घरताज्या घडामोडीसृष्टीचा श्रृंगार...

सृष्टीचा श्रृंगार…

Subscribe

उन्हाच्या झळांनी रानवाटांवर धूळवड सुरू असताना याच पायवाटा नवचैतन्याच्या पालवीने बहरल्यात... दूरवर कोवळ्या पालवीचा हा गारवा सुखद अनुभूती देतोय. अंगोपांग फुललेला पळस, सोनपिवळ्या रंगांत न्हाऊन निघालेला बहावा.. जांभळ्या रंगाची पखरण करणारा नीलमोहर, झुपकेदार गजरे माळलेला गिरिपुष्प... अशा रंगबिरंगी पुष्पश्रृंगाराने सृष्टी सजलीय. सृष्टीचा हा रंगोत्सव खरंतर डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. असा हा पुष्पोत्सव आवर्जून अनुभवावा असाच आहे.

शहरांच्या वाटा धूळवड आणि रंगपंचमीने न्हाऊन निघाल्यानंतर वसंत ऋतुच्या स्वागतासाठी सृष्टीचाही रंगोत्सव सुरू झालाय. शहराच्या रखरखीत वाटांवर, उद्यानांमध्ये आणि रस्त्याकडेला अधून-मधून दिसणारा हा उत्सव सृष्टीच्या अभूतपूर्व पुष्पोत्सवाची प्रचिती देतोय. निसर्गातली शेकडो प्रकारची झाडं अक्षरशः रंगवैभवाने नटून उभी आहेत. वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी अर्थात शिशिरात अंगावरची सारी पालवी झटकून देत झाडांनी फुलांचा संभार केलाय. पावसाने दिलेल्या जीवदानाची जाण ठेवत कोवळ्या पालवीचं दान झाडांकडून सृष्टीच्या पदरात टाकलं जातंय. वसंत ऋतुमुळे कितीतरी झाडांचं अस्तित्त्व रंग आणि गंधाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतंय. अर्थात आपले ऋतू आणि त्यांच्या हातात हात घालून येणार्या सणांची रचना बघितली की रचनाकारांच्या क्षमतेचा अंदाज येतो. रंगपंचमीपूर्वीच रंगांची उधळण करणारा वसंत ऋतू होळी, गुढीपाडवा, चैत्रोत्सव अशा सणांची श्रुंखलाच घेऊन येतो आणि त्यासाठी अवघी वनराई नटून उभी असते.

रक्तवर्णी फुलांनी पळस फुलला की या ऋतूची चाहूल लागते. त्याच्या जोडीला स्पॅतोडिया, काटेसावर आणि पांगारा असतोच. दुपारच्या ऊन्हातली स्पॅतोडियाची फुलं तर पेटत्या ज्वालांसारखी भासतात आणि पांगारा शांत निळ्या अस्मानी लालभडक फुलांची आेंजळ घेऊन उभा असतो. खोडापासून ते फांदीपर्यंत अंगभर काटे असलेला काटेसावर पक्षांचा आवडता वृक्ष. कारण, काहीशी मखमली, जाडसर फुलं त्यांना भरपूर गोडवा देतात. पांगारा, काटेसावर या झाडांवर बुलबुल, वटवट्या, कोतवाल, रॉबिन असे कितीतरी पक्षी हमखास दिसतात. शांत स्वभावाचा सीता-अशोकदेखील याच काळात फुलतो. पोपटाच्या चोचीसारखी पळसाची फुलं दूरूनही चटकन चटकन लक्ष वेधून घेतात. औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदातही या वृक्षाला मोठं महत्त्व आहे. शहरी वाटांवर, उद्यानांत दिसणारी बॉटल ब्रशची झाडंही आता रक्तवर्णी फुलांनी बहरली आहेत. नावाप्रमाणेच पानांपानांतून डोकावणारी याची फुलंही आकर्षक दिसतात. होळीनंतर वाढणार्या उन्हाच्या तीव्रतेची जाणीव ही झाडं करून देत असतात.

- Advertisement -

हलक्या गुलाबी छटांचा गिरीपुष्प, शिरिष आणि कॅशिया तर कवेत एकाचवेळी भरभरुन फुलं घेऊन यावीत, अशी उभी असतात. गिरीपुुष्पाची फुलं फुलली की त्याच्या जवळपास राहणार्या सापांसह अन्य सर्वच सरपटणारे प्राणी तेथून पळ काढतात. कारण, या फुलांचा वास त्यांना सहन होत नाही असं म्हणतात. कदाचित म्हणूनच हे झाड आदिवासी भागात उंदीरमारी नावाने ओळखलं जातं. प्रत्येक झाडाच्या अशा काहीना काही गंमतीजमती असतात. त्या-त्या झाडाच्या सानिध्यात गेल्या की लक्षात येतात. कॅशिया आपल्याकडे तसा दुर्मिळ, पण आजही काही ठिकाणी अस्तित्त्व टिकवून आहे. तर, शिरिष काहीसा उंच वृक्ष आणि तुलनेने फुलं खूप लहान आणि नाजूकही असतात. मात्र, तरीही दूरवरुन हा वृक्ष संपूर्ण गुलाबी झालेला दिसतो.

उन्हाच्या चटक्याचं रंगवर्णन करणार्या या झाडांसोबतच नीलमोहर मनाला आणि डोळ्यांनाही सुखावून जातो. गुलमोहराच्या जवळ जाणारं हे झाड या दिवसांत जांभळ्या छटा असलेल्या फुलांनी डवरलेलं असते. हे झाड जिथेकुठे रस्त्याकडेला असेल तिथे आपल्यासभोवती हलक्या जांभळ्या पाकळ्यांची पखरण करतं. या काळात पानं कमी आणी फुलंच अधिक दिसतात. नीलमोहरचा रंगसोबती असतो तो महाराष्ट्राचं राज्यफुल असलेला ताह्मण. जराशी गडद जांभळ्या रंगाची याची फुलं मधमाशा, सूर्यपक्षी यांची आवडती. याच्या पाकळ्यांची रचना गुलमोहराच्या फुलांसारखी असली तरीही आतील पुंकेसर व कळ्या या वेगळ्या असतात.

- Advertisement -

हळदीच्या रंगात न्हाऊन निघालेला टॅबुबिया, पिवळा बहावा आणि शिवण अर्थात गंभारीची फुलं म्हणजे आपल्याला सुखावून जातात. मध्यम उंचीचा ट्यॅबुबिया पिवळ्याधमक फुलांचे घोस घेऊन उभा असतो. बहाव्याचं वर्णन करावं तेवढं कमीच ठरेल. एखाद्या तरुणीने केसांत गजरा माळावा अशा रितीने फुलांचे अधांतरी लोंबणारे घोस बहाव्याचं हटकेपण सिद्ध करतात.

फेब्रुवारीत पांढरी सावर, मोह, पळस, कडुनिंब, ट्यॅबुुबिया, मार्चमध्ये पांगारा, शिरिष, नागचाफा, नीलमोहोर, सफेद खैर, एप्रिल महिन्यात आपटा (चित्रक) बेल, तर मे महिन्यात ताह्मण, बहावा, कदंब, गुलमोहर, सीता-अशोक निसर्गाचं सौंदर्य खुलवत असतो. त्यामुळे फुलांच्या विश्वात गेलं की निसर्गाची किमया सहज लक्षात येते. म्हणूनच शहराची वाट थोडी वाकडी करून मातीचा गंध आणि सृष्टीचा रंगोत्सव अनुभवण्यासारखं दुसरी आनंदानुभूती नसावी!


 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -