हेवाईक कपडे घातलेल्या पोरीबाळींचा एक रिअ‍ॅलिटी शो होता. आपण आजवर केलेली सगळी टवाळकी टवळ्या त्या शोमध्ये पणाला लावू लागला. ज्या टवाळकीमुळे टवळ्या अखंड पंचक्रोशीत गॉनकेस ठरला होता तीच टवाळकी आता लोकमान्य ठरू लागली होती. लोकांना आवडू लागली होती.

टवळ्या आताही टवाळकी सोडून दुसरंतिसरं काहीच करत नव्हता. फक्त रस्त्यावरच्या इलेक्ट्रिक पोलच्या खालची टवाळकी स्टुडिओतल्या झगमगत्या दिव्यांखाली करत होता.

- Advertisement -

टवळ्याच्या आयुष्याला आता एकाएकी कलाटणी मिळाली. टवळ्याच्या रिअ‍ॅलिटी शोचे जसे धडाधड एपिसोडमागून एपिसोड होऊ लागले तशी टवळ्याची टवाळकी ऐकण्यासाठी बायाबापडे टीव्हीसमोर वेळ काढून बसू लागले. टवळ्याच्या केसांचा तुरा पोराटोरांच्या दिलाची धडकन बनू लागला. आता तो सेलिब्रिटी एके सेलिब्रिटी, सेलिब्रिटी दुणे सेलिब्रिटी अशी सेलिब्रिटीची एकेक पायरी चढत वर वर जाऊ लागला.

टवळ्याची माहिती पेपरात, फेसबुकात येऊ लागली. चला, हवा भरू द्यामध्ये त्याला बुलावा येऊ लागला. तिथल्या थुकरट विनोदावरही तो नियमाबरहुकूम ओक्साबोक्शी हसू लागला. कुणी पाचकळ विनोद केला तरी तसं गडगडाटी हसण्याची व्यावसायिक सवय त्याने अंगी बाणवून घेतली. रस्त्यावरची टवाळकी टेलिव्हिजनवर आणताना आणि विशेष म्हणजे त्या टवाळकीला प्रतिष्ठा मिळवून देताना काय स्ट्रगल करावा लागला ह्याची दर्दभरी कहाणी सांगताना त्याला आपल्या गळ्याशी फोटोजेनिक हुंदका आणावा लागला. हुंदका देताना पॉज् घ्यावा लागला.

टवळ्याच्या व्यक्तिगत जीवनातही आता मेलोड्रॅमॅटिक बदल झाले. टवळ्या आता पूर्वीचा टवाळखोर टवळ्या राहिला नाही. तो आता जीवनाकडे फार घनगंभीरपणे पहाणारा खोल खोल माणूस झाला. आपल्या जवळ येणार्‍या कुणाशीही फार जवळीक होणार नाही आणि त्यामुळे आपल्या सेलिब्रिटीपणाचं चार्जिंग जराही खाली उतरणार नाही ह्याची आटोकाट काळजी घेऊ लागला. रस्त्यावर शतपावली करतानाही आपलं ग्लॅमर कुरवाळत चालत जाऊ लागला.

कुणाच्या लग्नसमारंभात जातानाही आपल्यातल्या सेलिब्रिटीची नोंद घेतली जाईल असं स्वत:चं चालचलन ठेवू लागला. कुणाच्या अंत्ययात्रेतही आपल्याकडे माना वळतील अशा जागा पकडू लागला. कुणाबरोबर सेल्फी काढताना अगदी रिझनेबल हसू चेहर्‍यावर ठेवू लागला. एकूण काय तर पृथ्वीवरच्या मानवजातीपेक्षा आपल्या अस्तित्वाचा दर्जा कसा वेगळा आहे हे आपल्या वागण्यातून दाखवू लागला.

टवळ्याचं हे एकूण सगळं छान चाललं होतं. टवळ्याला छान घसघशीत सुपार्‍या मिळत होत्या. मानसन्मान मिळत होता. कलेक्टर ऑफिसातही गेल्या गेल्या त्याची कामं होत होती. कुठे थांबावं लागत नव्हतं. बँकेतली माणसं बसल्या जागी त्याची कागदपत्रं आणून देत होती. हॉटेलवाले पैसे घेत नव्हते. मजा मजा चालली होती. टवळ्या मनातल्या मनात हवेत तरंगत होता.

…पण हवाच ती, ती येऊ द्या म्हटलं तरी तिचा झोत कधीतरी दुसर्‍या दिशेने बदलतोच. तो बदललाच. टवळ्याच्या टवाळकीतली आधीची नवलाई ओसरू लागली. आपण ज्याला विनोद समजत होतो ती शुध्द पाणचट टवाळकी आहे हे बघणार्‍यांच्याही लक्षात येऊ लागलं. नंतर नंतर प्रेक्षक तर टवळ्याला नाकारू लागलेच, पण हे बघेही बघेनासे झाले.

टवळ्या आधीपेक्षा भारी कोट अंगावर चढवू लागला, भारी टाय गळ्यात अडकवू लागला. केसांचा तुरा आणखी गिर्रेबाज करू लागला. पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. टवळ्या आता लोकांना कळलाच नव्हता तर कळून चुकला होता. आता पब्लिकला टवळ्या टवाळखोर वाटू लागला होता.

आता एखाददुसरा चुकार वाटसरू सेल्फीसाठी कधीतरी त्याच्या जवळ आला तर यायचा, नाहीतर एरव्ही पब्लिक त्याच्या नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर जात चाललं होतं.

दिवाळी संपून बरेच दिवस झाले तरी काही आकाशकंदिल बरेच दिवस दिव्याशिवाय लटकून ठेवायची काही लोकांना सवय असते. टवळ्याचं आणि टवळ्यातल्या सेलिब्रिटीचं आता नेमकं असं झालं होतं…कोणत्याही सेलिब्रिटीचं असं कधी होऊच नये!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -