महाराष्ट्राचे खेळात पाऊल पडते मागे!

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक (ब्राँझ) मिळवणारे खाशाबा जाधव याच महाराष्ट्राच्या मातीतले. बिलियर्ड्स आणि स्नूकरचे भारताचे पहिले जागतिक विजेते विल्सन जोन्स, मायकेल फरेराही या राज्याचेच. स्क्वॉशमध्येही येथील खेळाडूंनी प्रभाव दाखवला आहे. कबड्डी, खोखो, वॉटरपोलो तसेच इतरही काही खेळांमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक वेळा विजेता होता. दुर्दैवाने सध्या मात्र कबड्डी, खोखोतील त्याची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. हॉकीमध्येही काही प्रभाव दिसलेला नाही. जलतरणात तर वीरधवल खाडे आणि वॉटरपोलो संघातील भरत मर्चंट, संजय करंदीकर अशा खेळाडूंचे यश दिसते. जिम्नॅस्टिक्सला मात्र असे कोणी मिळालेले नाही. हॉकीत धनराज पिल्ले, रोईंगमध्ये दत्तू भोकनाळ अशी काही ऑलिम्पियनची नावे सापडतात. खेळांच्या राज्यातील संघटकांनी योग्य प्रकारे आत्ताच विचार केला नाही, तर मग फार उशीर झाला असेल.

महाराष्ट्राचे खेळांबरोबरचे नाते खूप जुने आहे. म्हणजे 1960 मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून त्याची स्थापना होण्याआधीपासून. येथेच सर्वप्रथम ऑलिंपिक समितीच स्थापना झाली, पहिली मॅरेथॉन स्पर्धाही आयोजित करण्यात आली. बॅडमिंटनची. पुणे तर बॅटमिंटनची जन्मभूमीच. जागतिक खेळाडूंचा सहभाग असलेल्या अनेक स्पर्धांचे राज्यात आयोजन केले गेले. डेव्हिस चषक टेनिसच्या लढतीही पुण्यात झाल्या. कुस्ती हा काही काळ या राज्याचा खेळ होता. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक (ब्राँझ) मिळवणारे खाशाबा जाधवही याच मातीतले. बिलियर्ड्स आणि स्नूकरचे भारताचे पहिले जागतिक विजेते विल्सन जोन्स, मायकेल फरेराही या राज्याचेच. स्क्वॉशमध्येही येथील खेळाडूंनी प्रभाव दाखवला आहे. कबड्डी, खोखो, वॉटरपोलो तसेच इतरही काही खेळांमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक वेळा विजेता होता. (दुर्दैवाने सध्या मात्र कबड्डी खोखोतील त्याची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. हॉकीमध्येही काही प्रभाव दिसलेला नाही.)

एकेकाळी फुटबॉलला येथे चांगला भाव होता. गेल्या काही वर्षांपासून त्याला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ यांचे वेगवेगळे संघ असले, तरी राज्यात रणजी करंडक अनेक वेळा जिंकला आहे मुंबईने. विदर्भाने तीनदा. (महाराष्ट्राने हा करंडक जिंकला तोही स्वातंत्र्यपूर्व काळात एकदाच.) वैयक्तिक खेळांबाबत बोलायचे तर अ‍ॅथलेटिक्स आणि जलतरण, डायव्हिंग (सूर मारणे), जिम्नॅस्टिक्स, शूटिंग, बाॉक्सिंग या खेळांमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंचा प्रभाव अनेकदा दिसला आहे. पण राष्ट्रीय स्तरावर. बुद्धिबळात काही पुरुष, महिला ग्रँडमास्टर आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर्सही आहेत. स्पेशल ऑलिम्पिकमध्येही राज्यातील खेळाडूंनी नाव मिळवले आहे.

इतके सांगितल्यानंतर हे राज्य खेळाडूंसाठी नंदनवनच आहे, असे वाटेल. वस्तुस्थिती तशी नाही. खेळाडूंनी आहेत त्या सुविधांचाच वापर करून, प्रयत्न करून यश मिळवले. पण आता इतर राज्ये महाराष्ट्रापेक्षा लक्षणीय कामगिरी करून दाखवतात. शिवाय मोठ्या शहरांतील खेळाडूंची संख्या कमी होत आहे. सुदैवाने त्यांची जागा ग्रामीण भागातील चांगल्या गुणवत्तेचे अनेक खेळाडू घेत आहेत. फुटबॉलही आता मुंबईशिवाय पुणे आणि कोल्हापूर येथे रुजला आहे. लोकप्रियही बनला आहे. पण या खेळांच्या संघटनांकडे (क्रिकेटप्रमाणे) पैसा नाही. कमी लोकप्रियतेमुळे प्रायोजकही नाहीत. क्रिकेटला नियामक मंडळाकडून पैसा मिळतो, तसा अन्य खेळांना मिळत नाही. तेवढ्या प्रमाणात तर नाहीच. त्यांना राज्य व केंद्र सरकारची मदतही फारशी नसते. केवळ खेळावरील प्रेमामुळे खेळाडू, प्रशिक्षक व संघटक खेळात प्राण फुंकतात, त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव कमावतात हाच आशेचा किरण. खेळांमध्ये कारकिर्द केली तर पैसाही मिळतो हे एक कारण आहेच.

सुविधा वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांना आवश्यक पैशाचे बळ मिळत नाही. गोपीचंद यांच्या अ‍ॅकेडमीला उद्योजक, राज्य सरकार दोघांचाही पाठिंबा मिळाल्याने त्यांनी निर्माण केलेली सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, त्यामुळे त्यांच्या अ‍ॅकेडमीतून तयार झालेले खेळाडू जागितक स्तरावरही चमकत आहेत. महाराष्ट्र राज्यात अनेक बडे उद्योजक आहेत. पण अशी अप्रतिम सुविधा कोणत्याही खेळासाठी नाही. आहेत त्या क्लब्ज वगैरेंच्याच आहेत. अपवाद पुण्यातील मॉडर्न संकुलाचा. तसे पाहिले तर राष्ट्रकुल (ज्युनियर स्पर्धा) जेथे झाल्या ते बालेवाडी संकुल आहे. तेथे आता काही खेळांच्या प्रशिक्षणाची सोय आहे, पण ती मोठे समारंभ वा सभा यांच्या तारखा सांभाळून! एकदा तर तेथे खेळांच्या स्पर्धा कमी आणि अन्य कार्यक्रम विवाह समारंभ, सभा, संगीत रजनी इ. जास्त असे चित्र होते. सुदैवाने ते बदलत आहे.

या राज्याने देशाला विविध खेळांमध्ये अनेक खेळाडू दिले आहेत. बहुतांश वाचक क्रिकेटप्रेमी असल्यामुळे क्रिकेट खेळाडूंची जंत्री देण्याची आवश्यकता नाही. तरीही पॉली उम्रीगर, चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर अशा कर्णधारांची नावे द्यायलाच हवीत. राज्याच्या स्थापनेनंतर काही काळ तर राज्यातील किमान पाचसहा खेळाडू तरी राष्ट्रीय संघात असत. आता लहान शहरांमधूनही क्रिकेट खेळाडूंची आवक होत आहे.

बॅडमिंटनमध्ये नंदू नाटेकर, चंदू देवरस, गौतम ठक्कर, असीफ पारपिया, उदय पवार अशी नावे सहजच आठवतात. बॅडमिंटनमध्ये रफिया लतीफ, अमी घिया यांनी खूपच यश मिळवले होते. या खेळाडूंमुळेच राज्यात बॅडमिंटनकडे खेळाडू मोठ्या संख्येने येऊ लागले. आजही अनेकजण राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व दाखवतात. खेळाडूंच्या प्रमाणात सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. झाली असती तर याहून वेगळे, अभिमानास्पद चित्र दिसले असते. अर्थात केवळ बॅडमिंटन नाही, तर सर्वच खेळांबाबत आपल्याला असे म्हणता येईल. (अपवाद अर्थातच क्रिकेटचा).

टेनिसमध्ये काही काळ महाराष्ट्राचे नाव होते ते शशी मेनन आणि नंदन बाळ यांच्यामुळे. ते दोघेही देशाचे प्रतिनिधित्व करत होते. निरुपमा मांकड महिलांमध्ये अग्रभागी होती. आता ऋतुजा भोसलेसारख्या खेळाडूंनी अपेक्षा वाढवल्या आहेत. भारताचे जर्मनी, जपान आणि रशियाबरोबरचे डेव्हिस चषक सामने पुण्यात झाले. त्यामुळे विल्हेल्म बुंगर्ट, यामानाका, अलेक्स मेत्रिवेली अशा दर्जेदार खेळाडूंच्या व त्यांना हरवणार्‍या रामनाथन कृष्णन, प्रेमजीत लाल, जयदीप मुखर्जी, विजय आणि आनंद अमृतराजचा खेळ पाहता आला. टेनिसचे आकर्षण वाढून पद्धतशीरपणे प्रशिक्षण सुरू झाले. टेनिस सुधारले. तरीही आज भारतीय संघात स्थान मिळवणारा राज्यातील खेळाडू दिसत नाही, याचे वाईट वाटते.

जोपर्यंत खेळाकरता खेळ होत होता, तोवर महाराष्ट्र कबड्डी खोखोमध्ये अजिंक्य होता आणि आधी चांगले प्रतिस्पर्धी, नंतर पैसा आला, आणि महाराष्ट्राची पकड ढिली झाली. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ पोहोचल्यावर तर ही दैना फारच जाणवते. कारण राष्ट्रीय स्पर्धेतही पहिल्याप्रमाणे यश मिळत नाही. तीच बाब खोखोचीही आहे. आता त्याचा प्रसार जास्त झाल्यावर तेथील मक्तेदारीही संपुष्टात आली आणि नेमक्या यावेळी खोखो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत! या खेळांच्या राज्यातील संघटकांनी योग्य प्रकारे आत्ताच विचार केला नाही, तर मग फार उशीर झाला असेल. तसे न होवो एवढीच इच्छा करायची.

अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स आणि जलतरण हे खरे तर सर्व खेळांचा पाया समजले जाणारे, पण यात आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे यश नाही. दिनशॉ इराणी (गोळाफेक), रमेश तावडे (100मी,) स्टेफी डिसूझा, मॅरेथॉनमध्ये ऑलिम्पिकला गेलेले बाळकृष्ण अकोटकर, आदिल सुमारीवाला आणि वंदना शानबाग अशी मोजकीच नावे आठवतात. जलतरणात तर वीरधवल खाडे आणि वॉटरपोलो संघातील भरत मर्चंट, संजय करंदीकर अशा खेळाडूंचे यश दिसते. जिम्नॅस्टिक्सला मात्र असे कोणी मिळालेले नाही. हॉकीत धनराज पिल्ले, रोईंगमध्ये दत्तू भोकनाळ अशी काही ऑलिम्पियनची नावे सापडतात, पण तो अपवादच.
महाराष्ट्रासारख्या राज्यात तो अपवाद न राहता प्रघात व्हावा ही इच्छा!