घरफिचर्ससारांशबुरा न मानो दिवाली है.....

बुरा न मानो दिवाली है…..

Subscribe

शिंदे लड
आधी एक पंच्चावन्न फटाक्यांची ही एकसंध लड होती, यातले ५० फटाके गेल्या ऐन पावसाळ्यात २० जून रोजी अर्ध्यातून वेगळे फुटले. त्यानंतर या नव्या लडीनं जुन्या लडीशी फारकत घेऊ पन्नास लवंगी फटाक्यांना शिंदे लड असं नावही दिलं. ही आता ५० फटाक्यांची माळ असते. यातला हा प्रमुख सर्वात पुढे असलेला शिंदे फटाका या दिवशी जून महिन्यात जोरदार फुटला असून एकदा सुरू झालेली ही फटाक्यांची माळ अजून अडीच वर्षे सातत्याने फुटत राहील. ही माळ एकदा का पेटवली की थांबवणं कठीण जातं. आवाज आणि प्रकाश मोठा असल्यानं या लडीची मागणी यंदा वाढली आहे.

उद्धव आकाशतारा
हा महाराष्ट्रातल्या अवकाशात जोरदार आवाज करणारा आणि त्यामागून रंगिबेरंगी प्रकाशाची उधळण करणारा असा आहे. राज्याच्या राजकारणात भगव्या रंगाची आग पेटवणारा असा हा आकाशतारा फटाका आहे. हा बॉम्ब वात पेटवणार्‍याचीही काळजी घेतो. आपल्या आवाजामुळे सात दशकं महाराष्ट्राचा राजकीय आसमंत व्यापणारा ठाकरे फायरवर्क्स कंपनीचा हा बॉम्ब संयमी जरी असला तरी ताकदीचा आहे.

- Advertisement -

राहुलबाजा
कन्याकुमारीमध्ये नुकतीच वात पेटलेला राहुलबाजा हा मोठा दीर्घकाळ वाजणारा फटाका आहे. येत्या ७ ते ११ नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस या फटाक्याचा आवाज महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात घुमू शकतो. हा फटाकाही उद्धवतारासारखाच संयमी आणि शांत आहे. ज्याप्रमाणे अवकाशात वीज चमकल्यावर आधी प्रकाश दिसतो त्यानंतर आवाज येतो तसाच राहुलबाजा आहे. या फटाक्याचा आधी प्रकाश दिसतो, त्यानंतर निवडणुकीच्या काळात हा फटाका जोरदार धमाका घडवून आणतो.

राजबॉम्ब
हा फटाका बरेचदा एकटाच फुटतो, मात्र आवाजाची धार, जरब, वात लावल्यानंतर काही सेकंदांचा पॉज जोरदार असल्यानं या बॉम्बला प्रचंड मागणी आहे. या बॉम्बचा आवाज महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत पोहचत असल्यानं या फटाक्याचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची मागणी केंद्रातल्या फायरवर्क्स नियंत्रण खात्यातून नेहमीच केली जाते. निवडणुकीच्या विजयाच्या आधीच हा फटाका अनेकदा फुटतो, मात्र या बॉम्बचा परिणामकारक आवाज आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सगळ्यांकडून केले जातात. डेसिबलचं यंत्र किंवा कुठल्याही कायद्याला हा बॉम्ब जुमानत नसल्यानं याची भीती आणि दरारा कायम आहे.

- Advertisement -

शरदाचं रॉकेट
भारताच्या राजकारणाच्या दिवाळीत या फटाक्याला आजपर्यंत पर्याय सापडलेला नाही. हा सगळ्यात मोठा फटाका आहे. हे रॉकेट राजकारणाचा आसमंत आपल्या रोषणाईनं उजळून टाकतं. निवडणुकीची वात पेटवल्यावर पाच वर्षांनी या रॉकेटचा प्रकाश पाहायला मिळतो. हे रॉकेट विविधरंगी असतं. आकाशात गेल्यावर हे मोठ्यानं आवाज करतं. त्यानंतर त्यातून प्रकाशाची फुलं उधळली जातात. अगदी जुनं जाणतं आणि मागील ८० वर्षांपासून देशाच्या राजकीय दिवाळीत सातत्यानं अजून हे रॉकेट त्याच परंपरेनं आणि ताकदीनं आजही सक्रिय आहे.

सुषमांची सुरसुरी
राजकारणाच्या अंधारलेल्या आकाशात या सुरसुरीच्या तेज आणि प्रकाशानं महाराष्ट्राचा राजकीय आसमंत नुकताच उजळून निघत आहे. ही सुरसुरी खूपच तडतडते अशी तक्रार केली जाते. राजकीय दिवाळीत जरी ही सुरसुरी नवी असली तरी त्यातली आग नीट न हाताळल्यास चटका देणारी आहे. ही सुरसुरी नुकतीच पेटवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला अंधार नाहीसा होईल असं मानलं जात आहे.

रामदासी भुईनळे
या भुईनळ्यावर कुठल्याही वातावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. केवळ दिवाळीच नाही तर दसरा, जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, अगदी ईदच्या दिवशीही हा फटाका जोरदार फुटतो. हा भुईनळा एकदा का पेटवला की तो नियंत्रणात आणणं कठीण असतं. या फटाक्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाची दिवाळी साजरी होत नाही.

राणेंचा डबलबार
महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात जोरदार आवाज करणारे हे दोन फटाके एक-दोन सेकंदांच्या अवकाशाने किंवा अनेकदा जवळपास एकाच वेळेस फुटतात. ठाकरे फायरवर्क्सच्या कंपनीशी कायम स्पर्धा करणारे राणे फायरवर्क्सचे हे दोन फायरब्रँड मानले जाणारे तरुण फटाके आहेत. राणे आणि ठाकरे कंपनीत फटाक्यांच्या आवाजावरून तीव्र स्पर्धा सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे प्रदूषण वाढले असल्याची तक्रारही होत आहे.

फडणवीशी बुलेट बॉम्ब
हा फटाका मागील दोन दिवाळ्यांमध्ये यंदा मी पुन्हा आवाज करेन, असं सांगत होता, मात्र यंदाच्या दिवाळीत त्यांना संधी मिळाली. हा फटाकाही मोठ्या परिणामकारक आवाजाचा आहे. यंदाच्या दिवाळीत फडणवीशी बुलेट बॉम्बने शिंदे लडीशी जुळवून घेतल्यानं हे दोन्ही फटाके या दिवाळीत एकाच वेळेस आजूबाजूला फुटणार आहेत. शिंदे लडीला ठाकरेंच्या दारुखान्यातून बाजूला काढून स्वतंत्र फुटण्यासाठी फडणवीशी बुलेटच्या आवाजानं मदत केल्याची चर्चा नुकत्याच झालेल्या राजकीय दिवाळीत केली जात होती.

पंकजा चक्री
ही गोलाकार वेगानं फिरणारी चक्री असून वात पेटवल्यावर आधी त्यातून वेगाने फिरता फिरता आगीची कमळपुष्पे बाहेर पडतात, मात्र आता जमिनीवरच गरागरा फिरायचे नाही तर राजकीय अवकाशात मोठी झेप घेऊन प्रकाशकमळांची उधळण करण्याची इच्छा या चक्रीची असल्याची चर्चा आहे. ही इच्छा लवकर पूर्णत्वास जाईल, याच दीपोत्सवाच्या सदिच्छा.

फटाक्यांचा प्रकाश वर्षाव
हा फटाका अत्यंत अभ्यासू आणि संयमी मानला जातो. हा फटाका अकोला सोडून इतर कुठल्याही दिवाळीला फुटत नाही, मात्र या फटाक्याच्या तेजानं महाराष्ट्राचा राजकीय आसमंत कायमच उजळून निघाला आहे. आवाज जरी कमी असला तरी या फटाक्याचा प्रकाश मोठा आहे. आवाज आणि राजकीय प्रदूषणाबाबत हा फटाका आजोबांनी केलेल्या कायद्याचे नेहमीच पालन करीत आलेला असल्याने या फटाक्याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात एक दरारा आणि आदर आहे.

खडसेंची खडखडी
खडखड तडतड वाजणारा असा हा मोठा अनुभवी मात्र महाराष्ट्राच्या राजकीय दिवाळीत काहीसा उपेक्षित राहिलेला फटाका आहे. राजकीय दिवाळीत निवडणुकीची आग दिल्यावर या फटाक्यातूनही आधी रंगीबेरंगी प्रकाशाची कमलपुष्पे बाहेर पडत होती. त्यामुळे अधूनमधून या फटाक्याच्या आगीचे चटके हा फटाका पेटवणार्‍यांनाही बसत होते. आता हा खडखड फटाका गजराचं घड्याळ बांधलेल्या हातात आहे.

(याशिवाय महाराष्ट्राच्या राजकीय दिवाळीत यंदा नाग गोळ्या, टिकल्या, चिमणी कावळे, हवाहवाई, आपटीबार, इतर छोटे मोठे बार, सुरसुर्‍याही वाजणार आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -