-अविनाश चंदने
के. जे. येसूदास म्हणजेच कट्टासरी जोसेफ येसूदास. संगीत त्यांच्या रक्तातच भिनलं होतं. त्यांचे वडील शास्त्रीय गायक, संगीतकार शिवाय रंगभूमीवर वावरणारे. त्यामुळे पाच भावंडांत शेंडेफळ असलेल्या येसूदासवर संगीताचे संस्कार उपजतच झाले नसते तरच नवल. त्यामुळे येसूदास यांचे संगीतातील पहिले गुरू वडील होते.
त्यानंतरही त्यांनी संगीताचं रितसर शिक्षण घेतलं. एखाद्या योग्यासारखी वाढलेली दाढी आणि निरागस चेहरा पाहूनच येसूदास यांच्या गाण्याची पहिली ओळख होते. त्यांच्या आवाजातील गोडव्यातूनच येसूदास यांच्या निरागसतेची ओळख होते. आज येसूदास ८५ वर्षांचे झाले आहेत. तरीही त्यांचा रियाझ सुरूच आहे. कारण ते खरेखुरे सूरदास आहेत, संगीतातील तपस्वी आहेत.
येसूदास यांनी १४ नोव्हेंबर १९६१ रोजी पहिलं गाणं गायलं. अर्थातच ते मल्याळम होतं. चित्रपटातलं त्यांचं पहिलं गाणं होतं ‘अॅटेन्शन पेन्हे अॅटेन्शन’. त्यानंतर तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांसाठी हजारो गाणी गायली. त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की त्यांना तत्कालीन सोव्हिएट यूनियनने म्हणजे अखंड रशियाने निमंत्रित केलं आणि देशभर त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम झाले.
दक्षिणेत अमाप लोकप्रियता मिळवल्यावर अखेर हिंदी सिनेसृष्टीने येसूदास यांची दखल घेतली. आणि १९७० मध्ये ‘जय जवान जय किसान’साठी ते पहिल्यांदा गायले. पण रिलीज झालेला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘छोटी सी बात’. यातील सलील चौधरी यांनी संगीत दिलेलं ‘जानेमन जानेमन’ गाणं तुफान लोकप्रिय झालं आणि आजही आहे. असं असलं तरी येसूदास यांना हिंदीत खरी संधी दिली ती संगीतकार रवींद्र जैन यांनी.
‘चितचोर’मधील येसूदास यांची सर्व गाणी गाजली. ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’, ‘जब दीप जले आना’ ही गाणी आजही कुणी विसरलेला नाही. रवींद्र जैन अंध होते. मात्र, ते येसूदास यांच्या आवाजाच्या इतके प्रेमात होते की जर दृष्टी मिळाली तर पहिलं येसूदास यांना डोळे भरून पाहीन, असं ते एका मुलाखतीत बोलले होते.
यावरून येसूदास ही काय ‘चीज’ आहे, हे लक्षात येतं. एवढंच कशाला डिस्को गाण्यांचा किंग म्हणून ओळखल्या जाणार्या बप्पी लाहिरी यांनाही येसूदास यांच्या आवाजाचा मोह आवरला नव्हता. त्यांच्या ‘टुटे खिलौने’मधील ‘माना हो तूम बेहद हसी’ तसंच ‘तेरी छोटीसी एक भुल ने’ ही ‘शिक्षा’ चित्रपटातील गाणी आजही आवर्जून ऐकली जातात.
येसूदास यांची खासीयत म्हणजे त्यांनी शेकडो भक्तीभर गाणी गायली. विशेषत: अय्यप्पावर त्यांची खूप श्रद्धा आहे. म्हणूनच तेवढीच भक्तीपर गाणी त्यांनी अय्यप्पावर गायली आहेत. त्यातही ‘हरिवरसनम’ हे गाणं आजही दक्षिणेतील घराघरात ऐकलं जातं. वाढदिवसाला येसूदास कर्नाटकमधील कोल्लूर मुकाम्बिका मंदिरात जाऊन भजन-कीर्तनात रमायचे. त्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला होता. कारण येसूदास हे जन्माने ख्रिस्ती आहेत. २०१६ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केल्याच्या बातम्याही झळकल्या. पण त्या अफवाच ठरल्या.
येसूदास यांनी मराठी गाणंही गायलंय आणि तेही तुफान हिट झालं. ‘नणंद-भावजय’ या चित्रपटासाठी संगीतकार अशोक पत्की यांनी येसूदास यांच्याकडून ‘मायेची साऊली, आनंदी बाहुली’ हे गाणं गावून घेतलं. विशेष म्हणजे आजही लग्नात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं.
येसूदास यांच्यावर पुरस्कारांचा अक्षरश: पाऊस पडत होता. तरीही १९९९ मध्ये युनेस्कोने संगीत आणि शांतता क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा केलेला गौरव काही खास होता. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या गायकाच्या आवाजात खरोखरच अशी काही जादू आहे की रसिक अगदी भावभक्तीने त्यांच्याकडे आकर्षिला जातो. म्हणूनच त्यांना पद्मश्री (१९७५), पद्मभूषण (२००२) आणि त्यानंतर १५ वर्षांनी पद्मविभूषण (२०१७) किताबाने सन्मानित करण्यात आले. असं असलं तरी येसूदास यांना जनतेचं, संगीतप्रेमींचं अफाट प्रेम लाभलं आहे आणि लाभत आहे. याहून मोठा पुरस्कार कुठलाच असू शकत नाही.
येसूदास यांची काही हिंदी लोकप्रिय गाणी
* दिल के तुकडे (दादा)
* चांद जैसे मुखडे को (सावन को आने दो)
* मधुबन खुशबू देता है (साजन बिना सुहागन)
* सुरमयी आखों में (सदमा)
* का करू सजनी (स्वामी)
* नी सा गा मा दा (आनंद महल)
* जिद ना करो (लहू के दो रंग)
* ये मेरे उदास मन (मान अभिमान)
* आ इन नजारोंको तुम देखो (सुनयना)
* खुशीया ही खुशीया हो (दुल्हन वही जो पिया मन भाये)
* कहा से आये बदरा (चष्मेबद्दूर)