घरफिचर्ससारांशकरमध्ये सरस्वती

करमध्ये सरस्वती

Subscribe

मुलांना वेगवेगळे स्पर्शज्ञान देताना माती, कणिक, कागद, भाज्या, साली, इत्यादी प्रकार हाताळून स्पर्श संवेदना वाढवता येते. मुलांच्या शारीरिक जडण घडणीसाठी तसेच बुद्धीचा विकास होण्यास रंग ओळख खास गरजेची आहे. कलेशी जितक्या लवकर मैत्री होते तितक्या तुमच्या कक्षा रुंदावत जातात. कल्पनाशक्तीचा विकास जितक्या लवकर सुरू होतो तितका व्यक्तिमत्वाचा विकास उत्तम होतो, असे गणितच आहे.

‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविन्दम,प्रभाते करदर्शनम’, हा श्लोक आपण सगळे सकाळी-सकाळी म्हणत असतो. याचा खर्‍या अर्थाने विचार केल्यास लक्षात येते यातील तथ्य, मर्म आपल्या कर्मातच आहे. जे काम आपण हाताने करतो त्याला पर्याय नसतो. अगदी लहान बाळाची बोटं मुठीत बंद असतात हळूहळू ती मोकळी होतात आणि सुरू होते नाजूक हालचाल. ही हालचाल त्याच्या मेंदूतून कार्यरत होत असते. त्याला बोलता येईपर्यंत या हाताच्या हालचाली, बोटांच्या स्नायूंना व्यायाम म्हणूनच उपयोगी असतात. जसजशी प्रगती होते ते बाळ प्रथम आईला धरण्यास सुरुवात करते मग आधारासाठी उपयोग सुरू होतो. थोडे वय वाढले की बळकटपणा जाणवतो आणि वस्तू धरण्याची, ओढणे, बोचकारणे असे विविध प्रकार सुरू होतात. हात आणि बोटे आपल्या शरीराचा मुख्य, अविभाज्य भाग आहे. बोटात खडू धरायला सुरुवात झाली की, भिंतीवरच्या रेघोट्यांमधून ते मूल व्यक्त होऊ लागते. गरज असते ती आपल्या वाचन प्रक्रियेची क्षमता वाढवण्याची. पालकत्व ही एक गोड जबाबदारीच असते. डोळा व हात यांचा समन्वय नीट होतोय की नाही हे समजण्यास काही छोट्या छोट्या निरीक्षणाची नितांत गरज असते. आपलं मूल वस्तू उचलू शकतंय का? वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या खेळण्यांशी खेळतंय का? खडू बोटात धरून हाताच्या हालचाली प्रथम गोल, मग उभ्या आडव्या रेघा मारणे हा उद्योग सुरू झाला की, खूप निरनिराळे प्रयोग करता येतात. इथेच आकार आणि रेषांशी व हळूहळू रंगांशी मैत्री होते. मग प्रवास सुरू होतो रंगीत चित्र गमतीचा.

आपल्या बोटांत लक्ष्मी वास करते याचाच दुसरा अर्थ आपण त्यांच्या सहाय्याने करणार असलेले कर्म. पंचमहाभूतानि बनलेले आपले शरीर एक अजब रसायन आहे. अग्नि आपल्या अंगठ्यात, वायू तर्जनीत, आकाश मध्यमेत, पृथ्वी अनामिकेत आणि जल करांगुलीरुपात वास करीत असतात. निर्मितीत म्हणूनच आपल्या बोटांचे कार्य महत्त्वाचे आहे. आपण जी शक्ती मिळवतो ती आपल्याला आपण ग्रहण केलेल्या अन्नाद्वारे प्राप्त होत असते. हातांनी जेवणे यासाठीच महत्त्वाचे आहे. पाचही बोटे जेव्हा घास घेऊन आपल्या आधारावर टेकतात त्यांनी आपल्या पचनक्रियेला मदतच होत असते. स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न विचारला होता की, तुम्ही भारतीय हाताने जेवता, चमचा वापरत नाही. स्वामीजींनी उत्तर दिले होते, अहो मी जेवतो ती बोटे फक्त माझ्याच तोंडात जातात. तुमचा चमचा किती जणांच्या मुखात जातो हे माहिती आहे का तुम्हाला. प्रश्न विचारणारा निरुत्तर झाला. कला ही माणसाच्या मनाचे मंदिर आहे आणि कर्म हे जीवन.
अशीच काही गंमत चित्रे आज आपण काढून पाहूया. ब्रश, खडू, पेन्सिल या साधनांशिवाय फक्त रंगाच्या सहाय्याने बोटांच्या ठशांची चित्र काढताना होईल थोडा पसारा, पण मजा अवर्णनीय असेल. आपल्या बाळाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आपणच निर्माण करावे. घरातूनच ही प्रक्रिया सुरू झाल्यास पुढे शाळेत जाताना आपली शिदोरी काकणभर जास्तच भरलेली असेल.

- Advertisement -

विचार करा थोडा. लहान मोठ्या आकारातून कसे चित्र तयार करता येईल त्याचा.

पहिले बोट तर्जनी व मधले बोट यांचे अग्रभाग एकत्र रंगात बुडवा. एक मोठा एक किंचित छोटा गोलाकार तयार करा. काय करता येतो त्याचा प्राणी? की डोळे? की पाने….एक न् अनेक बरेच ठिपके जोडून तयार करता येईल एक लांबलचक अळी?

- Advertisement -

दोन अंगठ्यांचे ठसे आणि दोन तर्जनीचे ठसे एक नाजूक फुलपाखरू नक्कीच बनवते.
सर्व बोटे निळ्या रंगात बुडवून चित्र बनवा गोलगोल मोठ्या ढगांचे.

बाळाच्या पायाच्या ठशाचे पक्षी बनवता येतील का?

पूर्ण पंजाचा ठसा एक सुंदर मोर चितारण्यास मदत करतो.

बघा डोकं चालवून या हाताचा, बोटांचा खरा आनंद घेऊया. आपण पुन्हा आपल्या बालपणात रममाण होऊन जाऊया. अशाच प्रकारे मुलांना वेगवेगळे स्पर्शज्ञान देताना माती, कणिक, कागद, भाज्या, साली, इत्यादी प्रकार हाताळून स्पर्श संवेदना वाढवता येते. मुलांच्या शारीरिक जडणघडणीसाठी तसेच बुद्धीचा विकास होण्यास अशी रंग ओळख खास गरजेची आहे. कलेशी जितक्या लवकर मैत्री होते तितक्या तुमच्या कक्षा रुंदावत जातात. कल्पनाशक्तीचा विकास जितक्या लवकर सुरू होतो तितका व्यक्तिमत्वाचा विकास उत्तम होतो, असे गणितच आहे.

लहानपणी झालेले संस्कार कधीच वाया जात नाहीत. काही मुले जन्मजात गुण घेऊन येतात तर काही प्रयत्नपूर्वक गुण संपादन करतात. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात अशी मुले आणि प्रयत्नांती परमेश्वर असा विश्वास असणारे दोघे यश कीर्ती संपादन करू शकतात. कला हे त्यासाठी एक उत्तम माध्यम आहे.

अर्चना देशपांडे-जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -