-मानसी सावर्डेकर
दिवाळी म्हटले की आपल्याला आठवतात ते नवनवीन कपडे, फटाके आणि फराळ, पण मला घडलेले काही विनोदी किस्से आठवतात तर काही मनावर कोरलेले किस्से आठवतात.
किस्सा पहिला :-
मी व माझी वहिनी माझे लग्न झाल्यापासून दोघींचा एकत्र फराळ बनवतो आणि माझी आई आम्हाला मागदर्शन करते. एके वर्षी आम्ही दिवाळीचे सगळे सामान आणले आणि डब्यांमध्ये भरून ठेवले. करंज्या करायच्या म्हणून मी पिठीसाखर करून ठेवली. करंजीचे सारण करण्यासाठी पिठीसाखर काढून सारण केले त्यात घातली. सगळा फराळ झाला. देवाला नैवेद्य दाखवला आणि करंजी तोंडात घातली आणि समजले किती खारट आहे. अरे देवा मी साखर समजून त्यात मीठ घातले होते. आमच्याकडे अशी पद्धत आहे की आधी देवाला फराळ, मग आपण फराळ करायचा (खायचा) त्यामुळे ही फजिती झाली. त्या वेळेपासून कशातही पिठीसाखर घालताना मी आधी बघते नक्की पिठीसाखर आहे की मीठ.
किस्सा दुसरा :-
आम्ही एकत्र फराळ करतो. त्यामुळे चकली करताना भाजणी खूप भिजवावी लागते. आम्ही एकदा चकलीची भाजणीची उकड काढली. चकल्या पाडल्या, तळल्या. दिसताना चकली एकदम मस्त दिसत होती, पण खाऊन बघितली तर चकली मऊ झालेली आता करायचं काय खूप प्रयत्न केले, पण चकल्या काही कडक होईनात. मग आम्ही कंटाळलो आणि त्याची थालीपिठे लावली, पण थालीपिठे तरी किती खाणार. शेवटी आम्ही शेजारी दिली बिल्डिंगमध्ये प्रत्येकाकडे. त्या दिवशी फक्त थालीपीठ आणि आमचे हास्य होते.
किस्सा तिसरा :-
आम्ही लहान असताना आमच्या शेजारी एक कानडी अण्णा राहायचे. आमच्या समोरच मोठे मैदान त्यामुळे आम्ही तिथे संध्याकाळी फटाके उडवत होतो. बाण सगळ्यात शेवटी लावायचो. कानडी अण्णा तिथे फेर्या मारत होते. आम्ही बाटलीत बाण लावत होतो. नेमका मी बाण लावला आणि ती बाटली पडली आणि आडवी झाली. त्यामुळे बाण पण आडवा झाला आणि सुटला आणि नेमका अण्णा जिथे फेर्या मारत होते तिथेच गेला आणि अण्णांच्या लुंगीत शिरला. अण्णा जोरजोरात ओरडत होते आणि त्यांनी लुंगी सोडून ते घराच्या दिशेने पळाले. एवढं सगळं झालं म्हटल्यावर आम्ही पण घाबरून लपून बसलो. ५ मिनिटांनी अण्णा आणि त्यांची बायको कानडी भाषेत शिव्या घालत बाहेर आले. आमचे घरचे पण आले की अण्णा का ओरडत आहेत. आम्हाला आमच्या घरच्यांनी लपून बसलेल्या ठिकाणाहून शोधून अण्णांसमोर उभे केले. अण्णा त्यांच्या भाषेत शिव्या घालत होते आणि आम्हाला काहीही समजत नव्हते. आम्हाला फक्त हसू येत होते आणि अण्णांच्या शिव्या काही थांबत नव्हत्या.
किस्सा चौथा :-
आपण सगळेच दिवाळीत अंगाला उटणे लावतो. एके वर्षी आम्ही सगळे (भावाचे कुटुंब, बहिणीचे कुटुंब, माझे कुटुंब असे एकूण १२ जण) औरंगाबादला सहलीसाठी गेलो होतो. नरक चतुर्दशी होती. या दिवशी आम्ही जशी घरी दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे मुक्काम केलेल्या हॉटेलवर दिवाळी साजरी करायची ठरवली. सकाळी लवकर उठून रांगोळ्या काढल्या. सुगंधी तेल लावले. छोट्या पिशवीत उटणे होते. एका वाटीत काढले आणि आम्ही जो आंघोळीला जाईल त्याला देत होतो. आंघोळीहून आल्यावर प्रत्येक जण म्हणत होता, काय आहे, उटणे आहे पण उटण्याला वास येत नाही.
नंतर माझी बहीण म्हणाली अग याला तर चाट मसाल्याचा वास येतोय. मी खाऊन बघितले तर तो चाट मसालाच होता.
त्यावर्षी आम्ही चाट मसाला लावून अभ्यंग स्नान केले.
पुढचा किस्सा तर मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही लहान असताना दर दिवाळीत आमच्या गावाला म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी जायचो. सकाळी ८.०० ची ठाणे-नाशिक एसटी पकडायची आणि १२.०० वाजता नाशिक सीबीएसला उतरून नंतर नाशिक-कळवण एसटीने दिंडोरीला जायचे. काका-काकूंकडे आमची मस्त दिवाळी साजरी व्हायची. नवीन कपडे, फराळ आणि काकांनी आणलेले खूप खूप फटाके असा आमचा नेम असायचा.
१९८८ सालातील ही दिवाळी. आम्ही दिंडोरीला गेलो होतो. आमचे चुलत भाऊ, आतेभाऊ, बहिणीही त्या दिवाळीत दिंडोरीला आले होते. आमची खूप धमाल चालू होती. नरक चतुर्दशीला पहाटे ४ वाजता उठून मस्त सुगंधी तेल, उटणे लावून आंघोळी आटोपून मोठ्यांच्या देखरेखीखाली आम्ही खूप फटाके उडवले. फराळ झाला. संध्याकाळी छान पणत्या लावल्या आणि घरातील मोठी माणसे आम्ही लहान मुले सगळे अंगणात येऊन बसलो. आम्ही फटाके वाजवले. आमचे फटाके वाजवून झाल्यावर मोठी माणसे आपापल्या कामांसाठी आत निघून गेली. माझी आई, काकू रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागल्या, तर काका त्यांचे कचेरीचे काम करू लागले. आम्ही भावंडे बाहेर खेळू लागलो. तेवढ्यात कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की आपण आत्ताच फटाके उडवले.
उडले नसतील ते फटाके एकत्र करून त्यातील दारू काढायची आणि ती पेटवायची. आम्हाला असे थोडे फटाके सापडले. त्यातील दारू एका कागदावर काढली. ती पूड किती उडेल काय आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आमच्यातील कोणीतरी आगपेटीची काडी ओढली आणि त्या कागदावर टाकली. कागदावर काडी टाकताच मोठ्ठा भडका उडाला आणि तो भडका माझ्या मोठ्या भावाच्या (रत्नाकर दादाच्या) उजव्या हातावर उडाला. तो जोरात ओरडला. घरात काम करीत असलेले आई, काका, काकू सगळे धावत आले. पाहतो तर काय दादाची उजव्या हाताची चार बोटे खूपच भाजली होती. माझेही पुढचे केस थोडे जळाले. दादा खूपच रडत होता. त्याला त्या वेदना असह्य होत होत्या. त्याला रडताना बघून मलाही रडू येत होते.
आम्ही सगळेच खूप घाबरून गेलो होतो. त्याला प्राथमिक उपचार करून डॉक्टरांकडे नेले. आम्ही दिवाळीचे चार दिवस संपल्यावर आमच्या घरी कळव्याला परतलो. दादाला त्या हाताने काहीच करता यायचे नाही. दिवाळीची सुट्टी संपून आमची शाळा सुरू झाली. दादाची व माझी शाळा एकच असल्यामुळे खूपच बरे झाले. शाळा भरताना त्याचे दप्तर त्याच्या वर्गात ठेवायचे. दररोज मधल्या सुट्टीत त्याच्या वर्गात जाऊन ज्या विषयाचे जे लिहून दिले असेल ते जितके मला जमायचे ते मी लिहून घ्यायची. हळूहळू त्याचा हात बरा झाला, पण त्याच्या हातावरचे व्रण अजूनही त्याच्या हातावर आणि आमच्या हृदयात कायम आहेत. सगळ्यांनी खूप फराळ करा, खूप खा. प्रदूषणाचा विचार करून फटाके उडवा. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!