Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश नाट्यगृह निघालंय महाराष्ट्र दौर्‍यावर

नाट्यगृह निघालंय महाराष्ट्र दौर्‍यावर

Subscribe

चलो सफर करे : नाट्यगृह तुमच्या दारी, या नाट्यचळवळीला सहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात प्रारंभ झाला. या मागची मूळ संकल्पना कल्पेश कुलकर्णी या तरुण रंगकर्मींची. मात्र ही चळवळ अनेक दिवस अज्ञातच राहिली. तीन वर्षांपूर्वी या चळवळीला खर्‍याअर्थाने एक ओळख मिळाली. पुढे कोविडच्या काळात यात खंड पडला. पण आता पुन्हा ही नाट्यचळवळ जोमाने उभी राहिली आहे. आता तर हे नाट्यगृह निघालंय महाराष्ट्र दौर्‍यावर.

आताशा प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकवर्ग मिळेनासा झाला आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची नितांत गरज आहे. प्रायोगिक नाटक दर्जेदार असूनदेखील त्यातील कलाकार प्रथितयश नसल्यामुळे रसिकप्रेक्षकांचा त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तसेच अद्यापही नाटक म्हणजे काय, ते कसं असतं याबाबत बर्‍याचअंशी समाजात अज्ञान आहे. सर्वच रसिकप्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नाटकाचा प्रयोग पाहता येत नाही. बर्‍याच मर्यादा असतात.

नाटक पाहण्यापासून कुणीही वंचित राहू नये, ही कला इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात जिवंत राहावी, प्रेक्षक नाटकाकडे वळावेत, नवे नाट्यरसिक घडावेत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही संकल्पना वास्तवात राबवली जात आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये नाटक नेऊन प्रत्यक्ष नाट्यगृहात आसनस्थ होऊन प्रयोग पाहिल्याची अनुभूती देण्याची ही चळवळ खर्‍या अर्थाने या रंगकर्मींची एक तळमळ आहे. सभागृहच हवे असा अट्टाहास न करता सोसायटीमधील टेरेस अथवा पार्किंगच्या जागा मिळाली तरी कोणतेही मानधन न घेता पांडुरंगकर्मी ही नाट्यसफर घडवून आणण्यास सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

आता नाट्यगृहच आपल्या दारी येत असल्यावर सुजाण प्रेक्षकांचीदेखील एक जबाबदारी निर्माण होत आहे ती म्हणजे नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याची आणि रंगभूमीला जिवंत ठेवण्याची. ‘नाट्यगृह तुमच्या दारी’ ही चळवळ यावेळेस नव्या रूपात आली आहे. मखमली पडदे, प्रकाश योजना, संगीत अशी तंत्रं वापरून नाटक सादर होत आहे. रंगभूमीची नि:स्वार्थ सेवा करणार्‍या कलाकारांचा तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मान या चळवळीतून केला जात आहे. प्रायोगिक नाट्यप्रयोगांच्या मोफत प्रसिद्धीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजवर अर्थक्वेक, सेल यासारख्या कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर या चळवळी अंतर्गत सध्या सादर होत असणारी कलाकृती आहे शंतनु चंद्रात्रे लिखित ‘चलो सफर करे’ ही एकांकिका.

‘चलो सफर करे’ ही एका अनोख्या सफरीची कथा आहे. ही सफर आहे थेट स्वर्गाची. आयुष्याचा प्रवास जिथे संपतो तिथून ही सफर सुरू होत असते. मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळावे अशी इच्छा उराशी बाळगणार्‍या प्रत्येकाच्याच स्वर्गाबाबतच्या संकल्पना मात्र भिन्न असतात. अशाच दोन व्यक्तींच्या जगण्या मरण्याची कथा आणि व्यथा यात मांडण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यातील एक नोकरदार तर दुसरा शेतकरी. दोघांच्याही आयुष्याचा अंत एकाचदिवशी आणि एकाचवेळी झालेला. यातील कोणा एकालाच स्वर्गाच्या सफरीवर जायला मिळणार आहे तर दुसर्‍याला या सफरीवर जाण्यासाठी एका तपाची म्हणजे तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असते. दोघांपैकी कुणाही एकाने दुसर्‍याच्या नावाने हक्कसोड पत्र लिहून देणेबाबत स्वर्गप्रवेश राजरथाचा सारथी अर्थात टिसी बजावतो. मानवी स्वभावानुसार हे दोघे त्याला चिरीमिरी आणि चहापाण्याचे आमिष दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. पुढे या दोघांची एकमेकांमध्येच स्पर्धा सुरू होते.

शेतकर्‍याचं आयुष्य नेहमी वाट पाहण्यातच गेलेलं. ही वाट कधी पावसाची तर कधी विहिरीला पाणी लागण्याची. तर नोकरदार वाट पाहण्याची सवय नसलेला. वेळ पाळण्यासाठी कुणासाठीही न थांबणारा. या दोघांचं जगणं जसं वेगळं तसंच मरणंही. एक चेंगरून तर एक लटकून मेलेला. आपल्या जगण्या मरण्यात बरोबरी असल्याचे लक्षात आल्याने ज्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबांवर अधिक आघात झाला त्याने स्वर्गात जायचे यावर त्यांच्यात एकमत होते. पण प्रत्यक्षात वेगळेच वास्तव उघडकीस येते. कोण कुणासाठी हक्कसोड पत्र लिहून देतो? कुणाचे जगणे, मरणे श्रेष्ठ? हे या दारी आलेल्या नाट्यगृहात पाहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे.

लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तांत्रिक बाजू या सर्वच बाबतीत समाधानकारक असलेली ही एक उत्तम कलाकृती आहे. खूप पसारा न करता मोजके पण सूचक असे नेपथ्य हृषीकेश पाटील यांनी केले आहे. चैतन्य गायधनी यांची प्रकाश योजना प्रभावी तर नितीन पावरा, ललित श्रीवास्तव यांचे संगीत प्रसंगानुरुप आणि साजेसे असे आहे. वैष्णवी शेजवळकर (संवादिनी) आणि आयुष शिरसाठ (पखवाज) यांनी यात भजनांना लाईव्ह संगीत दिले आहे. कल्पेश कुलकर्णी आणि अनिकेत इनामदार या दोघा कलावंतांनी आपल्या अभिनयाने या सफरीत अधिकच रंग भरले आहेत. ऋतुजा पाठक, हनुमान जाधव, प्रद्युम्न शेपाळ या तिघांनी यात दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर अमेय आचार्य एका छोट्याश्या भूमिकेत आहे. यातील कुणाचाही अभिनय कुठेही लाऊड वाटत नाही. हे सर्व कलाकार प्रयोगादरम्यान ते ते पात्र जगत होते.

अंतर्मुख करणारा पण काहीसा क्लिष्ट विषय. मात्र तो अगदी सहजतेने हाताळला आहे. रंगभूषा (स्वरांजली गुंजाळ) रंगमंच सहाय्य (नेहा उपाध्याय) यांची देखील कामगिरी आवर्जून दखल घ्यावी अशीच. इमारतीच्या टेरेस अथवा पार्किंगच्या मर्यादित जागेत प्रत्यक्ष रंगमंचावर प्रयोग पहात असल्याचा अनुभव देणारी ही नाट्यचळवळ. याचा साक्षीदार होणं, असणं प्रेक्षकांसाठी देखील एक अद्भुत अशी सफर आहे. रंगभूमीच्या आजवरच्या इतिहासात याची कुठेतरी नक्कीच नोंद होईल.

–श्रीराम वाघमारे

- Advertisment -