Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश गणेश देवी : डिपार्चरच्या टर्मिनलवर!

गणेश देवी : डिपार्चरच्या टर्मिनलवर!

गणेश देवींनी ‘सतत डिपार्चरच्या टर्मिनलवर उभा असलेला प्रवासी’ असा स्वतःचा परिचय करून दिला होता. विमानतळावर विमान वाहतुकीची दोन टर्मिनल्स असतात, अरायव्हल आणि डिपार्चर. येणार्‍या विमानांसाठी अरायव्हल तर निघणार्‍या विमानांसाठी डिपार्चरचे टर्मिनल असते. देवी स्वतःला ‘सतत डिपार्चरच्या टर्मिनलवर उभा असलेला प्रवासी मानतात आणि ते सार्थच आहे. कारण देवींच्या सत्तर वर्षांच्या आयुष्याचा पट पडताळून पाहिला तर सहजपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे ते सतत ‘डिपार्ट’ होण्याच्या तयारीत असतात. कुठल्यातरी ठिकाणात किंवा कोणत्यातरी पदामध्ये अडकून पडणे हा त्यांचा स्वभावच नाही.

Related Story

- Advertisement -

आपल्याकडे माणसांचा परिचय करून देण्याच्या काही पद्धती प्रचलित झालेल्या आहेत. जसे की कधी व्यवसायावरून, कधी पदावरून तर कधी त्याच्या रूढ झालेल्या प्रतिमेवरून. जसे की प्राध्यापक, लेखक, संशोधक, कार्यकर्ते…वगैरे.
पुन्हा त्यातही ती व्यक्ती लेखक असेल तर त्याचा परिचय करून देण्याचेही काही ठोकताळे आहेत. म्हणजे तो कोणत्या भाषेत लिहितो, यावरून मराठी लेखक, हिंदी लेखक, गुजराथी लेखक असे असे…किंवा कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित, वैचारिक…अशा कोणत्या जॉनरमध्ये लेखन करतो? यावरून कथाकार, कादंबरीकार, कवी, नाटककार, भाषांतरकार, विचारवंत वगैरे…हे आपले सर्वसाधारण ठोकताळे; पण असल्या कोणत्याही ठोकताळ्यांनी ज्यांचा परिचय करून देता येत नाही, असेही काही लेखक असतात. ना ते एका भाषेपुरते लिहितात ना विशिष्ट जॉनरमध्ये स्वतःला अडकवून घेतात. गणेश नारायणदास देवी हे या प्रकारचे लेखक आहेत. मराठी, गुजराती, इंग्रजी अशा तीन भाषांतून लेखन करणारे, समीक्षात्मक, वैचारिक आणि ललित असे तिन्ही प्रकारचे जॉनर हाताळणारे.

परंतु नुसते लेखक हाही देवींचा पूर्ण परिचय नाही. लोकभाषा सर्वेक्षणाचा महाकाय प्रकल्प सिद्धीस नेणारे सिद्धहस्त. आदिवासींसाठी मूलभूत कामांची उभारणी करणारे कार्यकर्ते आणि उजव्या, प्रतिगामी शक्तींच्या प्रतिकारासाठी ‘दक्षिणायन’ ही चळवळ चालविणारे प्रवर्तक.

- Advertisement -

‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’, ‘ऑफ मेनी हिरोज’, ‘इन अनादर टंग’, ‘पेंटेड वर्डस’, ‘इंडियन लिटररी क्रिटीसिझम’, ‘ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी’, ‘दि क्रायसिस विदिन नॉलेज अँड एज्युकेशन’ ही देवींची इंग्रजी भाषेतील ग्रंथसंपदा, ‘आदिवासी जाणे छे’ हा गुजराती भाषेतील ग्रंथ तर ‘वानप्रस्थ’ आणि ‘त्रिज्या’ ही मराठी भाषेतील पुस्तके शिवाय लोकभाषा सर्वेक्षणाचे बावन्न खंड अशी बहुआयामी लेखनसंपदा गणेश देवी यांच्या नावावर आहे. इंग्रजी भाषेतील लेखन साहित्येतिहास, संस्कृतिसमीक्षा या प्रकारांतील, गुजराती भाषेतील लेखन आदिवासींची संस्कृती उलगडून दाखविणारे तर मराठीतील लेखन ललित आणि वैचारिक या स्वरूपाचे आहे.

समीक्षक, लेखक म्हणून देवी यांना पहिली ओळख मिळवून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’. याला 1994 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साक्षेपी समीक्षक म.सु. पाटील यांनी ‘स्मृतीभ्रंशानंतर’ या नावाने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.

- Advertisement -

ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीमुळे आपण आपल्या साहित्यिक, सांस्कृतिक, समीक्षेच्या परंपरांना कसे पारखे झालो आहोत. युरो-अमेरिकन समीक्षेचे निकष स्वीकारून आपण या मातीत जन्माला आलेल्या साहित्याचे कसे अवमूल्यन करत आहोत; आपल्या उज्ज्वल परंपरांचा आपण घडवून आणलेला हा सामूहिक स्मृतिभ्रंश किती घातक आहे, याचा आढावा देवींनी प्रस्तुत दीर्घ निबंधाच्या स्वरूपातील ग्रंथात घेतला आहे. अर्थात या ग्रंथाला पाटील यांनी भाषांतरकर्त्याची जी प्रस्तावना जोडली आहे, त्यामध्ये देवींनी घेतलेला भारतीय साहित्य परंपरेचा शोध हा वरवरच्या वाचनावर आधारित असल्याचा आक्षेप घेत ‘भाषा’ साहित्यातील ज्या समीक्षेचा ते गौरव करत आहेत, ती मुळात एक तर संस्कृत नाहीतर पाश्चात्त्य समीक्षेवर परपुष्ट झाली असल्याची टीका करून प्रस्तुत ग्रंथातील मांडणीची मर्यादा दाखवून दिली आहे.

परंतु असे असले तरी ‘सर्जक विचारांचे दारिद्य्र दूर करणारा महत्त्वाचा ग्रंथ’ या शब्दात म.सु. पाटील यांनी या ग्रंथाचे मोल स्पष्ट केले आहे.

या ग्रंथातील मांडणीचाच विस्तार देवी यांनी ‘ऑफ मेनी हिरोज’, ‘इन अनादर टंग’,‘पेंटेड वर्डस’, ‘इंडियन लिटररी क्रिटीसिझम’, ‘ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी’ या ग्रंथामध्ये केला आहे. तर 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दि क्रायसिस विदिन : नॉलेज अँड एज्युकेशन’ या पुस्तकात देवींनी भारतीय ज्ञान निर्मितीच्या दोन हजार वर्षांच्या दीर्घ परंपरेचा आढावा घेतला आहे. देवींची एकंदरीत मांडणी ‘देशीवादा’ने प्रभावित असल्याने भालचंद्र नेमाडे यांच्याप्रमाणे त्यांच्यावरही खूप टीका झाली आहे. ज्याचा उल्लेख वर केलेलाच आहे. पण तरीही इतकी महामूर टीका होऊनही देवींचे मोठेपण नाकारता येणारे नाही.
वेगवेगळे कप्पे करून माणूस समजून घेता येत नसतो, हे ठाऊक असूनही व्यक्तीशः मला साहित्येतिहासाची मांडणी करणार्‍या समीक्षक देवींपेक्षा तेजगढमध्ये आदिवासी अकादमी उभारून त्यांच्या भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे मूल्य विशद करणारे आणि पुढे त्याच प्रेरणेतून लोकभाषा सर्वेक्षणाचे ‘अद्भुत’ काम पूर्णत्वास नेणारे गणेश देवी अगदी ‘ग्रेट’ वाटतात. या दृष्टीने ‘वानप्रस्थ’ हे त्यांचे पुस्तक मूलभूत आहे. त्याला मानाचे अनेक पुरस्कार मिळालेत म्हणून नव्हे, तर देवींच्या जीवन आणि कार्यामागील धारणा यातून ठळक होतात म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

या पुस्तकाचे त्यांनी तीन भागांत वर्गीकरण केलेले आहे. ज्यामध्ये पहिल्या भागात गृहस्थ धर्माकडून वानप्रस्थाकडे सुरू झालेला देवींचा प्रवास आहे, दुसर्‍या भागात ‘हिंसेची स्वप्नसृष्टी’ आणि ‘मृत्यूचे गणराज्य’ हे दोन लेख आहेत तर तिसर्‍या भागात त्यांचे भाषाविषयक चिंतन आहे.

राजकारण आणि अध्यात्म हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आधारस्तंभ असूनही आपण दोन्हींना स्टिरिओटाइप करून टाकले आहे; म्हणून तर बिगरराजकीय कृतिप्रवणता आणि बिनआध्यात्मिक अपरिग्रह या दोन्ही गोष्टी मराठी कल्पनाशक्तीच्या परिघाबाहेर जात असल्याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे समाजासाठी सर्वसामान्य माणूस कृतीप्रवण होऊ लागला की त्याच्यावर राजकारणाचा आणि गरजा कमी करू लागला की त्याच्यावर वैराग्याचा शिक्का बसतो. यामुळे माणसे ना सार्वजनिक कृतीच्या वाट्याला जातात ना अपरिग्रहाचा मार्ग निवडतात.
यातून ऐहिक आकांक्षाची गती वाढून आपल्या सगळ्या व्यवस्था भोगाला प्रवृत्त करणार्‍या, हिंसेचे आकर्षण वाढविणार्‍या ‘पुरुषी चेहर्‍याच्या’ होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. आपल्या एकंदरीत स्वातंत्र्यलढ्यातून गांधीजींनी शस्त्रबळ आणि सैन्यबळाच्या जागी सत्याग्रह, असहकार, मौन अशा स्त्रीत्वाला पूरक ठरणार्‍या मार्गांना केंद्रस्थानी आणले होते; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत आपल्या समाजाचा चेहरा पुन्हा अधिकाधिक रानटी, हिंस्र आणि पुरुषी होत चालल्याबद्दलची वेदना या पुस्तकात ठिकठिकाणी प्रकट झाली आहे.

समाजाच्या सौख्यासाठी आर्थिक सुबत्ता आणि सांस्कृतिक स्थिरता या दोन्हींची जरुरी असते. परंतु विकासाचे जे मॉडेल आपण अनुसरत आहोत, ते आर्थिक सुबत्तेचे अमर्याद आकर्षण वाढवून सांकृतिक सखोलतेचा पाया ठिसूळ करत नेणारे आहे. हे सांगत असतानाच गणेश देवी एक महत्त्वाचा धोकाही लक्षात आणून देतात, तो म्हणजे आधुनिकतेची अंधभक्ती जशी परवडणारी नाही तसेच परंपरेचे आंधळे अनुसरणही विघातक ठरणारे आहे…(‘करोना’वर ‘गोमुत्रा’च्या जालीम उपायातून हे आपण अनुभवतच आहोत)

परंपरांचे विवेकी वाचन आणि आधुनिकतेचे डोळस समायोजन हा आर्थिक सुबत्ता आणि सांस्कृतिक स्थिरता मिळवून देणारा मार्ग असल्याचे ते सुचवितात. हा मार्ग आदिवासींच्या जीवनव्यवहारात सापडल्याने आपण निसर्गावर निरामय माया करणार्‍या या पृथ्वीपुत्रांसाठीच्या प्रकल्पाकडे ओढले गेल्याचे देवी कबूल करतात.

वानप्रस्थ म्हणजे वनांत जाणे नव्हे; तर जे वंचित आहेत, त्यांचे दुःख,वेदना,त्यांची भाषा,संस्कृती समजून घेऊन त्यांच्याशी सहानुभाव स्थापित करणे होय. यासाठी ‘अरेरे बिच्चारे’ ही सहानुभूती अजिबात उपयोगाची नाही. गरज आहे त्यांना सोबत घेऊन त्यांच्या परंपरेतील ‘शहाणीवेला’ सन्मानित करण्याची. यासाठी देवींनी पत, पैसा आणि प्रतिष्ठेकडे घेऊन जाणारी ‘स्मार्ट सिटी’चा मार्ग सोडून जनांत आणि मनात उतरणारी वानप्रस्थाची वाट निवडली.

राजन खान यांनी एका मुलाखतीत ‘तुम्ही स्वतःचा परिचय कसा करून द्याल?’ असा प्रश्न त्यांना विचारला होता. तेव्हा देवींनी ‘सतत डिपार्चरच्या टर्मिनलवर उभा असलेला प्रवासी’ असा स्वतःचा परिचय करून दिला होता. विमानतळावर विमान वाहतुकीची दोन टर्मिनल्स असतात, अरायव्हल आणि डिपार्चर. येणार्‍या विमानांसाठी अरायव्हल तर निघणार्‍या विमानांसाठी डिपार्चरचे टर्मिनल असते. देवी स्वतःला ‘सतत डिपार्चरच्या टर्मिनलवर उभा असलेला प्रवासी’ मानतात आणि ते सार्थच आहे.

कारण देवींच्या सत्तर वर्षांच्या आयुष्याचा पट पडताळून पाहिला तर सहजपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे ते सतत ‘डिपार्ट’ होण्याच्या तयारीत असतात. कुठल्यातरी ठिकाणात किंवा कोणत्यातरी पदामध्ये अडकून पडणे हा त्यांचा स्वभावच नाही. खूप काही मिळवत राहण्याचा मोह टाळून जे मिळाले आहे, तेही विसर्जित करीत वाटचाल करण्याची त्यांची वृत्ती अगदी अपवादभूत आहे.

देवींचा जन्म पुण्याजवळील भोरचा. शालेय शिक्षण तिथेच. पुढे उच्च शिक्षण सांगलीत. पहिली नोकरी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात. पुढे महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा, धीरुबाई अंबानी इन्स्टिट्यूट, गांधीनगर अशा ठिकाणी अध्यापन,अनेक परदेशी विद्यापीठात संशोधन….असे सारे काही उत्तम चालू असताना 1998 मध्ये देवींनी स्वतःला अकादमिक कामांतून पूर्णपणे डिपार्ट करून घेतले आणि आदिवासींच्या कल्याणासाठीच्या कामात झोकून दिले.अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प उभा राहिला, स्थिरस्थावर झाला की याही कामांतून ते डिपार्ट झाले आणि लोकभाषा सर्वेक्षणाच्या महाप्रकल्पासाठी स्वतःला वाहून घेतले. देशभरातील 780 भाषा आणि 66 लिपींच्या सर्वेक्षणाचा हा 52 खंडांतील बृहतप्रकल्प हातावेगळा केला की ते याही कामांतून डिपार्ट झाले. दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्येनंतर प्रतिगामी उजव्यांचा वाढता उन्माद थोपविण्यासाठी ‘दक्षिणायन’ चळवळीला ते गतिमान करत आहेत.

ते जसे वेगवेगळ्या कामांतून डिपार्ट झाले तसेच निरनिराळ्या गाव-शहरांतूनही डिपार्ट होत गेले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा निरनिराळ्या राज्यांत, भोर-सांगली-कोल्हापूर-बडोदा-गांधीनगर-तेजगढ-धारवाड….अशा वेगवेगळ्या गावांत ते आपले प्रकल्प उभे करत गेले. कोणत्यातरी एकाच ठिकाणी रुजून तिथेच आपला गोतावळा वाढवत नेण्याचा पर्याय त्यांनी अनुसरला नाही. कधी साहित्येतिहास, कधी संस्कृतिसमीक्षा, कधी भाषा सर्वेक्षण तर कधी राजकीय लढाई; म्हणजेच कधी समीक्षक, कधी संस्कृतिअभ्यासक, कधी भाषाशास्त्रज्ञ तर कधी रस्त्यांवर उतरून लढाई लढणारे कार्यकर्ते. एका ठिकाणाहून, भूमिकेतून, कार्यक्रमातून डिपार्ट होऊन दुसर्‍या भूमिकेत शिरणे हे देवींच्या व्यक्तित्वाचे वैशिष्ठ्य राहिलेले आहे.

‘त्रिज्या’ या आत्मपर लेखात आपले व्यक्तिमत्व घडविणार्‍या तीन प्रेरणांचा उल्लेख देवींनी केला आहे. पहिली प्रेरणा आहे, गौतमाचे समाधीअवस्थेच्या अत्यंत उत्तुंग अवस्थेतून मानवजातीच्या कल्याणासाठी परत फिरणे ही घटना, जैन तत्वज्ञानातील चौथ्या शतकातील काळ-अणूची संकल्पना आणि युक्लीडच्या भूमितीतील त्रिज्येविषयीची धारणा. या तिन्हींतील समान धागा म्हणजे ‘स्व’चे सहज विसर्जन !

‘केल्याने वा न केल्याने ज्यास भावार्थ सारखा;
कोणामध्ये कुठे न ज्याचा जीव गुंतला’

भगवद्गीतेत सांगितलेली ही निर्व्याजता लाभते ती ‘अहं’ला विसर्जनाच्या वाटेवर खेळवत राहिल्यानंतर …
‘स्व’च्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडविणारे सहस्त्रावधी प्रयोग सभोवताली सुरू असताना गणेश देवी मात्र लहान मुलासारखे निरागस आणि फुलांनी डवरून आलेल्या झाडासारखे लोभस वाटतात ते या विसर्जनामुळेच ! म्हणून तर त्यांना एक भाषा, एक राज्य आणि एक भूमिका अशा चौकटीत बंदिस्त करताच येत नाही.

- Advertisement -