घरफिचर्ससारांशअतिथींचा आततायी अतिरेक!

अतिथींचा आततायी अतिरेक!

Subscribe

काही पाहुणे मंडळी आपण दुसर्‍याच्या घरी आहोत हे विसरून बेशिस्त वागणं, दुसर्‍यांच्या घराला, घरातील सामानाला, घरातील वस्तूंना निष्काळजीपणे हाताळणं, घरातील वस्तूंवर स्वतःचा हक्क दाखवणं, घरातीलच लोकांवर रूबाब दाखवणं यांसारखे प्रकार करून घरातल्याच लोकांना बेजार करून सोडतात. काही पाहुणे मंडळी आपण इथे आलो आहोत, राहत आहोत हे घरातील सर्व लोकांना आवडते की नाही, आपल्या येण्यामुळे, राहण्यामुळे कोणाला अडचण, त्रास, कंटाळा, वैताग होतोय का याचा थोडासुद्धा विचार करीत नाहीत आणि जबरदस्तीने घरातल्या लोकांचे खासगी आयुष्य डिस्टर्ब करून टाकतात. घरातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित पाहुणा असतो, त्याला तो जवळचा असतो, पण अनेकदा घरातील इतरांना त्याचा त्रास सोसावा लागतोय हे अशा पाहुण्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

अतिथी देवो भव! या ब्रीदवाक्याला अनुसरून आपण सर्वच जण आपल्या घरी दोन दिवस, आठ दिवस आलेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत, पाहुणचार, मानसन्मान अतिशय प्रेमाने, आपुलकीने करीत असतो. आपण पण जेव्हा कोणाकडे पाहुणे म्हणून जातो तेव्हा आपणदेखील समोरच्यांकडून हीच अपेक्षा करतो आणि त्यातूनच आपले एकमेकांप्रति हितसंबंध, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा घनिष्ठ होत जातात.

आजकाल सामाजिक माध्यमातूनच दूरचे, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी एकमेकांना वेळ देताना दिसतात. त्यामुळे प्रत्यक्षात कोणाच्याही घरी जाऊन राहणे, तिथे काही दिवसांसाठी स्वतःला अ‍ॅडजस्ट करणे, त्या त्या घराच्या रुटीन, शिस्त, सवयीनुसार राहणे वागणे, त्या घरातील इतर सर्व लहानथोर विविध स्वभावाच्या व्यक्तींशी मिळून मिसळून राहणे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यामुळे असे पाहुणे घरी आल्यावर घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद होतात. काही पाहुणे मंडळी स्वतःच्या मर्यादा सोडून जिथे गेले आहेत त्या घरातील अनेक गोष्टींमध्ये बोलणे, घरात वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणे, घरातल्याच लोकांमध्ये चुगल्या करणे असे चुकीचे प्रकार करतात.

- Advertisement -

काही पाहुणे मंडळी आपण दुसर्‍याच्या घरी आहोत हे विसरून बेशिस्त वागणं, दुसर्‍यांच्या घराला, घरातील सामानाला, घरातील वस्तूंना निष्काळजीपणे हाताळणं, घरातील वस्तूंवर स्वतःचा हक्क दाखवणं, घरातीलच लोकांवर रूबाब दाखवणं यांसारखे प्रकार करून घरातल्याच लोकांना बेजार करून सोडतात. काही पाहुणे मंडळी आपण इथे आलो आहोत, राहत आहोत हे घरातील सर्व लोकांना आवडते की नाही, आपल्या येण्यामुळे, राहण्यामुळे कोणाला अडचण, त्रास, कंटाळा, वैताग होतोय का याचा थोडासुद्धा विचार करीत नाहीत आणि जबरदस्तीने घरातल्या लोकांचे खासगी आयुष्य डिस्टर्ब करून टाकतात. घरातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित पाहुणा असतो. त्याला तो जवळचा असतो, पण अनेकदा घरातील इतरांना त्याचा त्रास सोसावा लागतोय हे अशा पाहुण्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आलेली त्रासदायक ठरणारी पाहुणे मंडळी आपण एकदा दोनदा किंवा काही दिवसांसाठी, कधीतरी थोडंफार मनाविरुद्ध जाऊन स्वीकारून पण घेऊ शकतो. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीशी तो संबंधित आहे, त्याला जवळचा आहे, प्रिय आहे म्हणून तेवढी तडजोड आपण करतोयदेखील. तरीही सातत्याने जर कोणी तिर्‍हाईत, फारसा लागेबांधे किंवा संबंध नसलेले, घरातील सगळ्यांना प्रिय नसलेलं व्यक्तिमत्त्व आपल्या घरी येऊन आपलं कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्य खराब करीत असेल, कुटुंबातील लोकांना जर मनस्ताप होत असेल तर आपली सहनशक्ती एक दिवस संपते आणि घरातच वाद व्हायला सुरुवात होते.

- Advertisement -

समुपदेशनादरम्यान अनेक पती-पत्नी अथवा कुटुंबातील लोकांचे अशा विनाकारण, डोक्याला ताप ठरणार्‍या पाहुण्यांमुळे आपापसात वाद होऊन ते विकोपाला जात आहेत हे लक्षात येते. ज्या व्यक्तीशी कुटुंबातील इतर लोकांना काहीही घेणंदेणं नाही, पण फक्त घरातील एका दुसर्‍याच्या आमंत्रणावरून जर पाहुणी व्यक्ती आपल्या घरी मुक्काम ठोकत असेल तर ते सपशेल चुकीचे आहे. ज्याच्यासाठी हा पाहुणा आला आहे त्या घरातल्या व्यक्तीने पण इतर कुटुंबाला त्यावरून वेठीला धरणं अयोग्य आहे.

नलिनीची (काल्पनिक नाव) समस्या होती की तिच्या नवर्‍याच्या ऑफिसच्या मैत्रिणी प्रत्येक वीकेण्डला त्यांच्या घरी येतात. माझा पतीच मुळात त्यांना सातत्याने आग्रह करून बोलावत असतो. या मैत्रिणींना काय फरक पडतोय फुकट आमच्या घरी राहायला. आठवड्यातून दोन दिवस मजा करायला मिळते. आयतं खायला मिळतं, असं नलिनी सांगत होती. प्रत्येक वीकेण्डला नवर्‍याच्या तीन-चार मैत्रिणींना विविध पदार्थ बनवून खाऊ घालणे, त्यांनी घरात वाटेल तसं वावरणं, त्यांनी केलेला पसारा परत आवरून ठेवणं, नलिनीच्या पतीशी त्याच्या मैत्रिणींनी अगदीच मर्यादा सोडून जोक करणे, हसणे खिदळणे, अंगचटीला येणे आणि हे सगळं सहन करून पण स्वतः नवर्‍याच्या धाकापोटी त्यांच्या पुढे पुढे करणे नलिनीला तापदायक ठरत होतं. पतीच्या या दर आठवड्याला येणार्‍या पाहुण्यांमुळे नलिनीला कधीही शनिवार- रविवार पतीसोबत निवांत वैयक्तिक वेळ घालवणं, फिरायला जाणं, काही महत्त्वाचं बोलणं शक्य होत नव्हतं. पूर्ण आठवडा तर नवरा ऑफिसमध्ये बिझी असतो आणि वीकेण्डला हा प्रकार, त्यामुळे नलिनीचे पतीशी सतत खटके उडत होते आणि पती काही या गोष्टी बदलायला तयार होत नव्हता.

अजय (काल्पनिक नाव) त्याची पत्नी अनिताच्या (काल्पनिक नाव) माहेरील पाहुण्यांना जाम कंटाळून गेला होता. अनिताचं माहेर सासर एकाच शहरात असल्याने तिच्या माहेरील कोणीही कधीही येऊन अजयच्या घरी टपकत असते. अजयच्या म्हणण्यानुसार हे लोक येतात तर येतात, माझ्या घरातील सर्व वस्तू निष्काळजीपणे वापरून, नुकसान करून जातात. अनिताच्या माहेरील नात्यातील लहान मुलं सतत जाऊन येऊन अजयच्या घरी असतात. त्यातून ही मुलं अजयच्या टीव्हीला, लॅपटॉपला, मोबाईलला, म्युजिक सिस्टीमला, एसीला विनाकारण न विचारता हात लावणं, त्याचं सेटिंग बिघडवून ठेवणं, कुठेतरी बिघाड करून ठेवणं अशी वागतात. त्यामुळे अजयचा संताप होत होता. त्याला त्याचीच वस्तू कधी जागेवर सापडत नव्हती. त्याची पत्नीदेखील या मुलांचे लाड करण्याच्या नादात त्यांना कधीही समजावून सांगत नव्हती.

अनिताची आई, बहीण आल्यावर तर अजयच्या घराच्या स्वयंपाकखोलीत धुमाकूळ घालतात असं त्याचं मत होतं. मला काय खायचं आहे, कधी काय किती जेवायचं आहे याकडे कोणाचं लक्ष नसतं. अनिता आणि या दोघी तिघी मिळून सतत माझ्या घरात नवनवीन पदार्थ करून पाहणे, त्यासाठी वाटेल ते महागडे मटेरियल आणणे, पदार्थ जमला नाही तर फेकून देणे, मग बाहेरून पार्सल मागवून घेणे इतके बेलगाम वागतात. अजयला आपल्याच घरात आपल्या डोळ्यांसमोर होणारी ही नासधूस सहन होत नव्हती. पत्नीला काही बोलावे तर तुम्हाला माझ्या माहेरचे सहन होत नाहीत यावरून जे भांडण सुरू होतं ते आता मला इथे राहायचंच नाही, नांदायचं नाही इतपर्यंत जाऊन पोहचतं, असं त्याचं म्हणणं होतं.

शिवानी (काल्पनिक नाव) आणि शिवानीचा पती राजेश (काल्पनिक नाव) कधीही फक्त पत्नी आणि मुलासोबत फॅमिली लाईफ म्हणून एन्जॉय करू शकत नाही. राजेशचं पूर्ण आयुष्य सार्वजनिक झालेलं आहे आणि शिवानीला आता अजिबात त्याच्यासोबत राहायचं नाही या थराला गोष्ट गेली होती. राजेश सामाजिक कामात अग्रेसर असल्यामुळे त्याला नातेवाईक तसेच भरपूर माणसे आजूबाजूला असणे याची प्रचंड आवड आहे. राजेश आणि शिवानीच्या घरी सतत कोणी ना कोणी मुक्कामी, नाश्त्याला, चहाला, जेवायला असतंच. सणवार, कार्यक्रम यावेळी तर घरात नुसताच धुडगूस असतो. कामाचा प्रचंड बोजा पडतो, थकायला होतं ते वेगळंच, पण फक्त आम्ही दोघेच जेवलो किंवा कुठे फिरायला, हॉटेलला कधी दोघेच गेलो आहोत हेच मला आठवत नाही, असं शिवानीचं म्हणणं होतं.

साधं चित्रपट, नाटक, हॉटेल अथवा काहीही घरगुती खरेदी करायची असेल, कोणाला भेटायला जायचं असेल तरी राजेश त्यावेळी घरात जो कोणी पाहुणा अथवा पाहुणी उपलब्ध असेल त्यांना गाडीत घेतो. अगदी देवदर्शनाला जायचं असेल तरी नवरा कधी वैयक्तिक उपलब्ध होत नाही. माझं कितीही खासगी काम असू द्या, त्यांच्यासोबत कोणी ना कोणी असतंच. पती-पत्नीला जर कायम लवाजमा घेऊन फिरायला लागत असेल, तर त्या संसारात काय अर्थ आहे, असा प्रश्न शिवानीला पडला आहे. आम्हाला पती-पत्नींना एक दिवस पण मोकळीक मिळू शकतं नसेल, तर नवर्‍याचं हे सामाजिक आणि सार्वजनिक झालेलं घर आणि तसं आयुष्य सांभाळण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही या निर्णयापत शिवानी पोहचली होती.

अशा आणि यांसारख्या अनेक घटना ज्या घरोघरी घडत आहेत, त्यामुळे कुटुंब, लग्न मोडकळीला येत आहे. घरातल्याच माणसांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. यावर कसा पायबंद घालावा याचा उहापोह करण्यासाठी आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -