घरफिचर्ससारांश‘थप्पड’च्या निमित्ताने...

‘थप्पड’च्या निमित्ताने…

Subscribe

थप्पडमधला तो कानशिलात लावलेला सीन आणि त्यानंतर नायिकेच्या एकूण भावना, तिला होणारा त्रास, तिच्या आत्मविश्वासाची झालेली मोडतोड या भूमिकेत तापसीने अक्षरशः जीव ओतलाय. तो सीन बघताना कितीतरी गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. आई, आजी, मामी, मावशी, मैत्रिणी यांच्याबाबत घडलेले कितीतरी किस्से आठवून गेले. थप्पड आरसा आहे अनेक स्त्रियांना मिळणार्‍या हिन वागणुकीचा. गरजेचं नाही मारहाण केल्यानेच स्त्रीला जखमा होतात आणि ना किती मारलं याच्या मोजमापावरून तिला होणारा त्रास मापता येतो. शब्दांचाही तितकाच दीर्घ परिणाम तिच्या एकूण अस्तित्वावर होतच असतो, मात्र त्याला गांभीर्याने घ्यावं असं आजवर कुणालाही वाटलं नाही.

पहिल्यांदा थप्पड चित्रपट पाहिला आणि त्यावर मित्राने कसा वाटला विचारल्यावर पटकन तोंडातून निघून गेलं ओव्हरेटेड वाटला. कानशिलात लगावली म्हणून कुणी नातं तोडतं का? पण या प्रतिक्रियेनंतर काहीतरी चुकल्यागत वाटलं. कितीतरी जणींची त्यावरची मतं हीच होती एका चापटीने असा तडकाफडकी निर्णय घेऊन नातं तोडायचं असतं का? माफ करून टाकायचं. खरंतर यात त्यांचाही दोष नाही. पण खरंच ती फक्त एक चापट असते? तेवढ्यापुरताच तिचा परिणाम असतो? हे प्रश्न डोक्यात काहूर माजवत होते. मग पुन्हा एकदा चित्रपट बघायला घेतला आणि यावेळी थप्पडबाबत आपलं मत किती चुकीचं होत हे लक्षात आलं. ठरवूनही आपल्यावर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा पडदा आणि स्त्रीची गृहीत धरलेली सहनशीलता एकदमच झुगारून देणं जमत नाही हीच बाब थप्पडबाबत पहिल्यांदा झालेल्या मतावरून अधोरेखित होते.

थप्पडमधला तो कानशिलात लावलेला सीन आणि त्यानंतर नायिकेच्या एकूण भावना, तिला होणारा त्रास, तिच्या आत्मविश्वासाची झालेली मोडतोड या भूमिकेत तापसीने अक्षरशः जीव ओतलाय. तो सीन बघताना कितीतरी गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. आई, आजी, मामी, मावशी, मैत्रिणी यांच्याबाबत घडलेले कितीतरी किस्से आठवून गेले. थप्पड आरसा आहे अनेक स्त्रियांना मिळणार्‍या हिन वागणुकीचा. गरजेचं नाही मारहाण केल्यानेच स्त्रीला जखमा होतात आणि ना किती मारलं याच्या मोजमापावरून तिला होणारा त्रास मापता येतो. शब्दांचाही तितकाच दीर्घ परिणाम तिच्या एकूण अस्तित्वावर होतच असतो, मात्र त्याला गांभीर्याने घ्यावं असं आजवर कुणालाही वाटलं नाही.

- Advertisement -

तुला काय अक्कल आहे? बायकांना गाडी चालवताच येत नाही, तुला काय कळणारे यातलं? दिवसभर घरात बसून करतेस काय तू? गृहिणींना नेहमी ऐकवताना, कित्येक बाया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात तू का नाही केलंस कधी ? साधं जेवण बनवता येत नाही धड. देवाने तुला मुलीच्या जन्मात घालूनच चूक केली. तिचं मत घ्यायची गरज नाही. मी आहे ना मी सांगतो काय ते.. हो मग तिच्याबद्दल सगळं माहीत असतं, मला सांगते ती सगळं नवरा आहे मी. तिचं कर्तव्यच आहे ते…तू ना आयुष्यात काही केलंस ना करू शकशील, लायकीच नाही तुझी..घरातली कामं करून उपकार नाही करत तू मी पोसतो तुला..ही आणि अजून अशी कितीतरी वाक्य दैनंदिन जीवनात पुरुष सहजगत्या बोलून जातात. मात्र त्याचा स्त्रियांच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होतो याचा ते तिळमात्रही विचार करत नाहीत. हा परिणाम त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आत्मविश्वास गमावला जातो. हतबलता येते आणि एका टप्प्यावर त्या समोरचा म्हणतो तसच असेल आपल्यातच काही दोष असेल म्हणून चूक नसताना गिल्ट घेऊन जगतात. आपल्याला काहीच जमणार नाही हे स्वीकारून प्रयत्न करणंच सोडतात. खूप कमी स्त्रियांमध्ये हिंमत उरते स्वतःसाठी लढण्याची. बाकीच्यांना तर आपल्यालाही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे याची जाणीवच नसते.

आमच्या खान्देशात जावई, सासरा, सासू, नणंद, भाचा, भाची, दिर, जाऊ आणि बरेच जवळचे दूरचे पण मुलाकडचे असणारे नातेवाईक यांना प्रचंड मान असतो. म्हणजे आपल्याच मुलाच्या वयाच्या असणार्‍या जावयाचे मुलीचे आई वडील पाया पडणार आणि तो निर्लज्ज ठोंब त्यावर कसलाच आक्षेप न घेता पाय पुढे करत आपल्याला किती मान आहे हे मित्रांना खुणावत सांगणार. लग्नातही लग्न मंडपात हार घातल्यावर नवर्‍याची पूजा करून वधूने त्याचा पाय पडायची प्रथा आहे, काय तर म्हणे पती परमेश्वर खरंच? खान्देशात वधूला नवर्‍याकडील नातेवाईकांना अहो-जाहो करून बोलावं लागतं. मग तो अगदी वर्षभराचा भाचा असला तरी त्याला मान देऊन बोलायचं. त्याला नमस्कार करायचा असं नाही केलं तर ती सून उद्धट ठरते. तिच्या आईवडिलांचे संस्कार निघतात. थोडक्यात काय तर मुलाकडील मंडळी हे प्रिव्हीलेज आणि त्यावरून मानपान ठरतो. त्यांच्याबद्दल खरच आदर वाटतो का? त्यांची तेवढी लायकी आहे का? हे सगळं करताना त्या पोरीच्या मनाला किती वेदना होत असतील याचा विचार होतच नाही.

- Advertisement -

काही अपवाद सोडता आजही असले खोटे मान सन्मान जपण्यासाठी मन मारतात पोरी. काही जण तर मला हे सगळं मान्य नाही पण घरच्यांच्या आग्रहामुळे करावं लागतं. त्यांची मने दुखावली जाऊ नयेत म्हणून पण हे सगळं करताना स्वतःच मन दुखावलं जातं त्याच काय? स्वाभिमानाच्या चिंधड्या उडतात अशा प्रकारांमुळे पण इथे त्याची पडलीये कुणाला? कारण पुन्हा तेच बाईचं जगणं वेगळं असतं. तिने रीतभात सांभाळली पाहिजे. अजून स्त्रीचं पुरुषसत्ताक मानसिकतेची वाहक कशी आहे हे ग्लोरीफाय करून तिलाच विलन केलं जातं. काही काळ मीही या अर्थहीन गैरसमजाला बळी पडले होते. पण नंतर डोळे उघडले. आपल्याकडच्या मालिकांमध्ये सासरा देव माणूस आणि सासू नेहमी विलन दाखवली जाते. स्त्रीवर पुरुषसत्ताक मानसिकतेचं ओझ लागणारा पुरुष कधी दाखवलाच जात नाही. वंशाचा दिवा असतो पणती नाही. हे स्त्रीवर बिंबवणारा कोण? जी स्वतः या पुरुषी व्यवस्थेची विक्टीम ठरली आहे ती काय वाहक कशी असे शकेल. बालपणी बहीण लहान असो वा मोठी भाऊ आला की ती आपसूक मोठी होऊन तिला अचानक समज येते. सुरुवातीची आदळ आपट थांबून पहिलं प्राधान्य भावाला हे तिला स्वीकारावं लागत. अर्थात याला काही घर अपवाद असतीलही.

कोणत्याही परिस्थितीत एका व्यक्तीने दुसर्‍याला केलेल्या मारहाणीचे (सेल्फ डिफेन्सचा अपवाद वगळता) समर्थन केले जाऊच शकत नाही. आपल्याकडे मारहाणीत सुद्धा पुरुषांना प्रिव्हिलेज आहे म्हणजे बायको खुलेपणाने आपली बाजू मांडत असेल तर ती उलट उत्तर देते, अशाने डोक्यावर बसेल, तिच्या कानशिलात दोन चार ठेऊन तिला सरळ कर हा सल्ला देणारे मित्रही कमी नसतात. पण उलटपक्षी बायकोला मारझोड करणारा बेवडा नवरा असेल आणि स्वरक्षणासाठी तिने त्याला मारलं तर कसा का असेना नवरा आहे तो बाईने नवर्‍यावर हात उचलू नये हा सल्ला देणार्‍या ज्येष्ठ महिलाच असतात कारण त्यांचावर असलेला पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा त्यांना सर्व घटना पुरुषी वर्चस्वाच्या परिवेशातून बघण्यास भाग पाडत असतो. थोडक्यात काय अख्खा समाजच पुरुषाने बाईला मारण्याचे समर्थन करतो नव्हे त्यासाठी प्रोत्साहित करतो. अगदी बायका डोक्यावर बसून नयेत म्हणून महिन्यातून एक दोनदा त्यांच्यावर पट्ट्याचे व्रण सोडले पाहिजेत अशी विकृत मानसिकता बाळगणारी जमातही आहे.

मुलगी जन्माला आल्यावर तिला ठराविक रंगाचेच कपडे खासकरून पिंक, खेळण्यात बाहुली सक्तीचीच. मुलींसाठी पिंकच रंग का? तिला बाहुली नको असेल गाडी हवी असेल तर? आता यावर काहीजण म्हणतील मी म्हणतेय ते खूप आधीच्या काळी व्हायचं आता जग बदललय वगैरे.. मान्य बदल घडतोय, फक्त पूर्वी छोट्या स्वरूपात घडणार्‍या याच गोष्टींचा आज समारंभ होतो. मुलीच्या जन्माचा उत्सव होतो स्तुत्यच पण मुलीच्या जन्माच्या उत्सवाच्या बातम्यांमध्ये ज्या पद्धतीने ग्लोरीफिकेशन दाखवलं जातं ते निरखून पाहिलंय का कधी? काहीतरी विशेष केल्याची ती भावनिक रुजवणूक सामाजिक जाणिवा सुखावत असेलही, पण स्त्रीला तिचं लिंग बाजूला सारून एक माणूस म्हणून मिळालेली स्वीकृती मात्र यातूनही दिसत नाही. मुळात तीचा जन्म लक्ष्मी म्हणून स्वीकारला जातोय शुभ संकेत देणारी, पण याच ठिकाणी जर तिच्या जन्मानंतर अपघात, मृत्यू काही घडला तर हीच लक्ष्मी पनौती ठरवली जाते. स्त्री-पुरुष समानता, बेटी बचाव बेटी पढाव, मेरी बेटी मेरा अभिमान हे लिहून, वाचून, बोलून गुळगुळीत झालेले विषय वाटायला लागतात आता हे सगळं नंतर आधी तिला माणूस म्हणून स्वीकारलं का यावर बोलूया. एकदा तिचं माणूस असणं स्वीकारलं तर बाकीचे प्रश्नच उद्भवत नाहीत.

–प्रतिक्षा पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -