फिरकीच्या जाळ्यात कांगारू अडकले

स्वीपचा आत्मघातकी फटका मारून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सर्वनाश ओढवून घेतला. फिरकी गोलंदाजी खेळण्याचं सदोष तंत्र तसेच संघनिवडीतील घोळ आणि जडेजा, अश्विन यांच्या प्रभावी फिरकीला अक्षर पटेलच्या डावखुर्‍या फटकेबाजीची अनपेक्षित साथ मिळाली. त्यानंतर रोहित शर्माने खडूस फलंदाजी केली. फिरकीच्या जाळ्यात कांगारू अडकले. यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखण्यात भारताला यश लाभले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरपाठोपाठ दिल्ली कसोटी जेमतेम अडीच दिवसांत जिंकून रोहित शर्माच्या भारतीय संघाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहील यावर कोटलावर शिक्कामोर्ताब तर केलंच अन् राजधानी दिल्लीतच अनेक विक्रमदेखील प्रस्थापित केले! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत सलग चौथ्यांदा बाजी मारण्याची कामगिरी भारतीय संघाने प्रथमच केली आहे. २०१६-१७ (२-१), २०१८-१९ आणि २०२०-२१ (२-१) दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियातच! आणि आता २-० अशी भक्कम आघाडी घेताना ऑस्ट्रेलियासारख्या रँकिंगमधील अव्वल क्रमांकाच्या संघावर २-० अशी आघाडी घेत निर्भेळ यशाच्या दिशेने भारताने वाटचाल सुरू केली आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये. अश्विन आणि जडेजा या फिरकी जोडगोळीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचे प्रथितयश फलंदाज (वॉर्नर, स्मिथ, लबूशेन) अडकले. स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या मोहात पाहुणे फलंदाज अलगद पडतात आणि जेमतेम एका सत्रातच दीड-दोन तासांतच संपूर्ण संघ माघारी परततोय, असं विदारक दृश्य जामठापाठोपाठ कोटलाच्या खेळपट्टीवर दिसून आले तेदेखील आठवड्यात दोनदा!

मालिकेला सुरुवात होतानाच ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमातून खेळपट्टीबाबत फिरकीला पोषक अशा ‘आखाडा’ खेळपट्या बनवाल्याची चर्चा सुरू झाली. जवळपास डझनभर ऑस्ट्रेलियन पत्रकारांचा तांडा नागपूरला जामठाच्या खेळपट्टीचं विश्लेषण करण्यात गर्क होता आणि त्यांची चर्चा फक्त आणि फक्त खेळपट्टीचीच! या सार्‍याचा परिपाक म्हणजे पाहुण्यांच्या मनात खेळपट्टीने गारुड घातलं. या खेळपट्ट्यांवर खेळण्यात माहीर असलेले भारतीय संघातील खेळाडू सांगत होते की जामठात चेंडू वळत होते, पण अगदी संथगतीने. खेळपट्टी काही रँक टर्नर (खतरनाक ) नव्हती. भीतीने पछाडलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समजावणार कोण? या भयगंडाने पछाडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला कोंडीत पकडण्याची संधी यजमान भारत थोडीच सोडणार?

या दौर्‍याच्या आखणीपासूनच ऑस्ट्रेलियाचे डावपेच / रणनीती चुकत गेली, असं दोन कसोटीतील त्यांच्या मानहानीकारक पराभवावरून म्हणता येईल. दौर्‍याची सुरुवात सराव सामन्याने करण्याऐवजी पाहुण्यांनी केली ती बंगळूरूपासून दूरवर असलेल्या अलूर याठिकाणी सराव करून तोदेखील तेथील खेळपट्टी खणून अन् अश्विन सदृश्य गोलंदाजी करणार्‍या बडोदेकर ऑफस्पिनर महेश पिथीयासमोर! कुठे ४५० हून अधिक कसोटी बळी टिपणारा अश्विन अन् कुठे हा महेश पिथीया!!! अश्विनच्या घातक ऑफस्पीनचा त्यांनी इतका धसका घेतला की अलूरमध्ये सराव करताना त्यांनी खेळपट्टीचा ‘आखाडा’ करून टाकला. भीतीने पछाडलेल्या खेळाडूंना कोण काय करणार? ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’अशी ऑस्ट्रेलियन संघाची हालत झाली होती, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिला चेंडू पडण्याआधीच!

त्यात भर पडली ती तीन प्रमुख शिलेदारांच्या दुखापतींची. नकटीच्या लग्नाला १७६० विघ्न!!! जेसन हेझलवूड, मायकेल स्टार्क, कॅमरून ग्रीन हे तीन मोहरे मालिकेआधीच जायबंदी. हेझलवूड तर मायदेशी परतलाय! ग्रीन आणि स्टार्क इंदोर, अहमदाबाद कसोटीत खेळण्याची शक्यता वर्तवली जातेय. कोपराला झालेली दुखापत घेऊन डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेदेखील मायदेशी प्रयाण केलं आहे, अ‍ॅस्टन अ‍ॅगरदेखील मायदेशी परतलाय!

गोलंदाज कर्णधार असेल तर तो कधी कधी स्वत:हून जास्त गोलंदाजी करतो किंवा स्वत: कमी गोलंदाजी करतो. दिल्ली कसोटीत असंच झालं, असं मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉर्डर यांनी मांडलंय. बॉर्डर म्हणतात, ‘कमिन्स दिल्ली कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा एकमेव वेगवान गोलंदाज अन् त्याने सामन्यात फक्त १३ षटके टाकली ती पहिल्या डावात. दुसर्‍या डावात तर त्याने एकही षटक टाकलं नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करून बॉर्डर म्हणतात, संघनायक आणि संघातील (दिल्ली कसोटीत ) एकमेव वेगवान गोलंदाज जमलेली जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करत नव्हते अन् त्याचे अन्य सहकारीदेखील त्याला एखादे षटक (ओव्हर ) टाकण्याबाबत आग्रह धरत नव्हते हे सारेच अनाकलनीय!

ऑस्ट्रेलियन संघासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून डॅनीएल व्हिट्टोरी आला असून तो तर न्यूझीलंडचा एकेकाळचा अव्वल फिरकीपटू. अश्विन-जडेजा जोडगोळी पोत्याने विकेट काढत असताना व्हिट्टोरी काय करत होता, असा सवाल ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू करत आहेत. संघ निवड चुकली असून निवड समिती आणि संघव्यवस्थापन यांच्यात ताळमेळ नाही. परिणामी ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत ०-२ असा पिछाडीवर पडलाय.

यजमान भारताने नागपूर आणि दिल्ली कसोटी तिसर्‍या दिवशीच जिंकली आहे ती गोलंदाजीच्या बळावर. कर्णधार रोहित शर्मा वगळता वरच्या तसेच मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांना धावा करता आलेल्या नाहीत. सलामीवीर लोकेश राहुलची कामगिरी खराब होत असूनदेखील (२०,१७,१=३८ धावा) त्याच्या निवडीचं समर्थन कर्णधार रोहित शर्मा आणि मार्गदर्शक-प्रशिक्षक राहुल द्रविड करताहेत! परदेशी दौर्‍यातील त्याच्या शतकी खेळीचे दाखले दिले जात आहेत, पण सध्याची त्याची कामगिरी अत्यंत ढिसाळ होत आहे याकडे कानाडोळा करण्यात येत असून सध्या भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला मात्र राखीव खेळाडूचीच भूमिका करावी लागतेय. दिल्ली कसोटीनंतर मात्र राहुलची उपकर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे! रोहित शर्माला सूर गवसला असून तो आपली भूमिका चोख बजावतोय. कर्णधार तसेच सलामीवीर म्हणूनदेखील त्याचं नेतृत्व भारताला फलदायी ठरलंय. रोहितने नागपूरला शानदार खेळ केला अन् शतकही फटकावलं. दिल्ली कसोटीत त्याने ३२ आणि ३१ धावांच्या माफक खेळी केल्या. दिल्ली कसोटीच्या दुसर्‍या डावात तो धावचीत झाला. कसोटी कारकिर्दीत अशी धावचीत होण्याची वेळ रोहितवर प्रथमच आली!

राहुलचे अपयश खटकणारे तसेच पुजारा, कोहली या बुजूर्ग खेळाडूंनाही अजून सूर गवसलेला नाही. विराट कोहलीने कोटलावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना पहिल्या डावात ४४ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घ कालावधीनंतर मोठी खेळी करण्याचा त्याचा इरादा स्पष्ट दिसत होता, पण पंच नितीन मेनन यांनी त्याला बाद ठरवलं. त्यामुळे दिल्लीकरांची निराशा झाली. दुसर्‍या डावात विराट यष्टीचीत झाला. आपल्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीत अशाप्रकारे तो प्रथमच बाद झाला!

सूर्यकुमार यादवला नागपूरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, पण केवळ ८ धावा करून तो माघारी परतला आणि त्याचा मुंबईकर सहकारी श्रेयस अय्यरदेखील पुनरागमनात छाप पाडू शकला नाही. दोन्ही कसोटीत (जामठा आणि कोटला ) भारताचा कोसळता डोलारा सावरला तो जडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच. डावखुर्‍या पटेलने ८४ आणि ७४ धावा फटकावताना जडेजा, शमी तसेच अश्विनच्या साथीने भागीदारी रचून भारताच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पटेलने अश्विनबरोबर शतकी भागीदारी करून दिल्ली कसोटीचा नूर पालटून टाकला.

कोटला कसोटी तसेच मालिकेला कलाटणी देणारा हा क्षण असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या शतकी भागीदारीने सामना ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध गेला. त्यांची पकड निसटली. हेड आणि लाबूशेन या जोडीने दुसर्‍या दिवशी अखेरच्या सत्रात फटकेबाजी करून प्रतिहल्ला केला, पण तिसर्‍या दिवशी सकाळीच अश्विन, जडेजा यांची फिरकी प्रभावी ठरली. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्वीपचे आत्मघातकी फटके मारून पराभव ओढवून घेतला. लागोपाठच्या कसोटीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ ३३ षटकांत गुंडाळला तो दोनदा! जडेजाने दिल्ली कसोटीत १० मोहरे टिपले.

लंडनला लॉर्ड्सवर ७-११ जून २०२३ दरम्यान होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने रोहित शर्माच्या भारतीय संघाची वाटचाल सुरू असून इंदोर कसोटी भारतीय संघाने जिंकली तर फायनलमध्ये त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित समजायला हरकत नसावी. ऑस्ट्रेलियन संघ सध्या गुणतालीकेत अव्वल स्थानावर आहे. २०२१ मध्ये पहिल्या-वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली होती, पण न्यूझीलंडने भारताला हरवून अजिंक्यपद पटकावलं होतं. यंदा रोहित शर्माचा भारतीय संघ लॉर्ड्सवर इतिहास घडवतो का? बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत कशी बाजी मारतो याकडेही सार्‍यांचे लक्ष असेल.
ऑल द बेस्ट टीम इंडिया!!!