घरफिचर्ससारांशअंतू बर्व्याचा दिवाळी दौरा!

अंतू बर्व्याचा दिवाळी दौरा!

Subscribe

लोकप्रिय विनोदी लेखक पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील एक टिपिकल कोकणी वल्ली असलेला अंतू बर्वा अनेकांना चांगलाच परिचित आहे. त्याच्या वक्रोक्ती आणि व्यंगोक्तीसाठी तो प्रसिद्ध आहे. पुलंनी कोकणातील अशा स्वभावाच्या वल्लींना हेरून त्यांच्या व्यक्तिचित्रणातून त्यांना लोकप्रिय केले. अंतू बर्वा असतानाचा काळ मागे पडून बरीच वर्षे झाली आहेत. सध्या दिवाळीचा माहोल आहे. अशा वेळी अंतू बर्वा जर कोकणात फेरफटका मारण्यासाठी पुन्हा आला तर त्याला काय दिसेल, सध्याचे बदललेले कोकण पाहून त्याला काय वाटेल, त्यावर त्याची काय प्रतिक्रिया उमटेल, याचा घेतलेला हा काल्पनिक आढावा.

सध्या स्वर्गवासी असलेल्या अंतू बर्व्याला अचानक वाटले की, दिवाळीच्या निमित्ताने एकदा आपल्या प्राणप्रिय कोकणात जावे. इतक्या वर्षात काय बरे बदल झाले असतील, याचा फेरफटका मारून प्रत्यक्ष पाहून यावे. पण त्यासाठी त्याला स्वर्गाधिपती इंद्रदेवाच्या परवानगीची गरज होती. त्यामुळे अतूंशेठ इंद्रदेवाला म्हणाले, मला माझ्या कोकणाची खूप आठवण येतेय त्यामुळे एकदा जाऊन येतो. त्यात दिवाळसणही आहे. तेव्हा कुणी काय दिवे लावले आहेत, तेही पाहून येतो. कारण आमच्या कोकणाचा विकास झाला असे कानावर येते अधूनमधून. माझी वडिलोपार्जित जमीन आणि आंब्याफणसाची, नारळी पोफळीच्या झाडांचे काय झाले हेही पाहून येईन. अंतूसारख्या इरसाल माणसाच्या मागणीचा इंद्रदेवाला विचार करावा लागला. कारण अंतूच्या वक्रोक्तीचा सामना इंद्राला करायचा नव्हता, म्हणून तो म्हणाला, ठिक आहे, अंतूशेठ या जाऊन. त्यानंतर अंतशेठ कोकण दौर्‍यावर निघाले.

अंतूचा कोकणच्या भूमीला पदस्पर्श झाल्यानंतर त्याला आनंद झाला. आपण स्वर्गातून आलो असलो तरी आपले पाय जमिनीवर आहेत, याचे त्याला विशेष वाटले. अंतूच्या काळचा आणि आताचा कोकण त्यात बराच फरक झालेला होता. त्याला पहिले आश्चर्य वाटले ते म्हणजे, त्यावेळी आपल्याला कोकण रेल्वे होणे हे केवळ स्वप्न वाटत होते. पण आता कोकणाच्या भूमीवर लांबच लांब रुळ टाकण्यात आलेले होते. खोल दर्‍यांमध्ये उंच पुल उभारण्यात आले होते, तर डोंगर पोखरून बोगदे तयार करण्यात आले होते. त्यातून ही कोकण रेल्वे अगदी धडाधड जात होती. त्या काळी अगदी एसटीचाही पत्ता नसलेल्या गावांमध्ये रेल्वेची स्थानके झाली होती.

- Advertisement -

पूर्वी बोटीने कोकणात जाणारा चाकरमानी आता रेल्वेने अगदी कमी वेळात गावाला पोहोचत होता. हे सगळे पाहून अंतू एकदम भारावून गेला, एकेकाळी स्वप्नवत वाटणार्‍या आणि आपल्या वेळची मंडळी ज्या गोष्टीची टर उडवत होती, त्या आता प्रत्यक्षात आलेल्या पाहून अंतूला काय बोलावे ते कळेना. अशा वेळी एखादी वक्रोक्ती डागून द्यावी, त्याचीही सोय नव्हती. कारण अंतूच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. कारण पहावे ते नवलच अशा गोष्टी त्याला दिसत होत्या. त्याने त्यानंतर काही लोकांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची एकूणच तोळामासा बारीक प्रकृती पाहून सुरुवातीला कुणी दाद देईना. हा कुठचा कोण आणि कशाला असल्या चौकशी करतो, या मूळ कोकणी बाण्याचा त्याला अनुभव आला. कोकणातील बर्‍याच गोष्टी बदलल्या, पण कोकणी माणसाची मूळ प्रवृत्ती जी आपल्या काळी होती, ती काही बदलली नाही, हे त्याच्या लक्षात आले.

लोक त्याला म्हणत, तुका काय करूचा हा, कोकण रेल्वे कुणी सुरू केल्यान, तिका किती खर्च इलो. तुका बसूचा असत तर बस. नाय तर वाटेन चलत र्‍हव. असे बोचरे बोल ऐकूनही अंतशेठचे कुतुहल काही त्याला गप्प बसू देईना. त्याने अधिक बारकाईने चौकशी सुरू केली. पण मूळ कोकणातला कुणी त्याला दाद देईना. त्यामुळे त्याने एका मोडके तोडके मराठी बोलणार्‍या परप्रांतियाला गठाले, त्याच्या एक गोष्टही लक्षात आली होती की, आता बाहेरील राज्यातील लोकांची बरीच गर्दी कोकणात झालेली होती. ही मंडळी पडेल ते व्यवसाय करत होते, कोकणी माणसाला आपला माल विकून श्रीमंत झालेली होती. अंतूशेठला भेटलेल्या परप्रांतियाला त्याने विचारले, त्यावर तो म्हणाला, श्रीधरन नाम के एक आदमी ने ये रेल्वे एक्चुली साऊथ के लोगों के लिए बनाया, ए गाडी कोकण मे से जाता हैं, इसलिए इसको कोकण रेल्वे बोलते हैं. हे ऐेकूण अंतू मनातल्या मनात म्हणाला, तरीच कोकणी माणसांचे कोकण रेल्वे आपल्याकडे आणण्यावर एकमत कसे काय झाले?

- Advertisement -

अंतू असा सगळा विचार करत चालत असताना तो वेंगुर्ल्यांजवळ आला. त्याच्या मनातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या. समुद्रकिनारा तोच होता. पण त्याच्या वेळच्या आठवणींनी तो हळवा झाला. त्याच्यावेळी असलेले अनेक लेखक, कवी त्याला आठवले. त्यानंतर हवेत एका विमानाचा आवाज झाला. त्याकडे तो पाहू लागला. ते विमान चिपीमध्ये उतरले. चिपी विमानतळ आणि कोकणात विमान सेवा सुरू झाली आहे, हे पाहिल्यावर त्याने आश्चर्याने बोटेच नव्हे तर अख्खा हात तोंडात घालायचा बाकी ठेवला. सगळ्या सुविधांनी सुसज्ज असलेला विमानतळ पाहिल्यावर तो आनंदाने बेभान झाला. अंतूला जर गाता आणि नाचता आले असते, तर त्याने तेही केले असते, पण तो त्याचा पिंड नव्हता, त्यामुळे त्याने तसे काही केले नाही.

ज्या कोकणात रेल्वे आणणे हेच आव्हान होते, तिथे चक्क विमान सेवा सुरू झाली, हे पाहून कोकणचा अकल्पित कायापालट झाला असे त्याला वाटू लागले. इतक्यात विमानतळाबाहेरच्या रस्त्यावरील खड्ड्यात त्याचा पाय लचकला, जोरात कळ आली. त्याच्यातील वक्रोक्ती त्याच्या तोंडून व्यक्त झाली. अरे कोकणात विमान आले, पण रस्ते काही सुधारले नाही. मग काय विमानातच बसून रहायचे की काय, या रस्त्यावरून चालणे अवघड आहे, ही मंडळी विमानातूनच कोकणात ज्याला जिथे उतरवाये आहे, जसे झाडावरून फणस उतरवतात, तसे आपापल्या घराजवळ का उतरवत नाहीत, असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. या रस्त्यावरून गाडीवाले गाड्या कशा चालवतात आणि आतमधल्या लोकांची काय अवस्था होत असेल याची तो कल्पना करू लागला.

अंतू पुढे चालत होता. त्याला असे दिसले की, पूर्वी कोकणात मुंबईतून पत्र पोहोचायला आठ दहा दिवस लागते.

आता तर ढोरांच्या राखण्याकडेही मोबाईल फोन आहे. मोबाईल प्रत्येकाच्या होती आहे. रंगीत टीव्ही, फ्रिज, प्रत्येक घरात एखादी बाईक तर आहेच. पूर्वी बाजारपेठांमध्ये बैलगाड्या दिसायच्या तिथे आता दुचाक्या आणि चारचाक्यांची इतकी गर्दी आहे, की, चालताना अवघड होऊन बसते. आधुनिक संपर्क आणि वाहतूक साधनांमुळे कोकणाचे शहरीकरण होताना त्याला दिसत होते.

अंतूने काही घरांमध्ये बाहेरून वाकून बघितले, तर दिवाळी असल्यामुळे त्याला चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या अशा पदार्थांचा सुवास येऊ लागला. त्याला आठवले की, आमच्या वेळी कोकणतला फराळ म्हणजे, खापरात भाजलेल्या भाताचे व्हाईनात कुटलेले पोहे, अधिकच झाले तर गोडे पोहे. आता तर अनेक शहरी पदार्थ आणि सवयींनी कोकणात प्रवेश केला होता. कोकणात बरीच घरे रिकामी होती. केवळ गणपती आणि मे महिन्यात काही मंडळी येतात. कोकणात खरी दिवळी ही तुळशीच्या लग्नात असते, पण आता लोक मुंबईच्या ढंगात दिवाळी साजरी करताना दिसत होते. पूर्वी कोकणात गायी म्हशींचे प्रमाण मोठे होते. त्यांचे दूध दुभते लोकांना मिळत असे. आता थेट दुधाच्या पिशव्या विकत मिळतात. बर्‍याच घरात लाकूड आणि शेणींच्या जागी स्वयंपाक गॅसचे सिलिंडर आले.

कोकणात झालेले विविध बदल पाहत अंतू कोकणभर फिरत होता. अनेक गोष्टी बदलल्या होत्या. कोकणात अनेक नवे प्रकल्प येत आहेत असे त्याला कळले, स्थानिक लोकांची आंदोलने होत होती. राजकीय मंडळी आपल्या सोयीनुसार पोळ्या भाजताना दिसत होते. अंतू कोकणभर फिरत होता. शेवटी तो राहत होता, तिथेही बरेच बदल झाले होते, बरेच काही बदलले होते, शेवटी तो नारळी पोफळी, आंब्या, काजूच्या बागांमध्ये गेला. त्यांच्या लक्षात आले की, कोकणातली माणसेही बदलली होती. त्यांच्या सवयी बदलल्या होत्या, पण ही कोकणात रुजलेली झाडे मात्र अजून तशीच आहेत, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. अंतूला गलबलून आले, त्याने एका नारळाच्या झाडाला आलिंगन दिले.

तेवढ्यात त्याला कुणी तरी पाहिले, तो म्हणाला, पावन्यातून काय करतास. कोण तुमी? अंतूच्या तोंडातून शब्द फुटेना. तो म्हणाला, मी अंतू बर्वा. पण समोरच्याला काही कळले नाही. त्याने विचारले, खयना इलास. तो म्हणाला, स्वर्गातून. ते ऐकून मात्र पुढच्या माणसाच्या छातीत धस्स झाले. बरा पावन्यातू म्हणत त्याने काढता पाय घेतला. अंतूला त्याचे आश्चर्य वाटले नाही, कारण कोकणात स्वर्गातून म्हटल्यावर पुढचा माणूस समजायचे ते समजून जातो. कारण कोकणी मनावर अगोदरच भुताखेतांचा मोठा पगडा. अंतूने सगळे कोकण डोळे भरून पाहिले. खरे तर कोकण हाच खरा स्वर्ग असे वाटत असूनही इंद्रदेवाला परत येण्याचा शब्द आपण दिला आहे, हे लक्षात आल्यावर अंतू पुन्हा स्वर्गाच्या दिशेने निघाला.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -