तणावमुक्तीचे अमेरिकन तंत्र !

कोरोना काळातील नैराश्याचे मळभ झटकून विद्यार्थी वर्ग आता शाळेत पुन्हा जाऊ लागला. नवा वर्ग, नव्या वह्या- पुस्तकं, नवे दप्तर, नवे शिक्षक आणि सारे काही नवे. पण या उत्साहाच्या वातावरणातही शिक्षक आणि पालकांना चिंता आहे ती कोरोनामुळे झालेल्या गुणात्मक नुकसानीची आणि मुलांना पुन्हा एकदा मानसिकरित्या ‘पॉझिटिव्ह’ बनवण्याची. यासाठी अमेरिकेने एक रोचक कार्यपद्धती अंमलात आणली आहे. तिचा वापर भारतातही केला गेला तर गेल्या दोन वर्षातील ताण निघून जाईल.

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला. कोरोनाचा सर्वाधिक फटका केवळ घरातील कर्त्या व्यक्तीला बसला असा सर्वसामान्य ग्रह आहे. प्रत्यक्षात कोरोनाचा फटका बसला विद्यार्थ्यांना. ज्या बालकांचे पाहिली किंवा लहान गटात जाण्याचे वय होते ते कोरोना महामारीमुळे थेट तिसर्‍या किंवा चौथ्या इयत्तेत ढकलले गेले. ज्या वयात अक्षरांची ओळख होऊन ते गिरवायचे शिकणे अपेक्षित असते त्या वयात या बालकांना पाठ्यपुस्तकांमधल्या धड्यांचा अभ्यास करणे भाग पडले. त्यामुळे या बालकांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांना दिसून आले. नैराश्य फक्त एका गृहस्थाला किंवा मर्यादित वयाच्या व्यक्तीला होत नसते तर ते एका बालकालाही होऊ शकते हे यावरून समोर आले. ज्या काल्पनिक विषयावर विद्यार्थी निबंध लिहायचे ते विषय या कोरोना महामारीत घडले.

शाळा बंद झाली तर या विषयावर निबंध लिहिताना मुलं फार आनंदी असायचे. मात्र कोरोना काळात जेव्हा शाळा बंद झाल्या तेव्हा मात्र या विद्यार्थ्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती उदयास आली. खरे तर, ही शिक्षण पद्धती काही अंशी विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या अशांवर प्रभावी ठरू शकली नाही. शाळांमध्ये शिकवत असलेले सर्वच शिक्षक टेक्नॉलॉजीफ्रेंडली नसल्याने ऑफलाइन शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाईन शिकवता आले नाही. बालकांचा हात धरून शिक्षक त्यांना अक्षर गिरवायला शिकवायचे ते या ऑनलाइन शिक्षणात त्यांना शिकवता आले नाही आणि त्याचाच परिणाम या बालकांवर झाला. म्हणतात ना इमारतीचा पाया कच्चा असेल तर इमारत फार काळ उभी राहू शकत नाही. या बालकांच्या बुद्धीचा पाया भरण्याच्या वयात त्यांना कोरोनासारख्या संकटाचा सामना करावा लागला.

आता हळूहळू शाळा भरू लागल्या आहेत, परंतु दोन वर्ष घरात बसल्याने मुलांना आता शाळेत जायला अजिबात इच्छा दिसत नाहीये. पालक मुलांना बळजबरीने शाळेत सोडून येतात. वर्गात शिकवलेले समजत नसल्यामुळे मग हे जेवण न करणे किंवा मानसिक ताण घेऊन आजारी पडतात. नवनवीन कला-गुण शिकण्याच्या वयात या चिमुरड्यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. यावर तज्ज्ञांनी फार गंभीर इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते जर का असेच सुरू राहिले, तर एका पिढीचे मानसिक आरोग्य डोक्यात येऊ शकते यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. हे झाले शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत, परंतु यात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे युवक-युवतींवर ही कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. जे युवक अभियांत्रिकी किंवा मेडिकलचे शिक्षण घेत होते त्यांना ऑनलाइन शिक्षणामुळे त्या क्षेत्रातले अजिबात ज्ञान नाही ते फक्त ऑनलाइन परीक्षा देऊन पास झालेत. त्यामुळे पुढची एक डॉक्टरांची किंवा अभियंत्यांची पिढी निकृष्ट बाहेर पडेल, यात काही शंका नाही आणि या सर्वाचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागेल. यात त्यांची चूक असेल अशातलाही भाग नाही.

नैराश्याचे वातावरण फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाला याचा विळखा बसला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही मुलांच्या नैराश्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अमेरिकेच्या सरकारने शास्त्रज्ञांना यावर उपाययोजना शोधण्यासाठी प्रोत्साहित केले होते. शास्त्रज्ञांनी खूप दिवस संशोधन करून यावर एक आगळा वेगळा उपाय शोधून काढला आणि जेव्हा त्याचे प्रत्यक्षात प्रयोग केले गेले तर त्या प्रयोगांमधून खूप सकारात्मक निष्कर्ष बाहेर आले. अमेरिकेच्या सरकारने संपूर्ण देशातील शाळांमध्ये हे प्रयोग राबवण्याचे आदेश दिले. राइज व्हीजन आणि गुड न्यूज नेटवर्क यांच्या मदतीने शाळेच्या मध्यभागी किंवा विद्यार्थ्यांची रेलचेल असणार्‍या ठिकाणी एक मोठ्या आकाराची स्क्रीन लावून त्यावर विद्यार्थ्यांच्या आवडीचे सेलिब्रिटी, खेळाडू, गायक, लेखक, कवी यांच्या प्रेरणादायी चित्रफिती दाखवण्यात येऊ लागल्या. त्यांनी कशाप्रकारे संघर्ष करून त्यांनी यश मिळविले हे त्यातून सांगण्यात येऊ लागले. त्याचबरोबर या चित्रफितींमधून विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कार्टून कॅरॅक्टरच्या मदतीने विद्यार्थ्यांना ताणमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.

हळूहळू विद्यार्थी या स्क्रीनसमोर उभे राहून हे सर्व पाहू लागले. विशेष म्हणजे वर्गात तासिका चालू असतानाही विद्यार्थी शिक्षकांची परवानगी न घेता या स्क्रीनसमोर जाऊन या चित्रफिती पाहू शकतील अशी मुभा शाळेतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आली. यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी शाळेत पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होतील त्यांच्या चित्रफिती बनवून त्या स्क्रीनवर चालवल्या जात. त्यामुळे आपणही अभ्यास करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो तर आपणही या स्क्रीनवर दिसू आपल्यालाही संपूर्ण शाळा बघेल यातून या भावनेतून विद्यार्थ्यांमध्ये हळू शिक्षणाची गोडी निर्माण होताना दिसू लागली आहे. या स्क्रीनवर प्रेरणादायी व्हिडिओच नव्हे तर शैक्षणिकदृष्ठ्या महत्वाचे असणारे व्हिडिओदेखील प्रसारित केले जातात. म्हणतात ना वाचलेले थोड्याच काळासाठी लक्षात राहते, परंतु पाहून आणि ऐकून जर आपण एकादी गोष्ट अभ्यासली तर ती आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते. हे तंत्र आपण फक्त बोलण्यापुरते ठेवतो मात्र त्याउलट अमेरिकेने ते आचरणात आणून शिक्षण क्षेत्रात एक क्रांति घडवायला सुरुवात केले आहे. अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा प्रयोग वाशिंग्टन सिटी आणि न्यूयॉर्कच्या जवळपास २०० शाळांमध्ये करण्यात आला आणि या प्रयोगाचे फलस्वरूप ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी दैनंदिन शाळेत उपस्थित राहू लागले.

जगाचे भविष्य असलेले युवक जर चांगले घडले तर जग प्रगतिपथावर राहील नाहीतर जगाचा विनाश यायला वेळ लागणार नाही. अमेरिकेप्रमाणे आपण भारतात आपण हा प्रयोग करू शकतो. गरज आहे तर फक्त अमेरिकेसारख्या प्रबळ ईच्छाशक्तीची आणि प्रामाणिक प्रयत्नांची. प्रथमदर्शी हा प्रयोग शाळांमध्ये करण्यात आला. जर का यातून असेच सकारात्मक फळ मिळत राहिले तर याचा प्रयोग आपण महाविद्यालयं गर्दीची ठिकाण जसे बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी या प्रकारच्या स्क्रीन लाऊन आपल्या समाजातील, देशातील, जगातील नैराश्य नावाचा रोग कमी करू शकू आणि एक ताणतणाव मुक्त समाज घडवू शकू. गुड न्यूज नेटवर्कच्या संस्थापक गेरी वेस-कॉर्बले यांनी राइज व्हीजन आणि गुड न्यूज नेटवर्क यांच्या मदतीने या संकल्पनेची निर्मिती केली आहे. एक मुलाखतीत गेरी म्हणाल्या, मी या संकल्पनेला फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार मला संपूर्ण जगभर करून युवकांच्या मनातील नैराश्य बाहेर काढून त्यांना एक सक्षम पिढीत त्यांचे परिवर्तन करायचे आहे. भारत सरकारनेही भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे प्रयोग राबवून युवकांना समाजात एक उच्य स्थान मिळवायला मदत केली पाहिजे हीच अपेक्षा….

–प्रमोद उगले