मुगाच्या लाडवांचो हप्तो माझ्यावर उधार रवलो, नाडकर्णी…

कमलाकर नाडकर्णींसोबत बोलता बोलता कोकणातल्या शेवाचे लाडू, खटखटे लाडू असे उल्लेख आले आणि तो विषय कोकणातल्या काळ्या मुगाच्या गूळ घातलेल्या लाडवांवर संपला. ‘तुमका आवाडतंत मुगाचे लाडू?’... ‘आवाडतंत ?? मी मध्यरात्री उठानसुद्धा मुगाचे चार लाडू खावक शकतंय..’ ते म्हणाले आणि मग काय, काळ्या मुगाचे गुळाचे लाडू हा आमच्यातला वरचेवर भेटण्यासाठीचा समान धागा ठरला. आमच्या नितीन आणि सुरेखा वाळकेंच्या ‘चैतन्य’मधून मी खास मालवणहून हे काळ्या मुगाचे लाडू मागवायचो.

— श्रीनिवास नार्वेकर

साल १९९७… स्थळ : अर्थातच सावंतवाडी.
आमच्या बालरंगतर्फे बालचळवळीसाठी आधारभूत कार्य करणार्‍या कोकणातल्या व्यक्तीला आत्माराम सावंत यांच्या नावाने पुरस्कार द्यायचं मी जाहीर केलं. हा पहिला पुरस्कार आचर्याच्या सुरेश ठाकूर यांना होता. कार्यक्रमासाठी मधु मंगेश कर्णिकांना निमंत्रित केलं. सोबत सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर. कार्यक्रमाच्या दोनच दिवस आधी मधुभाईंचा मी काम करत असलेल्या गजानन नाईक यांच्या दैनिक ‘कोंकणसाद’च्या ऑफिसमध्ये फोन आला. ‘आपल्या कार्यक्रमासाठी मी कमलाकर नाडकर्णीक सांगलंसंय. आत्माराम आणि कमलाकर अगदी जवळचे मित्र होते. तो यवक तयार झालोहा. बातमीत कमलाकर येतासा म्हणान नाव टाकूक हरकत नाय. माझ्याबरोबर घेवन येतंय तेका. तू काळजी नको करू..’ मधुभाईंनी नाडकर्णींशी परस्पर बोलून माझ्या वतीने निमंत्रण देऊन टाकलं होतं.

नाडकर्णी कार्यक्रमाला येणार आहेत म्हटल्यावर मीही अधिक खूश झालो होतो, पण दडपणही होतं. मधुभाईंची एव्हाना मला सवय झालेली, पण नाडकर्णी पहिल्यांदाच माझ्या कार्यक्रमाला येतायत म्हटल्यावर ते दडपण होतं. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी दोघेही सावंतवाडीत पोहचले. पहिल्या भेटीतच नाडकर्णींनी माझ्याशी थेट मालवणीतूनच सुरुवात केली (ते मालवणीतून बोलणं मग अगदी केव्हाही, कुठेही अखेरपर्यंत राहिलं. त्यांचं मूळ गाव की आजोळ वगैरे आंबोलीच्या पायथ्यालगतचं पारपोली असल्याचं मला तेव्हा समजलं). एखादं धमाल काहीतरी सांगितल्यावर स्वत:वरच खूश झाल्यागत गडगडाटी हसणं आणि त्यात दुसर्‍यालाही सामील करून घेणं हा त्यांचा आणखी एक विशेष. सावंतवाडीतल्या सेव्हन हिल्स हॉटेल पायर्‍यांवर उभं राहून ‘श्रीनिवास, या हॉटेलात माका परत कधी जेवक घेवन यायचा नाय. सोलकढी मिळणा नाय म्हणजे काय,’ असं सुनावलं होतं मला. या कार्यक्रमानंतर मग अधूनमधून (त्यावेळेच्या फोन खर्चाच्या मर्यादेत) बोलणं होत राहिलं.

नाडकर्णींच्या नाटकांच्या, सिनेमांच्या समीक्षेचा मी फॅन होतो त्याकाळी. मी एकटाच कशाला, कितीतरी जण फॅन होते त्यांच्या समीक्षा लेखनाचे. नाटक आणि चित्रपटांच्या त्यांच्या समीक्षेतला त्यावेळी मला जाणवलेला एक महत्त्वाचा फरक म्हणजे नाटकावर (बरं-वाईट जे काही असेल ते) लिहिताना ते फार गंभीरपणाने लिहायचं, तर चित्रपटांच्या समीक्षणांमध्ये जणू टवाळकीच्या जागा शोधून काढून(च) आपल्याला लिहायचंय, असं त्यांनी ठरवलं होतं की काय असं वाटायचं.

‘बलवान’च्या वेळी व्यायामशाळेतून पळून आलेला की आणलेला हिरो, असा सुनील शेट्टीचा उल्लेख वाचून जाम फुटलो होतो मी. ‘सौदागर’च्या वेळी विवेक मुशरनच्या बाबतीतही असंच काही धमाल लिहिलं होतं त्यांनी. (अवांतर : अलीकडचे कितीतरी नाट्य-चित्र/वृत्तपत्रीय परीक्षक (!) नाट्य/चित्र समीक्षण (?) म्हणून नाटका/सिनेमाची संपूर्ण गोष्ट लिहीत असताना, नाडकर्णी मात्र नाटकाची संपूर्ण गोष्ट का लिहायचे नाहीत, हा प्रश्न त्यांना विचारायचा राहिला खरंतर. तसं त्यांनी केलं असतं, तर (कदाचित) त्यांचा अधिक सन्मानही झाला असता.) पण कितीतरी प्रायोगिक नाटकांबद्दल किंवा व्यावसायिक रंगभूमीवरही वेगळा प्रयोग करणार्‍या नाटकांबद्दल प्रचंड आश्वासक असंही लिहिलं होतं त्यांनी.

कमलाकर नाडकर्णी या स्वत:च्या नावाच्या एकूणातल्याच लेखन, दिग्दर्शन, अभिनय (बालनाट्य ते प्रौढनाट्य), समीक्षा आणि कार्यकर्ता पिंड असलेल्या व्यक्तित्वाच्या इतिहासाबरोबरच मराठी रंगभूमीच्या वेगवेगळ्या बदलत्या प्रवाहांचा, चढ-उतारांचा, खर्‍याखुर्‍या सुवर्णकाळाचा जवळपास ७५ वर्षांचा चालताबोलता इतिहास- एन्सायक्लोपिडीआ होता हा माणूस. अशा माणसांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या अनुषंगाने एकूणच सांस्कृतिक अवकाशाचं, इतिहासाचं जतन होणं फार महत्त्वाचं असतं. अशा कोणत्याही सांस्कृतिक दस्तावेजीकरणाच्या बाबतीत आपण अजूनही फार उदासीन आहोत हेही तेवढंच खरं. वैयक्तिक पातळीवर भालचंद्र पेंढारकरांनी स्वत:च्या बळावर जितकं या दस्तावेजीकरणाचं काम करून ठेवलंय त्याला तोड नाही, पण पुढे काय? आणखीही काही जण नक्कीच असतील, ती माणसं समोर येणं गरजेचं आहे. त्यांना शासनानं, संस्थांनी सहकार्य करणंही तेवढंच गरजेचं आहे.

कमलाकर नाडकर्णी या माणसाचं (आणि अशा अनेकांचं) सविस्तर दस्तावेजीकरण आजघडीला उपलब्ध नाही हे आपलं दुर्दैव! (त्या अनुषंगाने आम्ही आमच्या बळावर एका मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला हात घातला आहे. त्याबद्दल सविस्तर यथावकाश!). मध्यंतरी कणकवलीच्या उदय पंडितांनी ज्योतिराव फुल्यांच्या ‘तृतीय रत्न’पासून वरेरकरांच्या ‘भूमीकन्या सीता’पर्यंत ७५ हून अधिक नाटकांचा परामर्श घेणार्‍या नाडकर्णींच्या ‘नाटकं ठेवणीतली’ पुस्तकाच्या प्रकाशनाचा घाट घातला. मनोविकास प्रकाशनने ‘नाटकी नाटकं’च्या निमित्ताने व्यावसायिक, कामगार, राज्य नाट्य, बालरंगभूमी, स्थानिक हौशी रंगभूमी या सर्वांचा आढावा घेणारा नाडकर्णींनी मांडलेला एक प्रासंगिक पट समोर आला, तर ‘महानगरी नाटकं’च्या निमित्ताने एकूणच त्यांच्या निवडक समीक्षणांचा संग्रह समोर आला. त्यांच्या एका जुन्या अनुवादित नाटकाचं पुस्तकही पंडितांनी प्रकाशित केलं. मराठी प्रकाशनविश्व (आणि अर्थातच शासनही) अशा दस्तावेजीकरणाच्या बाबतीत बर्‍यापैकी उदासीन असताना वैयक्तिक पातळीवर आपापल्या परीने हे असं काम होत राहणं फार महत्त्वाचं आहेच आहे.

मला वाटतं नाडकर्णींच्या लेखनामध्ये काहीसं दुहेरी व्यक्तिमत्त्व होतं. आरती प्रभूंच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे ‘मी नव्हे की बिंब माझे, मी न माझा आरसा, एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा…’ असं जणू असावं ते काहीसं. प्रेम करावं तर एखाद्यावर भरपूर करावं आणि एखाद्याला झोडपायचंच, तर अगदीच चुथडा करून टाकायचा, असं काहीसं होतं त्यांच्या बाबतीत. ते मुद्दामहून करत होते की कळत नकळत होत होतं त्यांच्याकडून तेच जाणोत! पण समीक्षणाच्या बाबतीत त्यांच्यावर अनेक वेळा होणारा पक्षपातीपणाचा आरोप मात्र ते कधीही फेटाळून लावू शकले नाहीत, किंबहुना त्यांनाही कदाचित त्याची जाणीव असावी, असं मला वाटत राहतं कधीतरी. ‘मी नव्हे की बिंब माझे, मी न माझा आरसा…’ पण त्यांच्यात एक दिलखुलास आणि खिलाडू वृत्ती असलेलं मैत्र होतं एवढं मात्र खरं… शिवाय बाकी कितीही, काहीही मतभेद असले तरीही त्यांच्यातल्या अभ्यासाला, विजिगिषु वृत्तीला, त्यांच्या परीने त्यांनी करून ठेवलेल्या कामाला पर्याय नाही हेही तितकंच निर्विवाद सत्य आहे.

साल २०१३… खालसा महाविद्यालयाच्या सहकार्याने कृष्णा नाईकांनी रत्नाकर मतकरींच्या समग्र साहित्यावर तीन दिवसांचा परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक मान्यवरांसह माझाही निबंध त्यामध्ये होता – रत्नाकर मतकरींच्या गूढकथांमधील वातावरण निर्मिती. स्वत: मतकरी आणि नाडकर्णींनी त्या निबंधाचं फार कौतुक केलं. ‘अशा विषयावरसुद्धा तू खूप लिहूक होया रे..’ नाडकर्णी म्हणालेले. त्याच वेळी ‘माका आणि रत्नाकराक तुझ्या गाडीयेन आमच्या घराकडे सोडूची कल्पना कशी वाटता तुका?’ असं मिश्कीलपणे त्यांनी विचारलं मला आणि मीही लगेचच ‘मस्तच, चला, जावया’ अशी मान हलवली. दोन थोरांना असं हातचं घालवण्याची संधी कोण सोडेल?

साल २०१५… व्हिजनची आवाज कार्यशाळा. अगदी पहिली बॅच. प्रमाणपत्र वितरणासाठी नाडकर्णींना बोलावलं. त्यांचं सहज बोलणं-सांगणंही बर्‍याच वेळा जणू इतिहास मांडत असल्यागत असायचं, तर आवाज कार्यशाळेच्या त्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमातही नाडकर्णी केवळ नटांच्या आवाजाच्या अनुषंगाने नानासाहेब फाटक, केशवराव भोसले, मा. दत्ताराम, दाजी भाटवडेकर, चिंतामणराव किंवा चित्तरंजन कोल्हटकर यांची उदाहरणं देत जे काही बोलले तोसुद्धा एक ठेवाच जणू! या कार्यक्रमानंतर मी, नाडकर्णी, सुनील देवळेकर आणि डॉ. उत्कर्षा परेलला जयहिंद हॉटेलमध्ये मस्तपैकी पापलेट, सुरमईचा फडशा पाडला आणि मग त्यांना दादरच्या घरी सोडलं.

इथून खरंतर आमची अधिक गट्टी जमत गेली. मग कधीतरी बोलता बोलता कोकणातल्या शेवाचे लाडू, खटखटे लाडू असे उल्लेख आले आणि तो विषय कोकणातल्या काळ्या मुगाच्या गूळ घातलेल्या लाडवांवर संपला. ‘तुमका आवाडतंत मुगाचे लाडू?’… ‘आवाडतंत ?? मी मध्यरात्री उठानसुद्धा मुगाचे चार लाडू खावक शकतंय..’ ते म्हणाले आणि मग काय, काळ्या मुगाचे गुळाचे लाडू हा आमच्यातला वरचेवर भेटण्यासाठीचा समान धागा ठरला. आमच्या नितीन आणि सुरेखा वाळकेंच्या ‘चैतन्य’मधून मी खास मालवणहून हे काळ्या मुगाचे लाडू मागवायचो. नंतर एकदा आमचा सावंतवाडीचा जवळचा पत्रकार मित्र राजेश मोंडकरच्या बायकोनं-प्रज्ञानं केलेले मुगाचे लाडू चाखले आणि ते अधिक आवडले. मग काय, प्रत्येक वेळी मागवताना एकेका किलोच्या दोन पिशव्या अशी ऑर्डर असायची प्रज्ञाकडे. ते लाडू त्यांना फारच आवडले.

एक-दोनदा तर खास फोन करून या वेळेक मुगाचे लाडू येवक नाय हां अजून, श्रीनिवास-असं सांगून जोरात हसायचे. मग त्यानंतरच्या एखाद्या महिन्यात कधीतरी पुन्हा लाडू मागवले जायचे. दरम्यान, कोरोना काळामुळे प्रत्यक्ष भेटाभेटी दुरावतच गेल्या. अखेरची भेट झाली, ती त्यांना लाडू देण्यासाठी म्हणून दादरच्या घरी गेलो ती. उत्साह आणि थकवा दोन्ही जाणवत होते, पण आठवणी मात्र पक्क्या शाबूत होत्या.

उत्कर्षा हॉस्पिटलमध्ये असल्याची बातमी त्यांना कळल्याबरोबर लगेचच त्यांनी नमिताला सांगून आर्थिक तजवीज करायला सांगितली होती, हे मला नंतर कधीतरी नमिताने सहज बोलता बोलता सांगितलं. असा हा माणूस. मध्यंतरी नाटकासंदर्भातल्याच एका विषयाचा अभ्यास करताना मला खात्री नसलेल्या कसल्या तरी एका गोष्टीचा कसला तरी संदर्भ हवा होता, म्हणून त्यांना फोन केला, तर त्यांनी दुसर्‍याच क्षणाला तो संदर्भ सांगितला आणि त्यानंतर ते जवळजवळ अर्धा तास त्याच्या अली-पलीकडल्या गोष्टी सांगत राहिले.

मग कधीतरी एका आजारपणाच्या दरम्यान ते गोरेगावला नमिताकडे-त्यांच्या मुलीकडे गेले आणि भेटी दुरापास्त झाल्या. दोन-अडीच वर्षांचा कोरोना काळ असाच गेला. दरम्यान, फोनवर बोलणं व्हायचं आमचं अधूनमधून. आमच्या ‘एक झुंज वार्‍याशी’बद्दल बोलताना ते म्हणाले एकदा फोनवर, खूप बरा ऐकलंसंय तुमच्या नाटकाबद्दल… पण मी बघून ठरवतंलंय… आणि हसले जोरात नेहमीप्रमाणे.. मी एकदम खूश.. म्हटलं, ‘तुम्ही यवचा असा वाटतासाच, पण दीनानाथ किंवा ठाकरेक प्रयोग असात तेव्हा सांगतंय. जवळ पडात तुमका. जाव-येवचो त्रास कमी होयत. तुमका घेवन येतंय आणि परत घराकडे सुखरूप सोडतंय..’ ‘मगे काय हरकत नाय.. एका पायार तयार रवतंय मी…’ पण दुर्दैव, कोरोना काळ वाढत गेला आणि नंतर सगळंच चित्र बदललं.

नव्या समोरच्याला प्रोत्साहन देण्याचाही गुण त्यांच्यात होता. कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या रंगवाचा नियतकालिकाचा मुंबई प्रतिनिधी म्हणून माझं नाव आहे. सुरुवातीला हौसेनं लिहिणं झालं, होत राहिलं. मग जरा मागे पुढे व्हायला लागलं, टळायला लागलं. एकदा उदय पंडितांचा फोन आला सहजच, त्यावेळी म्हणाले, ‘कमलाकर नाडकर्णी गाळी घालतंसंत तुका… एवढा चांगला लिहूनय सतत लिहिणा नाय, नार्वेकराक लिवक लाव मागे लागान नाटकावर..’ त्यानंतरच्याच दोन-चार दिवसांत कधीतरी खुद्द नाडकर्णींचाच फोन. म्हटलं, ‘निरोप गावलो, लिहिण्यासाठी वेळ काढूचो प्रयत्न करतंय नक्की… लेखन गंभीरपणान करूचा मीसुद्धा ठरवतंसंय..’ ‘मेल्या, कोंबो कापून टाक एखादो, तो खावया आपण आणि मगे सुरू कर लिवक…’ आणि त्यापाठोपाठ सवयीचं ते गडगडाटी हसणं… मला लाभलेला हा त्यांचा असा अकृत्रिम स्नेह…

आताच डिसेंबरमध्ये नमिताला जन्मदिवसाचा मेसेज केला, बाबांचीही चौकशी केली, तेव्हा थँक्यूच्या पाठोपाठ तिचा मेसेज आला. ‘घरी या एकदा बाबांशी गप्पा मारायला,’ तेव्हा मी म्हटलं होतं, ‘नक्कीच, मुगाचे लाडू घेऊन येतो.’ त्यावर तिचं जोरात ‘हा हा हा’… आणि पत्ता पाठवला तिनं गोरेगावचा. येतो म्हटलं लवकरच आणि त्याच्या दुसर्‍या-चौथ्याच दिवशी नितीन वाळकेच्या मुलाला-मित्रला मी फोन करून सांगितलं लाडू आणण्याबद्दल, पण कामाच्या व्यापात नंतर दोघांकडूनही ते राहून गेलं.

आणि आता राहिलंच… नाडकर्णी आणि मी… आमचा काही प्रचंड घनिष्ट वगैरे संबंध होता का? तर नाही… पण अगदी जेवढ्यास तेवढं असंही नव्हतं काही. त्या पलीकडे असावं काहीतरी.. माझ्यापुरतं तरी… काल ओशिवर्‍यात गेल्यानंतरही त्यांच्या पार्थिवाला नमस्कार करताना दोन क्षण तसाच उभा राहिलो त्यांच्यासमोर. फार कमी जणांच्या बाबतीत माझं होतं असं. अगदी नमिताला भेटतानासुद्धा तिला हळूच सांगावंसं वाटलं- मुगाचे लाडू आणायचं राहूनच गेलं शेवटी, पण नाही बोलता आलं.

बाकी ‘यातून सांभाळा, सगळे जण पाठीशी आहोत,’ हे सांगणं-समजावणं सोपं असतं खरं, आपण सगळेच जण या सगळ्यातून गेलेलो असतो. नमिता धीराची आहेच, ती ठामपणे उभी राहिलच, पण कितीही नाही म्हटलं तरी एक हात असतोच आपल्यासोबत, आपल्या माथ्यावर, आपल्या खांद्यावर. तो हात आता प्रत्यक्ष नाही हे जाणवत असणार. ‘माझा हिरो गेला’ ही तिची भावना त्यातूनच आलेली असणार, पण तरीही..!

माणूस प्रत्यक्ष नाही ही भावना काही काळ छळणारी, त्रास देणारी…आपण फक्त आठवणींच्या बळावर ती सोबत, तो चांगलेपणा आणि ते आयुष्य आपल्या पोतडीत साठवून ठेवायचं. आपल्याच उपयोगात येतं, आपण स्वत: हरवले जाण्याच्या गाफील क्षणी!

‘‘ठरवंन-बोलानंय मुगाच्या लाडवांचो हप्तो माझ्यावर उधार रवलो, नाडकर्णी.. उधारी कधी चुकती करुक येयत, बघू या… काय बोलू आणखी? तूर्तास एवढाच.. काळजी घ्या…

–(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी, दिग्दर्शक, आवाजतज्ज्ञ आहेत)