घरफिचर्ससारांशआंब्या-फणसाचे दिवस

आंब्या-फणसाचे दिवस

Subscribe

आंब्याच्या दिवसात आंबे भरपूर खाल्ले, कोणाच्या पाणंदीतून गेलं की, बिटकी नाही तर रायवळ आंबा सहज पडायचा. काही ठिकाणी आंब्याचा खच पडलेला असायचा. आमच्या परसवात कितीतरी रायवळ आंब्याची झाडे होती, त्या आंब्यांच्या चवीनुसार त्याला नावं दिलेली असायची. आमच्या पाटल्यादारी अतिशय गोड चवीचा आंबा होता त्याला साखरो आंबो म्हणायचे. कापा फणस फोडावा तो आमच्या तात्यांनीच! तात्या त्या फणसावर आडवे-उभे चार घाव मारून एकदा फणसाचे तुकडे केले की, मधला चीक व्यवस्थित पावाने बाजूला काढत. एकदा चीक काढला की, तेलाची वाटी बाजूला ठेऊन दिलेलीच असायची, मग एकेक फणसाचं शेड एकेकाच्या हातात देत असत.

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले तरी दरवर्षीसारखा आंबा फणसाचा मौसम सुरु झाला असं हल्ली वाटतच नाही, अचानक आलेल्या या करोनारुपी संकटाने या दिवसांची मजाच घालवली आहे. गावातली मुलं धरलेल्या आंब्याच्या झाडांची आणि मुळापासून लगडलेल्या फणसाच्या झाडाचे फोटो गावच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकून आमच्यासारख्या आयनलच्या नदीत नेहमी पाय टाकून बसलेल्या चाकरमान्यांना एकप्रकारे जळवत असतात. संपूर्ण जगाची आर्थिक गणितं चुकवणार्‍या या संकटामुळे गावी जायचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. आता टीव्हीवर ‘रामायण’ नाहीतर ‘महाभारत’ बघत पूर्वीचे विक्रोलीतले दिवस कसे होते हे आठवताना त्यादरम्यान गावी घालवलेले मे महिन्याच्या सुट्टीतले आंब्या-फणसाचे ते दिवस आठवतात. आज आपण सगळेच तो वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ त्या जुन्या टीव्हीवरच्या सिरीअलच्या माध्यमातून जगत आहोत. तेव्हा मलादेखील त्या वीस-पंचवीस वर्षामागचे मे महिन्यातले आंब्या-फणसाचे सोनेरी दिवस आठवतात. ते दिवस म्हणजे जागतिकीकरणाच्या अगदी सुरुवातीचे, यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण यांचा तो घुसखोरीचा काळ होता. कोकणरेल्वे सुरू होणार अशा गोष्टी कानावर पडत होत्या.

अशाच काही दिवसात गावी असताना कदम गुरुजी नेहमीप्रमाणे खळ्यात आले आणि माझ्या मोठ्या चुलत्यांच्या समोर आरामखुर्चीवर येऊन बसले. कदम गुरुजींनी पानाच्या ताटात हात घालून एक पान जुळवीत असताना माझे चुलते म्हणाले, आता पुढल्या वर्षी आमचे चाकरमानी एसटीन नाय रेल्वेन येतले, त्यावर गुरुजींनी आपल्या हातातले पान जुळवायचे तसेच ठेवले आणि अडकीत्याने सुपारीचे खांड फोडत ईनामदार, ही गोष्टच सोडा तुमी, तुमच्या चाकरमान्यांका रेल्वेत पाय ठेवक जागा गावाची नाय, सगळा राजकारण येगळा हा, आमका आपला वाटता कोकणरेल्वे ईली पण ती आमच्या माणसांसाठी नाय ओ, ती तकडे दक्षिणेच्या लोकांसाठी, त्यांचो एक दिवस वाचतलो म्हणान त्यांका कोकणरेल्वे व्हई… तर असं हे राजकारण आहे तर ?… कदम गुरजींच्या या वाक्याची प्रचिती मला नेहमीच येते.

- Advertisement -

पण रेल्वेच्या तिकीटी जरी मिळाल्या नाहीत तरी कोकणी माणूस एसटीच्या गाडीने, प्रायव्हेट गाडीने नाहीतर स्वतःच्या गाडीने का होईना, पण पाणी बदलण्यासाठी का होईना आपल्या गावी जातो, हल्ली माझा मे महिना दहा मेच्या नंतर येतो. कॉलेजची कामं आटपून होईपर्यंत मे महिन्याची दहा तारीख उलटून जाते, पण शाळेत शिकत असताना तेरा एप्रिलला शेवटचा पेपर संपला की, आम्ही पंधरा एप्रिलला कुर्ला डेपोतून देवगड गाडी नाहीतर कणकवली गाडी पकडून गावी जायला निघायचो. गावी पोचल्यावर घरच्या माणसांना भेटण्याअगोदर वाड्यात बांधलेल्या गुरा-ढोरांना बघण्यासाठी प्रवासातल्या कपड्यानिशी वाड्यात जायचो. गुरं वाड्यात नसली तर आंब्याच्या खाली कावन बांधलेलं असायचे, त्या कावणात गुरं बांधलेली असायची. गुरांना बघताना वरच्या आंब्याचा एखादा आंबा खाली पडायचा, तिचं गावचे आंबे खायची सुरुवात असायची, तेवढ्यात पाटल्यादारी येऊन नंदाकाकी रे त्या ढोराका नंतर बग, आदी कापडा बदल, तिने अशी हाक मारली की, घरात जाताना फणसाच्या झाडाजवळ पिकलेल्या फणसाचा घमघमाट सुटलेला असायचा.

आमच्याच घरात नाही तर अख्या वाडीत चाकरमानी यायला सुरुवात झालेली असायची. जसे जसे चाकरमानी यायचे तसे हे दिवस बहरून यायचे. एकतर दुपारी सर्वांचा डोळा चुकवून आम्ही समोरच्या बिटकीच्या झाडाखाली खोपटी बांधायला सुरुवात केलेली असायची. ती खोपटी बांधतांना घराच्या पाटल्यादारच्या सरीवर ठेवलेला कोयता कोणतरी पळवून आणायचा. त्या कोयत्याने नदीच्या बाजूला असलेल्या चिव्याच्या बेटातले चार चीवे तोडून बिटकीखाली आणून लपवून ठेवायचे, कोणतरी घरातल्या लाकडाच्या बलाटामधून चार मेढी घेऊन यायचा, एकदा एवढं सामान गोळा केलं की, खोपटीच्या कामाला सुरुवात व्हायची. आमच्यापैकी कोणालाच या खोपटीच्या कामाची सवय नसायची, कोयत्याने मेढी ठीक करताना एखादा फटका चुकायचा आणि नेमका तो चुकलेला फटका हातावर किंवा पायावर यायचा. मग हातातून नाहीतर पायातून भळांभळां रक्त निघायचं. आता हे रक्त कसं थांबवायचं तर त्यासाठी कोणतरी हळूच घरात जाऊन हळद घेऊन यायचा, पाटल्यादारी खूप जुने कपडे ठेवलेले असायचे. त्यातला एक जुनं फडका घेऊन ती जखम बांधून तो गडी पुन्हा खोपटी बांधायला तयार व्हायचा. दुपारी खोपटीच्या बांधकामाला सुरुवात केली की, संध्याकाळी काम पूर्ण झालं की, नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबायला मजा यायची. संध्याकाळी गुरांना पाण्याला घेऊन जातो हे फक्त निमित्त, खरं म्हणजे नदीच्या थंड पाण्यात बसून रहायला खूप मजा यायची. नदीच्या पाण्यात केवळ आंघोळ करण्यासाठी जातो असं नसून त्यावेळी आमच्या बरोबर नदीवर आंघोळीला गेलेल्या मुलामध्ये जास्त वेळ पाण्यात कोण डुंबून राहतो याची शर्यत लागायची.नाकात पाणी जाईपर्यंत एकेकजण पाण्यात डुंबून राही, नदीच्या पाण्याने डोळे लालबुंद व्हायचे.

- Advertisement -

सकाळी उठून एकदा माझ्या चुलत्यांबरोबर-तात्यांबरोबर एकदा आगरातल्या बागेत किंवा गाळवातल्या काजीत जाऊन आलं की, येताना तात्या खांद्यावर एखादा फणस घेऊन यायचे, काकीच्या डोक्यावर काजीची फाटी असायची आणि आमचा गडी वसंतनानाच्या डोक्यावर आंब्यांची गोणी असायची. पुढेमागे माझे चुलतभाऊ डोक्यावर एकेक फणस घेऊन असायचे. सकाळची भाकरी खाण्याच्या अगोदर तात्या फणस फोडायचे, तो फणस रसाळ-बरका असला की, सगळेजण त्याच्यावर तुटून पडत, एकेक गरा काढून पटकन तोंडात टाकताना हाताला चिकट लागायचा, बरका गरा खाताना एकाच्या तरी गळ्यात तो गरा फसायचा मग बकबक करत तो गरां बाहेर काढायला आम्ही सर्व त्याला बकबक कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवायचो. एकदा तो गरा बाहेर पडला की, त्याला एकदम हलकं वाटायचं. कापा फणस फोडावा तो आमच्या तात्यांनीच ! तात्या त्या फणसावर आडवे-उभे चार घाव मारून एकदा फणसाचे तुकडे केले की, मधला चीक व्यवस्थित पावाने बाजूला काढत. एकदा चीक काढला की, तेलाची वाटी बाजूला ठेऊन दिलेलीच असायची, मग एकेक फणसाचं शेड एकेकाच्या हातात देत, पण आम्ही पोरचं ! आम्ही फणसाचा डिंक एकमेकांच्या अंगाला लावण्यात गर्क असू. त्या दिवसात म्हशीच्या पुढ्यात चाराखंडाचा ढीग जमा व्हायचा.

त्या दिवसातला अजून एक उद्योग म्हणजे म्हशीच्या रेडकांना नदीवर नेऊन धुण्याचा. आमच्या म्हशी सर्व गावठी म्हशी त्यामुळे त्या काळ्याभोर होत्या, अर्थात त्यांची रेडकंदेखील तशीच काळ्याभोर. कोणीतरी आम्हाला सांगितलं की, म्हशीच्या रेडकांना लहान असताना साबणाने आंघोळ घातली तर त्यांचा रंग उजळतो, अर्थात कोणी सांगायची खोटी, आम्ही ते प्रयोग केलेच पाहिजे. संध्याकाळी आंघोळीच्या निमित्ताने त्या बारक्या रेडकाला नदीवर घेऊन गेलो आत नदीला जिथे कमी पाणी होतं तिकडे रुंबडाच्या झाडाला बांधलं आणि घसाघसा साबण लावत रेडकाच्या अंगावर पाणी टाकत राहिलो. वायच … वायच रंग बदलता हा रेड्काचो असं कोणी म्हटल्यावर अजून पाणी टाकत राहिलो, पाचशे एक साबणाचा तो संपूर्ण तुकडा संपला, आता पाण्याच्या सतत मार्‍याने रेडकू रेकू लागलं. तेव्हा नदीवर जाणार्‍या कोणाला आमचे प्रताप लक्षात आले, त्याने हातात काठी घेऊन आम्हाला बाहेर काढलं, पण घरी येऊन आईने आणि काकीने उत्तरपूजा केली हे सांगणे नकोच.

अशाविविध लीला करत मे महिन्याची सुट्टी जात असायची. गावात कोणाकडे टीव्ही नव्हते, गाणी ऐकायला मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे गावातले लग्नसोहळे. या लग्नाची मजा काही और होती म्हणजे वरातीपेक्षा जास्त मजा ट्रकातून व्हराडी होऊन जाण्यात असायची. लग्नाची बहुतेक वर्‍हाडं त्याकाळी अशी ट्रकमधून जायची. ट्रकच्यामध्ये एक दोरी बांधून दोन्ही बाजूला माणसे उभी राहायची आणि त्या लालामातीच्या रस्त्यावरून एकदा ट्रक धावू लागला की, लालमाती अंगावर उडायची. लग्नाला नवीन कपडे घालण्यात काही अर्थच नव्हता. कारण हे ट्रक बहुतेक जांभा दगड वाहून नेणारे असायचे, त्यांना आधीच खाली लालमाती असायची.आंब्या फणसाच्या दिवसात वाडीत, गावात अनेक ठिकाणी पूजा, लग्न, होम, वास्तूपूजा असायच्या. प्रत्येक ठिकाणी गावतली माणसं जेवण बनवायला आणि जेवायला असायची. ते दिवस माणूस वाचायचे दिवस होते, पुस्तकांपेक्षा माणूस वाचण हे कठीणच ना ! अनेक माणसं भेटायची, अनेक विषय समजायचे, पण आम्हा मुलाचं लक्ष बिटकीच्या झाडाखाली बांधलेल्या खोपटीत गुंतून असायचं.

आंब्याच्या दिवसात आंबे भरपूर खाल्ले, कोणाच्या पाणंदीतून गेलं की, बिटकी नाहीतर रायवळ आंबा सहज पडायचा. काही ठिकाणी आंब्याचा खच पडलेला असायचा. आमच्या परसवात कितीतरी रायवळ आंब्याची झाडे होती, त्या आंब्यांच्या चवीनुसार त्याला नावं दिलेली असायची. आमच्या पाटल्यादारी अतिशय गोड चवीचा आंबा होता त्याला साखरो आंबो म्हणायचे. एक आंबा होता त्याच्या फळात काज म्हणजे ठसका लागायचा त्याला काजयाळो आंबो म्हणायचे. खाली गूळ काढायचा रगाडा ठेवला असायचा म्हणून तिथल्या आंब्याला रगाडो आंबो, असं नामाभिधान रूढ झालेलं होतं. आमच्या घरात रायवळ आंब्याची आडी घालून ठेवायचे. कोणाला वाटलं आंबा खावा तर उठला आणि त्या खोलीत गेला. आडीतला एक आंबा काढला की, दाताला लावला. माझी आजी आणि थोरली काकी आंब्याची आणि फणसाची साटा बनवून ठेवायची. एकदा साटा घातली की, सुपात किंवा ताटात घालून त्यावर स्वच्छ फडका टाकून ती सुपं किंवा ताट घराच्या कौलांवर सुकत घालायला ठेवायची. खाली सुकत ठेवली की, आमची गुरं नाहीतर आमच्यासारखे बोके ती साटा खाऊन फस्त करायचे. या आंब्यांच्या दिवसात एकही दिवस खीरमट केल्याशिवाय जातं नसे. कच्चा आंबा कापून त्याच्या बारीक फोडी करून त्यात मीठ, तिखट आणि गूळ टाकायचे. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

हल्ली आंबा कापून तो खाल्ला जातो, पण खर सांगू आंबा असा कापून वैगरे खाण्याचं फळचं नव्हे, आंबा हे एका बाजूने दात लावून थोडं भोक करून रस चोपून काढताना, रस अंगावर नाहीतर शर्टावर खाल्याची निशाणी ठेऊन जाणारं फळ आहे. पूर्वी आंबा खाल्ला की, तोंडाला डाग लागून रहायचे. फणसाच्या चिकाचे काळे-तांबूस डाग बनियानवर पडले तरी धुवून टाकायच्या कोण भरीस पडायचं नाही. आंबा खाताना कोकणातली कितीतरी लोकगीतं तोंडात यायची. फणसाच्या एकेका गर्‍याबरोबर एकेक कविता आई पोटात घालायची. कोकणचा हा राजा आमच्यासारख्या मुंबईकरांना आता फक्त फोटोत दिसतो ही गोष्ट किती वेदनादायक आहे हे आंब्या-फणसाचे सोनेरी दिवस बघितलेल्या मालवणी माणसालाच माहीत.

आंब्या-फणसाचे हे दिवस पुन्हा तो काळ जगायला लावतात. त्या सोनेरी दिवसाला कारुण्याची किनार होती, त्यातल्या दिवसांना उद्याची चिंता होती. त्या दिवसात माणसं जरी जमिनीवर चालत असली तरी सगळं लक्ष त्याचं आभाळाकडे होतं. शेवटी मालवणी कवी दा. र. दळवी यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात.

गावच्या माझ्या कलमी आंब्याची
आडी मी घातलय हापूसची
पिकलेली फळा ही काडलय
पुढ्यात तुमच्या मी ठेवलय
पिवळी केसरी फळा ही खास
चवीन खावा तुमी सावकाश
फळाचो पीयान रस लयसो
सांगा हापूस माझो आसा कसो ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -