Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश लोककथा ७८ छायाचित्र तर आरण्यक भव्य पेंटिंग!

लोककथा ७८ छायाचित्र तर आरण्यक भव्य पेंटिंग!

आरण्यक या नाटकाबाबतची एक गोष्ट. माधव मनोहर यांच्या घरी आम्ही दोघं मित्र एकदा गेलो असताना, तिथं धों. वि. देशपांडे (अश्मसार) होते. गप्पा नव्या नाटकांवर आल्या. तेव्हा त्यांनी विचारलं ः ‘लोककथा -७८’ बघितलंत? होकारार्थी उत्तर दिल्यावर, पुढचा प्रश्न होताः कसं वाटलं? आता ते नाटक फारच गाजत होतं. तरीही, खरं सांगायचा निश्चय करून (भीत भीतच) म्हटलंः चांगलं आहे, पण ‘आरण्यक’ची सर त्याला यायची नाही. तेव्हा ते काय म्हणतात याची उत्सुकता होती. त्यांनी काहीही म्हटलं, तरी ते ऐकून घ्यायची तयारी होती. कारण त्यांचा अधिकारच तसा होता. माझं उत्तर ऐकून ते हसले. म्हणालेः बरोबर आहे. (मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.) अरे, तुम्हाला सांगू का, ‘लोककथा -७८’ म्हणजे छायाचित्र आहे, तर ‘आरण्यक’ म्हणजे भव्य पेंटिंग आहे! केवळ एका वाक्यात त्यांनी दोन्ही नाटकांचं अचूक मूल्यमापन केलं होतं. असं हे ‘आरण्यक’.

Related Story

- Advertisement -

खर्‍या अर्थानं चतुरस्र म्हणावा असा लेखक आता आपल्यात नाही. त्याच्या कथांनी दिला नसेल एवढा धक्का त्याच्या निधनाच्या बातमीनं सर्वांना दिला. कारण, साहित्याच्या दुनियेतल्या विविध प्रांतात त्याचा मुक्त संचार होता आणि त्यायोगे तो वाचकांना भरपूर आनंद देत होता. त्याच्या कथा सुखावत. भयकथा घाबरवत. थरकाप उडवत. तर गूढकथा त्याला गुंतवून टाकून अचानक पेचात टाकत आणि शेवटी असा धक्का देत की त्याचा थरकापच होई. त्याचं ललित लेखनही वैशिष्ठ्यपूर्ण असे आणि कादंबर्‍याही वेधक असत. चित्रकलेची ओढही त्याला स्वस्थ बसू देत नसे.

असं असलं, तरी त्याची ओळख जास्त करून नाटककार म्हणूनच फार पूर्वीपासून होती. नाटकाच्या संदर्भातील सारं काही त्याला माहीत होतं. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य इ.इ. त्यानं मालिका केल्या, चित्रपट केला, चित्रपटांच्या कथा संवादही लिहिले. या तिन्ही माध्यमांमध्ये ते लेखक, दिग्दर्शक, नट अशा अनेक बाजू सांभाळत, तरी त्यांचं नाटकांशी नातं म्हणजे राजाचं लाडक्या राणीशी असावं तसं होतं, असंच वाटायचं. कदाचित चूकही असेल. त्यांचा हा सर्वत्र चाललेला संचार पाहून नारदाचीच आठवण व्हायची. कोणताही प्रांत त्यांना वर्ज्य नव्हता. अर्थात, नारदाप्रमाणं बुद्धी असली, तरी त्यांनी त्याच्याप्रमाणं कळलावेपणा मात्र कधीच केला नाही. त्याचप्रमाणं कुणाबाबत अनुदार उद्गारही कधी काढल्याचं ऐकिवात नाही.

- Advertisement -

अशी प्रचंड निर्मिती करूनही या कलाकाराचं समाधान झालं नव्हतं. अजून तर बरंच काही करायचं आहे असंच तो म्हणायचा. अगदी गांधी-अखेरचं पर्व या नाटकापर्यंत. (दुर्दैवानं ते त्याचंही अखेरचं पर्व ठरलं. ते नाटक रंगभूमीवर आणायचं स्वप्नही अपूर्णच राहिलं, कदाचित कुणी ते पूर्ण करीलही, तीच त्याला आदरांजली असेल!). नेहमी असं वाटायचं की तो कधी स्वस्थ, निवांत बसलाच नसेल.

या कलाकाराची ओळख रत्नाकर मतकरी, अशी होती.
रत्नाकर मतकरी. सतत काहीतरी नवं करायचं हेच जणू त्याचं व्यसन होतं. ते त्यांनी लपवूनही ठेवलं नव्हतं. त्यामुळंच त्यांच्या कथांमध्ये काय किंवा नाटकांमध्ये काय, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असायचं. एखाद्या बाबीमुळं यश मिळालं म्हणून तिच्या आवृत्या काढत बसायचं त्यांना बहुधा ठाऊकच नसावं, पण त्यांच्या या नव्याच्या हव्यासानं त्यांच्याइतकंच समाधान त्यांच्या वाचकांना, प्रेक्षकांना दिलं.

- Advertisement -

केवळ त्यांच्या कथेसाठी दिवाळी अंक विकत घेतले जात. त्या कथांचं पुस्तक आलं की त्याला चांगली मागणी असे. त्याच्या आवृत्याही निघत, पण फॉर्म्युला हा शब्दच त्यांना भावत नसावा. मनात आलं आणि आपल्याला पटलं की बस. ते त्यावर काम सुरू करत. काम तरी कसं, तर जणू काही ती नोकरीच आहे अशा प्रकारे. सुरुवातीला बराच काळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची ही कामं चालत. नोकरी सांभाळून ते हे सारं कसं जमवत याचंही आश्चर्य वाटायचं.

पण नंतर मात्र हे सारं सुरू झालं … अगदी नियमानं. (अर्थात हे सुरू झालं, हे त्यांनी आता पूर्ण वेळ लेखनाला द्यायचा असं ठरवून बँकेतली नोकरी सोडल्यावर. तसं त्याआधी काही काळ, त्यांनी जास्त जबाबदारी आली तर लेखनाला, नाटकांना पुरेसा वेळ देता येणार नाही, या कारणानं बढतीही नाकारली होती. अशी लेखनावरची अव्यभिचारी निष्ठा दुर्मीळच.)

याबाबत अनेकांनी त्यांच्या आठवणींमध्ये सविस्तर सांगितलंच आहे, त्यामुळं पुनरुक्ती नको.
त्यांच्या या प्रत्येक कामाच्या, त्यांना मिळालेल्या लोकांच्या पसंतीच्या एक दशांशदेखील कुणाला लाभला असता, तर त्याला धन्य झाल्यासारखंच वाटलं असतीं, पण मतकरींना ते पुरेसं वाटत नव्हतं. उलट आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे, असंच ते म्हणत. बालनाट्यांनी सुरुवात केल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या कथांना अनेक बक्षिसं मिळाली. राज्य पुरस्कार मिळाले. नाटकांनी राज्य स्पर्धेत अनेक पारितोषकं (ते पारितोषिक असं कधीच लिहीत नसत. कारण तशी प्रथा असली, तरी तसं लिहिणं चूक आहे म्हणून.) मिळवली. चित्रपटाला राष्ट्रीय सन्मान मिळाला. देशा परदेशांत त्याचं कौतुक झालं, पण म्हणून ते तिथंच थांबले नाहीत. ते मागे पडलं असं समजून नवीन काय करायचं या तयारीला लागत. (याबाबतीत त्यांचं साम्य देव आनंदशी होतं.) त्यांना अनेक गोष्टी करायच्या असत आणि काय करायचं याची यादी तयार असे.

त्यांच्यावर आलेल्या लेखांमध्ये हे सारं सविस्तर वाचायला मिळालं, पण एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटलं. त्यांच्या कारकिर्दीची उजळणी करताना त्यांच्या अद्वितीय अशा एका महान नाट्यकृतीचा मात्र कुणी उल्लेख केला नाही याचं. अर्थात ते सारं घाईगर्दीत केलेलं लेखन असल्यानं चटकन न आठवल्यानं तसं झालं असेल. मात्र, त्याची आठवण होणं अपरिहार्य आहे.

त्यांचं ते नाटक म्हणजे ‘आरण्यक’.
मतकरींना हे नाटक कसं सुचलं हे त्यांनी ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकात दिलं आहे. इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यांना प्रश्न पडला की, युद्ध संपलं. पांडवांचं राज्य सुरू झालं, पण मग त्यानंतर धृतराष्ट्र, विदुर, गांधारी, कुंती या वडील मंडळींचं काय झालं. ते वनात गेले आणि तिथंच त्यांचा अंत झाला. याखेरीज फारसं काही कळत नाही. त्यामुळं त्याचाच विचार आपण करायचा असं मनात ठरवून, त्यांनी त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. तीनेक वषार्र्ंनंतर सारं जुळून आल्यावर आता लिहायला हरकत नाही, असं त्यांना वाटलं. बहुधा नावही तेव्हा पक्कं झालं. ‘आरण्यक’ पण त्यांच्याच मनात आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला, की या आगळ्या वेगळ्या विषयासाठी भाषा कोणती वापरायची?

आणि विचारांती त्यांनी ते लयबद्ध मुक्तछंदात लिहिलं. त्याबरोबरच ग्रीक ट्रॅजिडीचं तंत्रही वापरलं. राजवाड्यातील सार्‍या घटनांचा साक्षीदार प्रतिहारी. (आणि त्याच्याबरोबर साथीला वृंद-कोरस.) प्रतिहारी. तो सारं जणू प्रेक्षकांसाठीच पाहतो आणि सांगतो आहे, असं. मोजकीच पात्र आणि मोजकंच नेपथ्य. काही पायर्‍यांचं. असं असूनही प्रेक्षकांना कसलीच उणीव भासू नये असे प्रभावी संवाद आणि त्यांना अभिनयाची जोड. एक युधिष्ठिर वगळला तर पुढच्या पिढीतलं कुणीच मंचावर येत नाही. येतात त्यांचे आवाज, भीमाच्या गर्जना आणि कृष्णाचा धीरगंभीर आवाज (आणि त्याच्या बासरीचाही)! पण त्यामुळं मोठाच परिणाम साधला गेला. लयबद्ध संवादांना पार्श्वसंगीतही तेवढंच परिणामकारक. अनेकदा तर काही काळ फक्त तेच.

यातला सर्वात प्रभावी प्रसंग विदुराच्या निर्वाणाचा. तो अगदी सूचकतेनं दाखवलेला आणि त्यामुळंच थक्क करणारा. शेवटी विदुराला पित्याप्रमाणं मानणार्‍या युधिष्ठिराला तो मिठीत घेतो आणि दोघांचे आत्मे एक होतात, हे ज्या सूचकतेनं दाखवलं गेलं होतं त्याला तोडच नाही. काही क्षणांच्याच या प्रसंगानं स्तब्ध व्हायचं प्रेक्षागार.

नुकतंच या नाटकाचं पुनरुज्जीवन झालं, पण ते पाहण्याचा योग आला नाही. एका वाहिनीनं त्याचं चित्रण करून प्रसारणही केलं होतं. त्याला नव्या, समाज माध्यमांनाच सर्वस्व मानणार्‍या पिढीचा कसा प्रतिसाद मिळाला कळायचा मार्ग नाही, पण कदाचित त्यांना महाभारतच जेमतेम माहीत असण्याची शक्यता. तिथं त्यातील असं नाट्य त्यांना कितपत भावलं असेल अशी शंका. (पहिल्यांदा देखील काहीजणांनी म्हातार्‍यांची बडबड असं त्याचं वर्णन केलं होतच की! रंगदेवता त्यांना क्षमा करो!)
त्या नाटकाचं पुस्तक तर अनेकदा वाचलंय, तरीही समाधान न झाल्यानं पुन्हा वाचावसं वाटतं.

तर या नाटकाबाबतची एक गोष्ट. माधव मनोहर यांच्या घरी आम्ही दोघं मित्र एकदा गेलो असताना, तिथं धों. वि. देशपांडे (अश्मसार) होते. गप्पा नव्या नाटकांवर आल्या.

तेव्हा त्यांनी विचारलं ः ‘लोककथा -७८’ बघितलंत?
होकारार्थी उत्तर दिल्यावर, पुढचा प्रश्न होताः कसं वाटलं?
आता ते नाटक फारच गाजत होतं. तरीही, खरं सांगायचा निश्चय करून (भीत भीतच) म्हटलंः चांगलं आहे, पण ‘आरण्यक’ची सर त्याला यायची नाही.
तेव्हा ते काय म्हणतात याची उत्सुकता होती. त्यांनी काहीही म्हटलं, तरी ते ऐकून घ्यायची तयारी होती. कारण त्यांचा अधिकारच तसा होता.

माझं उत्तर ऐकून ते हसले. म्हणालेः बरोबर आहे. (मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.) अरे, तुम्हाला सांगू का, ‘लोककथा -७८’ म्हणजे छायाचित्र आहे, तर ‘आरण्यक’ म्हणजे भव्य पेंटिंग आहे!
केवळ एका वाक्यात त्यांनी दोन्ही नाटकांचं अचूक मूल्यमापन केलं होतं.
असं हे ‘आरण्यक’.

दुसरी जाणवलेली गोष्ट त्यांच्या ‘अ‍ॅडम’ या कादंबरीची. या वेगळ्या आणि त्या काळात कुणीच फारसा विचार करत नसलेल्या, नव्हे त्या विषयावर लिहायचं बोलायचं नाही, असा जणू अलिखित संकेत असताना, त्यांनी ‘अ‍ॅडम’ ही सेक्स या विषयावरील कादंबरी लिहिण्याचं धाडस केलं. असं अर्थात आपल्याला वाटतं. त्यांना त्यात काय मोठं असंच वाटलं असणार. कोणतीही पोज न घेता, त्यांनी ती लिहिली होती. आपण यात काही वेगळं करत आहोत, असंही त्यांनी कुठं म्हटलं नाही. कादंबरीच्या विषयामुळंच तिच्याबाबत नुसतीच (फुकाची) चर्चा झाली. तसं पाहिलं, तर ‘अ‍ॅडम’ या नावानंच त्यांनी बरंच काही सूचित केलं होतं, पण खर्‍या अर्थानं तिचं मूल्यमापन झालंच नाही, असं वाटतं. ते कधीतरी व्हायला हवं असंही वाटतं.

आणखीही एक वाटतं. साहित्य अकादमीनं त्यांना बर्‍याच उशिरा बालनाट्यातील कामगिरीबद्दल जीवनगौरव सन्मान दिला, तेव्हा चाळीस वर्षांनंतर ही दखल घेतली गेली, असं त्यांनी त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावाप्रमाणं सांगितलंही. अर्थात त्याला उत्तर देणं कुणालाच जमणारं नव्हतं, पण त्याच वेळी मनात येऊन गेलं, साहित्य अकादमीनं आरण्यकला साहित्य पुरस्कार का दिला नसेल? त्याची थोरवीच त्यांना उमगली नसेल असं काही म्हणता यायचं नाही, पण कुणीतरी झारीतला शुक्राचार्य नक्कीच आडवा आला असणार, असं वाटतं. अर्थात, या सवार्र्पेक्षा मोलाचं रसिकांचे प्रेम त्यांना लाभलं. आणि त्यांनीही ते समाधानानं स्वीकारलं. मराठी भाषा आहे, तोवर त्यांची ही कलाकृती असणारच आहे.

तसं पाहिलं तर मतकरींचा मृत्यूही गूढच म्हणायला हवा. त्यांच्या मुलीनं म्हटलं आहे की, ते तर कुठं बाहेर जात नव्हते. तरीही करोनानं त्यांच्यावर कसा हल्ला केला?

तसं हे धक्कादायकच आहे. कदाचित सवयीमुळं नकळत झालेल्या कोणत्यातरी वस्तूला त्यांनी केलेल्या स्पर्शामुळंही हे घडलं असू शकेल, पण तसं काही झालं नसलं, तर…

… हा विचार मनात येताच ‘रेबिड’ नावाची कादंबरी आठवली. तिच्यात कुत्रा चावल्यानं होणार्‍या रेबीज या जीवघेण्या रोगाच्या भयंकर प्रसारानं माजवलेली खळबळ आणि भीती परिणामकारकपणे वर्णन केली आहे. कादंबरीच्या शेवटी त्या रोगावर संशोधन करणारे आपसात बोलत असतात. एक डॉक्टर म्हणतोः ‘तरी बरं, या रोगाचा फैलाव हवेतून होत नाही!’
त्याचे हे उदगार ऐकल्यानंतर, त्याच विषयावर संशोधन करणारा डॉक्टर गंभीर स्वरात म्हणतोः ‘असं आपण आजवर समजत होतो !! …’

तसंच काही असेल की काय, … या विचारानंच थरकाप होतो. … मतकरींच्या कथांअखेरच्या धक्क्यानं व्हायचा तसाच!

- Advertisement -