घरफिचर्ससारांशहे सर्व कशासाठी?

हे सर्व कशासाठी?

Subscribe

जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या माणसांना, मानवी रक्त हाच एक धर्म आहे, याचं आकलन होईल, त्यांनाच ’निधर्मी’ शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. ज्यांना तो अर्थ समजला नाही, ते सगळे सत्ता टिकवण्यासाठी मानवी रक्त इंधन म्हणून वापरतात.

जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या माणसांना, मानवी रक्त हाच एक धर्म आहे, याचं आकलन होईल, त्यांनाच ’निधर्मी’ शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. ज्यांना तो अर्थ समजला नाही, ते सगळे सत्ता टिकवण्यासाठी मानवी रक्त इंधन म्हणून वापरतात. वयाच्या सोळाव्या वर्षी सगळ्या विश्वात शांती नांदावी म्हणून ’पसायदान’ मागणार्‍या ज्ञानेश्वर माऊलींनाच फक्त ’निधर्मी’ शब्द समजला होता, असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटले आहे. आपल्या देशाच्या बाबतीत हाच खरा प्रश्न आहे. आपला देश निधर्मी आहे की सर्वधर्मसमभाव याचा आदर करणारा?

जवळपास ३०-३२ वर्षांपूर्वी ’सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनायेंगे,’ अशी घोषणा भाजपाचे त्यावेळचे आक्रमक नेते लालकृष्ण आडवाणी यांनी केली आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पुढे जे काही घडले ते सर्वश्रृत आहे. राम मंदिर उभारणीची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे. पण तरीही हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये विद्वेषाचे बीजरोपण आजही सुरूच आहे. इंग्रजांच्या ’फोडा आणि राज्य करा’ या धोरणाने याचा पाया रचला. कालपरत्वे तो मागे सरायला हवा होता. पण कोणी ना कोणी तरी पुढे येत या निखार्‍यावर फुंकर मारतच आहे.

- Advertisement -

कोणताही धर्म असो, त्याच्या श्रद्धास्थानांचा आदर हा राखला गेलाच पाहिजे. याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण श्रद्धास्थानांबद्दल बेधडक वक्तव्यं केली जात असल्याचे किंवा तशी काहीतरी कृती केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे केवळ भारतातच नव्हे तर, परदेशातही, विशेषत: मुस्लीम देशांमध्ये पडसाद उमटले. भारतात तर या प्रकरणात दोघांनी जीव गमावला तर, दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे.

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. समाजा-समाजात विद्वेष निर्माण करणे हे आपल्या नेत्यांचे काम नसावे. हे तर इंग्रजांनी केले. त्यांनी आपली संस्कृती, देवी-देवता, जात-पात या सर्वांचा भारतीयांवर शस्त्रासारखा वापर केला. ते अजून का सुरू आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. त्यांनी याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागावी, असे न्यायालयाने सांगितले. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीबद्दल चर्चा सुरू असताना नुपूर शर्मा यांनी हे वक्तव्य केले होते. त्याला त्या चर्चेत सहभागी असलेले मौलवी देखील काही प्रमाणात जबाबदार आहेत. त्यांनी देखील शर्मा यांना भडकावल्याची तसेच त्यावेळी असलेल्या अँकरनेही हस्तक्षेप न केल्याची नोंद घेतली गेली.

- Advertisement -

त्याचबरोबर न्यायालयाने वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुळात ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. त्याची चर्चा वृत्तवाहिन्यांवर कशी काय होऊ शकते? असा मूलभूत प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणांवर संसद तसेच कोणत्याही विधानसभेत चर्चा किंवा टीकाटिप्पणी केली जात नाही. मग टीव्हीवर अशी चर्चा घेऊन काय साध्य केले जाते? हाही प्रश्न आहेच. अशा प्रकारच्या ’मीडिया ट्रायल’बाबत सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, अशा ’मीडिया ट्रायल’ सुरूच आहेत. हा सर्व प्रकार टीआरपी मिळवण्यासाठीच आहे, हे म्हणायला वाव आहे. कारण नुसत्या युक्तिवादातून निर्णय होत नसतात, त्याला पुरावे देखील लागतात. या वास्तवाकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते.

नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच कारणाने त्यांना अटक करण्यात आली. हे सर्व नाट्य अपेक्षितच होते. पण विषय पुन्हा उपस्थित धर्माधर्मातील विद्वेषाला हवा देण्याचा कार्यभाग याद्वारे साधला गेला होता, त्याचे काय?

या सर्व बाबतीत महाराष्ट्रात राजकीय स्तरावर सर्वांनी मौन धारण केले होते. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचा बचाव केला आहे. वादग्रस्त इस्लामी प्रचारक झाकिर नाईक यांनी देखील हाच मुद्दा मांडला होता. त्याला कोणी माफी मागायला सांगितले नाही. तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी देवी-देवतांच्या नावांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्याबद्दल कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही, असे मुद्दाही राज ठाकरे यांनी उपस्थित केले. एकूणच अकबरुद्दीन ओवैसी यांनी अनेकदा धर्माधर्मात तेढ वाढविणारी भूमिका घेतली आहे.* मे महिन्यात संभाजीनगरातील मुघल सम्राट औरंगजेबच्या कबरीला भेट देऊन वादळ निर्माण केले होते. तर दुसरीकडे त्यांचे बंधू खासदार असदुद्दीन ओवैसी हे सर्वधर्मसमभावचा वारंवार घोषा करत आहेत. त्यामुळे एमआयएमची भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्हच निर्माण होते.

सर्वोच्च न्यायालयाने कठोर भाषेत टिप्पणी केलेली असताना देखील देशात अद्यापही ईशनिंदेच्या (धार्मिक श्रद्धास्थानांचा अपमान) घटना घडतच आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलपती शांतीश्री धुलिपुडी यांनी देखील अलीकडेच हिंदू देवी-देवतांबद्दल असेच वक्तव्य केले आहे. मानवशास्त्रीय तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिंदूंचा एकही देव ब्राह्मण दिसत नाही. बहुतांश देव क्षत्रिय आहेत. तर स्मशानभूमीत सापासह बसणारे भगवान शंकर हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावेत, असा तर्क त्यांनी मांडला. मुळात जेएनयू हे अशा प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या वादात असतेच. तिथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात कथित घोषणा दिल्या जातात किंवा महिषासुर शहीद दिनसुद्धा पाळला गेला आहे, असा त्याचा पूर्वेतिहास आहे.

हनुमानाच्या बाबतीतही हेच घडले. श्रीरामाचा घोषा करणार्‍या भाजपाकडूनच हनुमानाच्या जातीचा उल्लेख पहिल्यांदा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वनवासी, वंचित आणि दलित असल्याचे म्हटले होते. बाबा रामदेव यांनी क्षत्रिय तर, शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी हनुमान ब्राह्मण असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे याच हनुमानाचे स्तुतिगान ’हनुमान चालिसा’वरून महाराष्ट्रात राजकारण रंगले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करताना भोंगे बंद न झाल्यास हनुमान चालिसा पठन होईल, असा इशारा दिला. याच हनुमान चालिसावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना तत्कालीन ठाकरे सरकारने विरोध करत तुरुंगात पाठवले होते.

कट्टर धार्मिकतेबद्दल विरोधक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बोट दाखवत असले तरी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळोवेळी ’वसुधैव कुटुंबकम’चीच भूमिका मांडली आहे. भारत विश्वकल्याणाच्या दृष्टीने काम करीत असून आम्ही वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मानणारे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे धार्मिक राजकारणाला अनेकदा हवा दिली आहे. यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. या अशा दोन टोकाच्या भूमिकांमध्ये सर्वसामान्य भरडला जात आहे. त्यात कधी कधी अभिनेते आमीर खान आणि गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांच्यासारख्या मान्यवरांचीही भर पडते. अभिनेते आमीर खान यांनी अकारण ’असहिष्णू’तेचा वाद निर्माण केला होता. तर दुसरीकडे हिंदू हा जगातील सर्वाधिक सहिष्णू असल्याचे सांगणार्‍या जावेद अख्तर यांनी रा. स्व. संघाची तुलना तालिबानशी केली. आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल यासारखे संघटनांचा उद्देश तालिबान्यांप्रमाणेच आहे, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

वस्तुत: या मान्यवरांनी जाती-धर्मातील तेढ वाढणार कशी नाही, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु त्यांचीच वक्तव्य आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. लोकांची श्रद्धास्थाने महत्त्वाची आहेत. जिथे ९८ टक्के लोकांची परमेश्वरावर श्रद्धा आहे. त्यांचा दिनक्रम त्यावरच सुरू असतो. अशा वेळी देवालाच रिटायर करा, असे सांगणारे विचारवंत कसे काय होऊ शकतात, अशा आशयाचा संवाद प्रसिद्ध नाटक ’मि. नामदेव म्हणे’ यात आहे. त्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा खेळ होऊ नये, भले ती आंधळी श्रद्धा असली तरी! कारण राजकारणी जर शुभ आणि अशुभ अशा अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील तर, दुसर्‍यांच्या श्रद्धेशी खेळ करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. आता तर सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम प्रत्येकाच्या हाती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भावना भडकावण्याचे काम आणखी सोपे झाले आहे. सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्टदेखील वाढल्या आहेत. जाती-धर्मातील विद्वेषाची वेल या सोशल मीडियामुळे जोमात फोफावण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासारविचार करायला हवा. हे सर्व का आणि कशासाठी सुरू आहे? याचा विचार व्हायला हवा. भावनेच्या भरात वाहवत न जाता, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासली जाणे आवश्यक आहे. तेव्हाच अशा वक्तव्यांचे वा कृतीचे पडसाद पडणार नाही.

“A politician divides mankind into two classes : tools and enemies.” असे जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नीत्शे यांनी म्हटले आहे. म्हणजेच राजकारणी मानवांना साधने आणि शत्रू अशा दोन वर्गांत विभाजित करतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपण काय व्हायचे, ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -