घरफिचर्ससारांशइंजिनिअर्सची कैफियत !

इंजिनिअर्सची कैफियत !

Subscribe

इंजिनिअर्सची बेरोजगारी हा सोशल मीडियामध्ये खिल्ली उडवण्याचा विषय बनला असला तरी याची दाहकता समजून घ्यावी लागेल. इंजिनियर्सच्या याच बेरोजगारीवर आधारलेली एक वेबसिरीज भारतीय डिजिटल पार्टी उर्फ भाडीपाने निर्माण केलीये आणि त्याला प्रेक्षकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बी.ई.रोजगार किंवा बेरोजगार नावाच्या या सिरीजची कथा आहे इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलेल्या ३ मित्रांची, जे नोकरीच्या शोधात पुण्यात आयटीपार्कमध्ये चकरा मारतायत, वेगळा विषय आणि त्याच प्रेक्षकांना आवडेल असं सादरीकरण, ताकदीचे संवाद आणि उत्कृष्ट अभिनेते या गोष्टींमुळेच या सीरिजला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही.

इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी हे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार होत चाललंय, एकेकाळी प्रत्येक मध्यमवर्गीय घरात आपल्या मुलाला इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघितलं जायचं, कारण आरामात नोकरी आणि तगडा पगार ही प्रलोभनं सामान्य माणसाला फार जवळची वाटत होती. पण काळाची चक्रे फिरली आणि हे चित्र देखील बदलत गेलं. शिक्षण सम्राटांनी गावखेड्यापासून ते शहराच्या गल्लीबोळात इंजिनियरिंग कॉलेज सुरू केली आणि कौशल्याचा अभाव असलेल्या इंजिनियर्सच्या टोळ्या बाहेर काढणारी ही फॅक्टरी सुरू झाली, इंजिनियरिंगच्या शिक्षणाचा दर्जा आणि स्किलफुल मॅनपॉवर दोन्ही तितक्याच वेगाने खाली आले. इंजिनियरिंगला प्रवेश मिळवण्यापासून ते शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळवण्यापर्यंतचा संघर्ष या पोरांना करावा लागला आणि हीच बेरोजगारी वाढत गेली. म्हणूनच हे समीकरण अधिक मजबूत बनत गेलंय, सोशल मीडियामध्ये हा खिल्ली उडवण्याचा विषय बनला असला तरी याची दाहकता समजून घ्यावी लागेल, इंजिनियर्सच्या याच बेरोजगारीवर आधारलेली एक वेबसिरीज भारतीय डिजिटल पार्टी उर्फ भाडीपाने निर्माण केलीये आणि त्याला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बी.ई.रोजगार किंवा बेरोजगार नावाच्या या सिरीजची कथा आहे इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलेल्या ३ मित्रांची, जे नोकरीच्या शोधात पुण्यात आयटीपार्कमध्ये चकरा मारतायत, वेगळा विषय आणि त्याच प्रेक्षकांना आवडेल असं सादरीकरण, ताकदीचे संवाद आणि उत्कृष्ट अभिनेते या गोष्टींमुळेच या सीरिजला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. भाडीपा म्हटलं की, त्याची तुलना लगेच हिंदीतील टीव्हीएफ सोबत केली जाते, दोन्ही माध्यमांची आपापली एक खासियत आणि स्टाईल आहेच,पण या सोबतच दोघांकडे असलेला प्रेक्षकवर्गदेखील वेगवेगळा आहे. टीव्हीएफच्या मागील काही सिरीज पाहिल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद का मिळतो याची कारणं स्पष्ट होतील, ग्रामीण भारतातील कथानक आणि त्याच अनोखं सादरीकरण हे त्यांच्या सिरीज यशस्वी होण्यामागचं एक कारण आहे. भाडीपावर देखील काहीवेळा असाच आरोप केला जातो की, ते स्वतः पुण्याच्या बाहेरचा कंटेंट करत नाहीत, पण बेरोजगार सिरीज ही त्याला अपवाद आहे. इथं इचलकरंजी, कोल्हापूर सोबत विदर्भदेखील पाहायला मिळतो, म्हणजे या सिरीजमधील पात्रं हे केवळ पुण्यापुरते मर्यादित नाहीत, इथं बर्‍यापैकी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याला यशदेखील मिळालं आहे.

- Advertisement -

सिनेमा असो किंवा सिरीज ३ मित्रांची कथा म्हणजे सिनेमा हिट होण्याचा यशस्वी फॉर्म्युला मानला जातो, बेरोजगार सिरीजदेखील अशाच तीन मित्रांची कहाणी आहे. वडा (सई ताम्हणकर), पापड्या ( संभाजी सासणे) आणि अक्ष्या (जगदीश कन्नम ) तिघेही इंजिनियरिंग उत्तीर्ण झालेले सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे पुण्यात एका भाड्याच्या ठिकाणी राहतात. वडा अर्थात प्रियमवदा हिची नोकरी गेलीये, मेकॅनिकल इंजिनियर असल्यानं त्यातल्या त्यात मुलगी असल्यानं तिला कंपनीत लवकर काम मिळत नाहीये. दुसरं पात्र म्हणजे अक्ष्या उर्फ अक्षय कांबळे, कोडिंगमध्ये इंटरेस्ट असलेल्या या इंजिनियरमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, कंपनीने त्याचा पगार अर्धा केलाय आणि फोनवर घरं विकायचं काम त्याला दिलंय. तिसरं पात्र आहे पापड्या उर्फ पदमनाभ देशमुख, इंजिनियरिंगमध्ये केवळ ऍडमिशन घेतलं आणि पास झाला इतकीच काय त्याची पात्रता, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या या तरुणाला नोकरी करायची नाहीये, स्वतःच असं काही स्टार्टअप सुरू करत झटपट पैसा त्याला कमवायचा आहे.

तीन वेगवेगळ्या तर्‍हेचे मित्र एकत्र आल्यावर पुढे काय होईल? बेरोजगारी आणि त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या यांना हे तिघे जण कशाप्रकारे सामोरं जातात? यासाठी तुम्हाला ६ भागांची ही सिरीज पाहावी लागेल. सिरीजची कथा आणि संवाद लिहिले आहेत सौरभ श्यामराज आणि दिग्दर्शन केलंय सारंग साठ्ये यांनी…सौरभ श्यामराजचे विशेष कौतुक यासाठी की, कथेतील तीनही पात्रांची पार्शवभूमी वेगवेगळी होती, सईच्या पात्राची वर्‍हाडी भाषा आणि पापड्याची कोल्हापुरी दोघांचा लहेजा पकडणं आणि संवाद लिहिताना त्यात ह्युमर निर्माण करणं कठीण काम होतं, पण त्याने ते योग्यरित्या निभावलं आहे. कथेचा वेग सिरीजमध्ये महत्वाचा असतो, प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढच्या भागात काय होणार? ही उत्कंठा नसेल तर एक आठवडा प्रेक्षक काय म्हणून पुढच्या भागाची वाट पाहतील ? पण यामध्ये तसं होतं नाही, एपिसोडच्या नावाप्रमाणेच त्याचा आशय शेवटाकडे येऊन कळतो आणि पुढच्या भागाची उत्कंठा वाढवतो. सिरीजमध्ये विनोद निर्मितीसाठी काही ठरवलेले फॉर्म्युले वापरलेले नाहीत, जी पात्र विनोदी म्हणून कथेत येतात, त्यांचं येणं खटकत नाहीत आणि ते त्या कथेचा भाग बनतात हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे.

- Advertisement -

बेरोजगार ही मातीत रुजलेल्या ३ मित्रांची कथा आहे, तिघंही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेत, त्यांचे प्रश्न आणि आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा या वेगवेगळ्या आहेत. प्रियंवदा उर्फ वडा नोकरी करून घरी पैसे पाठवण्यासाठी आणि लग्नापासून वाचण्यासाठी पुण्यात आलीये, दुसरा आहे अक्ष्या जो एका दलित कुटुंबातून आलाय आणि हुशार असतानाही केवळ आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळं तो चांगल्या ठिकाणी नोकरी करू शकत नाही, म्हणून गुगल किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन तो आलाय आणि तिसरा आहे पापड्या, जो इतर दोघांच्या तुलनेने आर्थिकदृष्ठ्या सक्षम तर आहे, पण त्याला वडिलांप्रमाणे शेती करायची नाहीये, त्याला स्वतःचा असा काही बिजनेस करायचा आहे. या तीनही पात्रांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे जी परस्परात त्यांना जोडते, ती म्हणजे इंजिनियरिंग आणि त्याच्यासोबत बोनसमध्ये मिळालेली बेरोजगारी… जेव्हा कथा इतकी वेगळी असते तेव्हा पात्रांची निवड करताना मोठं आव्हान दिग्दर्शकापुढे नक्कीच असेल, सईच्या येण्याने काहीसा भार हलका झाला असला तरी बाकी दोन पात्रांची निवड कशी झाली असणार , हे देखील एकदा पाहावेच लागेल, कारण जी पात्रं आपण स्क्रीनवर पाहतो.

ती इतकी जमून आलीत की, आपण त्यांच्याशिवाय दुसरा कोण असा विचार देखील करू शकणार नाही. विशेषतः पापड्याचं पात्र साकारणारा संभाजी सासणे, कट्टर शिवभक्त कोल्हापूरातला रांगडा गडी आणि तितकाच भावनिक, मित्रांसाठी काहीही करायला तयार असणारा पापड्या त्याने भन्नाट साकारलाय .. अक्ष्या आणि वडा या दोघांची पात्रं देखील तितकीच जमून आलीत, सईची वर्‍हाडी बोली तितकी खटकत नाही, तिला तो लहेजा काहीसा का होईना पण पकडता आलाय आणि तिने ते उत्तमरित्या पडद्यावर साकारलं आहे. सुमित पाटील, प्रकाश पाटील, सारंग साठ्ये आणि इतर सर्व सहकलाकारांच्या भूमिकादेखील बर्‍यापैकी जमून आल्यात. एक गोष्ट जी मला या सिरीजमध्ये तितकी आवडली नाही ती म्हणजे या सिरीजचा शेवटचा भाग, सिरीजच्या संपण्याची घाई करण्यात आलीये, सगळं काही घाईघाईत दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं तिथं दिसतं, मोहन आगाशेंच ते पात्र देखील तितकं जमून आलेलं नाही.

जो कनेक्ट पहिल्या ५ भागात राहतो, जो खरेपणा भावतो तो सहाव्या भागात काहीसा दूर व्हायला लागतो. अजून एक गोष्ट म्हणजे कथेचं मूळ असलेली ही तीगाडा कंपनी पहिल्यांदा कशी भेटली ? त्यांच्या मैत्रीची सुरुवात कशी याबद्दल तितकं काही कथेत दिसत नाही, कदाचित पुढच्या सीझनमध्ये किंवा एखाद्या शॉर्टफिल्ममध्ये निर्माते ते दाखवू शकतील, पण ज्यांची इतकी घट्ट मैत्री आहे ती कशी सुरू झाली, याचं उत्तर मिळालं असतं तर अधिक उत्तम असं मला वाटतं. बाकी बेरोजगार ही एक उत्तम मनोरंजक अशी सिरीज आहे, जी आपलं पुरेपूर मनोरंजन करतानाच इंजिनियरिंगच्या जगतात वाढणार्‍या बेरोजगारीच्या समस्येवरदेखील भाष्य करते. म्हणून ही सिरीज एकदा युट्युबवर मोफत पाहण्यास काहीच हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -