घरफिचर्ससारांशअशी रोखली शिक्षणक्षेत्रात लुडबूड करणारी भोंदूगिरी...

अशी रोखली शिक्षणक्षेत्रात लुडबूड करणारी भोंदूगिरी…

Subscribe

महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली आध्यात्मिक बुवाबाजी चालवणार्‍या एका मोठ्या संप्रदायाने कोरोनाचे संकट टाळण्यासाठी नामी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तावर होमहवन, पूजा-पाठ, मंत्रघोष असे विविध कर्मकांड केल्याने, कोरोनाचे भयंकर संकट केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून आणि जगातूनही नष्ट होईल, त्यामुळे जगात शांतता निर्माण होईल, असा जाहीर दावा या संप्रदायाने केला. पण वेळीच हालचाल करून अंनिसने या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला.

भारतात कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटाची चाहूल मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये लागली होती. कोरोना विषाणूची निर्मिती, त्याचा प्रसार होण्याची कारणे, आजाराची लक्षणे, त्यावर करावयाचे वैद्यकीय उपचार, लसनिर्मिती या चिंतेने जगातील वैद्यकीय क्षेत्राची झोप उडाली होती. लगोलग शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी विविध वैद्यकीय चाचण्या, तपासण्या सुरू केल्या. विज्ञानाच्या पद्धतीप्रमाणे ते योग्यही होते. मात्र त्याचवेळी आमच्याकडे अध्यात्माच्या नावाखाली कोरोनावर जालीम उपाय सांगण्यासाठी दैवी उपाय, उपचारांची चढाओढ सुरू झाली. त्यामध्ये तंत्र-मंत्र, होमहवन, गंडेदोरे, मंत्र जप, अशा अनेक निरर्थक कर्मकांडांना पुन्हा उजाळा देण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू झाला. अशा भीतीदायक परिस्थितीत लोकांच्या आध्यात्मिक, धार्मिक श्रद्धा, भावनांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करता येतो, हे ह्या क्षेत्रातल्या भोंदूंना पक्कं ठाऊक असतं.

साधारणपणे वर्षभराने शास्त्रज्ञांनी कोरोनावर काही प्रमाणात प्रभावी अशी प्रतिबंधक लस शोधण्यात यश मिळवले आहे. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कोरोनावर तथाकथित दैवी उपाय आणि उपचार करून घेण्यास सांगणारी ही भोंदू मंडळी, स्वतः मात्र कोरोनाची लस टोचून घेण्यास आघाडीवर होती, असे दिसत होते. कोरोनावर खात्रीशीर असा दैवी उपाय, उपचार सांगणारी ही धूर्त मंडळी, असा उपाय, उपचार स्वतःसाठी का बरं करून घेत नसावेत ?

- Advertisement -

महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली आध्यात्मिक बुवाबाजी चालवणार्‍या एका मोठ्या संप्रदायाने ह्या काळात कोरोनाचे संकट टाळण्यासाठी नामी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला. ह्या संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तावर होमहवन, पूजा-पाठ, मंत्रघोष असे विविध कर्मकांड केल्याने, कोरोनाचे भयंकर संकट केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून आणि जगातूनही नष्ट होईल, त्यामुळे जगात शांतता निर्माण होईल, असा जाहीर दावा या संप्रदायाने केला. त्याचे वेळापत्रकही तयार केले. लोकांपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विज्ञानाने शोधलेल्या साधनांचाच उपयोग केला गेला. अर्थातच हे सेवाभावी काम, संप्रदायातील सेवकांमार्फत इमानेइतबारे करण्यात येत होते. एवढ्यावरच ही मंडळी थांबली नाही, तर त्यांनी, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील, जिल्हा प्रशासनाला या दैवी उपायांची महती पटवून देण्यात यश मिळवले. हा उपक्रम जर शाळांशाळांमधून संस्कारक्षम वयातील मुलांमध्ये राबविला तर, त्यांना कोरोनाचा धोका राहणार नाही, असे सांगण्यात आले. या फसव्या दाव्याला भुलून, जिल्हा प्रशासनाने लगेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांना फर्मावले. शिक्षणाधिकार्‍यांच्या अखत्यारितला शाळाशाळांमधून सदर उपक्रम राबवावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले.

या तथाकथित अध्यात्माच्या संप्रदायाचा सेवक-वर्ग शाळेत जाऊन काही विज्ञानाचे प्रयोग करतील. भारतीय संस्कृतीत त्यांचे कसे आणि किती महत्व आहे किंवा होते, ते सांगतील. थोडक्यात, अध्यात्म व विज्ञान याची जोड घालून, कोरोनापासून बचाव होण्यासाठी दैवी उपाय सांगतील. ते मुलांसाठी फारच उपयोगाचे ठरू शकतात, असे ठासून सांगितले गेले. खरंतर, संप्रदायातील सेवकांमार्फत विज्ञानाच्या नावाखाली छद्मविज्ञानाचा वापर करून, दैववादाचे धडे शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले जाणार होते. त्यातून कोणतेही संकट दूर होणार नव्हते. हे निश्चित होते. तरीही असा अवैज्ञानिक कार्यक्रम राबवण्याचे आदेश जारी केले गेले. हा कार्यक्रम राबवण्याचा मुहूर्त ठरला, 28 फेब्रुवारी, म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन !!! शिवाय या मोहिमेला नाव दिले गेले, ‘विज्ञान महोत्सव.’ याला म्हणतात चलाखी!! तथाकथित आध्यात्मिक मंडळींकडून छद्मविज्ञानाचा वापर होतो, तो असा.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाचा आदेश मिळताच, जिल्हा शिक्षण विभागाने लगेच परिपत्रक काढून, शाळांना कळविले. एका जागृत शिक्षक बांधवाने सदर परिपत्रक महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना पाठवले. लगेच कार्यकर्ते कामाला लागले. जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यांनी काढलेल्या परिपत्रकातील आशय हा, भारतीय राज्यघटनेत भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला आणि शिक्षणातील मूलभूत गाभाघटक म्हणून जाणीवपूर्वक शिक्षणात समाविष्ट केलेला, वैज्ञानिक दृष्टिकोन याच्याशी कसा विसंगत आहे, हे कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांना पटवून दिले.

पण त्यांची अडचण अशी होती की, कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी काढलेला आदेश, जिल्ह्यातील शाळांशाळांपर्यंत पोहोचला होता. हा विज्ञान महोत्सव साजरा करण्यासाठी संप्रदाय सेवकांनी पुरेपूर नियोजन केले होते. दोनच दिवसांवर कार्यक्रम येऊन ठेपला होता. मग आता हा कार्यक्रम कसा काय रद्द करता येईल?

मात्र, तथाकथित आध्यात्मिक संप्रदायामार्फत शाळांमधून कार्यक्रम राबविला जाऊ नये, त्याऐवजी राष्ट्रीय दिनानिमित्त विज्ञानानाचे मनोरंजक प्रयोग, प्रबोधनपर, सृजनशील कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या सहभागातून घेण्याचा आदेश काढावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना केली. मात्र तरीही ते राजी होईनात. त्यांचे म्हणणे असे होते की, कार्यकर्त्यांचे हे म्हणणे सर्व खरे आहे आणि संप्रदायातील सेवकांमार्फत होणारा हा कार्यक्रम थांबायलाही पाहिजे, असे त्यांनाही वाटते. पण असा विज्ञान महोत्सव शाळाशाळांमधून राबवावा, असे जिल्हा प्रशासनानेच त्यांना कळवले आहे. त्यामुळे ते, त्यांच्या अधिकारात कार्यक्रम रद्द करू शकत नव्हते. जिल्हा प्रशासनाने जर कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले तरंच पुढील कार्यवाही ते करू शकणार होते, अशी अतिशय नम्रपणे कबुली शिक्षणाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना दिली.

कार्यकर्त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. कारण वेळ फारच कमी होता. जिल्हा प्रशासनासमोरही कार्यकर्त्यांनी वरीलप्रमाणे पाढा वाचला. त्यांच्यामार्फत जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना तथाकथित आध्यात्मिक संप्रदायाच्या सेवकांमार्फत शाळाशाळांमधून राबविण्यात येणारा जिल्हा विज्ञान महोत्सव तातडीने रद्द करावा, तसे पत्र लगेच शिक्षणाधिकार्‍यांना द्यावे, अशी विनंती कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली. तासाभरात अशा आशयाचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना प्राप्त झाला. तोपर्यंत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयानेही, सदर विज्ञान महोत्सव फक्त शिक्षक, विद्यार्थी यांनीच साजरा करावा, असे परिपत्रक काढून, कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले.

सदर तथाकथित आध्यात्मिक संप्रदायाच्या भावनिक आवाहनाला भूलून, विज्ञान महोत्सवाचा कार्यक्रम आदिवासी शासकीय आश्रम शाळांमधून राबवण्याचे परिपत्रक, आदिवासी विकास प्रकल्पाच्या एका विभागाच्या उपायुक्तांनी, त्या विभागासाठी काढले होते. त्याच्या अंमलबजावणीची पूर्ण तयारी झाली असल्याचे, महाराष्ट्र अंनिसच्या त्या विभागातील कार्यकर्त्यांना कळाले. तेथील मा. उपआयुक्त, आदिवासी विभाग यांचे याबाबतचे परिपत्रकच कार्यकर्त्यांना प्राप्त झाले.

एका जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यक्रम रद्द करण्यात यश मिळवलेले कार्यकर्ते लगेच मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या दालनात पोहचले. पुन्हा वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्यांची व परिपत्रकातील आशय यांतील विसंगती यावर मा.आयुक्त, आदिवासी विकास विभाग, यांच्याशी चर्चा केली. आयुक्त साहेबांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन, संबंधित आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्तांना लगेच त्यांनी काढलेले परिपत्रक रद्द करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. मात्र दरम्यान तेथील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संबंधित उपायुक्त, आदिवासी विभाग यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, एका जिल्ह्यातील कार्यक्रमात रद्द करण्यात आल्याचे परिपत्रकच त्यांना दाखवले. त्यांनी तातडीने सदर संप्रदायाच्या सेवकांमार्फत आदिवासी आश्रम शाळांमधील राबवण्यात येणारा विज्ञान महोत्सव रद्द करून नावीन्यपूर्ण उपक्रम शाळांनीच राबवून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करावा, असे परिपत्रक काढले होते. सदर परिपत्रक, आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांना कार्यकर्त्यांनी लगेच दाखवले. त्यामुळे एक दिवस अगोदरच, शिक्षण क्षेत्रात लुडबूड करणारी ही आध्यात्मिक बुवाबाजीची भंकसगिरी रोखण्यात कार्यकर्त्यांना पूर्णपणे यश मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -