घरताज्या घडामोडीअमृतातेहि पैजा जिंके !

अमृतातेहि पैजा जिंके !

Subscribe

संत ज्ञानेश्वर यांचा मराठी भाषाभिमान, चक्रधरांचे महानुभावांचे मराठी प्रेम, नामदेवांची मराठी भाषाभिव्यक्तीची प्रेरणा,संत एकनाथांचा मराठी भाषेबाबतचा रोकडा सवाल, संत तुकोबांनी गाठलेले लोकभाषेच्या गौरवाचे, लोकाभिमुख काव्याभिव्यक्तीचे शिखर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सिध्द केलेला ‘राज्यव्यवहार कोश’ संत रामदासांची ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही उक्ती अशाप्रकारे महाराष्ट्राच्या या मानबिंदूनी, आपल्या अस्मिता केंद्रानी महाराष्ट्र धर्माच्या जोपासनेसाठी केलेला प्रयत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाचा आहे. भाषा टिकली, जगली तर राष्ट्र जगते या जाणिवेतून महाराष्ट्र धर्माच्या विकासासाठी मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मराठी भाषेचा केलेला हा जनजागर.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥ ही प्रतिज्ञा करून संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. त्यांची ही प्रतिज्ञा सार्थ झाली म्हणूनच ‘इये मराठीचिये नगरी’ मराठी भाषा वारकरी संताच्या वाणीतून, पंडितांच्या कलात्मक काव्यातून आणि शाहिरांच्या कवनातून झंकारते आहे. तिच्या गौरवाची थोरवी मराठीतील अनेक मान्यवर कवींनी गायली आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांनी म्हटले आहे, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा । हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा।’ तर कवीवर्य सुधीर भट यांनी म्हटले आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ तर वि.म. कुलकर्णी यांनी म्हटले आहे, ‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट’, या सर्वात माझे अधिक लक्ष वेधून घेतात, त्या काव्यपंक्ती म्हणजे ‘फादर स्टीफन्स’ यांनी केलेला मराठी भाषेचा गौरव होय.

आपल्या भाषेतील धर्मग्रंथाचा प्रसार करण्यासाठी या परभाषिक माणसाने मराठी भाषेचे अध्ययन करून ही भाषा आत्मसात केली. केवळ बोलण्यापुरतीच नाही, तर त्याने आपला धर्मग्रंथ ख्रिस्तपुराण मराठी भाषेत लिहिला आणि मराठी भाषेचा गौरव करताना म्हटले, ‘तैसी पुष्मामाजी पुष्पमोगरी । की परिमळामाजी-कस्तुरी । तैसी भाषामाजी साजिरी। मराठिया।’ जे मराठी भाषेचे माधुर्य, तिची गोडी स्टीफन्सला कळली ती आपणास कळू नये? हा खरा प्रश्न आहे. कारण कोणतेही ज्ञान-विज्ञान हे मातृभाषेतूनच अधिक संवाद्य, परावर्तित होत असते; पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी इतर भाषेचा दु:स्वास करावा. आपल्या भाषेला अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर तिला जागतिक स्तरावर ज्ञानभाषा म्हणून स्थापित करावे लागते. हा प्रयत्न संत ज्ञानदेवापासूनच आराभित झाला.

- Advertisement -

प्राचीन काळी संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची त्यामुळे सर्व ज्ञान-तत्वज्ञान या भाषेतच ग्रंथबद्ध होते. ही कोंडी फोडण्यासाठीच ज्ञानदेवांनी हे ज्ञान आपल्या लोकभाषेत प्रवाहित केले आणि ‘मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू केला’, परंतु आज खेदाने असे म्हणावे लागते की ललित साहित्य वगळता इतर भाषेतील ज्ञान आपल्या भाषेत आणून आपल्या भाषेला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न झाला नाही. हा मान इंग्रजी भाषेने मिळवला. आज सर्व ज्ञानशाखेतील अद्ययावत ज्ञान या भाषेत बंदिस्त आहे, त्यामुळे ही भाषा अवगत करणे अपरिहार्य ठरते. अशी अपरिहार्यता मराठी भाषेसंदर्भात आपण निर्माण केली नाही. हे ज्ञान आपल्या भाषेत खुले केल्याशिवाय आपली भाषिक गुलामी संपुष्टात येणार नाही.

तेराव्या शतकात जसे ज्ञानदेवांनी केले तेच भाषिक कार्य आपणास करावे लागणार आहे. मराठी भाषेचे अग्रदूत होऊन संत ज्ञानदेवादी वारकरी संतानी तसेच महानुभाव आचार्यांनी भक्तीक्षेत्रात मराठी भाषेला समृध्द बनवून या भाषेत ग्रंथनिर्मिती केली. सामन्यांच्या भाषेत भक्तिज्ञान, पारमार्थिक ज्ञान आल्याने तळागाळातील लोक अभिव्यक्त झाले. यात स्त्री-पुरुषही सामील होते आणि यातून जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, सावता, गोरोबा, चोखोबा, रोहिदास इत्यादी संताची मांदियाळी निर्माण झाली, याचे श्रेय जसे वारकरी पंथाच्या सामाजिक दृष्टिकोनाला जाते तसेच ते त्यांच्या समतावादी विचारालाही जाते. कारण सामान्य माणसे आपल्या दैनंदिन लोकभाषेतूनच व्यक्त होत असतात आणि असा अवसर त्यांना वारकरी पंथाने दिला. आज सर्व ज्ञानशाखेत ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ असा प्रयोग होताना दिसतो का? पारमार्थिक क्षेत्रात हे कार्य संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केले.

- Advertisement -

म्हणूनच समाजजीवनाच्या अन्य क्षेत्रात मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून रुजविण्याचे कार्य आता करावे लागणार आहे. जर मातृभाषेतून सर्व ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, अनुवादित करून आपल्या भाषेत ज्ञानार्जन करण्याची संधी जर मराठी भाषक समाजाला लाभली तर आज जे इंग्रजी भाषेचे, शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे ते संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी गरज आहे आपला दृष्टिकोन बदलण्याची. प्रत्यक्ष कृती आणि मातृभाषक चळवळ उभारल्याशिवाय हे कार्य होणार नाही. नुसता मराठीच्या नावाने टाहो फोडून अथवा परिपत्रकाचे फतवे काढून काहीही साध्य होणार नाही. यासाठी जसे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तशीच आपली मानसिकता बदलावी लागेल आणि भाषिक न्यूनगंड मिटवल्याशिवाय हे शक्य होणार नाही. अजूनही तेराव्या शतकात जो प्रश्न वारकरी संताना पडला, त्यासाठी लोकभाषेचा आग्रह त्यांना धरावा लागला तेव्हा संस्कृत भाषा आणि या भाषेला बंदिस्त करणारे तत्कालीन समाजधुरीण त्यांच्यासमोर होते.

आज संस्कृत भाषेच्या जागी दुसरी भाषा आहे; पण जो मूळ प्रश्न आहे तो मात्र तेराव्या शतकापासून तोच आहे. आजही आपल्या राज्याच्या भाषिक धोरणातून हेच दाखले, हेच संदर्भ आपणास द्यावे लागतात, याचा अर्थ काय? म्हणून हा प्रश्न केवळ भाषिक अस्मितेचा नाही; तर तो आपला सांस्कृतिक प्रश्न आहे आणि या परिप्रेक्षातून याकडे पहिले पाहिजे. संत ज्ञानेश्वर यांचा मराठी भाषाभिमान, चक्रधरांचे महानुभावांचे मराठी प्रेम, नामदेवांची मराठी भाषाभिव्यक्तीची प्रेरणा,संत एकनाथांचा मराठी भाषेबाबतचा रोकडा सवाल, संत तुकोबांनी गाठलेले लोकभाषेच्या गौरवाचे, लोकाभिमुख काव्याभिव्यक्तीचे शिखर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सिध्द केलेला ‘राज्यव्यवहार कोश’ संत रामदासांची ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही उक्ती अशाप्रकारे महाराष्ट्राच्या या मानबिंदूनी आपल्या अस्मिताकेंद्रानी महाराष्ट्र धर्माच्या जोपासनेसाठी केलेला हा प्रयत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वपूर्ण आहे. भाषा टिकली, जगली तर राष्ट्र जगते या जाणिवेतून महाराष्ट्र धर्माच्या विकासासाठी मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करणे अत्यंत महत्वाचे आहे.

11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता मिळाली. तसेच भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये राष्ट्रीय भाषा म्हणून मराठी भाषेचे स्थान तेराव्या क्रमांकावर आहे आणि जागतिक भाषांमध्ये मराठी भाषा दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून गणली जाते. भाषावार प्रांतरचना या तत्वानुसार इतर राज्यांची निर्मिती झाली, पण मराठी भाषकांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यासाठी १०६ महाराष्ट्रप्रेमींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तेव्हा 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर तत्कालीन साहित्याचे रसिक जाणकार लोकनेते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केले हे सर्वज्ञात आहे. परंतु माधव जुलियन यांनी जे म्हटले होते ‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी ।’ ही परिस्थिती मात्र बदलली नाही. केवळ कागदावर मराठीला राजभाषेचा दर्जा लाभला, परंतु वास्तवात, प्रशासकीय व अन्य व्यवहारात मात्र ती अंग चोरून वावरते आहे.

याला राजवैभव कसे म्हणायचे? अजूनही आपण तिला वैभवाच्या शिरी बसवले नाही हे कटू सत्य आहे. असे का झाले? याचे उत्तर मराठी माणसाच्या मानसिकतेत आहे. तात्विक पातळीवर अनेक निर्णय होतात, पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये कृतिशीलता आढळत नाही. अलीकडेच 2014 मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या ‘मराठी भाषाविषयक धोरण समितीने’ जो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, त्यात प्रारंभीच नमूद केले आहे, ‘11 जानेवारी 1965 रोजी राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. या घटनेस पन्नास वर्षे होत आली तरी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी भाषेचा वापर ज्या प्रमाणात व्हावयास पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.’ हा अभिप्राय अत्यंत परखड व वास्तवदर्शी आहे. पुढील पंचवीस वर्षाच्या मराठी भाषेच्या वाटचालीचा जो अहवाल या समितीने शासनाकडे सोपवला आहे त्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत, त्या स्वीकारून त्यावर चर्चा करून मराठी भाषेच्या विकसनाचे उत्तरदायीत्व शासनाने निभावले पाहिजे.

कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे हे सर्वमान्य तत्व आहे. ज्ञानार्जन व ज्ञाननिर्मिती ही मातृभाषेतूनच अधिक सुलभपणे होत असते. आज जी अनेक प्रगत राष्ट्रे आघाडीवर दिसतात त्यांच्या शिक्षणामध्ये सर्व पातळीवर त्यांच्या मातृभाषा आघाडीवर आहेत. सर्व ज्ञानशाखेतील शिक्षण त्यांच्या मातृभाषेत दिले जाते, मग आपण ही परवशता कधी नाकारणार? आज या मूलभूत प्रश्नापासून आपण खूप दुरावत आहोत. शिक्षणात कोणत्या भाषेला अग्रक्रम दिला जातो त्यावर त्या भाषेची समृद्धी आधारित असते. आपल्या भावी पिढीला, त्यांच्या पालकांना दोष देऊन चालणार नाही. कारण हे सर्व दोष समकालीन शिक्षण पद्धतीचे आहेत. आपण सर्व अभ्यासक्रम त्यांना मातृभाषेत उपलब्ध करून दिले तर मराठी विद्यार्थाला इंग्रजी शाळेत जायची गरज उरणार नाही.

उलट, आपल्याकडे शेतकर्‍यासाठी आवशयक असलेला ‘कृषी’ हा अभ्यासक्रमही इंग्रजीमध्ये शिकवला जातो. अशाने कोणता फायदा कृषिनिष्ठ वर्गाला होईल? म्हणूनच भाषा समितीने जी पंचवीस उद्दिष्टे ठरवून हा अहवाल दिला आहे, त्याची पूर्तता करणे निकडीचे आहे. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मागे पडलेल्या अनेक मुद्यांच्या परिपूर्तीचीही गरज आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारावे लागेल. यासाठी आपली मराठी अभ्यासक्रम राबवणारी विद्यापीठीय मंडळे, विविध भाषिक, साहित्यिक मंडळे, साहित्यसंस्था यांनी आपल्या निष्ठा एकवार तपासून पाहण्याची गरज आहे. मराठी भाषकाला, समाजनिष्ठेला केंद्रस्थानी ठेवून आपली ध्येयधोरणे कृतीशीलपणे राबवली तरच ज्ञानदेवांची ‘अमृतातेहि पैजा जिंके’ ही उक्ती सार्थ होऊ शकेल!

–डॉ.अशोक लिंबेकर 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -