घरफिचर्ससारांश‘ठेवलेली’ म्हणून राहणे धोकादायक!

‘ठेवलेली’ म्हणून राहणे धोकादायक!

Subscribe

आपल्या अनेक लेखांमधून आपण विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि त्याचे संसारावर होणारे दुष्परिणाम या विषयावर भाष्य करीत असतो. समुपदेशनाला आलेल्या अनेक प्रकरणातून एक साधर्म्य आढळते ते म्हणजे ज्या महिला एकट्या आहेत, घटस्फोटिता अथवा विधवा आहेत, अथवा कोणत्या कारणास्तव पतीपासून दूर आहेत त्या आपली शारीरिक, मानसिक, भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी आधार म्हणून, सोबत म्हणून, साथ म्हणून विवाहित पुरुषाशी संबंध ठेऊन असतात. महिलांना आपल्या समाजात एकट्याने जीवन जगणे कठीण असते. महिला कमावती नसल्यास आर्थिक मदतीसाठी, मुलं असल्यास त्यांना वडील म्हणून कोणाचा तरी आधार, प्रेम किंवा संगोपन मिळावे म्हणून महिला परपुरुषाचा आधार शोधतात. पण त्याच्याशी त्यांचा विवाह झालेला नसतो, त्यामुळे ‘ठेवलेली’ म्हणून त्याच्यासोबत राहणे या महिलांसाठी पुढे धक्कादायक आणि धोकायदायक ठरते.

उत्तम आर्थिक परिस्थिती अथवा मिळवती महिला असल्यास, स्वतःचे घरदार, नोकरी व्यवसाय असलेल्या महिला शारीरिक गरजा, मानसिक, भावनिक गरजा यासाठी परपुरुषाचा आधार शोधतात. बहुतांश वेळी हे पुरुष विवाहित, मुलंबाळ असलेले, एकत्र कुटुंबातीलदेखील असतात. त्याचप्रमाणे त्यांना कायदेशीर पत्नी असते आणि इतर नातेवाईक, मित्र मंडळी असतातच. अशा पुरुषांच्या आयुष्यात स्वतः स्त्रीने प्रवेश करणे म्हणजे स्वतःहून स्वतःचा अपमान करुन घेणे आणि आत्मसन्मान गहाण ठेवण्यासारखे आहे. अशा प्रकारची प्रकरणे हाताळताना विविध अनुभव येतात आणि सर्व महिलांना त्याबाबत माहिती होणेसाठी या लेखामार्फत आपण एक प्रकरण काल्पनिक नाव वापरून या ठिकाणी नमूद करणार आहोत. जेणेकरून कोणतीही महिला असे चुकीचे पाऊल उचलताना खूप विचार करेल आणि स्वतःचे आयुष्य, भविष्य भरकटण्यापासून सावरू शकेल.

अंजली (काल्पनिक नाव ) पतीच्या निधनानंतर स्वतःच्या मुलांचे पालनपोषण करीत उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करणारी महिला. मुलं अत्यंत लहान असताना आणि अंजली तरुण असतानाच पतीचे अपघाती निधन झाले आणि भरपूर पैसा पाणी असून, पतीची प्रॉपर्टी मिळून सुद्धा एकाकी जीवन जगण्याची वेळ तिच्यावर आली. अशावेळी तिच्या आयुष्यात विवाहित आणि तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठा असलेला, अतिशय बुद्धिमान, प्रतिष्ठित व्यावसायिक विजय (काल्पनिक नाव )आला आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता अंजली त्याच्याशी एकरूप झाली. विजयच्या सततच्या बायकांच्या भानगडींना वैतागून अनेक वर्षांपासून विजयची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहत होती.

- Advertisement -

विजय एकटा कमवता, कर्ता असल्यामुळे घरच्यांच्या हातात कोणताही अधिकार नसलेल्या विजयच्या घरात त्याच्या शब्दापुढे जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. त्यामुळे विजयच्या घरात प्रवेश करुन अंजली राजरोसपणे त्याच्या सोबत राहू लागली. कधी दोघेही तिच्या घरी राहत तर कधी विजयच्या. विजयने आपल्याला घरात स्थान दिले, समाजात आपल्याला घेऊन सगळीकडे तो वावरतो, आपल्या मुलांना बापाचं प्रेम देतो, आपल्याला जीव लावतो, काहीही कमी पडू देत नाही या मानसिकतेमधून ती हे विसरून गेली होती की विजयचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही आणि त्याची बायको मुलं आजही त्याच्या हक्काची आहेत. बायको मुलांचा पण त्याच्यावर कायदेशीर हक्क आहे.

पती-पत्नी जरी वेगळे राहत असतील, लांब राहत असतील, त्याबाबत सदर पुरुष काहीही समर्थन देत असेल, त्याच्यात जरी वादविवाद असतील, त्यांच्या जरी कोर्टात केस सुरू असतील, अथवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया सुरू असतील तरीही जोपर्यंत पती-पत्नीची कायदेशीर फारकत होत नाही, तोपर्यंत पती दुसर्‍या महिलेला कायदेशीर पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही आणि तसे दाखविण्यासाठी, विश्वास संपादन करण्यासाठी, भासविण्यासाठी जर देवळात लग्न करणे, माळा घालणे, पर स्त्रीला स्वतःचे नाव वापरू देण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणे असे उद्योग करुन कोणीही विवाहित पुरुष जर तुम्हाला फसवत असेल तर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि चुकीचं आहे हे लक्षात घ्या.

- Advertisement -

विजयच्या घरचे हतबल असल्याने आणि त्याच्या सततच्या बायका बदलण्याच्या सवयीला वैतागलेले असल्यामुळे त्यांनी अंजलीला न विरोध केला तिचा स्वीकार केला. चालतंय ते चालूदे, आपल्या सगळ्यांच्या आर्थिक गरजा विजय पूर्ण करतोय ना तर कशाला त्याला विरोध करुन त्याचा रोष ओढून घ्यायचा आणि स्वतःचं नुकसान करुन घ्यायचं ही मानसिकता विजयच्या घरच्यांची झालेली होती. त्याच्या कुटुंबातील सर्वांच्याच हे अंगवळणी पडलं होतं की विजय दर एक दोन वर्षाला नवीन बाईशी संबंध जोडतो, प्रेम प्रकरण करतो, एकावेळी अनेकींना वेड्यात काढण्यात त्याचा हातखंडा आहे, त्यांच्यावर अमाप पैसा उधळतो आणि आपल्या कोणालाही किंमत देत नाही.

विजयला काहीही समजवायला, सांगायला गेलं की आपलाच अपमान करतो हे घरातील इतर लोक जाणून होते. विजयच्या कुटुंबीयांचा हाच समज आणि धारणा होती की शेवटी तो पुरुष आहे, त्याच्या आयुष्यात येणार्‍या बायकांना समजायला हवं की विवाहित असलेल्या पुरुषाशी आपण संबंध कसे ठेवावेत. त्यामुळे अंजलीच्या बाबतीत फक्त धुसफूस करणे, तिच्या मागे तिला अपशब्द वापरणे, टोमणे मारणे, घाणेरड्या शिव्या देणे यापलीकडे घरच्यांच्या हातात काहीही नव्हते. कुटुंबातील कोणाच्याही विरोधाला कोणत्याच बाईबाबतीत विजयने कधीच दाद दिली नव्हती.

केवळ विजय आपला आहे, आपल्याशी प्रामाणिक आहे, आपल्यावर खरं प्रेम करतो आहे, त्याच्या आयुष्यातील बायकोची कमी फक्त आपणच भरून काढू शकतो या मानसिकतेतून अंजली बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत, अपमानित होऊनसुद्धा त्याच्यासोबत राहत होती. अंजलीला स्वतःच्या बायकोबद्दल विजयने अनेक चुकीच्या, वाईट साईट गोष्टी सांगून, तिला भावनावश करुन, स्वतःच्या बोलण्यात गुंडाळून तिच्याशिवाय त्याला या जगात कोणीच प्रिय नाही हेच तिच्या मनावर बिंबवलं होतं. विजयने स्वतःच्या बायकोची यथेच्छ बदनामी अंजली जवळ केलेली असल्यामुळे, ती कधीही त्याच्या आयुष्यात परत येणार नाही या विचाराने विजयला ती स्वतःचा नवराच समजून हक्क गाजवीत होती, त्याच्या घरात मालकीण बनून वावरत होती. अंजली सपशेल याच भ्रमात होती की आता विजय आणि ती आयुष्यभर एकमेकांना साथ सोबत देणार आहेत. विजयची बायको कधी नांदायला येणार नाही आणि विजयचे घरातले पण त्याचं किंवा माझं काही वाकड करु शकत नाहीत. सामाजिक मर्यादांना तर दोघांनी कधीच माग टाकलं होतं. अशा पद्धतीने एक नाही दोन नाही तब्बल दहा वर्षे अंजली आणि विजय नवरा बायकोसारखे आयुष्य जगत होते.

अंजली जेव्हा समुपदेशनासाठी आली तेव्हा तिचं म्हणणं होतं की, मी काय निर्णय घेऊ, मला काहीच कळतं नाहीये. इतकी वर्षं एकत्र राहताना अनेकदा मला विजयबाबतीत संशय होता की तो इतर महिलांच्या पण संपर्कात आहे, तो एकावेळी अनेक महिलांना खेळवतो आणि वेड्यात काढतो आहे. पण तो माझ्याशी ज्या पद्धतीने वागायचा, माझ्यासाठी घरच्यांशीसुद्धा वाद घालायचा, त्यांनासुद्धा झुगारून द्यायचा. मला वाटायचं तो खरंच फक्त माझा आहे. तो मला वेळोवेळी हेच सांगायचा की मी केवळ त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या घरातील लोक, आजूबाजूचे लोक त्याला मला तोडण्यासाठी कट कारस्थान करतात, पण मी दुर्लक्ष केलं पाहिजे. अंजलीचं म्हणणं होतं विजयच्या घरातील लोक तिच्यासाठी खूप खालच्या दर्जाचे शब्द वापरतात, पण विजयच्या प्रेमाखातर ती सगळं सहन करते आहे. तिला अनेकदा अनेक जणांनी विजयच्या सवयीबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समजावण्याचा प्रयत्न केलेला होता. जेव्हा जेव्हा तिने विजयकडे यावर स्पष्टीकरण मागितले होते त्याने हेच सांगितलं होते की, आपल्या नात्यावर लोक जळतात, लोकांना आपलं चांगल चाललेलं पाहवत नाही, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीही अंतर देणार नाही.

आता अंजलीची मुख्य समस्या ही होती की, तिला काही महिन्यांपूर्वी विजयच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे नको त्या अवस्थेतील फोटो, विडिओ आणि खालच्या दर्जाचे चॅटिंग मेसेज सापडले होते. त्यातील अनेक महिलांना तर खुद्द अंजली बर्‍यापैकी ओळखत होती. कोणी त्याच्या व्यावसायिक कामातील होत्या, कोणी ऑफिसमधील होत्या, कोणी नात्यातीलदेखील होत्या तर कोणी तो जिथे नेहमी खरेदीला जातो त्या दुकानदार होत्या तर कोणी इतर शहरातीलसुद्धा त्याच्या संपर्कात होत्या. हे सर्व पाहून अंजलीला धक्का बसला होता आणि ज्याच्या मागे दहा वर्षं घालवली त्याने आपल्यासोबत काय केलं? न लग्न केलं, न आपल्या नात्याला न्याय दिला, न समाजात किंवा त्याच्या घरात मला आदर मिळाला! विजयला याबद्दल विचारणा केली असता त्याने परत तिला भावनिक करुन, तात्पुरती माफी मागून सावरा सावर करुन अंजलीचं मनपरिवर्तन केलं होत आणि अंजलीचं मन अजूनही सत्य परिस्थिती स्वीकारायला तयार नव्हतं.

समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या एखाद्या पुरुषाची बायको त्याच्यासोबत राहत नाही, नांदत नाही, किंवा लांब आहे म्हणून राजरोस त्याच्या घरात येऊन राहतात किंवा तो जिथे सोय करेल, ठेवेल तिथेच राहायला लागतात. बायको शरीराने लांब आहे, नवर्‍यासोबत नाही, याचा अर्थ अनेक महिला असा घेतात की यांचा घटस्फोट झाला आहे, किंवा लवकरच होणार आहे, किंवा झाला काय, नाही झाला काय, आम्ही नवरा-बायकोसारखेच एकत्र राहत आहोत. आम्हाला कायदेशीर लग्नाची गरज नाही. आमची मनं जुळली आहेत, आमचं प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. प्रेमाला कसलंही बंधन नसतं इत्यादी भ्रामक कल्पना स्वतःचीच फसवणूक करण्यासाठी महिला वापरत असतात.

अशा महिलांना वारंवार हेच सांगावेसे वाटते की नवरा-बायकोसारखं राहणं आणि कायदेशीर नवरा बायको असणं यात जामीन अस्मानाचा फरक आहे. बायांनो सत्य स्वीकारा. लग्न झालेल्या, विवाहित पुरुषाच्या आयुष्यात, घरात पाय ठेवताना हजार वेळा विचार करा, कोणासाठी ठेवलेली म्हणून राहू नका, स्वतःचं अस्तित्व जपा, स्वतःची पायरी ओळखा, आपला मानसन्मान आंधळ्या प्रेमासाठी उधळून देऊ नका. वर्षानुवर्षे एखाद्याच्या आयुष्यात असे बेकायदेशीर नाते स्वीकारून राहणे यातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यातून अंजली सारखं राहणं ! विजयचे अनेक बायकांशी संबंध असल्याचे कळल्यावर तिची झालेली दुर्दशा आणि त्याच्या घरातील सर्वांनी तिची कायम केलेली हेटाळणी आणि तिरस्कार यातून तिने दहा वर्षात काय मिळवलं? विजयने तिच्यावर मारेमाप पैसा खर्च केला होता, तिला तिच्या मुलांना हिंडवणे फिरवणे, विविध वस्तू खरेदी करुन देणे, अंजलीला शारीरिक सुख देणे, तिला स्वतःच्या घरात ठेऊन घेणे हे सर्व जरी तात्कालिक स्वरूपात सुखावणारे असले, छान वाटणारे असले तरी यातून अंजलीचं झालेलं मानसिक, सामाजिक नुकसान भरून येण्यासारखं नक्कीच नाही. अंजली स्वतः आर्थिक दृष्टीने उत्तम होती, स्वतःच्या पायावर उभी होती, तिला स्वतःचं घरदार होतं तरीही एखाद्या परपुरुषाच्या घरात राहून, तिला त्याची ठेवलेली, रखेली यापलीकडे कोणताही नाव, कोणतीही ओळख विजयने दिलेली नव्हती.

अशा वेळी महिलांनी हा विचार करणे आवश्यक आहे की या माणसाच्या आयुष्यात माझं स्थान काय आणि आपच्या नात्याला नाव काय? प्रेम म्हटले तरी विवाहित पुरुषाने अथवा स्त्रीने लग्नानंतर केलेले प्रेम हे जगासाठी व्याभिचार असतो…. त्यातून ते किती खरं किती खोटं किती काळ टिकणार? किती प्रामाणिक? किती जणींशी? किती जणांशी??? जो माणूस स्वतःच्या पत्नीला, मुलाला वार्‍यावर सोडू शकतो, जो माणूस घरच्यांना पैसा फेकून स्वतःच्या तालावर नाचवतो तो पूर्णपणे आपला होऊ शकेल का, हा सारासार विचार अंजलीने करणे आवश्यक होते. विजय तिला विविध वचने देत गेला. कायम तिला भावनिक करुन गुंडाळत गेला, तिला, तिच्या मुलांना हवं ते पुरवून अंजलीचं तोंड गप्प करीत राहिला. समाजात, नातेवाईकांत विजयची खरी बायको-मुलं कोण आहेत हे माहिती असतानादेखील, अंजलीला बर वाटावं, तिचं मन जिंकावं म्हणून चारचौघात अंजलीला बायको असल्याचे सांगून फिरवत राहिला आणि यानेच भारावून जाऊन अंजलीने स्वतःच्या आयुष्यातील इतकी वर्षे व्यर्थ घालवली.

हेच अंजलीने स्वतःच्या पतीच्या निधनानंतर तरुणपणीच रीतसर दुसरा विवाह केला असता, राजरोस कायदेशीर लग्न करुन थोडीफार तडजोड स्वीकारून एखाद्याची बायको बनली असती तर नक्कीच आज तिला समाजात, तिच्या नातेवाईकांत, माहेरी, सासरी सगळीकडे सन्मान मिळाला असता. तिच्या मुलांना दुसरा का होईना हक्काचा बाप मिळाला असता. महिलांनो आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल, साथ देईल अशी समाजमान्य, कायद्याने पाठबळ दिलेलीच संगत निवडा. उगाच प्रेमाच्या खोट्या कल्पनांना बळी पडून विवाहित पुरुषांचा संसार मोडायला कारणीभूत होऊ नका आणि स्वतःच्या आयुष्याचे देखील अवमूल्यन करुन घेऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -