गढीवरच्या पोरी

‘गढीवरच्या पोरी’ या दीर्घांकाला स्वतंत्र असे सलग कथानक नाही. घटना, प्रसंग नाहीत की फ्लॅशबॅक नाही. यातील पात्रे म्हणजे पाच स्त्री व्यक्तीरेखा. मुंबईसारख्या महानगरात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या व एकाच फ्लॅटमध्ये राहणार्‍या या पाचही जणींचे भावविश्व वेगळे, स्वप्ने वेगळी, आयुष्य वेगळे तसेच जगणेही. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी. पदरी आशा-निराशेचा खेळ आणि कुठेतरी भेडसावणारं एकाकीपण. गढी म्हणजे परंपरेचा बंदिस्त बुरूज. येथे ही प्रतीकात्मक गढी आहे. या प्रतीकात्मक गढीच्या आतून आपापल्या विश्वाशी आपल्या पद्धतीनं मुक्त संवाद साधणार्‍या तरुणी यात दिसतात.

लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे या जोडगोळीचं नाटक म्हणजे चुकवू नये असाच प्रयोग. आजवर प्रायोगिक तत्वावर वैविध्यपूर्ण विषय त्यातील आशयाला परिपूर्ण न्याय देत रंगभूमीवर सादर केलेल्या या जोडीची ‘गढीवरच्या पोरी’ ही कलाकृती २०१५ साली रंगभूमीवर आली आणि नाट्यरसिकांच्या पसंतीसदेखील उतरली. सुमारे नव्वद मिनिटांचा कालावधी असणार्‍या या दीर्घांकाने रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद तर मिळवलीच पण त्याचबरोबर प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या झी गौरव पुरस्कारांत तब्बल सात नामांकने आणि विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटक हा पुरस्कारदेखील पटकावला.

हीच नाट्यकलाकृती आता नव्या रुपात, नव्या ढंगात आणि नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आली आहे. यावेळी मात्र त्यात एक वेगळेपण आहे. शीर्षकाला अनुसरून ऑन स्टेज आणि बॅकस्टेज असं दोन्हीकडे तरुण स्त्री कलाकार आणि तंत्रज्ञ हा प्रयोग सादर करत आहेत. रंगमंचावर आणि रंगमंचाच्या मागेदेखील पोरीच असल्या तरी ही कलाकृती फक्त मुलींसाठीच नाही तर समाजातील स्त्री-पुरुष या दोन्ही वर्ग आणि घटकांसाठी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार नाटकाचे स्वरूप आता बदलले आहे. तीन अंकी नाटकाची जागा आता दीर्घांकाने घेतलेली आहे. ‘गढीवरच्या पोरी’ या दीर्घांकात लेखक-दिग्दर्शक जोडीने एक नावीन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे. या दीर्घांकातील पात्रे परस्परांशी संवाद साधताना दिसत नाहीत. प्रेक्षकांना समजावं म्हणून संवाद आहेत, पण हा संवाद थेट प्रेक्षकांशी नाही. तर या पात्रांचा संवाद आहे. परस्परांच्या संपर्कासाठीच्या आताशा अंगवळणी पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या माध्यमातून.

या दीर्घांकाला स्वतंत्र असे सलग कथानक नाही. घटना, प्रसंग नाहीत की फ्लॅशबॅक नाही. यातील पात्रे म्हणजे पाच स्त्री व्यक्तीरेखा. मुंबईसारख्या महानगरात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या व एकाच फ्लॅटमध्ये राहणार्‍या या पाचही जणींचे भावविश्व वेगळे, स्वप्ने वेगळी, आयुष्य वेगळे तसेच जगणेही. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी. पदरी आशा-निराशेचा खेळ आणि कुठेतरी भेडसावणारं एकाकीपण! गढी म्हणजे परंपरेचा बंदिस्त बुरुज. येथे ही प्रतिकात्मक गढी आहे. या प्रतिकात्मक गढीच्या आतून आपापल्या विश्वाशी आपल्या पध्दतीनं मुक्त संवाद साधणार्‍या तरुणी यात दिसतात. त्याच या ‘गढीवरच्या पोरी’!

मानसी कावळे, पल्लवी ठाकरे, सानिका गायकवाड, श्रृती कापसे व वैभवी चव्हाण या नव्या दमाच्या युवा अभिनेत्रींनी साकारलेल्या व्यक्तीरेखा सशक्त तर आहेतच, पण त्याबरोबरच well defined आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा आजच्या आधुनिक काळातील स्त्रीचं प्रतिनिधीत्व करताना दिसते. प्रत्येकीची वाट वेगळी असली तर आयुष्याच्या एका वळणावर एकमेकींच्या त्या सहवासात आलेल्या आहेत. स्त्री शिकली, प्रगती झाली. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात तिची आगेकूच सुरू आहे. तिच्यातील आत्मविश्वास दुणावलाय. मोकळेपणाने आज ती व्यक्त होतेय. आपले विचार, आपली मतं मांडतेय. नवनवी क्षितीजे तिला खुणावत आहेत. तिच्या पंखांत आता नवीन बळ आलंय. तिच्या स्वप्नांचा वास्तवतेकडे प्रवास होत आहे. पण या सगळ्यातही कुठेतरी तिची मानसिक घुसमट होत आहे. काहीतरी शल्य तिला बोचतंय. आजची स्त्री बिनधास्त असली तरी प्रसंगी तितकीच हळवी आणि अतिशय संवेदनशील आहे. हेच या पाचही व्यक्तीरेखांमधून पुन्हा अधोरेखित होतं.

या पाच व्यक्तीरेखांमधून कोणती व्यक्तीरेखा प्रेक्षकांना अधिक भावेल आणि भिडेल हे सांगणं तसं कठीणच आहे. कारण काही व्यक्तीरेखा या लेखकाने आपल्या कसदार लेखणीने सशक्त केलेल्या आहेत तर काही व्यक्तीरेखा या दमदार अभिनयाने अधिक खुलून आलेल्या आहेत. यातील कोणती ना कोणती व्यक्तीरेखा प्रेक्षकांना आपल्या स्वत:शीच किंवा आपल्या परिचयातील कुणाशी तरी रिलेट होत जाणारी वाटू शकेल.

स्नेहा ही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या श्रीमंत कुटुंबातील तरुणी. ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे ती व्यक्ती आपल्याला शारिरीकदृष्ठ्यादेखील आवडली पाहिजे, असं ठाम मत व्यक्त करत असतानाच आईवडिलांकडून होणार्‍या आग्रहामुळे अखेर तडजोड करायला तयार होते. तर आधुनिक लाईफस्टाईल असलेली फटाकडी रागिणी गावाकडून आलेल्या व तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या संवेदनशील मनाच्या कवी मित्राला मैत्री, प्रेम आणि शारीरिक संबंध कसे भिन्न आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या गावी परतण्याच्या निर्णयाने हळवी होऊन जाते. मंगला ही आत्महत्या केलेल्या एका शेतकर्‍याची मुलगी. पुढील शिक्षणासाठी ती शहरात येते. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची धडपड करत आपल्या परिवाराला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसते. पीएचडी मिळवलेली प्रज्ञा तिला मार्गदर्शक असलेले प्राध्यापक आणि तिच्यात असणार्‍या भावनिक नात्याचा गुंता समजून घेण्याचा व समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते. तर प्रियकराने नाकारलेली सारिका प्रेमभंगाच्या वेदनेने स्वत:वरच सुड उगवत भरकटत जाते.

पाचही स्त्री कलाकारांनी समरसून अभिनय करत आपल्या भूमिकांना पूर्णपणे न्याय दिलेला आहे. प्रज्ञा आणि सारिका या व्यक्तीरेखा वेगळेपणामुळे अधिक प्रभावित करतात. त्या अनुक्रमे श्रृती कापसे व वैभवी चव्हाण यांनी ताकदीने साकारलेल्या आहेत. मंगलाच्या भूमिकेसाठी सानिका गायकवाड हिने गावंढळ भाषा आणि उच्चार यावर मेहनत घेतल्याचं जाणवतं. तिची मंगला काही ठिकाणी प्रेक्षकांमध्ये हशा निर्माण करते. मानसी कावळे हिने स्नेहा उत्तम साकारली आहे तर बोल्ड संवाद अगदी सहजतेने उच्चारत पल्लवी ठाकरेने रागिणी ही भूमिका वठवली आहे. मोबाईलवर बोलत असताना आपण काही ना काही हालचाली करतच असतो, एका जागी उभे न राहता फिरत बोलत असतो. ते सगळं या अभिनेत्रींकडून अगदी नैसर्गिक वाटेल अशा पध्दतीने दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी करवून घेतलेलं आहे. त्यांच्या दिग्दर्शनात सफाईदारपणा तसेच कमालीची परिणामकारकता आहे. नुपूर सावजी हिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांना साथ दिली आहे.

लेखक दत्ता पाटील यांचं लेखन नेहमीसारखंचं कसदार, दर्जेदार आहे. प्रत्येक व्यक्तीरेखेचे जवळपास १५ ते २० मिनिटांचे मोबाईलवरील बोलणे, त्यातून त्यांचं उलगडत जाणारं एकूणच व्यक्तीमत्व हे सर्व त्यांनी अत्यंत प्रभावी संवादातून रेखाटलं आहे. मनासारख्या गोष्टी मिळवण्या मागे लागण्यापेक्षा मिळालेल्या गोष्टी मनाजोगत्या करुन घ्याव्या’, ‘लव यु लव यु.. त्याचा आणि प्रेमाचा काही संबंध राहिला नाहीये’, ‘जेवढं बोलायचं ना तेवढाच टॉक टाईम मारायचा.. जेवढा टॉक टाईम मारलाय तेवढं नाही बोलायचं..,’, ‘फोनचं ना जरा वेगळंच असतं. आपण आपल्याशीच बोलल्याचा फिल येतो. पण प्रत्यक्ष भेटलं ना की काहीतरी वेगळचं बोलतो आपण’, ‘पाऊस पडतोय येऊ नकोस असं म्हणणारे बरेच भेटले. पण पाऊस पडतोय जाऊ नकोस असं म्हणणारं कोणीच नाही भेटलं..’ यासारखे काही मनोरंजक, काही गंभीर पण अर्थपूर्ण संवाद या दीर्घांकात आहेत.

या दीर्घांकाचे नेपथ्य तेजस भसे हिने केले आहे. पाच तरुणी दिवाणखाना, खिडकी, बाल्कनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून, बसून बोलताना दाखवल्याने त्यात नैसर्गिकता आली आहे. आर्या शिंगणे हिची प्रकाश योजना प्रसंगांच्या मुडला तर क्षमा देशपांडे हिने केलेली वेशभूषा पात्रांना अनुसरुन अशी आहे. सिध्दी बोरसे, ऋतिका देशमुख यांचं पार्श्वसंगीत प्रभावी झालं आहे. पात्रांच्या तोंडी येणारी ‘दारी तोरण तोरण’ ही ओवी चपखल बसली आहे. सपान निर्मित ‘गढीवरच्या पोरी’ हा दीर्घांक आजच्या स्त्रीची मानसिकता, तिचं भावविश्व, तिची उमेद त्याचबरोबर होणारी घुसमट समजून घेण्यासाठी प्रत्येकाने एकदातरी पहायलाच हवा.

— श्रीराम वाघमारे, नाशिक