घरफिचर्ससारांशमोनोपॉलीचा प्रवास...डेंजर ते अँड्रॉईड!

मोनोपॉलीचा प्रवास…डेंजर ते अँड्रॉईड!

Subscribe

सेवा देणार्‍या कंपन्या सोबतची लालूच जगभर दाखवित व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालतात. मोनोपॉली स्थापन करण्याचा हा हव्यास ‘डेंजर’ ठरू शकतो. आज जग अँड्रॉईडमय होत असताना जगातून अनेक देशांतील गोपनीयता धोक्यात येत आहे. नुकतेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘अपसाइडडाउनकेक’ हे अँड्रॉईडचे १४ वे व्हर्जन लाँच झाले. मोबाईल एप्लिकेशन्स डिझाईन (मॅड) हा आता नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग बनला आहे. अशा वेळी जगरहाटीच्या दुनियादारीत अँड्रॉईडची कथा ड्रॅमेटिक जशी आहे तशीच संस्थापकांच्या आत्मसंघर्षमय फिलॉसॉफीने स्किल वाढवित खाचखळग्यांपासून सावध करीत प्रेरणा देणारीही आहे.

खरंतर ‘अँड्रॉईड’ची ड्रॅमेटिक कथा सुरू झाली ती २३ वर्षांपूर्वी १९९९ साली! ‘जॉन, जॉनी आणि जनार्दन’ पिच्चरसारखेच अ‍ॅपल, वेबटीव्ही आणि फिलिप्स कंपनीमध्ये काम करणारे तीन समविचारी मित्र एकत्र आलेत. अँडी रुबिन (३६), जो ब्रिट आणि मॅट हर्शन्सन (५१) काहीतरी ‘थ्रिलिंग आणि किलिंग’ करण्याच्या ध्येयाने झपाटलेले! संपूर्ण जगाला भुरळ पडेल आणि प्रत्येक जण ज्याची नोंद घेईल असे काहीतरी! संपूर्ण मानवजातीवर छाप पडेल आणि सेवा घडत अर्थरूपी मेवाही मिळेल असे काहीतरी! मग साकारली ‘डेंजर इनकॉर्पोरेटेड’! टी-मोबाईल साइडकिक सेलफोन, तरुणाईमध्ये मायस्पेस सोशल नेटवर्किंग यामुळे ‘डेंजर धूम’ होती, परंतु ‘डेंजर इनकॉर्पोरेटेड’ने फाईल केलेले पेटंट्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या लढाईत जपानसह इतर अनेक देशांतील दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांशी दिलेली कायदेशीर सनदशीर टक्कर ही ‘डेंजर’ची जमेची आणि तितकीच अत्यंत डेंजर खर्चिक बाजूदेखील होती.

सुरुवात एक आणि…

- Advertisement -

खूप स्कोप आहे म्हणून डिजिटल कॅमेर्‍यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनविणे या उद्देशाने डेंजर इनकॉर्पोरेशनची स्थापना झाली, परंतु पुढे कंपनीने २००४ साली आपला फोकस बदलत स्मार्टफोन टार्गेट केला आणि अत्यंत वेगाने जग काबीज केले. नंतर डेंजर इनकॉर्पोरेशन विभागली गेली. ‘अँड्रॉईड’चा वेगळा ‘संसार’ सुरू झाला, जो आजही एक कॉम्प्युटर प्रोग्रामर, उद्योजक आणि अमेरिकन कॅपिटॅलिस्ट म्हणजे उद्यम भांडवलदार अशी ओळख निर्माण करून आहे. त्याचे नाव अँड्यू ई. रुबिन!

गंमत ‘अँड्रॉईड’ची!

- Advertisement -

खरंतर ‘अँड्रॉईड’ या नावामागे मोठी गंमत आहे. आजपासून ९६ वर्षांपूर्वी १९२७ साली ‘मेट्रोपोलिस’ नावाच्या फिल्मचे कथानक चित्रपट रूपात पडद्यावर आले होते. ‘अँड्रॉईड’ म्हणजे एक चांगला वागणारा दूरचा ‘काल्पनिक रोबोट’ असे काहीसे कॅरेक्टर या चित्रपटात होते. गंमत म्हणजे का कोणास ठाऊक परंतु अँड्यू ई. रुबिन हा अ‍ॅपल कंपनीत कामाला असताना त्यांचे सहकारी तू ‘अँड्रॉईड’ आहेस असे त्याला चिडवित. आधी नावडणारे नाव इतके अंगवळणी पडले की पुढे अँड्यूचे नाव अँडी झाले तरी मित्रपरिवार त्याला ‘अँड्रॉईड’ या टोपन नावाने (निकनेम) हाका मारत असे. मग २००३ साली अमेरिकेत साकारली ती टेक्नॉलॉजी कंपनी – ‘अँड्रॉईड इनकॉर्पोरेशन’!

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना जोडणारा दुवा म्हणजेच इंटरफेस म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम ही एखाद्या मुकादमाप्रमाणे सुरळीत कामासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते, अन्यथा कॉम्प्युटरवर प्रत्येक प्रोग्राम रन करण्यासाठी कृती करताना इंटरप्रिटर आणि कंपायलर वापरून लोक वैतागले असते. प्रत्येक गोष्ट साधी सोपी आणि अगदी ‘युजर फ्रेंडली’ बनते ती याच ऑपरेटिंग सिस्टीम वापराने हे विशेष!

‘अँड्रॉईड’ ही खरंतर मोबाईल फोन आणि टॅबलेट कॉम्प्युटरसाठी विकसित केलेली ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ (ओएस) म्हणजेच संचालन प्रणाली आहे. ओपन कोड असलेली लिनक्सवर आधारित आणि जावा प्रोग्रॅमिंगचा वापर करून ‘अँड्रॉईड ओएस’ तयार केली गेली.

बडी मछली
मोठा मासा छोटे मासे खाऊन गब्बर होतो, असे म्हणतात. अमेरिकन सर्च इंजिन कंपनी असणारी गुगल इनकॉर्पोरेशनची नजर अँड्रॉईड इनकॉर्पोरेशनवर पडली आणि ११ जुलै २००५ रोजी गुगलने ५० दशलक्ष डॉलर्स (४१ हजार ४०५ कोटी रुपये) मोजून आपला मालकी हक्क प्राप्त केला. विशेष म्हणजे अवघ्या १० वर्षांत अँड्यू ई. रुबिनची संपत्ती ३५ पटीने वाढली. ११ फेब्रुवारी २००८ रोजी ‘डेंजर इनकॉर्पोरेशन’ ला ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे अँड्रॉईडच्या दहापट किंमत देऊन मायक्रोसॉफ्टने विकत घेतले होते. विशेष म्हणजे दोन्ही आर्थिक व्यवहार वादग्रस्त ठरले आणि जगभरच्या मीडियाला यात भरपूर ‘खाद्य’ मिळाले. अँड्रॉईडच्या संस्थापकाला गुगल या ‘बडी मछली’ने व्हाइस प्रेसिडेंट या पदाची ऑफर आणि घसघशीत रक्कम मोजल्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये २०१३ साली प्रेयसीने केलेल्या लैंगिक अत्याचाराचा हवाला हा आरोप ठेवून घरचा रस्ता दाखविला गेला.

बॅड नेम
‘गिव्ह अ डॉग बॅड नेम बिफोर किलिंग’ अशी एक परदेशी म्हण आहे. थोडक्यात एखाद्याला संपविण्यासाठी त्याची बदनामी करा असा तिचा अर्थ असतो. आपल्याला संपवण्यासाठी हे षड्यंत्र आहे, असे ओरडून सांगितले तरीही कुणी ऐकले नाही, असे म्हणतात, ‘हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर’ यांना जोडणारा पैशाने अमाप श्रीमंत असूनही आपले कुटुंब जोडण्यासाठी ‘सिस्टीम’ बनविण्यात अयशस्वी ठरला, मात्र ‘हार नही मानुंगा’ हा ध्येयमंत्र म्हणत घटस्फोटानंतर पुन्हा उभा राहत स्वत:ला सावरत एका नव्या करियरची सुरुवात केली. कॅलिफोर्नियात ‘सिंपल थिंग्ज’ नावाचे स्टार्टअप सध्या अँड्यू ई. रुबिनने सुरू केले आहे.

स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग!
धोरणात्मक नियोजन किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असे गुगलसह प्रत्येक कंपनीचे आर्थिक मार्केट काबीज करण्यासाठी ‘सेवाधोरण’असते. ते चुकीचे की बरोबर हा वाद असू शकतो, मात्र आज संपूर्ण जग अँड्रॉईडमय झाले हे सत्य नाकारून चालणार नाही. जगातील १९५ देशांसमोर इंटरनेट आणि मोबाईल वापरताना ‘अ‍ॅपल’सारखे मर्यादित आणि महागडे पर्याय आहेत. परिणामी ‘अँड्रॉईड’ वापरताना आपल्या मोबाईल हँडसेटमध्ये दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम टाकायचीच नाही अशी जबरदस्त आणि जबरदस्ती अट गुगलची ‘मार्केट स्ट्रॅटेजी’ ठरली. विशेष म्हणजे गुगलने ५ नोव्हेंबर २००७ रोजी इंटेल कॉर्पोरेशन, मोटोरोल इंक, एनव्हीआयडीए कॉर्पोरेशन, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इन्कॉर्पोरेटेड, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इन्क, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, स्प्रिंट नेक्स्टेल कॉर्पोरेशन आणि टी-मोबाईल (डच टेलिकॉम) यांसारख्या डझनभर तंत्रज्ञान आणि मोबाईल टेलिफोन कंपन्यांचा एक समूह असलेला ओपन हँडसेट अलायन्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

मोनोपॉली!
आज मोनोपॉली निर्माण करीत गुगलच्या ‘अँड्रॉईड ओएस’ने जगभरातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट काबीज केले आहे, असे रिपोर्ट आहेत. गुगलने जगातील जवळपास सर्व मोबाईल हँडसेट बनविणार्‍या कंपन्यांना आपले ‘अँड्रॉईड ओएस’ फ्री दिले. परिणामी मोबाईल फोन स्वस्त झालेत. भारताच्या डिजिटल क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी यामुळे मदत झाली हे खरे आहे तरी त्याची किंमत स्वातंत्र्य हिरावून गुगलने आपली मक्तेदारी निर्माण केली ती अँड्रॉईड वापरत! भारताच्या स्पर्धा नियंत्रक यंत्रणेने २५ ऑक्टोबर २०२२ रोजी गुगलला २२७३.७६ कोटींचा म्हणजे याआधी १,३३७.७६ कोटी रुपये आणि नंतर ९३६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

चुकीच्या पद्धतीने खुल्या बाजारात स्पर्धा केल्यामुळे गुगलला हा दंड झाला आहे. गुगलने अ‍ॅप स्टोअरच्या राज्यात स्वत:च्या प्रबळ स्थानाचा दुरुपयोग करीत अ‍ॅप बनवणार्‍यांना इन-अ‍ॅप पेमेंट करण्याची जबरदस्ती केली. गुगलने त्यांच्या सेवा वापरणार्‍यांना गुगल क्रोम, यू ट्यूब, गुगल मॅप्स आणि इतर सेवांचा गुच्छच वापरण्यासाठी जबरदस्ती भाग पाडले. २०१९ साली अँड्रॉईड स्मार्टफोनच्या ग्राहकांनी याची तक्रार केल्यानंतर याबद्दलची चौकशी सुरू झाली. युरोपमध्येही अशाच प्रकरणी गुगलला ५ अब्ज डॉलर्सचा दंड झाला होता. अँड्रॉईड ओएसला ‘नो’ केल्याने नोकिया ही जगातील एकेकाळी बलाढ्य आणि एक नंबरची असलेली कंपनी आपल्या केवळ एका निर्णयामुळे अक्षरश: धुळीस मिळाली, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

सेवा देणार्‍या कंपन्या सोबतचे लालूच जगभर दाखवित व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालतात. मोनोपॉली स्थापन करण्याचा हा हव्यास ‘डेंजर’ ठरू शकतो. आज जग अँड्रॉईडमय होत असताना जगातील अनेक देशांमधील गोपनीयता धोक्यात येत आहे. नुकतेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘अपसाइडडाउनकेक’ हे अँड्रॉईडचे १४ वे व्हर्जन लाँच झाले. मोबाईल एप्लिकेशन्स डिझाईन (मॅड) हा आता नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग बनला आहे. अशा वेळी जगरहाटीच्या दुनियादारीत ‘अँड्रॉईड’ची कथा ड्रॅमेटिक जशी आहे तशीच संस्थापकांच्या आत्मसंघर्षमय फिलॉसॉफीने ‘स्किल’ वाढवित खाचखळग्यांपासून सावध करीत प्रेरणाही देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -