घरफिचर्ससारांशआम्ही लग्नाळू

आम्ही लग्नाळू

Subscribe

एकंदरीतच आजकाल घरातून मिळणारा सपोर्ट पाहिला तर मुली त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करीत आहेत. एकदा शिक्षणाच्या निमिताने मुली शहरात आल्यानंतर गावापेक्षा पैशांच्या गरजेसाठी शहरातच राहण्याचा पर्याय त्यांना योग्य वाटतो. त्यामुळे सर्वात प्रथम हा मुद्दा लक्षात घ्या की ज्या वातावरणात आजच्या मुली वाढल्या आहेत, त्यामुळे त्या शिक्षित व निर्भीड झाल्या आहेत. अर्थातच पूर्वीच्या काळी स्त्रिया जितक्या पुरुषांवर अवलंबून असायच्या त्या मानाने आता नाहीत. परिस्थिती बदलली, काळ बदलला, आजूबाजूचे वातावरण बदलले तरीही बदली नाही ती मानसिकता, स्त्रीकडील अपेक्षा आणि त्याचमुळे आज ‘लग्न जुळणे’ ही समस्या आता इतकी गंभीर बनत चालली आहे की ‘लग्नाळू’ मुलांना मोर्चा काढायची आवश्यकता भासू लागली आहे.

–सायली दिवाकर

सध्या समाजात ‘लग्न योग्य वयात न जुळणे’ ह्या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने चर्चा ऐकायला मिळत आहेत. एक काळ असा होता की माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी सहजतेने घडत जायच्या जसे की बालपण मस्त फुलपाखरासारखं उडत संपायचं, तर शिक्षणाची वाट धरता धरताच काही कामधंदा हातात यायचा. तोपर्यंत घरातले एखादी मुलगी पाहून लग्नाच्या बेडीत अडकवून टाकायचे. पूर्वीच्या काळी विनासायास लग्न होऊन घरातल्या संयुक्त कुटुंबात दहा-पंधरा मुलं सहजतेने मोठी व्हायची, परंतु सद्यस्थितीचा विचार केल्यास ‘लग्न जुळणे’ ही गंभीर समस्या होऊन बसली आहे.

- Advertisement -

सध्याचं आयुष्य ज्या चक्रात अडकलं आहे त्या चक्रातच माणूस गटांगळ्या खात आहे की काय असे वाटते. कारण उच्चशिक्षण आणि करियर यांची गोळाबेरीज केल्यास आयुष्यात बाकी शून्य राहतील की काय याची सगळ्यांना चिंता वाटत आहे. म्हणजेच पैसे कमावण्याच्या रेसच्या मागे मुलांना धावायला सांगून त्यांच्या आयुष्याची रस्सीखेच कधी झाली हेच कुणाच्या लक्षात आले नाही, पण जेव्हा एकोणतीस-तिसाव्या वर्षी वय उलटून जात आहे याची जाणीव होऊ लागते तेव्हा लग्नाची झटापट सुरू होते. आता तिसाव्या वर्षी मुलगी शोधायला सुरुवात केल्यावर सुरुवातीला नकारच ऐकावे लागणार ना? पण हीच नकारघंटा ऐकून मुलांना नैराश्य येऊ लागते.

समाजात मुलांच्या पालकांना आणि मुलांना जी निराशा पदरी पडत आहे त्याला जबाबदार मुलींना आणि मुलींच्या लग्नासाठी असणार्‍या अपेक्षांना धरलं जातं आहे. दिसायला छान, उच्चशिक्षित, भरपूर पगार असलेला, समजूतदार, रसिक, शहरात राहणारा मुलगा बहुतांश मुलींना हवा असतो, अशी समजूत बर्‍याच जणांची झाली आहे. त्यामुळे बर्‍याच घरात लग्न ठरवताना टेन्शनचं वातावरण असतं. आता सगळीचं मुलं सर्वगुणसंपन्न नसतात? तेव्हा बाकीच्या मुलांनी लग्न करायचं नाही का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. त्यामुळेच कदाचित सध्याच्या तरुण मुलींचे वागणे बहुतांश लोकांना खटकत असेल. घरातील वयोवृद्ध लोकांनी पूर्वीचा आणि सध्याचा हे दोन्ही काळ पाहिले आहेत. वीस-पंचवीस माणसांच्या कुटुबांत मिळून मिसळून राहून सर्व जबाबदार्‍या घेणार्‍या बायका पाहिल्या आहेत आणि नोकरी करून घरातील सर्व व्यवहार कर्तेपणाने पार पडणारी स्त्रीदेखील पाहिली आहे. म्हणूनच आजच्या मुलींच्या अपेक्षांचे सर्वांनाच नवल वाटते. त्यामुळेच कदाचित सध्याच्या तरुण मुलींचे वागणे बहुतांश लोकांना खटकत असेल.

- Advertisement -

खरंतर परिस्थिती समजून घ्यायला हवी. सध्याच्या काळातील मुलींचे पालक जागरूकतेपोटी मुलींची जास्त काळजी घेतात. त्यांच्या बहुतांश गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याच वेळा मुलींच्या आईची अशी मानसिकता असू शकते की जे मला करायला मिळालं नाही किंवा माझ्या लग्नाची घाई झाली, तसं माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ नये आणि असं वाटणं साहजिक आहे. कारण याआधीच्या बहुतांश स्त्रियांनी जे सोसलं आहे, त्यावरून त्या अधिक सजग झाल्या आहेत असं वाटतं.

मुलींच्या आया सजग होण्यामागे त्यांनी व त्यांच्या आधीच्या स्त्रियांनी सोसलेल्या यातना आहेत असे वाटते. शेकडो वर्षे समाजाने स्त्रियांना जी काही वागणूक दिली याला इतिहासाची साक्ष आहे. ‘जशाच तसे’ हा प्रकृतीचा, ब्रह्मांडाचा आणि काळाचाही नियम आहे हे विसरुन चालणार नाही. सतिप्रथा, केशवपन, बालविवाह, हुंडाबळी असे अनेक अत्याचार बायकांनी सहन केले आहेत. लग्नाच्या बाजारात हुंड्यासाठी मुलींच्या आई-वडिलांनीदेखील खूप अपमान सोसले आहेत. थोडे थोडके नाही तर शतकानुशतके स्त्रियांवर अत्याचार झाले नंतर तर ते अत्याचार इतके विकोपाला गेले की, त्यांना स्त्री स्वातंत्र्यासाठी संघटित होऊन चळवळी कराव्या लागल्या. फक्त स्त्रियांसाठी अनेक कुप्रथा समाजाने स्वतःच निर्माण केल्या अन् ‘पुरुष हाच वंशाचा दिवा’ म्हणत अगणित ‘स्त्रीभ्रुण हत्या’ झाल्या. तोच समाज आज मुलींच्या अवाजवी अपेक्षांमुळेच मुलांची लग्न होत नाहीत म्हणून नावे ठेवत आहे हा कुठला न्याय.

एक काळ असा होता की, मुलीच्या बापाचे लग्नाच्या बाजारात नको इतके धिंडवडे काढले जात होते, पण आता मुलीचे आई-वडील जेंव्हा आपल्या मुलीच्या सुखासाठी, सुरक्षिततेसाठी चार गोष्टींची अपेक्षा करतात यात काय वावगे आहे. आतापर्यंत किती स्त्रिया हुंडाबळीच्या शिकार झाल्या असतील त्याची गणतीच नाही. मुलगी पाहायला आल्यावर चालून दाखव, सुईत दोरा ओवून दाखव, गाणं म्हणून दाखव, विणकाम, भरतकाम, शिलाई काम, घरकाम, स्वयंपाक, रांगोळी असं काय-काय फक्त लग्नाच्या बाजारात उभं राहण्यासाठी मुलींना शिकावं लागलं आहे. इतकचं काय पण आयुष्यभर मोठ्याने हसू नकोस, मोठ्याने बोलू नकोस, असं बसू नकोस असे किती तरी निर्बंध केवळ सासरी जायचे आहे, म्हणून घातले जात होते. एवढंच नाही तर सासरी गेल्यावर आमच्यात हे चालत नाही, ते चालत नाही हे सुरू व्हायचे ते वेगळंच, अर्थातच सासर-माहेरच्या खेळात मुलींना कधी जगू दिले नाही.

एकंदरीतच आजकाल घरातून मिळणारा सपोर्ट पाहिला तर मुली त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत. एकदा शिक्षणाच्या निमिताने मुली शहरात आल्यानंतर गावापेक्षा पैशाच्या गरजेसाठी शहरातच राहण्याचा पर्याय त्यांना योग्य वाटतो. त्यामुळे सर्वात प्रथम हा मुद्दा लक्षात घ्या की, ज्या वातावरणात आजच्या मुली वाढल्या आहेत, त्यामुळे त्या शिक्षित व निर्भीड झाल्या आहेत. अर्थातच पूर्वीच्या काळी स्त्रिया जितक्या पुरुषांवर अवलंबून असायच्या त्यामानाने आता नाहीत. परिस्थिती बदलली, काळ बदलला, आजूबाजूचे वातावरण बदलले तरीही बदली नाही ती मानसिकता, स्त्रीकडील अपेक्षा आणि त्याचमुळे आज ‘लग्न जुळणे’ ही समस्या आता इतकी गंभीर बनत चालली आहे की ‘लग्नाळू’ मुलांना मोर्चा काढायची आवश्यकता भासू लागली आहे.

हे सगळे मुद्दे मांडून ‘स्त्री हक्का’ वगैरे ह्या विषयांना हात घालायचा नाही, तर हेच सांगायचं आहे की,‘परिवर्तन ही जीवन का नियम है’, हे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितले आहे. परिस्थितीनुसार जीवनात परिवर्तन हे अनिवार्य आहे आणि ह्याच बदलाची ही नांदी आहे. ‘लग्नासाठी मुली न मिळणे’ ही तर नुसती झलक आहे, पिक्चर तो अभी बाकी है…

–(लेखिका साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -