–आशिष निनगुरकर
आईचं काळीज समजणार्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणार्या बापाने अजून जोरात पळायला हवे, असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असते. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही आणि दुसर्याची बाजूही कळत नाही. हाच प्रवास मकरंद माने दिग्दर्शित ‘बाप ल्योक’या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मनाला भिडणारं कथानक आणि त्यासाठी आवश्यक असणारे कसदार कलावंत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे ‘बाप ल्योक’ या चित्रपटातून बाप आणि लेकाचा भावनिक विषय घेऊन येणार्या दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे उभे राहिले आहेत.
बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘बाप ल्योक’.बाप हे असं नातं आहे जे वरवर कठोर वाटतं पण त्याच्या आत डोकावलं की एक प्रेमळ रसायन सापडतं.
बाप-मुलीचं बाँडींग वेगळं असतं आणि बाप-मुलाचं काहीसं वेगळं. अनेकदा बाप-मुलाच्या नात्यात काही गोष्टी बोलायच्या राहून जातात. अनेकदा दोघांनाही एकमेकांसमोर मन मोकळं करावं वाटतं. पण काहीतरी अव्यक्त अशा गोष्टींची बंधनं येतात आणि बोलायचंच राहून जातं. पण ज्या क्षणी मुलाला बापाच्या आतल्या माणसाची खर्या अर्थाने जाणीव होते ती भावना त्याच्यासाठी खूप स्पेशल असते. बाप-लेकाच्या नात्याची अशीच हळवी कहाणी सांगणारा ‘बाप ल्योक’ हा सिनेमा उत्तम भावपूर्ण झाला आहे.
ही गोष्ट आहे तात्या आणि त्यांचा मुलगा सागरची. अनेक प्रयत्न करून सागरचं लग्न ठरलंय. सागर लग्नासाठी उत्सुक. इतकं की, चोरून चोरून होणारी बायको मयुरीशी व्हिडीओ कॉल वर बोलतो. तिला जाऊन भेटतो. सागरचं तात्याशी मात्र पटत नाही. अशातच सागरच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याची जबाबदारी तात्यावर येऊन पडते. तात्याशी आधीच वाकडं असलेला सागर आधी बापासोबत पत्रिका वाटायला टाळाटाळ करतो. पण नंतर त्यालाच जावं लागतं. दोघे बाप-लेक बाईकवर आसपासच्या गावात त्यांच्या सग्यासोयर्यांना पत्रिका वाटायला निघून जातात आणि मग सुरू होतो बाप-लेकाच्या नात्याचा हळुवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो.
‘बाप ल्योक’ सिनेमाची गोष्ट तशी छोटी. पण ती खूप छान सजवली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरचा स्कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो. पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात ‘बाप ल्योक’ सिनेमा फक्त दीड तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचं आटोपशीर कथानक ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीत सुद्धा ऐकायला छान वाटतं. याशिवाय सिनेमातले संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पाडतात असे अर्थपूर्ण आहेत.‘भूतकाळाला पुन्हा भेटायचं असतं व्हय!’ अशा छोट्या संवादांमधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते.
‘बाप ल्योक’ मध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्यांची भूमिका साकारणार्या शशांक शेंडेंचा आणि सागरच्या भूमिकेतील विठ्ठल काळेचा. दोघांची केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी खूप छान रंगली आहे. अगदी खर्या आयुष्यात दोघे बाप-लेक आहेत इतका सहज त्यांचा अभिनय आहे. मयुरी झालेल्या पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब. आईच्या भूमिकेत नीता शेंडे सुद्धा लक्षात राहतात. ‘बाप ल्योक’ पाहताना बापाला एक कडकडून मिठी मारावीशी वाटेल तसेच प्रत्येकाला त्याचा बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेकरांबद्दल, कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. ‘बाप ल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे.
पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी, तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.
सरणारी वर्ष आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप-लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही.‘नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणार्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बाप ल्योक’ हा सिनेमा आवर्जून बघण्यासारखा आहे.
–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)