Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary मर्लिन मुनरो, शापित सौंदर्य

मर्लिन मुनरो, शापित सौंदर्य

Subscribe

मादक सौंदर्यात न्हाऊन निघालेली, हवेत उडणारा सफेद फ्रॉक सावरण्याचा मिश्किल प्रयत्न करताना नॉटी हसणारी, ओठांवर कायम लालबुंद लिपस्टीक लावलेली, लहान पण कुरळ्या केसांच्या बटांमधून हात फिरवत गालावरच्या काळ्या तिळाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खळाळून हसणारी हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री मर्लिन मन्रो. याच मर्लिनच्या आयुष्यावर आधारित ‘ब्लाँड’ नावाचा जीवनपट नेटफ्लिक्सवर २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. पण म्हणतात ना काहीजण जिवंत असतानाही आणि मृत्यूनंतरही वादामुळे चर्चेत राहतात, तसंच मर्लिनच्या बाबतही झालंय.

काही माणसं ही जन्मजातच सुंदर असतात. परमेश्वराने त्यांच्यावर अक्षरश सौंदर्याची उधळण केलेली असते. यामुळे अशी माणसं डोळ्यासमोर आली की, त्यांच्यावर नजरा नकळत खिळतातच. पण काही सौंदर्यवान व्यक्ती अशाही असतात ज्या समोर जरी नसल्या तरी त्यांच्या नावाचा नुसता उल्लेख जरी कुठे कानावर पडला किंवा वाचनात आला तरी त्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. अशावेळी त्यांना आठवण्यासाठी कुठल्याच घटनांची, प्रसंगाची गरज भासत नाही, इतक्या त्या आपल्या मनपटलावर प्रतिबिंबित झालेल्या असतात. हॉलीवूडची वादग्रस्त स्टार मर्लिन मन्रो हीदेखील अशीच एक व्यक्ती. मृत्यूच्या ६० वर्षांनंतरही जी तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय अशी एकमेव हॉलीवूड अभिनेत्री.

तिचं नुसतं नाव जरी कुठे ऐकलं वा वाचनात आलं तर आठवते ती मादक सौंदर्यात न्हाऊन निघालेली, हवेत उडणारा सफेद फ्रॉक सावरण्याचा मिश्किल प्रयत्न करताना नॉटी हसणारी, ओठांवर कायम लालबुंद लिपस्टीक लावलेली, लहान पण कुरळ्या केसांच्या जटांमधून हात फिरवत गालावरच्या काळ्या तिळाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खळाळून हसणारी मर्लिन मन्रो. याच मर्लिनच्या आयुष्यावर आधारित ब्लाँड नावाचा जीवनपट नेटफ्लिक्सवर २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. पण म्हणतात ना काहीजण जिवंत असतानाही आणि मृत्यूनंतरही वादामुळे चर्चेत राहतात, तसंच याबाबतही झालंय. कारण जिवंत असताना अनाथ आश्रमातील लहानपण ते लैंगिक शोषण आणि थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्याबरोबरील अफेयर्सपासून अनेक पुरुषांबरोबर असलेल्या संबंधामुळे कायम चर्चेत राहणारी मर्लिन या जीवनपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

- Advertisement -

मर्लिनचा जन्म १ जून १९२६ साली लॉस एंजलिन्समध्ये झाला, पण आईची मानसिक अवस्था ठिक नसल्याने मर्लिनला आईचे प्रेम कधीच मिळालं नाही. तिचे बालपण गेले ते अनाथालयात. वाढत्या वयाबरोबर मर्लिनच सौंदर्यही निखरु लागलं होतं. अनाथालयातील इतर मुलांच्या तुलनेत मर्लिनवर आता सगळ्यांच्याच नजरा होत्या. अनाथालयातल्या सफाई कामगारापासून ते खानसामापर्यंत सगळ्यांनाच मर्लिन हवी होती. त्यानंतर मर्लिनच्या आईची मैत्रिण ग्रेसीने ७ वर्षाच्या मर्लिनचे पालकत्व स्वीकारले. मर्लिन ग्रेसीच्या कुटुंबाचा भाग बनली. ती अवघ्या सात वर्षांची होती. या वयात मुली निरागस, गोड दिसतात, पण मर्लिन त्याला अपवाद होती. पुरुषांना तिच्यात स्त्री दिसायची असं म्हटलं जातं. ग्रेसीच्या रुपाने आईचं प्रेम आणि तिच्या पतीद्वारे बापाचं प्रेम मिळेल या अपेक्षेने मर्लिनला ग्रेसीने घरी आणलं होतं.

पण वाढत्या वयाबरोबर सुंदर दिसणार्‍या मर्लिनला बघून ग्रेसीच्या पतीची नियत फिरली. ग्रेसी घरात नसताना त्यानं अनेकवेळा मर्लिनचे लैंगिक शौषण केलं. तसेच तिला कुठे वाच्यता केल्यास पुन्हा अनाथालयात सोडेन अशी धमकी दिली. मर्लिनवर आपल्या पतीची वाईट नजर असल्याचं लक्षात येताच ग्रेसीने तिला नातेवाईकांच्या घरी पाठवून दिलं. तोपर्यंत मर्लिनही वयात आली होती. पण तिथेही तिच्याबरोबर तेच होऊ लागलं. १९४२ पर्यंत मर्लिनचं आयुष्य असंच कधी याच्या दरवाजात तर कधी त्याच्या दरवाजात गेलं. अखेर ग्रेसीला याबद्दल कळालं आणि तिने मर्लिनची रवानगी अनाथालयात केली. या सर्व घटनांमुळे मर्लिन वयाने जरी लहान असली तरी अनुभवाने मोठी झाली. वासनेने बघणार्‍या नजरा बघून ती कंटाळली. अखेर वयाच्या १६ वर्षानंतर तिने शेजारी राहणार्‍या २१ वर्षीय जेम्स डॉगर्टी याच्याबरोबर लग्न केलं. ती गृहिणी म्हणून राहू लागली. सगळं छान सुरू होतं.

- Advertisement -

यादरम्यान तिच्या पतीला नोकरीसाठी दोन वर्षे बाहेरगावी जावे लागले. त्यानंतर मर्लिन आपल्या सासरच्यांबरोबर राहू लागली. दरम्यान १९४४ मध्ये तिने रेडियोप्लेन कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. तेथे फोटोग्राफर डेविड कोनोवरबरोबर तिची ओळख झाली. तिचे सौंदर्य बघून त्याने तिला मॉडेलिंगची ऑफर दिली. पतीने तिला नकार दिला. त्यानंतर १९४५ साली मर्लिनने नवर्‍याचे घर सोडले. त्यानंतर तिला मासिकांसाठी मॉडेलिगंच्या ऑफर्स आल्या. तब्बल ३३ मासिकांच्या कव्हर पेजवर मर्लिन आणि फक्त मर्लिन होती. मॉडेलिंगच्या दुनियेत ही जगातील अशी एकमेव घटना होती. जेव्हा जगातील विविध मासिकांवर एकाच मॉडेलचे फोटो झळकले होते.

मर्लिन आता जगप्रसिद्ध झाली होती. सुपरमॉडेल तर ती होतीच, पण ती कधी कधी कविताही करू लागली. गाणी गाऊ लागली. मर्लिनला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या. पैसा प्रसिद्धी सगळंच एकदम मिळत असल्याने मर्लिनच्या डोक्यात हवा गेली. यादरम्यान तिच्या प्रसिद्धी आणि यशावर जळणार्‍यांनी तिच्या बदनामीच्या कथा पेरायला सुरुवात केली. पण मर्लिनने कधीही त्याकडे लक्ष दिले नाही. ती काम करत राहिली, पण याचदरम्यान, ती व्यसनाधीन झाली. तिची अरेरावी वाढली. यशाची झिंग डोक्यात गेल्याने ती कधीही सेटवर वेळवर येत नसे. कधी दारू पिऊन तर कधी कशीशच्या नशेत ती सेटवर यायला लागली. मध्येच सेट सोडून निघून जाऊ लागली. यामुळे चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होऊ लागले.

अनेक बडेबडे धनाढ्य, बिझनेसमन मर्लिनवर फिदा होते. ते तिच्यावर पैसेही उधळत होते. पण नंतर तिच्यातील बदल त्यांनाही खटकू लागला. त्यातच मर्लिनने १९५२ मध्ये न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवली. तसेच ती चित्रपट निर्मितीतही उतरली. यादरम्यान तिचे आर्थर मिलर, मार्लन ब्रांडो जोए डिमागियो या पुरुषांबरोबरील प्रेमसंबंधही गाजले. १९५६ मध्ये तिने लेखक मिलरबरोबर लग्न केले. तर अनेकवेळा ती शूटिंग थांबवून राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींना भेटायला जायची. त्यांचे अफेअर तेव्हा फारच गाजले होते. मर्लिनसारखी सुंदर स्त्री आपल्यासाठी वेडी झाली हे पैजेवर पटवून देण्यासाठी काहींनी तिचा वापरही केला, ज्याला तिने प्रेम समजलं होतं. या सगळ्यांत मर्लिनला ड्रग्जचे व्यसनही लागले. तसेच तिला मूतखड्याचा त्रास होऊ लागला. तिच्या आयुष्यात येणारे बहुतेक पुरूष हे तिच्या शारीरिक सौंदर्याचे उपासक होते. यामुळे लहानपणापासूनच आई बापाच्या मायेला पारखी झालेली मर्लिन आयुष्यात येणार्‍या पुरुषांकडून तशाच निस्वार्थी प्रेमाची अपेक्षा करण्याची सतत चूक करत होती.

यामुळेच तिच्या आयुष्यात अनेकजण येत होते. जात होते. पण मर्लिन मात्र खर्‍या प्रेमाच्या शोधात नाती तुडवत पुढे चालली होती. अखेर मिलरच्या बाबतीतही तेच झाले. शूटिंग दरम्यान मर्लिन आणि एका नामवंत फोटोग्राफरमध्ये मैत्री वाढली. हे मिलर यांना रुचले नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. अखेर त्यांनी तिला डिवोर्स दिला. त्यानंतर मर्लिनच्या करियरलाही उतरती कळा लागली. तिला काम मिळेनासे झाले. तिचे बड्या लोकांशी असलेल्या संबंधामुळे एफबीआयही तिच्या मागे लागली. व्यसनाधीनतेमुळे तीनवेळा तिचा गर्भपात झाला. १९६१ मध्ये नातेसंबंधात आलेल्या नैराश्यामुळे मर्लिन डिप्रेशनमध्ये गेली. १९६१ साली तिला गोल्डन ग्लोब वर्ल्ड अवॉर्ड मिळाला. मर्लिन उत्कृष्ट अभिनेत्री तर होतीच. त्याचबरोबर ती कवयित्रीही होती. पण नंतर मात्र तिने स्वत:ला सगळ्यांपासून विभक्त केलं.

ती एकटीच राहू लागली. तिला मानसिक व्याधी जडली. पर्सेनॅलिटी डिसऑर्डरने तिला ग्रासले. त्यामुळे तिने दोनवेळा गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जी मर्लिन आधी लोकांना पार्ट्या देण्यासाठी प्रसिद्ध होती, ती आता एकांतात जीवन जगू लागली होती. तिचे सौंदर्य उतरू लागले होते. काम मिळेनासे झाल्याने हातात पैसा नव्हता. आणि पुरूषांना खूश करण्यासाठी तिच्याकडे काहीच उरले नव्हते. तिला नैराश्याचे झटके येऊ लागले. एका आरसपानी सौंदर्याचे रुपांतर शापित सौंदर्यात झालं होतं. कारण सौंदर्यामुळे लोक तिच्याकडे स्वत:हून येत. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत बेधुंद होत स्वत:चं समाधान करत. ती त्यालाच खरे प्रेम समजत होती, पण मन भरलं की तो पुरुष तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. उलट ती कशी व्यसनी आणि वाईट चालीची आहे हे तो सांगायला मोकळा व्हायचा. यातून मग त्याने आपल्याला फसवलं हा विचार करत मर्लिन त्यात स्वत:ला गुरफटून घेत होती. यातूनच तिला मानसिक व्याधी जडली. तिचा खर्‍या प्रेमाचा शोध थांबला.

५ ऑगस्ट १९६२ साली ३६ वर्षीय मर्लिनच्या संशयास्पद मृत्यूच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडवली. रात्री तीन वाजता बेडरुममध्ये मर्लिन मृतावस्थेत आढळली. पण पोस्टमार्टेममध्ये मात्र तिचा मृत्यू ४ ऑगस्टलाच झाल्याचे स्पष्ट झाले. मर्लिनच्या मृतदेहाशेजारी झोपेच्या गोळ्यांच्या बाटल्याही सापडल्या. यामुळे तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली असे सांगण्यात आले, पण मर्लिनची हत्या झाल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. कारण मृत्यूआधी काही तासांपूर्वीच तिला भेटण्यासाठी बॉब केनेडी आल्याचे तिच्या घरातील नोकराने सांगितले होते. बॉब केनेडी हे जॉन केनेडी यांचे भाऊ होते. यामुळे मर्लिन ही साधारण व्यक्ती नव्हती तर तिच्या बाहुपाशात कैद असताना अनेकांनी आयुष्यातली गुपित तिला सांगितली होती.

यामुळे ती या सगळ्यांचीच गुपितं माहीत असणारी एकमेव व्यक्ती होती, पण त्यापैकी कधीच कोणाचं सिक्रेट तिने ते सोडून गेल्यावरही जाहीर केलं नव्हतं. एवढे इमान तिने नात्यात सांभाळलं होतं. पण त्यामोबदल्यात सगळ्यांनीच तिला एकांताच्या खाईत ढकललं ते कायमचं. मर्लिनचे अनेक चाहते होते. यामुळे तिच्या आत्महत्येनंतर शहरात अनेकांनी व्यथित होऊन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या. मर्लिन एकटीच होती. तिला कोणीही नातेवाईक नव्हते. यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न होता. त्यावेळी तिचा दुसरा पती डिमियागो याने पुढाकार घेत सगळे सोपस्कार पार पाडले. विशेष म्हणजे आपल्यामुळेच तिची मानसिक अवस्था बिघडली, कारण तिला हवं ते निर्वाज्य प्रेम मला समजलं नाही, अशी कबुली त्याने दिली. मर्लिनच्या आयुष्यात आलेला तो असा एकमेव पुरुष होता. ज्याला तिला काय हवंय हे कळलं होतं. कारण इतर जणांनी मात्र तिच्याकडून त्यांना काय हवंय हेच मिळवलं होतं.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -

Manini