घरताज्या घडामोडीहिंदी पडद्यावर रंग मराठीचा वेगळा

हिंदी पडद्यावर रंग मराठीचा वेगळा

Subscribe

हिंदी पडद्यावर मराठी भाषा पंजाबी, भोजपुरी, दक्षिणेकडील इतर भाषेच्या तुलनेत अभावाने ऐकता येईल. मराठी आणि हिंदीची लिपी जरी सारखी असली तरी हिंदी आधी मराठी लिपी होती हे स्पष्ट असतानाही असे का व्हावे, याचे उत्तर मराठीचे हिंदी पडद्यावर पुरेसे प्रतिनिधित्व करणारे लेखक दिग्दर्शक नव्हते हेच आहे.

सत्तरच्या दशकात मूळ बंगाली भाषेतील ‘अमानुष’ सारखे अनेक सिनेमे हिंदीत अनुवादित झाले. मराठीत असं झालं नाही. बिमल रॉय यांची अनेक बंगाली कथानके हिंदी पडद्यावर साकार झाली. मराठीला मोठी साहित्य परंपरा असतानाही मराठी कथानकांवर हिंदीत सिनेमे साकारले गेले नाहीत.

शांतारामबापूंचा पिंजरा हिंदीत बनायला हवा असा आग्रह दमदार कथानकामुळे निर्मात्यांकडून झाल्यावर हिंदीसाठी नटश्रेष्ठ दिलीप कुमार यांचं नाव डॉ. लागूंनी जिवंत केलेल्या ‘मास्तर’च्या व्यक्तिरेखेसाठी पुढं आलं. मात्र, हिंदीत या सिनेमाची ग्रामीण कथानकाचा पाया असलेली मराठी बोली लोकभाषा हा आत्माच हरवून जाईल हे शांतारामबापूंनी ओळखले होते. त्यांनी पिंजराच्या हिंदीकरणास स्पष्ट नकार दिला आणि पिंजरा मराठीतच बनवला गेला. पिंजरातील ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…, आली ठुमकत नार लचकत…’ ही अस्सल मातीतल्या लावणीचा बाज असलेली गाणी हिंदीत ओंगळवाणी झाली असती हे खरंच…संगीत, संवाद, लोककथानक हिंदीत हरवून गेलं असतं, व्ही शांताराम यांचा निर्णय योग्य ठरल्याचं पिंजराच्या यशाने स्पष्ट केलं.

- Advertisement -

थिएटरमध्ये पिंजरा पाहायला अमराठी प्रेक्षकांच्या होणारी गर्दीने जाणिवा संवेदनेला भाषेची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. फँड्री हिंदीत बनला असता तर.. उपेक्षितांच्या कथानकाचा तसा प्रयत्न शबाना आणि नासिरुद्दीनच्या ‘पार’, मध्ये होता. मात्र, ती सुद्धा बोली भाषाच होती हिंदी नाही. राजश्री फिल्म्सचा ‘नदीया के पार’ हा हिंदी नसून भोजपुरी चित्रपट असल्याचं सांगावं लागेल. हिंदीशी पुरेसं बोली भाषा साधर्म्य नसल्यानं मराठीत असं झालं असावं. दक्षिणेकडच्या तामिळ तेलुगू भाषेसारखी मराठी वेगळी असतानाही मराठीला आपलं सिने पडद्यावरचं स्वातंत्र्य जपता आलेलं नाही.

हिंदी पडद्यावर उर्दू आणि पंजाबी सिनेमे खोर्‍यानं ओढता येतील इतके आले गेले. प्रेमकथा मग ती हिर रांझा, सोहनी महेवाल, लैला मजनू किंवा शिरीन फरहान असंच समीकरण हिंदीत जपलं गेलं. मराठीत नल दमयंतीचा विषय आजवर हिंदीत उपेक्षितच राहिला. दादासाहेब फाळके यांना हिंदी चित्रपट उद्योगाचे जनक मानलं जात असतानाही आणि ज्याला आज बॉलिवूड म्हटलं जातं ती सिने इंडस्ट्री मुंबई महाराष्ट्रात असतानाही मराठी पडद्याची भाषा हिंदीने जाणीवपूर्वक टाळलीच, त्यामागे मराठी सिने कला साहित्यातील मूल्ये हिंदीला वरचढ ठरतील अशी अमराठी हिंदीजनांना भीती असावी, असं बोलून आपली पाठ आपल्याला थोपटता येत नसते. मराठीत ज्यावेळी समांतर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला सोन्याचे दिवस होते, त्यावेळीही मराठी कथानकांसाठी हिंदी पडद्यावर जागा नव्हती.

- Advertisement -

दिलीप चित्रे, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल आणि विजय तेंडुलकर या नावांनी हिंदी पडद्याला दर्जेदार सिनेमाची भाषा ऐंशीच्या दशकात शिकवली. अँग्री यंग मॅन किंवा विद्रोहाची हीच भाषा सलीम जावेदनं हिंदी पडद्यावर अनुवादित केली. मात्र, त्यांनी लिहलेल्या कथानकांचे पडद्यावरचे नायक कायमच अमराठी राहिले. यात कायम उत्तरेकडील नावातल्या नायक नायिकांचा वरचष्मा राहिला… मेरी जंग (विजय वर्मा), जंजिर (रवी वर्मा), त्रिशूल (शेखर गुप्ता) ही काही उदाहरणे…हिंदी पडद्यावर अमराठी नायकाचा मित्र किंवा नायिकेची मैत्रीण इतकीच मराठी माणसं म्हणून होती, पुढे हिंदी पडद्यावर मराठी माणूस केवळ नोकर, चाकर, ड्रायव्हर किंवा कामवाली शांताबाई असं मराठीपण खालावत गेलं….गुजराती, पंजाबी, सिंधी, बंगाली, उत्तरेकडील, दक्षिण भारतीय माणसाच्या तुलनेत मराठी माणूस हिंदी चित्रपट निर्मात्याच्या सीटवर तुरळक असल्यानं हे घडलं किंवा घडवलं जात होतं.

हिंदीतीलं आर्थिक निर्मिती मूल्य असलेल्यांनी त्यांच्या भाषा संस्कृतीला महत्व दिलं हे योग्यच होतं. ऐंशीच्या दशकात राहुल रवैलनं जावेद अख्तरच्या पटकथेवर ‘अर्जुन’ बनवला त्यातला नायक अर्जुन मालवणकर मराठी होता. मात्र, त्यानंतर थेट महेश मांजरेकरच्या वास्तवमध्ये त्याआधी रामगोपाल वर्माच्या सत्यामध्ये अनुक्रमे रघुनाथ दत्तात्रय शिवलकर (रघु)आणि भिकू म्हात्रे या गुन्हेगारी जगताच्या चित्रण करणार्‍या व्यक्तिरेखा होत्या. मराठी नायक बहुतांशी गुन्हेगारीपट सिनेमांचा नायक होता. उबग आणणारी श्रमंती दाखवणार्‍या आणि भारत किंवा हिंदुस्थान म्हणजे ‘पंजाब दी मिट्टी’ जेवण म्हणजे ‘सारसो दा साग आणि मक्के दी रोटी’ या पलिकडे ज्वारी-बाजरी तांदळाच्या भाकरीचा भारत नव्हताच का? दक्षिणेकडच्या मंडळींनी त्यांचा सिने पडदा इतका आक्रमकपणे जपला की तो हिंदी पडद्याला वरचढ ठरू लागला आहे.

अलिकडचा पुष्पा, जयभीम आणि इतर सिनेमे त्याचं उदाहरण ठरावे. मराठी चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील जातीय वाद हेही मराठी पडदा मागे पडण्याचं प्रमुख कारण आहे. अभिजन भाषा शुद्धतेच्या जोखडातून मराठी पडदा ओढून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न नागराज मंजुळे, राजीव पाटील, गजेंद्र अहिरे आणि काही दिगदर्शक मंडळींनी केला. हिंदी पडद्यासमोर दक्षिणेचं आव्हान असताना मराठी नायकाचा नागराजचा झुंड हिंदीत दाखल होतोय ही उमेदीची गोष्ट आहे. हिंदी पडद्याचा मराठी नायक आठवावा लागतो कारण हिंदीची सिनेमाची आर्थिक गणितं मराठीच्या ताब्यात अभावानेच होती. सकस साहित्य मूल्य असतानाही मराठी भाषेला हिंदीत जागा नव्हती. मुंबईचा टपोरी बेरोजगार नायकाची रस्त्यावरची भाषा म्हणून मराठी उरवण्यात आली.

मराठी लोककलेला हिंदी पडद्यावर स्थान नव्हतं आणि आजही नाही. एकेकाळी मराठी मालिका आणि सिनेमांच्या कथांवर हिंदी सिनेमे बनवले जात आज मराठीतला छोटा आणि मोठा पडदाही टुकार हिंदी पडद्याचं अनुकरण करण्यात धन्यता मानत आहे. विनोदी कार्यक्रम मालिकांच्या बाबतीतही हा उलटा प्रवास सुरू झाला आहे.

सई परांजपेच्या ‘कथा’ नावाच्या सिनेमात मराठी चाळ आणि शहरी घर संस्कृती पहिल्यांदा ठळकपणे हिंदी पडद्यावर दिसली. ज्यात राजाराम नावाचा मराठी नायक (नसिरुद्दीन शहा) हा चाळीतल्या खोलीतून बाहेर येऊन आज का ‘लोकसत्ता’ नही आया क्या…असं शेजार्‍यांना विचारतो. हे ठळक मराठीपणाचं ऐंशीचं दशक मागे सरलं. ‘राजू बन गया जंटलमन’मध्ये ‘सर्दी खांसी न मलेरिया हुवा… या गाण्यात इराण्याच्या हॉटेलात नवाकाळ वाचणारा जयवंत (नाना पाटेकर) नावाचा मराठी माणूस हिंदी पडद्यावरून इतिहासजमा झालेला असतो. हिंदीला मराठी भाषा, मराठी इतिहास किंवा मुंबई महाराष्ट्रात आणल्याच्या इतिहासकालीन लढाईचे कथानक व्यावसायिक मूल्यांचे वाटत नसते.

आजच्या ओटीटीच्या काळातही यात बदल झालेला नसतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हिंदी पडद्यावर यायला 100 वर्षांनंतरही मराठीतल्या ‘नागराजची’ वाट पहावी लागते तर तानाजी सिनेमासाठी ओम राऊत दिग्दर्शक असतो. बाजीराव मस्तानी सिनेमासाठी सिने इंडस्ट्रीची 100 वर्षे जावी लागतात. दक्षिणेकडे बाहुबलीचे कौतुक करताना छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीत दर्जेदार सिनेमा अजूनही आलेला नसतो. म्हणूनच मराठी दिग्दर्शकांनी हिंदीत मराठीसाठी केलेले प्रयत्न कौतुकाचे ठरतात.

मराठी सिनेमांना आजही मुंबई आणि महाराष्ट्रात चित्रपटगृहांमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दर्जाच्या बाबतीत मराठीचं हिंदी पडद्याकडून नेहमी कौतुक होतं श्वास, जोगवा, कोर्ट, फँड्री, सैराटवर पुरस्कारांचा पाऊस होतो. पण व्यावसायिक मूल्य म्हटल्यावर हिंदी पडद्याचे मराठी प्रेम किती वरवरचे आहे हे स्पष्ट व्हावे. हिंदीला मराठीतील प्रयोगशील दिग्दर्शक, कथाकार, तंत्रज्ञ हवे असतात मात्र सिनेमावर मराठीचा ठसा नको असतो.

हिंदीतल्या शोलेचं कौतुक होतं, दिग्दर्शक, कथाकार, कलाकार सगळ्यांची नावे उभ्या देशाला माहिती असतात पण शोलेची शेकडो किलोमीटरची रीळ कात्रीने एडिट करणारे आणि एडिटिंगसाठी शोलेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारे एम एस शिंदे हे मराठी नाव माहीत नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -