घरफिचर्ससारांशदाजींचा घर

दाजींचा घर

Subscribe

दाजींचे घर अगदी इतर घरांसारखे चौसोपी, इतर तळकोकणातील घरांसारखे. बाहेरचा लोटा. त्यात बहुतेक चोपाळा ठेवलेला. हा चोपाळा किती नक्षीदार होता म्हणून सांगू. चार पायांच्या वरती जी गोल रिंगणे होती,त्यावर पोपटाच्या तोंडाची आणि चोचीची नक्षी काढलेली. बाजूची चौकटदेखील तशीच नक्षीदार. ह्या गावच्या कलाकाराने आपले कसब पणाला लावून ह्या वस्तू घडवलेल्या. ह्या चोपाळ्यावर बसताना सावध बसावे लागे. कारण ह्या चौकटीच्या आत जी छोटी फट होती. ह्यात हाताचे बोट अडकायचे.

वास्तविक ह्या घराला अनेकांनी अनेक नाव दिली ती आपल्या सोयीने, कोणी ह्या घराला ‘खोतांचा घर’, कोणी ‘साटमांचा घर, कोणी ‘मांडावरचा घर’, पण ह्या घराची खरी ओळख म्हणजे दाजींचा घर अशीच होती. आम्ही लहानपणापासून बघतो किंवा ऐकतो. ह्या घराला अनेकांनी अनेक स्तरावर बघितले, पण ह्या घराची ओळख ‘दाजींचा घर’ म्हणूनच राहिली आणि आजच्या घडीला ती ओळख टिकून आहे. असं काय विशेष होतं किंवा आजच्या घडीला काय विशेष आहे ह्या घरात. ह्या घराच्या घरपणात किंवा इथल्या सामान्यतेत ह्या घराचे असामान्य महत्व आमच्या मनात टिकून आहे. आमच्या गावच्या घराच्या वरच्या बाजूला दाजींचे घर. दाजींच्या घराची अनेक रूपे मी बघितली. अगदी दाजींचे नव्याने बांधलेले घर जेवढे मनात भरून आहे तेवढेच त्यांचे जुने घर आजही मनात रुंजी घालते.

पूर्वी मुंबईहून गावी गेलो की, कपडे बदलून आम्ही पोरं दाजींच्या घरात पडीक असायचो. ते मुंबईला जायचा दिवस येईपर्यंत. आमच्या घराला आणि दाजींच्या घराला जोडणारा एक दुवा म्हणजे आईचा परसू,आमच्या दोघांच्या घराच्यामध्ये कितीतरी वर्षे नव्हे तर मागील कित्येक पिढ्या हा आईचा परसू उभा आहे. आईच्या परसूला दोघांच्या दृष्टीने एक सांस्कृतिक महत्व असायचे. दोन्ही घरांच्या सुख-दुःखातल्या प्रसंगाचा हा आईचा परसू साक्षीदार. आईच्या परसात पूर्वी म्हणे पावसाळ्याच्या दिवसात मिरच्या, पडवळ, भेंडी जमलं तर तौशी लावली जायची. ह्या सर्वाला साक्षीदार असणारी चिंच आजही तिथे उभी आहे आणि दाजींच्या घराच्या आखाड्यावर उभा असणारा फणस आजही आमच्या दोन घरांच्या सौहार्दाच्या संबंधाचे गोडवे गात असावा. ह्या आईच्या परसूने तीन पिढ्यांना एकत्र आणलं.

- Advertisement -

गावर्‍हाटीचा विचार करता आमचे आणि दाजींचे घर एकत्र रहाणे गरजेचे होते, त्या एकत्र रहाण्याला खतपाणी ह्या आईच्या परसूने घातलं. भल्या पहाटे दूध न्यायला दाजी यायचे, तेव्हा तात्या नुकते धार काढायला बसलेले असायचे. बाकी कोण नाही, पण थोरली काकी आपल्या आणि घरातल्यांच्या भाकर्‍या भाजून खळ्यात केर काढायला आलेली असते. तिला अशी केर काढताना बघून ईनामदारा उटान चायपाणी -भाकरी करून कामाक लागली सुदा,गे म्हातारे वायच पडाचा हुता. पण काकी काही ऐकणार नव्हती. तिची कामं चालूच रहायची. हा दोघांचा संवाद कितीतरी वर्षे तसाच्या तसा चालू होता.

दाजींचे घर अगदी इतर घरांसारखे चौसोपी, इतर तळकोकणातील घरांसारखे. बाहेरचा लोटा. त्यात बहुतेक चोपाळा ठेवलेला. हा चोपाळा किती नक्षीदार होता म्हणून सांगू. चार पायांच्या वरती जी गोल रिंगणे होती,त्यावर पोपटाच्या तोंडाची आणि चोचीची नक्षी काढलेली. बाजूची चौकटदेखील तशीच नक्षीदार. ह्या गावच्या कलाकाराने आपले कसब पणाला लावून ह्या वस्तू घडवलेल्या. ह्या चोपाळ्यावर बसताना सावध बसावे लागे. कारण ह्या चौकटीच्या आत जी छोटी फट होती. ह्यात हाताचे बोट अडकायचे. लोट्यावर पाच-सहा खुंटी भिंतीत खोवलेले. त्या खुंटीला कोणी कंदील अडकवला आहे. तिथेच दोन चार खोरणे होती, त्यातील कुठल्यातरी खोरणात दिव्याची चिमणी ठेवलेली.

- Advertisement -

दुसर्‍या खोरणात मिलिंद किंवा विनोदची पुस्तके ठेवलेली. ह्या लोट्याला लागून देवघर होते. त्या देवघरात देवांच्या वरती गणपतीत लावलेली मंडपी वर्षभर तशीच असायची. खाली छोट्या चोपाळ्यावर सगळ्या देवादिकांच्या मूर्ती मांडून ठेवलेल्या. समोरच्या भिंतीला मोठमोठे पाट टेकून ठेवलेले. गावातल्या इतर घरांमध्ये देवघरात जसा भिंतीला नाग काढलेला असे,तसा दाजींच्या देवघरातदेखील काढलेला असे. ह्या नागाच्या वरती परब गुरुजींनी काढलेली फुलदाणी. अशीच फुलदाणी लोट्याच्या भिंतीलादेखील काढलेली. ह्या लोट्याची अजून एक खासियत होती ती म्हणजे ह्या भिंतीना जुने क्षण जागवणारे कितीतरी फोटो फ्रेम करून लावलेले.

लोटा ओलांडून आत आलं की, मोठी वळई होती, ह्या वळईत शंभर पानं सहज उठली असती. एवढी प्रशस्त वळई होती, ह्या वळईत एका कोपर्‍यात तीन-चार भाताच्या कणग्या ठेवलेल्या आणि त्याच्या बाजूला भाताचे बिवळे एकावर एक रचून ठेवलेले. गावात कोणाकडे काही कार्यक्रम असू दे. मोठी भांडी किंवा मोठे टोप हवे असतील तर ते मिळण्याचे एक ठिकाण म्हणजे दाजींचे घर. तीन-चार मोठे टोप वळईच्या वरच्या माळ्यावर ठेवलेले. त्यावरची झाकणी एवढी मोठी होती की, ती झाकणी आडवी केली की, त्याने स्वयंपाकघर संपूर्ण भरून जायचे. ह्या वळईच्या बाजूला जेवणाची खोली, तिकडे माई काहीना काही रांधत बसलेली. ह्या जेवणाच्या खोलीत मांडणी केलेली त्यावर सगळी पितळेची भांडी. ती पिवळी धम्मक चकाकत असायची. ह्या सगळ्याच्या मागे मोठी पडवी होती. कुठल्याही कोकणातल्या घराची रचना होती तसेच हे घर पण इतरांपेक्षा वेगळं, ह्या घराच्या बाजूला एक उघडी पडवी होती. ही पडवी म्हणजे ह्या घराचे वैभव होते. ह्या पडवीत दाजींची सगळी गुरंढोर एका रांगेत बांधलेली असायची. कितीतरी गुरे होती. मला वाटतं जोताचे बैल दोनच होते, पण किती गायी होत्या त्यांची छोटी छोटी पाडकं तर भरपूर. सतत जवळच्या खोपीत एखादी गाय आणि तिचं वासरू सतत बांधलेलं असायचं..

आमच्या घरात सकाळी आबा-आजोबा किंवा सुधीर काका देवपूजा करत असले की, आमच्या हातात फुलांची परडी देऊन दाजींच्या परसवातून फुलं आणा म्हणून सांगायचे. दाजींच्या पाटल्यादारी एक जास्वंद होती. ती वर्षाच्या बारा महिने फुललेली असायची. दाजींच्या ऐवजी त्या जास्वंदीची फुलं ही आमच्या घरासाठीच असायची. एक एक फुलं हे मोठं! त्या फुलाचा तो लालभडक रंग देवघरात शोभून दिसायचा. त्या जास्वंदीची काडी घेऊन अनेकांनी आपल्या परड्यात लावायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या परड्यात काही ते झाड बहरलं नाही. त्या झाडाच्या बाजूला विहीर होती. आणि विहिरीच्या बाजूला भाज्यांचा मांडव घातलेला. दाजींच्या पाटल्यादारी पडवळ, भेंडी आणि वांगी सहज मिळायची. त्याका काय येळ लागता, जाता येता परड्यात बियाणा टाकला की, येल लागता, असल्या कामाक वगत लागता असं म्हणत दाजी इथे पडीक असायचे. दाजींच्या वाड्याच्या बाजूला एक फणस होता,त्या फणसाकडे जायची मात्र आमची हिंमत होतं नसे.

ह्या फणसाच्या मुळात घरातली नको असलेली वस्तू ठेवलेली. त्यामुळे एखादी वस्तू तिकडून काढायची म्हणजे तिथून सरडा किंवा अजून काही पहिलं बाहेर यायचं आणि मग वस्तू मिळायची. तिथेच बाजूला एक साखरीआंबा होता. त्या आंब्याच्या चवीवरून त्याला साखरी आंबा म्हणत असावेत. किती गोड आंबा होता तो!. त्या आंब्याची चव तर सोडाच पण त्या आंब्याची खासियत म्हणजे त्या आंब्याची बाटी अगदी सुपारी एवढी, पण बाजूला सगळे मास भरलेले. आंबा सहज पिळला तर वाटीभर रस सहज निघावा एवढी त्या आंब्याची गुणवत्ता होती. त्या वयीला लागून एक तगर होता. त्या तगराची फुलं दाजींच्या घरात कमी आणि आमच्या घरात जास्त यायची. खळ्याच्या एका टोकाला मोठा फणस होता. त्याचे फणस बहुतेकवेळा मांडवावर पडायचे. त्या फणसाच्या भोवती एक पार तयार केला होता. त्या पारावर बसून आम्ही सगळेच वरून खाली पडलेला फणस खायचो. ह्या घराला माणसांचे काही वावगे नव्हते. ह्या घरात सतत माणसांची ये-जा असे.

आमच्या ईनामदारांच्या घरातली सगळी लग्न दाजींच्या मांडवात झाली आणि दाजींच्या घरातल्या सगळ्यांची लग्ने आमच्या दारात झाली. आमच्या दोन घरांच्या नवीन सुना ह्या ह्या दारातून आमच्या घरी नांदत्या झाल्या. लग्नाच्या आदल्यादिवशी एकमेकांची घरे सजवायला दोन्हीकडची मंडळी किती उत्सुक असायची हे ज्यांनी ही लग्ने बघितली त्यांनीच ठरवायची. आमच्या घरात कोणाचे लग्न ठरले की, ते दाजींच्या घरात होणार हे अलिखित. मग दाजींच्या घरात जी लगबग उडायची त्यांची सांगता सोय नाही. आमच्यादृष्टीने दाजींचे घर म्हणजे आमच्या लग्नाचा हॉल. पण हे गृहीत धरणं, याला किती विश्वास असावा लागतो. हा विश्वास दोन्ही कुटुंबांनी कमवला. याला आधीची पिढी जबाबदार आहे, त्यांनी आमच्या हृदयात हा स्नेहदीप जागवला. ईनामदारांच्या घरात लग्न म्हणजे निदान अक्षता टाकायला तरी गावी जायला हवं असं समजून दाजींच्या घरातला चाकरमानी एक दिवसासाठी का होईना गावी येतोच.

एकमेकांची सुख-दुःख वाटून घेतलेली आमची ही दोन घरं. आमच्या दोन घरांमध्ये फक्त तीन चार कुणगे होते. पण मनाने दोन्ही घरं एकत्र होती. आमच्या घरात काही वाईट झालं की, त्याकाळात आमच्या घरातले तार करून ते दाजीच्या घरातल्या मुंबईकरांना कळवत. दाजींच्या घरातले मुंबईकर बहुतेक वरळीला रहात. मग ते वरळीहून आमच्या मुंबईच्या ठिकाणावर येऊन ती वाईट बातमी आम्हाला सांगत. त्यांच्या घरात असं काही वाईट झालं की, मग आमच्या परेलच्या घरी तार करून त्यांच्या घरातले कळवत. तेव्हा वरळी आणि परळ ही आमच्या गावातल्या मुंबईकरांची सत्ताकेंद्रे होती, असेच म्हणावे लागेल. आजच्या घडीलादेखील आमची दोन्ही घरं ही एकमेकांना पूरक आहेत.

आज दाजींचे नवीन घर पूर्वी जिथे जुने घर उभे होते तिथेच उभे आहे. पूर्वी हिरीरीने समाजात मिसळणारी दोन्ही घरातली माणसे आता वयोमानामुळे थकली. पण दोन्हीकडे दुसरी फळी तयार झाली याचे कारण आधीच्या पिढीने ते नातं खूप घट्ट केलं आहे. दाजींचा घर हे केवळ त्या स्थानाची ओळख नव्हती किंवा आजच्या घडीलादेखील ती त्या स्थानाची ओळख नाही. दाजींचे घर हे दोन शेजार्‍यांना निरपेक्ष भावनेने जोडलेला सांस्कृतिक ठेवा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -