घरफिचर्ससारांशऑस्करवीर भारतीय...

ऑस्करवीर भारतीय…

Subscribe

समस्त भारतीयांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर अनुभवायला मिळाला. भारतीय चित्रपट आरआरआरमधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑक्सर पुरस्कार मिळाला. भारतीयांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला..

–सचिन जाधव

भारताकडून यापूर्वी बर्‍याच चित्रपटांना ‘ऑस्कर’साठी पाठविण्यात आले. वर्षाला साधारण ३०० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होणार्‍या आपल्या देशामध्ये एखाद्याच चित्रपटाला नामांकन मिळावे, ही तशी लाजीरवाणी बाब म्हणावी. जागतिक पातळीवरील चित्रपटांचे आशय अणि विषयामध्ये नावीन्य असते, असे सांगितले जाते. मग भारतीय चित्रपटकारांना असे आशयघन चित्रपट का बनविता येत नाहीत? सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्दर्शकाने ज्याप्रमाणे विषय मांडले, त्याप्रमाणे सध्या चित्रपट तयार होताना दिसत नाहीत. भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रेमकथांचा प्रभाव असलेले चित्रपट निर्माण होताना दिसतात. कारण, त्यांचा व्यावसायिक अंगाने विचार केल्यास ‘बॉक्स ऑफिस’वर कमाई करणे, हेच मुख्य ध्येय दिसते.

- Advertisement -

भारताला पहिला ऑस्कर १९८३ मध्ये मिळाला होता. डिझायनर भानू अथैया यांना ‘गांधी’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. भानू अथैया यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. जर भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सत्यजित रे यांचे नाव सर्वात वर येईल. सत्यजित रे यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट केले, ज्यांचे परदेशातही कौतुक झाले. १९९२ मध्ये सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी एआर रहमान यांना शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला होता.

‘जय हो’ या गाण्याला ऑस्कर मिळाला असला तरीही ती ब्रिटिश फिल्म होती. अशा परिस्थितीत भारतीय चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. खरे तर हे गाणे ज्या चित्रपटात आहे त्या एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या‘आरआरआर’ हा काही त्यातील आशय किंवा अभिनयासाठी लक्षात राहणारा चित्रपट नव्हे. भव्यता, तांत्रिक करामती हीच त्याची वैशिष्ठ्ये, बेस्ट ओरिजिनल साँग विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरलाय. या विभागात ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती. पण यात सरस ठरलं ते नाटू नाटू गाणं.. यापूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

या गाण्याची थोडक्यात संकल्पना अशी आहे. ब्रिटिश राज्यात भारतीय लोकांनी काय काय भोगले त्याला इतिहास साक्षी आहे. आरआरआरमधील ‘नाटू नाटू’ गाण्यातून भूतकाळातील झलक दाखवण्यात आलीये. भीम आणि राम ही जोडी जेनीच्या निमंत्रणानंतर ब्रिटिश छावणीतील पार्टीत जातात. इंग्रजांचे गाणे न समजता देखील म्यूझिक बीट्सवर भीमचे थिरकणारे पाय, इंग्रजी अधिकार्‍याने त्याची उडवलेली खिल्ली आणि डान्स स्पर्धेच्या माध्यमातून इंग्रजांना दिलेली चपराक असे कमालीचे चित्रण या गाण्यात पाहायला मिळते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातून आफ्रिकी देशांनी प्रेरणा घेतलीये. ‘नाटू नाटू’ गाण्यात हे दोन अभिनेते डान्स करत असताना ड्रम वाजवणार्‍या कृष्णवर्णीय व्यक्तीचा संदर्भही बोलका आहे.

या गाण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे गाण्याच्या पार्श्वभूमीत असलेली इमारत सध्या लक्ष वेधून घेत आहे. अनेकांना हा सेट आहे असे वाटले होते. मात्र ही एक भक्कम पॅलेसची सुंदर इमारत आहे. ही इमारत आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्वतः राहत असलेल्या सुंदर राजवाड्याची. एका आंतरराष्ट्रीय चॅनेलवरील मुलाखतीमध्ये राजामौली यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यातील हुक-स्टेपसाठी कोरिओग्राफर प्रेम रक्षितने घेतलेली मेहनत किती अफाट होती, याची माहिती दिली होती. १०० वेगवेगळ्या डान्स स्टेप्समधून ४-५ डान्स स्टेप फायनल करण्यात आल्या आहेत. ‘नाटू नाटू’ या गाण्यात एक हुक स्टेप नाही तर अनेक स्टेपचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यात एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे या स्टेप्स देशी आहेत. या गाण्याला शूट करायला २० दिवस लागले आणि ४३ रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण करण्यात आली होती. याच वीस दिवसांत कलाकारांनी रिहर्सलसुद्धा केलं होतं. नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती. सकाळच्या वेळेत रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटाच्या सीन्सचं शूटिंग करायचे. पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता दोघं रिहर्सल करायला जायचे. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत त्यांची रिहर्सल सुरू असायची.

‘नाटू नाटू’ गाण्यातील संगीत जितके जबरदस्त आहे अगदी तितकेच त्या गाण्याचे बोलही थिरकायला लावणारे आहेत. या गाण्यात तुम्हाला ‘बैल जैसे धूल उडा के, सींग उठा के’ नाचण्याचा उल्लेख दिसून येतो. याचे श्रेय जाते ते रिया मुखर्जीला. तिने तेलुगू गाण्याचे लिरिक्सचे भाव हिंदीतही कायम ठेवले. ओरिजिनल ‘नाटू नाटू’ गाण्याचे लिरिक्स मातृभूमीशी अधिक कनेक्ट होणारे आहेत. नाटू-नाटू गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांची कहाणीही रोचक आहे. त्यांचे वडील एकेकाळी हिरे व्यापारी होते. १९९३ मध्ये कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कुटुंब इतके गरीब झाले होते की, वडील चित्रपटांमध्ये नृत्य सहाय्यक बनले. आणि प्रेम एका शिंप्याच्या दुकानात काम करू लागला. एके दिवशी गरिबीला कंटाळून प्रेम आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरीना बीचवर गेला. आत्महत्या केल्यावर डान्स फेडरेशनचे लोक कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करतील, असा विचार त्यांनी केला. आत्महत्येपूर्वी प्रेमला समजले की, समुद्रकिनारी पोहोचण्यासाठी त्याने वापरलेली सायकल ही उसनी घेतली होती.

तो असाच मेला तर सायकलमुळे कुटुंबाला त्रास होईल. असा विचार करून तो सायकल ठेवण्यासाठी घरी आला. घरी येताच त्यांना वडिलांचा फोन आला की प्रेमला एका चित्रपटात डान्स कलाकार म्हणून काम मिळाले आहे. प्रेम यांनी नोकरी मिळताच आत्महत्येचा विचार सोडून दिला. ‘विद्यार्थी’ चित्रपटासाठी प्रथम प्रेम यांनी नृत्यदिग्दर्शन केले. ते गाणे पाहून राजामौली इतके खूश झाले की, त्यांनी कोरिओग्राफरला कळवले. गाण्याचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित असल्याची माहिती होताच राजामौली यांनी स्वत: त्यांना बोलावून घेतले. विचारले की, तुम्ही मुलांना नृत्य शिकवू शकता का? यानंतर राजामौली यांनी त्यांना ‘छत्रपती’ चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम दिले. ज्युनिअर एनटीआर या चित्रपटातूनच स्टार झाला. त्याचबरोबर या चित्रपटातून प्रेम रक्षितलाही ओळख मिळाली. या ओळखीतून रक्षितचा आत्मविश्वास इतका वाढला की, त्याने नाटू-नाटूसारख्या गाण्यावर जगाला थिरकायला लावले.

भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने उत्तम लघुपटाचा पुरस्कार जिंकला आहे. लघुपटाचं चित्रीकरण करण्यासाठी दिग्दर्शिकेने खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शिका कार्तिकी गोंसाल्विस यांनी तब्बल पाच वर्षे या एलिफंट कँपमध्ये वास्तव्य केलं. येथील बारकावे टिपले. त्यानंतरच चित्रीकरण सुरू केलं. अनाथ हत्ती रघू आणि त्याचा सांभाळ करणार्‍या दाम्पत्याच्या जीवनावर आधारीत हे कथानक आहे. स्वतःवर ओढवलेल्या असंख्य अडचणींचा सामना करत हे दाम्पत्य रघूचा सांभाळ करते, हे यातून दाखवण्यात आले आहे. हा लघुपट गुनीत मोंगाने तयार केला होता. ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गुनीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘पिरियड एंड ऑफ सेंटन्स’ या चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

ज्या परिसरात ‘एलिफंट व्हिस्परर्स’ लघुपटाचं चित्रण झालं, त्या भागात रघू तर हिरोच बनलाय आणि आता ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर देश-विदेशातील चाहत्यांकडून रघू नेमका कोण आहे, कुठे राहतो, हे पाहण्यासाठी गर्दी होतेय. अनेक चित्रपट प्रेमी तर तमिळनाडूत रघूच्या भेटीसाठी येण्याचं नियोजन करीत आहेत. या लघुपटाचं शूटिंग तमिळनाडूच्या नीलगिरी पर्वत परिसरात झालं आहे. मुदुमलाई टायगर रिझर्व्ह येथील थेप्पाकडू एलिफंट कँपमध्ये हे चित्रीकरण झालं आहे. आशियातील हा सर्वात जुना एलिफंट कँप आहे. जवळपास १०५ वर्षांपूर्वीचा. त्यामुळे इथे अनेक प्रकारचे, विविध स्वभावांचे हत्ती आहेत. यातूनच एका हत्तीची निवड या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी करण्यात आली.

या लघुपटाला मिळालेल्या ऑक्सरनंतर तामिळनाडू सरकारने म्हणजेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घोषणा केली की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून राज्यातील २ छावण्यांमधील हत्तींची काळजी घेणार्‍या ९१ केअरटेकर्सना प्रत्येकी १ लाख रुपये कौतुकाचे प्रतीक म्हणून देण्यात येतील. शिवाय माहूतांची घरे बांधण्यासाठी ९.१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘एलिफंट कॅम्प’ विकसीत करण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. कोईम्बतूर चावडी याठिकाणी ८ कोटी रुपये खर्च करुन मूलभूत सुविधांसह नवीन एलिफंट कॅम्प बांधण्यात येईल. या घोषणा करण्यासाठी तामिळनाडूच्या रहिवाशांना ऑक्सरची वाट बघावी लागली हेदेखील तितकेच खरे.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -