–आशिष निनगुरकर
‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या ‘बापमाणूस’ चित्रपटाचा विषय अतिशय भावपूर्ण आहे. या सिनेमाच्या पोस्टर आणि इतर गोष्टींना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं होतं. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली आहे, तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे. बाप-लेकीच्या खास असणार्या नात्यावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले.
करिअर की अपत्याचा सांभाळ यात होणारी आई किंवा वडिलांची घुसमट हेदेखील अनेक चित्रपटांत आपण पाहिलं. आता एकल पालकत्व ही संकल्पना घेऊन एका मुलीची आणि तिच्या बापाची भावनाप्रधान गोष्ट दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी ‘बापमाणूस’ या चित्रपटातून मांडली आहे. कोणतीही व्यावसायिक गणितं डोळ्यांपुढं न ठेवता अनिवासी मराठी कुटुंबाची गोष्ट इथं सांगितली जाते. आशय म्हणून त्यात काही फार नवं आहे अशातला भाग नाही आणि मांडणीमध्येही काही फार वैविध्य नाही, मात्र कथेशी प्रामाणिक राहून बाप-लेकीच्यातील बंध इथं संवेदनशीलतेनं उलगडले जातात हे नक्की.
चित्रपटाची गोष्ट लंडनमध्ये घडते. चित्रपटाचा नायक मूळचा पुण्याचा आहे. श्रेयस बापट (पुष्कर जोग) असं टिपिकल पुणेरी नाव असलेली ही व्यक्तिरेखा आहे. शिक्षणाच्या निमित्तानं लंडनला गेलेला आणि तिथंच करिअर करण्याचा निर्णय घेतलेला श्रेयस आणि त्याची पत्नी अस्मिता (श्वेता पाटील) यांचा सुखी संसार सुरू आहे. अस्मिता एका मुलीला जन्म देते आणि बाळंतपणातल्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू होतो. छोट्या कुकीची (किया इंगळे) जबाबदारी श्रेयसवर येते. अस्मिताची आई सुनीता (शुभांगी गोखले) श्रेयसच्या मुलीचा सांभाळ करण्यास तयार होतात, मात्र श्रेयस बाप होण्याचा खडतर प्रवास एकट्यानंच करण्याचा निर्णय घेतो. एकल पालकत्वाची आव्हानं सांभाळताना त्याच्या आयुष्यात क्रिशा (अनुषा दांडेकर) येते.
मित्र माधव (कुशल बद्रिके) आणि त्याची पत्नी साक्षी (अश्विनी किन्हीकर) त्याच्या या प्रवासात त्याला साह्य करतात. श्रेयस ही तारेवरची कसरत कशी पार पाडतो, श्रेयस आणि क्रिशा यांच्यात कोणत्या स्वरूपाचं नातं निर्माण होतं, करिअर आणि मूल यांच्यातला समतोल तो कसा राखतो, या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘बापमाणूस’ हा चित्रपट पाहायला हवा. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर वैशल शाह, राहुल दुबे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. पुष्कर जोग, किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले यांनीही ‘बापमाणूस’ चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा इमिआरा हिची आहे. सोपान पुरंदरे चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत, तर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रवी झिंगाडे यांनी सांभाळली आहे.
सिनेमाची गोष्ट अतिशय सरधोपट आणि कोणतेही ट्विस्ट नसलेली आहे. तिची मांडणी सरळ आणि पारंपरिक मार्गावरून जाणारी आहे. विदेशात स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे मांडण्यावर लेखक-दिग्दर्शकाचा भर आहे, मात्र एकल पालकत्वाचे सगळे कंगोरे इथं उलगडत नाहीत. श्रेयस आणि क्रिशा यांच्यात फुलत जाणारे नातेसंबंध आणि दोघांच्याही भूमिका स्पष्ट होत नाहीत. पत्नीच्या विरहाचं दुःख विसरून दुसर्या मुलीत गुंतणारा श्रेयस आणि त्याच वेळी मुलीला वेळ देता येत नसल्याची खंत असा सारा पट अधिक सशक्तपणे पडद्यावर यायला हवा होता. इथं तो येत नाही. सध्याचे दिवस अशा भावनाप्रधान चित्रपटांचे नाहीत, मात्र तरीही काळजाला काही भिडणारं दिलं तर प्रेक्षक ते नक्की आपलसं करतात हे आपण पाहिलं आहे.
इथंही लेखक-दिग्दर्शक तोच ‘ट्रॅक’ पकडतो खरा, पण पुढं काही वेगळ्याच मार्गावर चित्रपट जातो. दुसरीकडे आपल्या मुलावर अशी परिस्थिती ओढावली असताना व्यवसायाला प्राधान्य देणारी आई आणि दुसरीकडे कुकी-श्रेयसकडे अतिलक्ष देणारी श्रेयसची सासू या व्यक्तिरेखांची मांडणीही मर्यादित राहते. पुष्कर जोग श्रेयसच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देतो. बालकलाकार किया इंगळेनं नैसर्गिक अभिनय केला आहे. कुशल बद्रिकेचा माधव शांत आणि संयत आहे, तर शुभांगी गोखलेंचा अभिनयही प्रसंगानुरूप आहे. या चित्रपटाची कथा मनाला स्पर्श करणारी आहे. एका वडील आणि मुलीच्या नात्याची कथा, जिथे एक बाप एकट्यानं आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी धडपडत असतो.
चित्रपटात कुटुंब, प्रेम आणि पालकत्व खूप छान पद्धतीनं एकत्र गुंफण्यात आलं आहे. हा चित्रपट कालच्या आणि आजच्या अशा दोन्ही पिढ्यांना जवळचा वाटेल. आईच्या निधनानंतर वडिलांनी आपल्या लहान मुलीला एकट्यानं सांभाळण्याचा धरलेला हट्ट, तो पूर्ण करण्यासाठी वडिलांची चाललेली धडपड, अनेकदा लहान मुलीच्या भाबड्या प्रश्नांना उत्तरं देताना वडिलांच्या मनात उठणारा भावनिक कल्लोळ चित्रपटात अगदी उत्तम मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. थोडक्यात काय तर हा एक कौटुंबिक वळणावरचा भावनाप्रधान चित्रपट आहे. एकटा बाप मुलीचा सांभाळ करू शकत नाही या समाजाच्या मानसिकतेला चोख उत्तर ‘बापमाणूस’ या चित्रपटातून देण्यात आलं आहे.