आभास हा मान्सूनचा, परी वाटे खरा !

अनेकदा शेतकरी मान्सून पूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन व पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचे संकट ओढावून आत्महत्या करतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होत आहे. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावे. गेल्या वीस वर्षात वेगाने बदललेल्या मान्सून व वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. हवामान खात्यातील सकारात्मक बदल, प्रसारमाध्यमांनी घडवून आणलेल्या खुल्या वैज्ञानिक चर्चा व शेतकरी जनतेची लाईव्ह प्रश्नोत्तरे यातूनच कृषी प्रधान भारत देश आत्मनिर्भर होईल.

उन्हाळ्यात गातात तसे कोकीळ अजून गात आहेत, कुत्री प्रणयक्रीडा करताना दिसत आहेत, कधी नव्हे ते श्रावणात विजांचा लखलखाट आणि ढगफुटींनी महाराष्ट्र बेजार होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात तर यंदा जुलै महिन्यात सरासरीच्या तब्बल पाचपट पाऊस नोंदवत ‘भूकंप’ झाला. अशी लांबलचक यादी ही गेली १५ वर्षे मांडत असलेले मान्सून पॅटर्न बदलला हे लेखकाचे वैज्ञानिक संशोधन निष्कर्ष खरे असल्याची निसर्ग स्वत: साक्ष देत सांगत आहे. ‘आभास हा ‘मान्सून’चा परी खरा वाटे जीवा!’ असे म्हणण्याची वेळ आज आली आहे.

‘मान्सून’ हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’ किंवा ‘हंगाम’ असा होतो. नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांना आणि त्यासोबत बरसणार्‍या पावसाला ‘मान्सून’ हे नाव ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्राप्त झाले. समुद्रावरून येताना हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणतात. अनुकूल स्थितीमध्ये या बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होते. या ढगांना योग्य तो थंडावा मिळाला की ते जलधारा बनून पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो आणि हाच तो ‘मान्सूनचा पाऊस’ होय.

पाऊस ही एक वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. जून-जुलैमध्ये मान्सून हिमालयापर्यंत धडकतो. आपल्या कृषिप्रधान भारत देशाचा जुलै ते ऑक्टोबर असा खरीप हंगाम यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे आणि ‘ईशान्य मोसमी’ वार्‍यामुळे ‘रिटर्न म्हणजे परतीचा मान्सून’ पाऊस देतो. या पावसावर ऑक्टोबर ते मार्च असा रब्बी हंगाम पिकतो.

अनेकदा शेतकरी मान्सून पूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन व पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचे संकट ओढावून आत्महत्या करतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होत आहे. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावे. गेल्या वीस वर्षात वेगाने बदललेल्या मान्सून व वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. हवामान खात्यातील सकारात्मक बदल, प्रसारमाध्यमांनी घडवून आणलेल्या खुल्या वैज्ञानिक चर्चा व शेतकरी जनतेची लाईव्ह प्रश्नोत्तरे यातूनच कृषी प्रधान भारत देश आत्मनिर्भर होईल.

भारत हवामान विभाग गेल्या १४५ वर्षांपासून शेतकरी व जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचे आगमन पाहून शेतकर्‍यांच्या शेती कामांचे नियोजन व पेरणीचा निर्णय ठरतो. अचूक हवामान माहितीच्या जोरावर कृषी क्रांती घडली आहे. कृषी प्रधान भारत देशात शेतकर्‍यांना पिकांसाठी मान्सून पाऊस आवश्यक आहे तसेच त्याची खरी माहिती आवश्यक आहे.

यावर्षी निसर्ग वादळामुळे मान्सून लांबणीवर अशी घोषणा झाली. नंतर अवघ्या काही तासांत मान्सून कर्नाटकला पोहोचला ही हवामान खात्याची घोषणा संशयास्पद व शंका निर्माण करणारी ठरते. केरळमधील आठ केंद्रांवर अडीच मिलीमीटर पावसाची नोंद होणे असे निकष वादळी पावसाने केवळ पूर्ण झाले म्हणून आभासी मान्सूनलाच खरा मान्सून असे घोषित करण्यात येत आहे. आणि तो भारतीय शेतीला अतिशय आत्मघातकी ठरू शकतो.

मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनचा पाऊस आणि मान्सूनउत्तर पाऊस अशी तीन टप्प्यांत पावसाची वर्गवारी करता येऊ शकते. याशिवाय अचानक येणारा अवकाळी पाऊस काय? हे शेतकर्‍यांनी समजून घेतले पाहिजे. वृत्तपत्रातील बातम्या कधीकधी नव्हे तर अनेकदा शेतकरी आणि सामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणून पावसाला समजून विचार करणे महत्वाचे आहे.

१. मान्सूनपूर्व पाऊस : यालाच प्री मान्सून रेन म्हणजेच वळीवाचा पाऊस असेही म्हणतात. ढोबळ मानाने मार्च ते मे आणि मान्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जूनमध्ये होणारा पाऊस हा मान्सून पूर्व / वळवाचा पाऊस होय. वातावरणातील तापमान हवेचा दाब आर्द्रता आदी घटकांच्या लक्षणीय बदलामुळे अस्थिरता वाढल्याने हा पाऊस होतो. अजस्र क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस होतो. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळीवारे, गडगडाट व कडकडाट असे विजांचे तांडव, गारा किंवा गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये दिसणे ही हा पाऊस ओळखण्याची साधी लक्षणे किंवा खूण आहे. हा पाऊस दोन प्रकारे कोसळतो.

अ) दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर आणि जास्त करून २ वाजेनंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे दिवसा पडतो.

ब) सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे सूर्य नसताना पाऊस पडतो.

२. मान्सूनचा पाऊस : ढगांचे पुंजके यात दिसत नाहीत तर आकाश समान एका रंगांच्या शेडमध्ये काळपट दिसते. पाऊस रिपरिप पडत राहतो. मान्सूनपूर्व पावसातली कुठलीच लक्षणे दिसत नाहीत, कारण वातावरण स्थिर झालेले असते.

३. मान्सून उत्तर पाऊस : हाच पाऊस मान्सून पश्चात किंवा पोस्ट मान्सून म्हणून पण ओळखला जातो. यात मान्सूनपूर्व पावसाप्रमाणेच सर्व लक्षणे वातावरणात असतात. ढोबळ मानाने याचा कालावधी ऑक्टोबर व नोव्हेंबर असा असून याची तीव्रता कमी असते.

४. अवकाळी पाऊस : डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. हिवाळी पाऊस असेही याला कधीकधी संबोधतात.

असा जाहीर होतो मान्सून!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर केरळमधील आठ केंद्रांवर अडीच मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनच्या आगमनाची घोषणा होते. दरवर्षी १० मेनंतर मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालुर, कोल्लम, अल्लापुझ्झा, कोट्ट्यम, कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थालासेरी, कन्नुर, कुडुलु आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रापैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस अडीच मिलीमिटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते.

यामुळे मान्सूनपूर्व पावसालाच मान्सून समजून शेतकर्‍यांनी पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवून आर्थिक फटका बसू शकतो. पेरणीचा निर्णय घेताना शेतकरी बांधवांनो आभासी मान्सूनपासून सावधान असा सबूरीचा सल्लाही कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक म्हणून द्यावासा वाटतो.

आर्थिक समृद्धीसाठी शेतकर्‍यांना त्रिसूत्री!

आत्मनिर्भर भारतासाठी शेतकरी हाच देशाचा खरा सेनापती आहे. देशी बी-बियाणांचा वापर, बहुपिक पद्धती, सेंद्रिय खत-कीटक नाशकांचा वापर ही त्रिसूत्री वापरावी. याबरोबरच अन्नप्रकियेने टिकाऊपण व दर्जा वाढवून व स्वतः किंमत ठरवून आपल्या शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करावी. जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता, हवामान व हंगाम पाहून डाळी, कडधान्ये, तेलबिया, गहू, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, हळद, औषधी वनस्पती आदींना लागवड करताना प्राधान्य द्यावे. तसेच कापसासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झालेली पिके व त्यांची उत्पादने यांची लागवड व निर्मिती करताना गांभीर्याने विचार करायला हवा.