Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश SOS, Attention: कबीरा

SOS, Attention: कबीरा

या निर्मनुष्य वस्तीत झुंडच झुंड. जिवाचा थरकाप उडावा असा सारा माहोल. त्यात तुझी माझी चुकामूक झाली. आता या अनोळखी भवतालात मी गर्दीत आईचं बोट निसटलेल्या लहानग्यासारखा. कुणी शाहरूख हातात बंदूक घेऊन रस्त्यावर येतो तर कोणी कपिल सार्‍या दंगलीचं नेपथ्य रचतो. मी श्वास रोखून पाहतो. sos चे तुला किती कॉल द्यावेत, पण जणू मध्ये काच असावी आवाज बाहेरच जात नाही. तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. तुझ्या-माझ्या दरम्यान ही निर्वात भिंत तयार झाली आणि मग सार्‍या शहराचं रक्तरंजित मैदान झालं.

Related Story

- Advertisement -

तू भर बाजारात उभा आहेस सगळ्यांसाठी प्रार्थना करत. कोणी कोणाचं शत्रुत्व पत्करू नये आणि सार्‍यांचं भलं व्हावं म्हणून तू बोलतो आहे सर्वांशी. पण प्रार्थना करतो आहे कुणाकडे ? गलबलाट इतका आहे की परस्परांचे आवाज ऐकू येत नाहीत इथं. किंकाळ्यांनी, आक्रंदनांनी विरतात या हाका, या प्रार्थना. तुझी प्रार्थना पोहोचत नाही. जीवाच्या आकांताने मीही तुला हाक मारतो आहे; पण बहुतेक माझा आवाजही तुझ्यापर्यंत पोहोचत नाही.

या निर्मनुष्य वस्तीत झुंडच झुंड. जिवाचा थरकाप उडावा असा सारा माहोल. त्यात तुझी माझी चुकामूक झाली. आता या अनोळखी भवतालात मी गर्दीत आईचं बोट निसटलेल्या लहानग्यासारखा. कुणी शाहरूख हातात बंदूक घेऊन रस्त्यावर येतो तर कोणी कपिल सार्‍या दंगलीचं नेपथ्य रचतो. मी श्वास रोखून पाहतो. sos चे तुला किती कॉल द्यावेत, पण जणू मध्ये काच असावी आवाज बाहेरच जात नाही. तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. तुझ्या-माझ्या दरम्यान ही निर्वात भिंत तयार झाली आणि मग सार्‍या शहराचं रक्तरंजित मैदान झालं.

- Advertisement -

दिल्ली कहाँ गईं तिरे कूचों की रौऩकें
गलियों से सर झुका के गुज़रने लगा हूँ मैं

जां निसार अख्तर हे बोलत होता तेव्हाही तू प्रार्थनामग्न. दिल्ली का और दिल का हाल एक जैसा होने लगा आणि कातरवेळ अंगावर धावून आली.
नऊ महिन्याचं पोर पोटाशी धरून ती तुझा धावा करत होती ते घरावर धावून आले तेव्हा. घर जळून खाक झालं. कोणी अश्फाक, कोणी रतनलाल, कोणी इमरान, कोणी अंकित सारे होरपळले. ‘माणूस मारला, माझा माणूस मारला’ सांगणारा संभाजी भगत केव्हाचा गात होता, पण कान बंद केलेल्या गर्दीला काय ऐकू येणार होतं !
मग त्यांनी आपल्या घरांवर झेंडे रोवले, ही आपली घरं, ही त्यांची घरं आणि मग आग लावत सुटले. मृत्यूशय्येवर असणार्‍यांना त्यांनी राष्ट्रगीताचे धडे दिले. हातातल्या शस्त्रांनी त्यांनी संपवून टाकलेलं दिसेल त्याला. माणसं संपवली त्यांनी; पण त्यांचा द्वेष संपला नाही. वाढत राहिला. वाढवला गेला. मशिदींवर भगवे झेंडे लावणारे ते हात पाहून तुही हळहळला असतास. हे सारं होत असताना ते शांत होते. कारण हेच तर त्यांना हवं होतं म्हणून तर त्यांनी तुझा-माझा संपर्क तोडून टाकला.
हे सारं होऊ दिलं गेलं, कारण कुंपणानेच शेत खाल्लं होतं.
रक्तपिपासू सैतानांची फौज रस्त्यावर उतरली तेव्हा शेकडोंनी तुला हाक दिली. तू दूर गेलास की आम्ही तुझ्यापासून दूर, हा प्रश्न आता विचारता येईल की नाही, कोण जाणे !
पण या गल्लीतून जाताना तुझाही श्वास गुदमरेल कबीरा.
ही पाहिलीस राख झालेली ? इथं शाळा होती. शाळांमधले बेंचेसही तोडलेले पाहिलेस ? ही मुलांची पुस्तकं. लायब्ररीत अभ्यास करत होती मुलं. ही लायब्ररीही उध्वस्त झाली. आणि जे पुस्तक दिसतं आहे ना इथं ते आहे टागोरांचं. त्यावर लिहिलं आहे- ‘चित्त जिथे भीतीशून्य, उंच जिथे माथा, ज्ञान जिथे मुक्त तिथे उन्नत करी नाथा’ बाजूलाच गांधींवरचं ‘गांधी विचार और दर्शन’ हे पुस्तकही निपचित पडलं आहे. हे गांधी टागोर म्हणजे तुझ्याच वाटेवरचे यात्रिक; पण तेही आता आउट ऑफ रेंज ! शाळेच्या अंगणात हा तोडक्या मोडक्या बेंचेसचा सांगाडा रचला आहे. हा सांगाडा खरं तर सापळा आहे हे केव्हा कळेल त्यांना ? शाळेतल्या पोराचा बाप म्हणाला, मुलं घाबरली आहेत, वर्षभर तरी या सदम्यातून ते बाहेर येतील की नाही, कोण जाणे. मृत्यू या शब्दाचा अर्थही ठाऊक नसलेली पोरं या भीषण चित्राकडं कसं पाहात असतील ? वर्ष- दोन वर्षं की संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या डोळ्यासमोर नाचत राहील हे तांडव ? बाजूलाच एक कार जाळली आहे. कोणी विजय नावाचा ड्रायव्हर पोरांना घरातून शाळेत, शाळेतून घरी सोडत होता. अशी छिन्नविच्छिन्न झालेली शाळा पाहून तुझं ‘ढाई आखर प्रेम के’ नाही म्हणता येत रे कबीरा. या प्रार्थनाही पोकळ वाटू लागतात. ही असहाय्यता सर्व काही व्यापून उरते. एक भलंमोठ्ठ शून्य.
इथं तर प्रेतांवर हिरवे भगवे शिक्के आहेत. गल्ली-गल्लीत बाउन्ड्री आखली गेली आहे. मंदिर मशिदीच्या तटबंदी पक्क्या झाल्या आहेत. कधीकाळी माणसं रहायची इथं यावर तुझा विश्वासच बसणार नाही..
पण तुला तर इथं रहायला जागाच नाही, हे माझ्या लक्षातच नाही आलं कबीरा. तुला कसं राहता येईल इथं ? तुझ्याकडे नागरिकत्वाचा दाखलाच नाही, मला ठाऊक आहे. आमच्या एनआरसीतून तुला आम्ही धक्के मारून बाहेर काढू, याचीही आहे खात्री; म्हणूनच तुला हाक देताना भीती वाटते, तू म्हणशील हे कोणते परग्रहवासी ? तुझ्या डोळ्यात अनोळखी भाव पाहून मी आणखी घाबरून जाईन.
मी डोळे मिटून घेतो. स्क्रोल करत राहतो. टीव्ही बंद करतो. वर्तमानपत्रापासून पळ काढतो; पण तरीही या रक्ताळलेल्या प्रतिमा मानगुटीवर बसून राहतात. पिच्छा सोडत नाहीत. नंतर शेअर बाजाराच्या चढत्या निर्देशांकाप्रमाणे ते सांगत राहतात मृत्यूचा निर्देशांक; आम्ही काढत राहतो मोर्चे आणि सामूहिक वेदनेच्या अभिव्यक्तीतूनही नाही पडता येत बाहेर यातून.
आजही आम्ही तुझाच धावा करतो आहोत. या भयंकर दलदलीत चाक अडकलं आहे आमच्या असण्याचं.हे रेस्क्यु ऑपरेशन तूच करू शकतोस. प्रेमाच्या गल्लीतून एकालाच जाता येतं, हे तू पुन्हा सांगायला हवं. इट्स अ‍ॅन अर्जंट कॉल. तू यायला हवंस. अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस, नेते, कम्पेनसेशन, हॉस्पिटल्स येतील. सारं विधिवत होईलच; पण तुझ्याशिवाय ही जखम भरु शकत नाही.
SOS, Attention : कबीरा !

- Advertisement -

श्रीरंजन आवटे

- Advertisement -