घरफिचर्ससारांशबोलो जुबां तिसरी

बोलो जुबां तिसरी

Subscribe

केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीला भारतीय सिनेमा इंडस्ट्री म्हणणं चुकीचं आहे. भारतीय चित्रपट इतिहासाच्या प्रवासात मराठी, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, आसामीपासून ते भोजपुरी आणि पंजाबीसारख्या प्रत्येक प्रादेशिक भाषेचं आणि त्या भाषेतील सिनेमांचं योगदान आहे. गेल्या काही काळात स्वातंत्र्यानंतर हिंदी इंडस्ट्रीने इतर इंडस्ट्रीना डॉमिनेट केले आणि आता साऊथ इंडस्ट्री हिंदीवर वर्चस्व गाजवू लागलीये, म्हणून आता अभिनेत्यांनी आणि प्रेक्षकांनीदेखील प्रादेशिक की, हिंदी या दोन भाषांच्या वादात न पडता आपली स्वतःची अशी तिसरी सिनेमांची भाषा समजून केवळ तिचाच आनंद घ्यावा, हीच अपेक्षा.

भारत विविधतेत एकता शोधणारा देश आहे, इथं वेगवेगळ्या संस्कृतीचे, भाषेचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहतात लहानपणीपासून हे ऐकत आणि वाचत वाढलेल्या प्रत्येक पिढीला या गोष्टीवर विश्वास आहे आणि तो असलाच पाहिजे, पण जेव्हा आपण भारताला विविधतेत एकता असणारा देश म्हणतो, त्याचवेळी आपल्याला देशात असणारी विविधता मान्य करावीच लागते. ती विविधता भाषेची, धर्माची, संस्कृतीची असते आणि ती विविधता जपण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे असं आपलं भारतीय संविधान सांगतं. सध्या देशभरात विविधता सोडून केवळ एकच संस्कृती आणि एकच भाषा प्रमाण मानण्याचं फॅड सुरु झालंय, मागच्या महिन्यात असं काही घडलं की, ज्याची चर्चा देशभरात झाली. बॉलिवूड इंडस्ट्री आणि त्यात काम करणारे अभिनेते त्यांच्या भूमिका हा आधीपासूनच चर्चेचा विषय बनत आलाय, काही बॉलिवूड अभिनेते आपल्या भूमिकांमुळे चर्चेत असतात तर काही कुठलीच भूमिका न घेतल्याने चर्चेत असतात.

जिथं कलाकारांचं भूमिका घेणं त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असतं, तिथं क्वचितवेळी भूमिका घेणार्‍या कलाकाराला तितकं महत्व दिलं जात नाही, पण हीच भूमिका जेव्हा लोकप्रिय विषयाबद्दल असते तेव्हा मात्र मीडियात राहण्याची पुरेपूर संधी दोघांना मिळते, गेल्या काही महिन्यात हिंदी पट्ट्यांमध्ये दाक्षिणात्य सिनेमाना मिळणारा प्रतिसाद हा बॉलिवूडच्या सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी डोकेदुखी ठरलाय हे सत्य नाकारून चालणार नाही. तेलगू आणि तामिळ सिनेसृष्टीतील सिनेमांना यश मिळणं एकवेळ आपण समजूदेखील शकतो, पण ज्या इंडस्ट्रीत सुपरस्टार्सची वाणवा गेल्या काही वर्षांत होती, अशा कन्नड भाषेतील केजीएफ 2 ला मिळालेलं यश सर्वांचीच चिंता वाढवणार आहे. त्यातच कन्नड अभिनेता किच्चा सुदीप त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला, त्याला कधीच लवकर रिअ‍ॅक्ट न होणार्‍या अजय देवगणने उत्तर दिलं आणि चर्चेला सुरुवात झाली. हिंदी राष्ट्रभाषा आहे का? एकीकडे विविधतेचा नारा देणार्‍या भारतीयांसाठी एकच भाषा राष्ट्रीय भाषा कशी होऊ शकते आणि मग त्यांच्या मातृभाषेचे काय? असे जुने प्रश्न पुन्हा एकदा या ट्विटर वॉरच्या माध्यमातून समोर आले. हिंदी पट्ट्यात प्रादेशिक भाषेतील सिनेमांना मिळणारा प्रतिसाद, दाक्षिणात्य लोकांचं आपल्या भाषेवर असणारं प्रेम आणि बॉलिवूड अभिनेत्यांची सिलेक्टिव्ह भूमिका यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न.

- Advertisement -

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, प्रत्येक भाषेचं स्वतःच एक सौंदर्य आहे, भाषेवर प्रेम करणारा त्यांचा एक विशेष वर्ग आहे. इतर भाषांच्या तुलनेत हिंदी बोलणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे, म्हणून तीच भाषा राष्ट्रीय भाषा करावी असा आग्रह करणे म्हणजे बाकीच्या भाषांचं अस्तित्व नाकारणं आणि ती विविधता देखील नाकारणं होय. नुकताच अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि आयुष्मान खुराणा अभिनित अनेक नावाच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हिंदीचा आग्रह धरणार्‍या व्यक्तींनी एकदा तो ट्रेलर नक्की पाहावा, त्यात एक दृश्य आहे, ज्यात आयुष्मान तेलंगणाच्या एका व्यक्तीला विचारतो की, तू कुठला आहेस, उत्तर मिळतं साउथ इंडिया, पुन्हा प्रश्न विचारतो की तुला काय वाटत? मी कुठून असेन? तो म्हणतो नॉर्थ इंडिया, पुन्हा विचारतो की, तुला असं का वाटलं ? तो म्हणतो की, तुझी हिंदी खूप चांगली आहे.. तेव्हा आयुष्मान म्हणतो की, याचा अर्थ हिंदी ठरवते की, कोण साऊथच आहे आणि कोण नॉर्थच, समोरचा व्यक्ती अनुत्तरित राहतो आणि तेव्हा आयुष्मान रागात विचारतो की, मग कसं डिसाईड केलं जातं की, कोण भारतीय आहे आणि कोण भारतीय नाही? भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत अनेकवेळा हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून दर्जा देण्याची मागणी केली जाते, याला कारण असं दिलं जातं की, देशाची एक तरी भाषा असावी.

पण ज्या देशात काही कोसाला भाषा बदलते त्या देशात हे शक्य होईल का? विरोध हिंदीविषयी प्रेम असण्याला किंवा अभिमान असण्याला नाही. किच्चा सुदीपने अजयच्या ट्विटला दिलेल्या रिप्लायमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे हिंदीवर प्रेम करतो, आदर करतो आणि आम्ही हिंदी शिकलीदेेखील आहे. पण माफ करा, काय झालं असतं जेव्हा मी तुमच्या ट्विटला कन्नड भाषेत उत्तर दिलं असतं, काय आपण सगळे भारतीय नाही आहोत का?. जेव्हा आपण स्वतःला भारतीय म्हणवून घेतो, तेव्हा या सगळ्या भाषांचा आदर करणं त्यांच्या सगळ्या संस्कृतीचा आदर करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.

- Advertisement -

हिंदी सिनेमांतील अभिनेत्यांची आणि निर्मात्यांची एक विशेषत: आहे, सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अनेकवेळा इथं स्वतःहून वाद निर्माण केले जातात. पद्मावत असो किंवा इतर कुठलाही मोठा सिनेमा, प्रदर्शनाच्या आधी असे वाद हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. हिंदी विरुद्ध दाक्षिणात्य भाषा हा वाद उफाळून येण्यात अजय देवगणचा हात होता, आता अजयने ज्या ट्विटरचा आधार घेतला त्याच्या ट्विटरची हिस्ट्री पाहिली तरी लक्षात येईल की, तो नियमित ट्विट करत नाही. त्यातल्या त्यात अशा संवेदनशील विषयांवर तर मुळीच नाही, म्हणून त्याचं किच्चा सुदीपला दिलेलं उत्तर हे त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग असू शकतो असं म्हणायला इथं स्थान आहे. अन्यथा ज्या अजय देवगणचं दुकान गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमांच्या रिमेकवर चालत आलंय, तो अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याची शक्यता नाही.

गेल्या काही महिन्यात साऊथच्या सिनेमाना मिळणारा प्रतिसाद, केजीएफ 2 ला होणारी गर्दी आणि त्यातच अजयच्या रनवे 34 चे प्रदर्शन यामुळे हे ट्विट आल्याची शक्यता वर्तविण्यात आली. भारतात बोलल्या जाणार्‍या इतर भाषांप्रमाणेच हिंदी हीदेखील एक भाषा आहे, फरक इतकाच की, ही भाषा बोलणार्‍यांची आणि समजणार्‍यांची संख्या तुलनेने अधिक आहे. म्हणून केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीला भारतीय सिनेमा इंडस्ट्री म्हणणं चुकीचं आहे. भारतीय चित्रपट इतिहासाच्या प्रवासात मराठी, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, आसामीपासून ते भोजपुरी आणि पंजाबीसारख्या प्रत्येक प्रादेशिक भाषेचं आणि त्या भाषेतील सिनेमांचं योगदान आहे. गेल्या काही काळात स्वातंत्र्यानंतर हिंदी इंडस्ट्रीने इतर इंडस्ट्रीना डॉमिनेट केले आणि आता साऊथ इंडस्ट्री हिंदीवर वर्चस्व गाजवू लागलीये, म्हणून आता अभिनेत्यांनी आणि प्रेक्षकांनीदेखील प्रादेशिक की, हिंदी या दोन भाषांच्या वादात न पडता आपली स्वतःची अशी तिसरी सिनेमांची भाषा समजून केवळ तिचाच आनंद घ्यावा, हीच अपेक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -