Homeफिचर्ससारांशBaby John : साऊथच्या ‘थेरी’ची कॉपी...बेबी जॉन

Baby John : साऊथच्या ‘थेरी’ची कॉपी…बेबी जॉन

Subscribe

अभिनेता वरुण धवन स्टारर चित्रपट ‘बेबी जॉन’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टली यांनी केले असून हा चित्रपट ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. वरुण धवनची जबरदस्त अ‍ॅक्शन आणि इमोशन तसेच पटकथा चांगली असती तर चित्रपट वेगळ्याच पातळीवर गेला असता. या चित्रपटावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

 – आशिष निनगुरकर

‘बेबी जॉन’ चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे, मात्र त्याचं हे हिंदी व्हर्जन जरा गडबडलं आहे. याआधी थलापती विजय या भूमिकेत दिसला असून त्याने पडद्यावर खळबळ उडवून दिली आहे, पण हिंदीत सगळा सावळागोंधळ पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाच्या कथेत काही बदल करण्यात आला नाही. वरुण धवन हा डीसीपी आहे. तो एका मोठ्या प्रभावशाली व्यक्तीच्या मुलाचा खून करतो.

- Advertisement -

कारण त्याने एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मग तो व्यक्ती म्हणजे जॅकी श्रॉफ हा वरुणच्या पत्नी आणि आईला मारतो. त्याला वाटते की या हल्ल्यात वरुण आणि त्याची मुलगीही मारली गेली, पण नंतर वरुण पोलिसाची नोकरी सोडून दुसरीकडे कुठेतरी आपल्या मुलीसोबत सामान्य जीवन जगतो, मात्र तो व्यक्ती पुन्हा वरुणच्या आयुष्यात परत येतो आणि पुढे काय होते ही या चित्रपटाची कथा आहे.

चित्रपटाची मूळ चित्रपटाशी तुलना अपरिहार्य आहे. वरुण हा विजयच्या तुलनेत कुठेच वरचढ दिसत नाही. प्रत्येक सीन पाहताना मूळ चित्रपटातील दृश्य तुमच्या डोळ्यांसमोर येते, मात्र तरी हा चित्रपट तुम्हाला मोहित करीत नाही. काही ठिकाणी चित्रपट इतका बालिश वाटतो की हसू येतं. मधेच येणारी वाईट गाणी आधीच चिडलेल्या प्रेक्षकांना आणखी वैताग देतात.

- Advertisement -

एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की मूळचा चित्रपट पाहिला असता तर बरं झालं असतं. वरुण धवन चित्रपटातील ‘जॉन’ पात्राला न्याय देऊ शकला नाही. वरुण चांगला आणि मेहनती अभिनेता आहे. मागील वेब सीरिज ‘सिटाडेल हनी बनी’मधील त्याचे काम चांगले होते, पण त्याला काम करायला लावणारे राज आणि डीकेही होते, मात्र इथे दिग्दर्शकाला त्याची व्यक्तिरेखा फुलवता आली नाही.

चित्रपटाची कथा महिलांची सुरक्षा आणि मुलांची तस्करी यांसारख्या मुद्यांना स्पर्श करते. जॉन उर्फ डीसीपी सत्य वर्मा (वरुण धवन) केरळमध्ये आपली मुलगी खुशीसोबत आपला भूतकाळ लपवत आनंदी जीवन जगत असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जॉन एक बेकरी चालवतो आणि त्याची मुलगी खुशी त्याला बेबी म्हणते, पण त्यादरम्यान जॉनचे भूतकाळातील जीवन पुन्हा एकदा त्याच्या वर्तमानावर वर्चस्व गाजवू लागते, जेव्हा धोकादायक खलनायक नाना जीच्या (जॅकी श्रॉफ) तावडीतून निष्पाप मुलींना वाचवण्यात यश मिळते.

नानाच्या धोकादायक योजनांपासून जॉन स्वतःला आणि आपल्या मुलीला कसे वाचवतो याभोवती चित्रपटाची कथा फिरते. वरुण धवनने आपल्या कारकिर्दीत नवीन शैली दाखवली आहे. त्याचा इमोशनल आणि अ‍ॅक्शन पॅक्ड परफॉर्मन्स उत्कृष्ट आहे. कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांनी आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये सखोलता दाखवली आहे. कीर्तीची ग्रेस आणि वामिकाची प्रामाणिकता यामुळे चित्रपट मजबूत होतो.

चित्रपटातील जॅकी श्रॉफचा अभिनय आणि लूक दमदार आहे, पण त्याचे पात्र अधुरे वाटते. त्याची व्यक्तिरेखा अधिक चांगल्या प्रकारे मांडता आली असती असे वाटते. राजपाल यादवची हलकी विनोदी शैली काही दृश्यांमध्ये प्रभाव टाकते. वरुण धवन आणि झारा ग्याना यांची केमिस्ट्री हा चित्रपटाचा सर्वात भावनिक पैलू आहे. या चित्रपटात झाराने वरुण धवनच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

कॅलिसचे दिग्दर्शन प्रभावी असले तरी पटकथा आणि कथानकात अनेक उणिवा आहेत, मात्र चित्रपटात त्यांनी सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बाप-मुलीचे नाते भावनिक पद्धतीने मांडले आहे, पण कथेचा पाया कमकुवत आहे. प्रेक्षक अतिहुशार आहेत असे गृहीत धरून लेखकांनी गुंतागुंतीची आणि कालबाह्य कथा तयार केली आहे. बरेच भाग गृहीत धरून आहेत आणि इमोशनल कनेक्टचा अभाव आहे. अखेरीस चित्रपट पुढे खेचत असल्याचे दिसते.

चित्रपटाचा विषय ज्या प्रकारचा आहे, त्यात संशोधनाचा अभाव आहे. चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन आहे, पण कॉमेडी आणि इमोशन सीन्समधला ताळमेळ दिसत नाही. मुख्य खलनायकाचा पुरेपूर उपयोग झाला नाही. त्याचबरोबर सलमान खानचा कॅमिओ अनावश्यक वाटतो. एकही गाणे नाही जे लक्षात राहील. थमनचा बॅकग्राऊंड स्कोअर दमदार आहे आणि चित्रपटाच्या वातावरणात भर घालतो. या चित्रपटाच्या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन टली यांनीच केले होते.

यावेळी कॅलिसच्या हाती धुरा देण्यात आली होती. हा चित्रपट टली, कॅलिस आणि सुमित अरोरा या तीन लेखकांनी लिहिला आहे. वरुण धवनची नवी स्टाईल, अ‍ॅक्शन आणि इमोशनचा अचूक ताळमेळ या चित्रपटात पाहायला मिळाला. हा चित्रपट सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न करतो. नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट एकदा बघता येईल, पण कमकुवत कथा आणि दीर्घ पटकथेमुळे तो फारसा परिणामकारक वाटत नाही.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -