वूमन इन ब्लूची अनोळखी कथा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा मोठी क्रिकेट कारकीर्द असलेली, सर्वाधिक क्रिकेट सामने खेळण्याचा, सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा आणि सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम नावावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेटसंघाच्या माजी कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर नुकताच ‘शाबाश मिथू’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि त्या सिनेमात तापसीने मितालीची भूमिका साकारली आहे. वूमन इन ब्लूची कधीच न ऐकलेली आणि न पाहिलेली कथा समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या सिनेमाच्या माध्यमातून केलेला आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन गोष्टींचं भारतीयांशी असणारं नातं इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा फार वेगळं आहे, याच दोन गोष्टी आहेत. ज्या विविध रंगात आणि परंपरेत विभागलेल्या भारतीयांना एकत्र आणतात. गेल्या काही काळात याच दोन गोष्टींचा एकत्र संगम पाहायला मिळाला, तो क्रिकेट खेळाडूंवर आलेल्या बायोपिक्समध्ये… तेंडुलकर, धोनीपासून प्रवीण तांबेपर्यंत अनेक क्रिकेटर्सच्या जीवनावर सिनेमे आले आणि त्याला उत्तम प्रतिसाददेखील मिळाला. क्रिकेट जीव की, प्राण असणार्‍या भारतीयांना, आपल्या आवडत्या खेळाडूला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आणि त्याचा फायदा बॉलीवूडला झाला. क्रिकेट आणि इतर खेळातील नामवंत खेळाडू यांच्या जीवनकथा शोधण्यात आल्या, त्यातील मसालेदार कथा निवडून मग त्यात सुपरस्टारची निवड झाली आणि तोच कित्ता पुन्हा गिरवायला सुरुवात झाली.

खेळ आणि खेळाडू बदलला तरी त्या बायोपिक्सचा पॅटर्न मात्र बदलला नाही. जिंकण्याची आशा नसणारी व्यक्ती ट्राय करते, मग ती कठीण ट्रेनिंग घेते, ट्रेनिंग सुरू असताना बॅकग्राऊंडला सुखविंदर किंवा कैलास जोरजोरात गाणी म्हणतात, मग अजून स्ट्रगल आणि शेवटी आपल्या टीमला एखाद्या रोमांचक सामन्यात तो खेळाडू विजय मिळवून देतो, अशाच काहीशा कथा थोड्या फार फरकाने पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. खेळ कुठलाही असो कथेची मांडणी अशीच काहीशी पाहायला मिळते, आता अशा बायोपिक्समध्ये काम करणारे काही कलाकारदेखील निश्चित झाले आहेत. काहींना त्या भूमिका दमदार वठवता आल्या म्हणून लोकांनी देखील त्यांना डोक्यावर घेतलं, सुशांतचा धोनी किंवा फरहानचा मिल्खा अशी काही उदाहरणं, पण पुरुषांच्या सोबतच काही महिला खेळाडूंवरदेखील बायोपिक्स बनलेत आणि त्या बायोपिक्सची अक्षय कुमार बनलीये, तापसी पन्नू…सुरमा, सांड कि आँख, लूप लपेटा, रश्मी रॉकेट यांसाख्या सिनेमात तिने खेळाडूंची भूमिका साकारली आहे.

तापसी एक उत्तम अभिनेत्री आहे, व्हिक्टिमचे पात्र तिच्यापेक्षा उत्तम साकारणारी दुसरी एखादी अभिनेत्री सध्या मला तरी दिसत नाही, तरीही तिने विविध सिनेमात साकारलेल्या खेळाडूंच्या भूमिका चांगल्या होत्या.. विशेषतः सांड की आंख आणि रश्मी रॉकेटसारख्या सिनेमात तिने पात्र साकारण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येते. सचिन तेंडुलकरपेक्षा मोठी क्रिकेट कारकीर्द असलेली, सर्वाधिक क्रिकेट सामने खेळण्याचा, सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा आणि सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम नावावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेटसंघाच्या माजी कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर नुकताच ‘शाबाश मिथू’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि त्या सिनेमात तापसीने मितालीची भूमिका साकारली आहे. वूमन इन ब्लुची कधीच न ऐकलेली आणि न पाहिलेली कथा समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या सिनेमाच्या माध्यमातून केलेला आहे.

‘शाबाश मिथू’ सिनेमा आजवर आलेल्या खेळाडूंवरील इतर बायोपिक्सपेक्षा वेगळा असण्याचं मुख्य कारण आहे, ते म्हणजे या सिनेमाची कथा मिताली राज स्वतः एका चांगल्या घरातून येते, तिच्याकडे क्रिकेटसाठी आवश्यक कौशल्य होतं, म्हणून तिचा स्ट्रगल इतरांपेक्षा वेगळा होता. ना तिला शाळा संपल्यावर कुठं काम करावं लागायचं, ना तिच्या आईवडिलांनी तिच्या खेळण्याला विरोध केला. तिचा मोठा भाऊ आणि आजी काहीसे नाराज असले तरी ते तिच्यासाठी तितकं महत्वाचं नव्हतं, चांगल्या घरातून आल्यामुळे एका सामान्य मुलीला खेळण्यासाठी जितका संघर्ष करावा लागत होता, तितका तिच्या वाटेला आला नाही. मात्र तिची कथा तिच्या एकटीची कथा नसून संपूर्ण महिला क्रिकेटर्सची कथा होती, एक असा काळ जिथं पुरुष क्रिकेट संघाची तुलना देशासाठी लढणार्‍या सैनिकांसोबत केली जायची, तिथं त्यांच्या तुलनेत कुठेच कमी नसणार्‍या महिला क्रिकेट संघाला मात्र पुरुषांनी वापरलेल्या जर्सीज दिल्या जात, शेयरिंग रूम्स, तुटपुंजी मॅच फीस मिळायची, म्हणून मितालीची कथा केवळ एका खेळाडूची कथा न राहता ती तत्कालीन महिला क्रिकेट संघाचा आरसा बनत आपल्याला सत्य दाखविण्याचा प्रयत्न करते.

सिनेमाची सुरुवात ७/८ वर्षाच्या मितालीपासून होते, जी भरतनाट्यम शिकतेय, तिची एक मैत्रीण आहे नुरी आणि त्या दोघी घरातल्या थापीने क्रिकेट खेळायला सुरुवात करतात, मितलीला त्यात इंटरेस्ट येतो आणि ती स्वतः त्यात रस घेऊन शिकू लागते. मितालीच्या भावाची क्रिकेट शिकवणार्‍या संपत सरांशी (विजयराज) ओळख होते. त्यानंतर ते तिच्या घरच्यांना मितालीला क्रिकेट खेळू देण्याची विनंती करतात, पुढे काय घडतं यासाठी सिनेमा पहावा लागेल. ८ वर्षाच्या इनायत नावाच्या मुलीने लहानपणीच्या मितालीची भूमिका रेखाटली आहे आणि तिचे डोळे, संवाद सगळं काही अप्रतिम आहे. तापसीला आता अशा प्रकारचे रोल्स निभवण्यात फार अडचण येत नसावी, तिचे हावभाव आणि संवाद दोन्हीही चांगल्या तर्‍हेने जमून आलंय. विजयराजसह इतर सर्व पात्रांच्या भूमिकादेखील चांगल्या आहेत.

बंगाली दिग्दर्शकांना कॅमेर्‍याच ज्ञान काहीसं अधिकच असतं, असं मी कुठेतरी ऐकलं होतं. ‘शाबाश मिथू’मध्ये एक दृश्य पाहिल्यावर याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वानाच येईल, महिला क्रिकेट संघाची वार्मअप मॅच सुरू आहे आणि ती सुरू होण्याअगोदरच विजयराज उर्फ संपत सर मितालीला टीमच्या इतर खेळाडूंच्या इतिहासाबद्दल सांगतात, त्यांच्या संघर्षाबद्दल सांगतात आणि बॅटिंग करताना मितालीला अचानक प्रत्येक प्लेअरचा इतिहास दिसायला लागतो. तिच्या संघात असणार्‍या प्रत्येक खेळाडूची कथा वेगळी सांगण्याचा प्रयत्न केला गेला असता तर ते शक्यच झाले नसते, पण काही वाक्य आणि त्यानंतर आलेल्या कॅमेर्‍यामध्ये त्यांनी तो इतिहास समोर आणलाय, सिनेमातील सर्वोत्तम सीन म्हणजे तोच असं म्हणायला हरकत नाही. सिनेमात कुठलंही पात्रं नकारात्मक नाहीये, प्रत्येक पात्राच्या काही छटा आहेत आणि ते त्यानुसार वागतं, म्हणून सुरुवातीला खलनायक वाटत असलेल्या पात्रांबद्दलदेखील शेवटी सहानुभूती निर्माण होते. शाबाश मिथू केवळ मितालीचा बायोपिक नाहीये, त्यात दाखविण्यात येणारे बरेचसे सीन्स संपूर्ण महिला भारतीय क्रिकेटचा इतिहास दाखवतात.

शौचासाठी रस्त्याच्या कडेला बसाव्या लागलेल्या आपल्या जागतिक महिला क्रिकेट खेळाडू, सीआयए- मध्ये ३० वर्षांपासून काम करणार्‍या पिऊनची वास्तविकता आपल्यापेक्षा फार वेगळी नव्हती. इतकं सगळं चांगलं असतानाही शाबाश मिथू हा एक चांगला सिनेमा नाहीये, याचा मुख्य प्रॉब्लेम आहे सिनेमाचा सेकंड हाफमधील फॅक्च्युअल चुका आणि स्क्रिनप्ले रटाळ होतो. २०१७ च्या वर्ल्ड कपआधी देखील तिच्याकडे पद्मश्री, अर्जुन पुरस्कार होते, तिने ब्रेक घेतला होता तर त्याचे काय परिणाम झाले याबद्दल तितकं सिनेमात दिसत नाही. क्लायमॅक्सची वाट आपण बघायला लागतो आणि सिनेमा कधी संपेल असं आपल्याला वाटायला लागतं, इतकी रटाळ कथा सेकण्ड हाफमध्ये आहे. अडीच तासांपेक्षा अधिकचा कालावधी असलेल्या सिनेमात सेकंड हाफच्या सुरुवातीलाच कथेपासून नाळ तुटते. गाणी अडथळा आणतात आणि सिनेमाची वाढलेली लांबी कथा अधिक रटाळ बनवतात, सिनेमा किमान २० मिनिट तरी कमी करता आला असता.. तरीही क्रिकेटची आवड असणार्‍या आणि खेळाला कुठलाही भेदभाव न करता बघणार्‍या अस्सल क्रिकेट फॅन्सने हा सिनेमा एकदा पाहण्यास हरकत नाही.