घरफिचर्ससारांशसहवास म्हणजेच मैत्री का?

सहवास म्हणजेच मैत्री का?

Subscribe

एखाद्याचा पुरेसा सहवास लाभत नाही म्हणून जवळीकता साधता येत नाही तर एखाद्याच्या सहवासालाच आपण मैत्री समजण्याची गल्लत करतो. बर्‍याचदा हा सहवास गरजेतून, भावनेतून निर्माण झालेला असतो. सहवास संपला की, मग मैत्रीही संपुष्टात येते. तर कधी सहवास संपला तरी मैत्रीचा सुगंध सतत दरवळत रहातो. म्हणजेच मैत्री ही व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे. तिला ढोबळमानाने विशिष्ट निकष लावता येत नाहीत हेच खरं. समान आवडीनिवडी, छंद असले की पटकन मैत्री होते तसेच जे गुण आपल्यात नाहीत ते आपल्या मित्रात आढळले तर कुठेतरी आपल्याच व्यक्तिमत्वाला पूर्णत्व प्राप्त होतं.

‘दिये जलते है..’ हे ‘नमक हराम’ या चित्रपटातलं मैत्रीगीत तसं माझ्याही अत्यंत आवडीचं आहे. पण आताशा मात्र यातील ‘बडी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते है..’ या विधानाशी मी सहमत होत नाही. मित्र मुबलक प्रमाणावर आणि अगदी विनासायास मिळतात. कठिण असतं ते या मित्रांशी झालेली मैत्री टिकवणं. ती जबाबदारी तशी दोन्ही बाजूंची असते. कधी त्यात आपणही कमी पडतो आणि खापर मात्र दुसर्‍यावर फोडून मोकळे होत असतो.

मैत्री..! काय असतं हे नातं? या नात्याची सुरवात होते एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख होऊन. ‘ओळख’ म्हणजे ‘परिचय’ नाही. म्हणजे एखाद्याचा पुरेसा परिचय नसतानाही ओळखही असतेच. एखाद्या अनोळखीशी ओळख होतानाचा तो प्रसंग म्हणजे अर्थातच पहिली भेट. या पहिल्या भेटीतच जी व्यक्ती आपल्याला आवडून जाते त्याच व्यक्तीच्या संपर्कात राहणे आपण पसंत करतो. ओळख वाढवण्यासाठी पावले उचलू लागतो. आणि दोघी बाजूंनी ओढ जाणवू लागली की मगच त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत होऊ लागतं. पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल अनामिक आकर्षण वाटतं. सॉफ्ट कॉर्नर जाणवतो. पहिल्या भेटीतच एखादी व्यक्ती आवडली नाही तर पुढे मग मैत्री निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी आपसुकच त्या अनुषंगाने आपण प्रतिसाद देणं थांबवतो. पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल चांगलं/वाईट असं काहीच मत तयार झालं नाही तर एकवेळ तिथे तरी भविष्यात बंध निर्माण होऊ शकण्याची शक्यता असते.

- Advertisement -

मैत्री ही नवीन असताना तर ती एक विशिष्ट व्यक्तीच तुमचं अंतर्मन आणि अवघं भावविश्व व्यापून टाकत असते. कालांतराने ती मैत्री अधिक घट्टही होते, पण पुढे मात्र अंतर येत जाते. त्याला कारणंही अनेक असतात. एकतर सुरुवातीला चेहर्‍यावर लावलेले मुखवटे आता गळून पडलेले असतात. एकमेकांमधील गुणांबरोबरच त्यांच्यातील दोषही तीव्रतेने दिसू लागतात. कधी अवाजवी अपेक्षा केल्या जातात तर कधी समोरच्याला गृहीत धरले जाऊ लागते. आणि यापैकी काही नसेलच तर इतर गोष्टी कारणीभूत असतात. माध्यम/कार्यक्षेत्र तसेच वैयक्तिक प्राधान्यक्रम बदलले जाणं, व्यस्तता इत्यादी. अशावेळी मग इच्छा असुनही जवळीक वाढवता अथवा ती टिकवता येत नाही. या उलट माध्यम/ कार्यक्षेत्र एकच असले तर त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा, चढाओढ, असुरक्षिता जाणवू लागते. म्हणजे माध्यम एक नाही म्हणून आणि माध्यम एकच आहे म्हणूनही मैत्रीच्या नात्यात अडथळे येतात.

एखाद्याचा पुरेसा सहवास लाभत नाही म्हणून जवळीकता साधता येत नाही तर एखाद्याच्या सहवासालाच आपण मैत्री समजण्याची गल्लत करतो. बर्‍याचदा हा सहवास गरजेतून, भावनेतून निर्माण झालेला असतो. सहवास संपला की, मग मैत्रीही संपुष्टात येते. तर कधी सहवास संपला तरी मैत्रीचा सुगंध सतत दरवळत रहातो. म्हणजेच मैत्री ही व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे. तिला ढोबळमानाने विशिष्ट निकष लावता येत नाहीत हेच खरं. समान आवडीनिवडी, छंद असले की पटकन मैत्री होते तसेच जे गुण आपल्यात नाहीत ते आपल्या मित्रात आढळले तर कुठेतरी आपल्याच व्यक्तिमत्वाला पूर्णत्व प्राप्त होतं.

- Advertisement -

मैत्री म्हणजे उगाचच वाढलेलं वय कमी करणारं यंत्र. आणि ही किमया साध्य करणारा कारागिर म्हणजे मित्र. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात मैत्रीचे नवनवीन प्रकार अनुभवायला मिळत आहेत. त्यातील एक म्हणजे व्हर्च्युअल मैत्री. हा मैत्रीचा एक आभासी प्रकार म्हणता येईल. म्हणजे मैत्री झाल्याचं नुसतं जाणवतं. रोज संपर्कात राहिलं जातं, पण ती मैत्री असतेच असे नाही. कारण या मैत्रीत जो तो आपली एक इच्छित प्रतिमा तयार करत असतो. वास्तव मात्र वेगळंच असतं. आणि जेव्हा ते समोर येतं तेव्हा भ्रमनिरास होतो. कधीकाळी शाळा-महाविद्यालयात एकत्र असणारे सवंगडी अनेक वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्याने भेटतात. मग हरवलेली मैत्री गवसल्याचा साक्षात्कार होतो. पण इथेही कोणीतरी नातं गढूळ करत असतं. कधी वैयक्तिक स्वार्थ, आपलंचं खरं हा दृष्टिकोण, तर कधी सुप्त असणारी व्यभिचाराची भावना जागी होणं अशी कितीतरी कारणं या मागे असतात. मग अशावेळी त्या मैत्रीचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. आणि मैत्री वगैरे सबझुठ असंच वाटायला लागतं. पण मैत्री या सगळ्यांहून भिन्न असते.

कोणतीही बंधनं नसणारं हे एक बंधन आहे. मैत्री कोणत्याही वयाच्या, लिंगाच्या, पदाच्या भिन्न आर्थिक, सामाजिक परिस्थिती असलेल्या व्यक्तींमधे होऊ शकते. गरज असते ती हे नातं निखळ, नितळ आणि निर्मळपणे जपण्याची. एवढं केलं तरी ‘बडी आसानी से दुनिया में दोस्त मिलते है’ असं बिनदिक्कतपणे गाता येऊ शकेल.

–मंदाकिनी शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -