घरफिचर्ससारांशघरकामाचा सासुरवास !

घरकामाचा सासुरवास !

Subscribe

घरकामावरून सासुरवास हा प्रकार आजच्या मुलींना पचवणं आणि पेलवणं कठीण होऊन बसलं आहे. सासू किंवा घरातील नात्याने, मानाने आणि वयाने मोठ्या असलेल्या महिलांनी आपल्याकडून त्याच अपेक्षा कराव्यात का ज्यात त्यांचं आयुष्य गेलं? हे स्वीकारणे आजच्या तरुण मुलींना शक्य नाही. हे जुने लोक स्वतःही बदलत नाहीत आणि आम्हाला पण मनाजोगतं जगू देत नाहीत, असा एकंदरीत समज नवीन पिढीतील महिलांचा आहे. घरकामाला बाई किंवा कामवाली न लावता सुनेकडून या कामांची अपेक्षा ठेवणे म्हणजे मुद्दाम केलेला छळ असं आजच गणित झालं आहे.

चूल आणि मुल यापुरतेच सीमित असलेले महिलांचे विश्व कालानुरूप विस्तारत गेले आहे असे आपण मानतो. पूर्वीच्या स्त्रिया सातत्याने घरात राबत असत, सर्व पदार्थ स्वयंपाक घरातच बनवणे, इतर सर्व कामे घरातली महिलाच करणार, पै पाहुणा यांचे आदरातिथ्य करणे, लहानमुले सांभाळणे, सणवार, व्रतवैकल्ये, वडिलधार्‍यांची सुश्रुषा करणे इथपासून ते शेती असल्यास शेतीतील काम करणे अथवा करवून घेणे या जबाबदार्‍या महिला लीलया पेलत होत्या. त्याकाळी कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा नव्हत्या. कोणतीही गोष्ट बाजारात सहजासहजी उपलब्ध नव्हती. महिलांवर शैक्षणिक, व्यावसायिक अथवा नोकरी या जबाबदार्‍या नव्हत्या, आर्थिक बाबीत त्यांना फारस महत्व दिल जात नव्हतं आणि पुरुष प्रधान संस्कृतीमुळे त्यात कोणताही कामीपणा महिलांना वाटतं नव्हता. मुळात एकत्र कुटुंबात अनेक महिला असल्यामुळे घरातीत कामांची वाटणी होऊन, एकमेकींना हातभार लावून काम आटोपली जायची.

त्या काळी या सर्व घरकामांची सवय महिलांना अंगवळणी पडलेली होती आणि त्या शारीरिक आणि मानसिक दृष्टीने देखील तेवढ्या काटक, निरोगी, खंबीर आणि सक्षमदेखील होत्या. प्रत्येक काम निगुतीने करणे, मन लावून, एकरूप होऊन करणे, स्वतः पुढे होऊन जबाबदारी घेणे, कशाचाही कंटाळा, आळस न करणे हेच संस्कार त्या माहेरून घेऊन येत. घरातील पुरुषांकडून अथवा सासूकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवणे त्यांच्या स्वप्नातदेखील नव्हतं. तरीही आहे ते आपलं म्हणून दिल्या घरी त्या सुखासमाधानाने नांदत. कितीही त्रास झाला, दमणूक झाली, मूड नसला, आजारी असल्या, कामावरून कामातील चुकांवरून बोलणी खावी लागली तरी त्या निमूटपणे सहन करत. त्या काळी प्रचंड काम आणि कष्ट करणारी स्त्री ही आदर्श, सोशिक, सहनशील, सुसंस्कारी मानली जायची आणि घरोघरी सारखीच परिस्थिती असल्याने कोणाला त्यात काही वावगे वाटायचे नाही. परंतु आजमितीला परिस्थिती पूर्णतः बदलली आहे आणि आजच्या नवविवाहित मुली, महिलादेखील कालानुरूप पूर्ण बदललेल्या आहेत.

- Advertisement -

महिलांनी शैक्षणिक प्रगती केल्यापासून, नौकरीत व्यवसायात सामाजिक योगदानात त्या अग्रेसर झाल्यापासून अनेक सोयीसुविधा, विकतचे मनुष्यबळ त्यांना उपलब्ध असल्यामुळे आणि ते वापरण्याची आर्थिक कुवत असल्यामुळे, स्वतः कमवती असल्यामुळे महिला कमीतकमी वेळ घरकाम, स्वयंपाक, धुणं-भांडी, झाडू, फरशी या गोष्टींना देतात अथवा हे सगळंच पगार, पैसे देऊन कोणाकडून करुन घेणे याला प्राधान्य देतात. हॉटेलिंग, पार्सल सुविधा, सणवारांचे पदार्थसुद्धा आयते मिळत असल्याने आता महिलांवरील ताण बर्‍यापैकी कमी झालेला आहे. घरातील साफसफाई, घरातील विविध स्वरूपाची काम यासाठी बाजारात अनेक सेवा साधन उपलब्ध आहेत. अशा गोष्टीत वाया जाणारा वेळ आणि होणारी दमछाक यापेक्षा महिला स्वतःचं करिअर घडवणं, चार पैसे मिळवणं, स्वतःच्या मनानुसार जगणं, स्वतःच्या आवडी निवडी तब्येत सांभाळणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणे यासारखे आयुष्य उपभोगताना दिसतात. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. जशी सामाजिक परिस्थिती बदलली तसेच महिलादेखील स्वतःला बदलत गेली आहे.

आजही थोड्या फार प्रमाणात ज्या ठिकाणी सासू सुना, जावा जावा, नणंदा भावजया एकत्र कुटुंबात आहेत तिथे हा दोन पिढ्यांमधील फरक, तफावत प्रकर्षाने जाणवत आहे. जुन्या पिढीतील अनेक स्त्रिया आजही स्वतःच्या हाताने घरातील सर्व कामे करण्याला प्राधान्य देताना दिसतात. घरात स्वतः केलेला स्वयंपाक आणि विकतचं आणून खाणे यावरून आजही अनेक घरात मतभेद आढळतात. स्वतःच खपलं, स्वतः दमलं, स्वतः राबलं म्हणजे त्या कामाचं जे समाधान जुन्या पिढीतील महिलांना सुखावून जायचं ते आजच्या मुलींना फालतू कामात वेळ वाया घालवणं आणि गध्दामजुरी करण्यासारखं वाटतं.

- Advertisement -

जर सर्व काही पैसे देऊन विकत मिळतंय तर राबायची गरजच काय, हा रास्त प्रश्न या मुलींना पडलेला असतो. थोडंफार अन्न वाया गेलं तर काय बिघडलं. कमवतोय की आपण तेवढं, प्रत्येक गोष्टीत काय जीव अडकवायचा? ही मानसिकता आताच्या पिढीची आहे. घर आहे, हॉटेल आहे का, सारखं स्वच्छ सुंदर आणि निटनिटक राहायला?? राहिला पसारा राहूद्या, नसतील वस्तू जागेवर तर काय बिघडलं, नाही पाळले सगळेच नियम आणि शास्त्र तर फार काही बिघडत नाही, तुम्हाला हौस असेल तर तुम्ही करत बसा आम्हाला वेळ नाही. असा काही प्रमाणात निष्काळजीपणा, मनमानीपणा सध्या जाणवतोय. बरं केलं जरी यातलं एखादं काम तर ते चालूचालू कमीतकमी वेळात कसंतरी उरकणे, केवळ घरातल्यांची बोलणी आणि टोमणी नकोत, कटकट नको म्हणून एकदाच करुन टाकणे ही वृत्ती महिलांमध्ये बाळावलेली आहे.

घरकामावरून सासुरवास हा प्रकार आजच्या मुलींना पचवणं आणि पेलवणं कठीण होऊन बसलं आहे. सासू किंवा घरातील नात्याने, मानाने आणि वयाने मोठ्या असलेल्या महिलांनी आपल्याकडून त्याच अपेक्षा कराव्यात का ज्यात त्यांचं आयुष्य गेलं? हे स्वीकारणे आजच्या तरुण मुलींना शक्य नाही. हे जुने लोक स्वतःही बदलत नाहीत आणि आम्हाला पण मनाजोगतं जगू देत नाहीत, असा एकंदरीत समज नवीन पिढीतील महिलांचा आहे. घरकामाला बाई किंवा कामवाली न लावता सुनेकडून या कामांची अपेक्षा ठेवणे म्हणजे मुद्दाम केलेला छळ असं आजच गणित झालं आहे. उरलेसुरले पदार्थ फेकून न देता त्याचं काहीतरी बनवून खाणं आणि अन्नाची नासाडी न करणं म्हणजे शीळ पाकं खाऊ घालून उपाशी ठेवणे, हाल करणे असं समीकरण झालं आहे. सतत साफसफाई करायला सांगणं, घर सांभाळून, घरातील जबाबदार्‍या सांभाळून नोकरी करायला लावणं, त्यात काही कमीजास्त झाल्यास चुका काढणं म्हणजे मुद्दाम त्रास देणं, मानसिक अत्याचार करणे, घरगुती हिंसाचार करणं असे स्वरूप आज आले आहे.

प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवणे, प्रमाणात मोजक्या वस्तू वापरणे, काटकसर करणे, उधळ माधळ न करणे, नासधूस होऊ न देणे, अंथरून पाहुण पाय पसरणं, ऋण काढून सण न करणं, हे सर्व विचार आज कालबाह्य झालेले आहेत, अशी नवीन पिढीची धारणा आहे. कामवालीला फुकट पैसे जातात, कामवाली आपल्यासारखे स्वच्छ काम करत नाही, अचानक सुट्ट्या घेते, बाहेरील पदार्थांना घरच्यासारखी चव नसते शिवाय त्यामुळे प्रकृती बिघडते, फास्ट फूड अपायकरक असते, हॉटेलमध्ये स्वच्छता नसते, ऐका वेळच्या हॉटेलच्या जेवणात आठवडाभराची भाजी येते, घरात विनाकारण नवीन वस्तू का घ्यावी? फॅशननुसार कपडे बदललेच पाहिजेत का, सतत घरात नवीन वस्तू आणल्याच पाहिजेत का, जुन्या वस्तू चांगल्या स्थितीत असतील तरी फेकून द्यायच्या का, असे प्रश्न जुन्या पिढीसमोर असतात. कारण त्यांनी तेवढे संघर्षाचे दिवस काढलेले असतात. फॅशन आणि मॉडपणा या नावाखाली मंगळसूत्र, बांगड्या, टिकली या सौभाग्य अलंकारांना सर्रास बाजूला सारलं जात आणि फक्त आवश्यक त्या प्रसंगी ते परिधान केलं जातं ही सध्या सर्वसामान्य बाब झाली आहे. पण जुनी पिढी असं काही फॅशन वगैरे पाहिलं की तोंड वाकड करते आणि आमचा मूड मुद्दाम घालवते ही तक्रार अतिशय सर्वसाधारण झाली आहे.

या सर्व अत्याधुनिक बदलांना सामोरे जाताना घरातील जेष्ठ महिलांना, नागरिकांना मानसिक, भावनिक त्रास होतो आहे आणि त्यातून घरातील मुलींना विशेतः सुनांना काही बोलण्याची सोय राहिली नाहीये. नवविवाहित मुलींना घरातली कामे, जास्त माणसांचा स्वयंपाक, ठराविक पद्धतीने, ठराविक वेळेत स्वयंपाक करणे, घरातील काम करणे, घासाघिस करुन घरातल्या वस्तू ज्येष्ठ मंडळींच्या पसंतीनेच घेणे, घरातल्यांकडून मोबाईलवर जास्त बोलायला मर्यादा आणणे, एकटं दुकटं जास्त वेळ घराबाहेर घालवण्यावर बंधन येणे, स्वतःच्या मर्जीने हवे तसे कपडे घालण्याची पद्धत, व्यक्तिमत्व बदलायला लावणे, लग्नानंतर मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवायला परवानगी नसणे, घरातल्यांना मान पान देत बसणे, त्यांचे विचार मार्गदर्शन घेणे या गोष्टी अत्याचार, छळ, सासुरवास हिच धारणा झालेली आहे. त्यामुळे घरोघरी अतिशय शुल्लक गोष्टींवरून खटके उडू लागले आहेत आणि त्यातून कौटुंबिक शांतता भंग होत चालली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -