घरफिचर्ससारांशअभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी !

Subscribe

‘अभिव्यक्ती म्हणजे काय आणि काय आहे नेमका कायदा? आपले विचार, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल मतं मांडणे, आपल्या भावना, संवेदना निर्धोकपणे व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय’. भारतीय राज्यघटनेच्या 19 व्या कलमानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार मिळाले आहेत. ज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे. मात्र बर्‍याच जणांना अभिव्यक्ती म्हणजे काय याची संकल्पनाच आजवर स्पष्ट उमगलेली नाही अशी शंका निर्माण व्हावी असे प्रकार सर्रासपणे घडताना दिसतात. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य निरंकुश नाही तर त्याला सभ्यतेची, नैतिकतेची, भाषेची, संयमाची आणि नियमनाची मर्यादा आहे याचा विसरच आजच्या पिढीला पडलेला दिसतो.

आपल्या देशात Freedom of Expression म्हणजेच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या शब्दांचा उल्लेख सहसा एखादा वाद होतो तेव्हाच येतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करून केलेली अश्लाघ्य टीका अतिशय हीन दर्जाची होती. त्यासाठी तिच्यावर रितसर गुन्हा दाखल करून अटकही झाली. मात्र न्यायालयात तिने स्वतःच्या समर्थनार्थ मला कुणाहीबद्दल मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा केलेल्या युक्तिवादाने पुन्हा एकदा अभिव्यक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. स्वतः एपिलेप्सीची रुग्ण असूनही एका माणसाच्या व्यंगावर केलेली टीका आणि त्याच्या मरणाची प्रकट केलेली इच्छा ही तुमची अभिव्यक्ती असू शकते? विकृत मानसिकतेची व्यक्तीचं हे करू शकते. पण हा मुद्दा फक्त इथे संपत नाही. केतकी चुकलीच पण तिच्या पोस्टनंतर कार्यकर्त्यांनी तिला ज्या गलिच्छ आणि अश्लील भाषेत ट्रोल केले ते तरी कुठे योग्य होते. आश्चर्य म्हणजे यात महिला वर्गही मागे नव्हता.

विकृतीला विकृतीने उत्तर देणे हे कोणत्या संस्कृतीत बसते? पुरुषांनी महिलांचा अपमान केला, त्यांनी अवघ्या महिला वर्गाची माफी मागायला हवी ही मागणी होत असताना, जेव्हा महिलाच आक्षेपार्ह वक्तव्य करतात त्याचं काय? ममता बॅनर्जींवर टीका करणारी कंगना असो वा महिलांच्या राहणीमानावर टिप्पणी करणारी कीर्तनकार शिवलीला असो यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार दिला कुणी. जेव्हा कीर्तनकार इंदुरीकर महाराज महिलांची भांडणं, राहणीमान यावर विनोद करत अतिशय नाट्यमय पद्धतीने निकृष्ट भाषेत ते मांडत असतात तेव्हा त्यांना प्रतिसाद देणार्‍या वर्गात महिलाही असतातच. एक महिला म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आपली भूमिका मांडणे आवश्यक असताना इतरांना सामील होणं अथवा मौन पत्करणं हा समर्थनाचा भाग झाला. एखाद्या अभिनेत्रीच्या चित्रपटातील काही दृष्यांवर अश्लीलतेचा ठपका ठेवून तिच्याविरुद्ध अश्लील भाषेत आक्षेप नोंदविणार्‍या वर्गाला आजवर कोणत्या दुसर्‍या अभिनेत्रीने येऊन त्या दृष्यात ती एकटी नसून पुरुषही आहे हे सांगण्याची धमक दाखवून समर्थन दिले. गरज आहे तिथे कुठे असतो तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर?

- Advertisement -

‘अभिव्यक्ती म्हणजे काय आणि काय आहे नेमका कायदा? आपले विचार, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल मतं मांडणे, आपल्या भावना, संवेदना निर्धोकपणे व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय’. भारतीय राज्यघटनेच्या 19 व्या कलमानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार मिळाले आहेत. ज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे. मात्र बर्‍याच जणांना अभिव्यक्ती म्हणजे काय याची संकल्पनाच आजवर स्पष्ट उमगलेली नाही अशी शंका निर्माण व्हावी असे प्रकार सर्रासपणे घडताना दिसतात. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य निरंकुश नाही तर त्याला सभ्यतेची, नैतिकतेची, भाषेची, संयमाची आणि नियमनाची मर्यादा आहे याचा विसरच आजच्या पिढीला पडलेला दिसतो.

मुळात या अधिकाराबाबत लोकांची झालेली गल्लत इतकी टोकाची आहे की तोंडाला येईल ते बोलत सुटणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा सोयीचा अर्थ त्यांनी घेतला. भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार आपल्याला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कलम 19 (2) ते (6) मध्ये काही मर्यादा घालून दिल्या आहेत ज्यात देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व, राष्ट्रीय सुरक्षा, परकीय देशांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक व्यवस्था, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान आणि अब्रूनुकसानी किंवा गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्यास कायद्याने शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

पूर्वी वर्तमानपत्रे, नभोवाणी, पुस्तके, भाषणं अशी मर्यादित माध्यमे असल्याने त्याद्वारे व्यक्त होणारा वर्गही मोजकाच होता. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात हाती इंटरनेट आले आणि समाजमाध्यमे हाताशी आल्यानंतर जनसामान्यांना व्यक्त होण्याची आयती संधी मिळाली. एका अर्थाने ही बाब सुखावणारी असली तरी त्याचे तोटेही आता जाणवायला लागले आहेत. पूर्वी नळावरची भांडणे असायची आजकाल फेसबुकवर असतात. विचारांचा विचारांशी असलेला लढा वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारा कधी होतो कळतच नाही. मतभेदांचे मनभेदात रूपांतर होऊन अभिव्यक्तीच्या नावाखाली केवळ छळवाद मांडणे हे स्वातंत्र्याच्या कक्षेत बसते की स्वैराचाराच्या याचा तार्किक अंगाने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जातेय, ही माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर येणारी गदा आहे, त्याने माझ्या बोलण्याच्या अधिकाराची पायमल्ली केली हे आजच्या जगातील परवलीचे शब्द ठरावेत इतका उच्छाद मांडला गेला आहे या शब्दसमुहांचा. कोणत्याही घटनेवर व्यक्त होताना चटकन कुणाच्याही भावना दुखावून आपला इगो कुरवाळत बसण्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत असाल तर यापेक्षा दयनीय अवस्था कुणाचीही नसावी.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणारी लोक आहेत तशीच मुद्देसूदमांडणी करत व्यक्त होणेही महागात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या विषयाचे कंगोरे उलगडले तितके कमीच. त्यातील काही महिन्यांपूर्वीच घडलेलं उदाहरण म्हणजे कलाकार किरण माने प्रकरण. एक व्यक्ती म्हणून ठराविक समुदाय, विचारधारेच समर्थन करणे अथवा विरोध करणे आपल्या अंगलट येऊ शकतात याची उदाहरणे कमी नाहीत. यात व्यक्त होणार्‍याची चूक नसली तरी त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून तो संदेश चुकीच्या पद्धतीने सर्वदूर पोहोचणे हा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा मोठा तोटाच म्हणावं लागेल. असहिष्णुतेच्या मुद्यावर आमीर खानने केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्याला पाकिस्तानात जाण्याचे मिळालेले सल्ले सर्वश्रुतच आहेत. आपल्याकडे धर्मानुरुप अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टीका करणारी ठराविक वाक्य आहेत. मुस्लीम व्यक्तीने एखाद्या मुद्यावर रास्त टीका केली तर त्याला पाकिस्तानात पाठविणे, हिंदू व्यक्तीने संस्कृतीवर, रूढी परंपरांवर टीका केल्यास हिंदू धर्माच्या नावाला कलंक, धर्मांतराचे सल्ले दिले जातात.

एखादा माणूस व्यक्त होतो त्यानंतर वैचारिक विरोध करणे सहज शक्य असताना हिंसक होणे एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे हे हीन प्रकार घडल्याची सुद्धा काही उदाहरणे देता येतील. संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास लिहिल्याचा आरोप करुन साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेरांवर शाई फेकणे असो वा NCERT च्या पुस्तकात गोगलगायीवर बसलेले डॉ. आंबेडकर आणि त्यांच्यामागे हातात चाबूक घेऊन उभे असलेले पं. नेहरूंच कार्टून अपमानजनक होतं म्हणत NCERT चे सल्लागार डॉ. सुहास पळशीकर यांच्यावर काही तरुणांनी पुण्यात शाई फेकणे असो ही कृत्ये अभिव्यक्तीला अभिव्यक्तीने दिलेली उत्तरे असू शकत नाही. वर्तमानातील काही मजकुराने भावना दुखावल्यावर कार्यालयांची होणारी तोडफोड हे देखील अभिव्यक्तीला मिळालेले हिंसक बक्षीसच म्हणावे लागेल.

वास्तव लक्षात घेऊन त्यावर भान राखत, रास्त आणि मुद्देसूद टीका करणे आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली वाट्टेल ते बरळत आपल्या डोक्यातील घाण बाहेर ओकणे अभिव्यक्तीच्या नाण्याला सध्या या दोन प्रमुख बाजू आहेत. ज्यात पहिली बाजू लोकशाहीला पोषक आणि दुसरी घातक ठरणारी आहे. अभिव्यक्ती शस्त्र आहे चाकुसारखे ज्याच्या धारेचा वापर आत्मरक्षणासाठी करावा की हत्या करण्यासाठी याची निवड ज्याचं त्यानं ठरवावं. मात्र एक स्त्री म्हणून महिलांना इतकच सांगेन अभिव्यक्तीच्या अधिकाराने आपल्या शिवलेल्या ओठांवरील सुटलेले समाजबंधनाचे दोर प्रतीक म्हणून वापरुयात. फैज अहमद फैज यांची एक सुंदर कविता आहे ज्यातून अभिव्यक्तीच्या ताकदीची जाणीव होते. त्यातील काही माझ्या आवडत्या ओळी…

बोल कि लब आज़ाद हैं तेरे बोल ज़बाँ अब तक तेरी है ।
तेरा सुत्वाँ जिस्म है तेरा बोल कि जाँ अब तक तेरी है ।
बोल ये थोड़ा वक़्त बहुत है जिस्म ओ ज़बाँ की मौत से पहले
बोल कि सच ज़िंदा है अब तक बोल जो कुछ कहना है कह ले…

–प्रतीक्षा पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -