घरफिचर्ससारांशसोशिकतेच्या पलीकडे!

सोशिकतेच्या पलीकडे!

Subscribe

बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’मध्ये केवळ स्त्रीवादी सोशिकपण नव्हते...अस्पृश्यता, स्त्री पुरुषांमधील भावनिक आणि सामाजिक पातळीवर फरकही त्यातून गडदपणे समोर आला होता. एका अस्पृश्यांच्या दुर्लक्षित वस्तीत मजूर मातापित्यांच्या घरात सुजाता (नूतन) चा जन्म होतो. साथीच्या आजारात तिच्या मातापित्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपेक्षित आयुष्यांचं ओझं लादूनच सुजाताचं जगणं सुरू होतं. हे ओझं स्वीकारायला या मजूर मातापित्यांच्या वस्तीतील कुणीही तयार होत नाही.

हिंदी पडद्यावर महिलांच्या सोशिकतेचे गोडवे गाणार्‍या चित्रपटांचा हुकमी वर्ग आहे. मात्र, बंडखोर स्त्रियांना पडद्यावर साकारण्याचे प्रयत्न त्या तुलनेत कमीच झाले आहेत. नव्वदच्या दशकातला ‘दामिनी’ हा अलीकडचा प्रयत्न. राजकुमार संंतोषींनी त्यानंतर स्त्री वादाचा विषय असलेला लज्जा बनवला. आर के. बॅनरखाली साकारलेल्या चित्रपटांत हा सोशिकपणाचा सोसच अधिकाधिक होता. ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’पासून ते ‘प्रेमग्रंथ’पर्यंत हे सोशिकपणच होते. एन. चंद्रा यांचे ‘तेजस्वीनी’, ‘प्रतिघात’ हे बटबटीत होते. ‘घर’ आणि ‘घरोंदा’ या दोन्ही चित्रपटांना स्त्रीवादाची किनार होती. ‘गमन’, ‘भूमिका’, ‘मंथन’, ‘मिर्च मसाला’, ‘आक्रोश’मधला स्त्रीवाद सोशिक आणि आक्रमकही होता. मात्र, कितीतरी वर्षे त्याआधी बिमल रॉय यांनी पडद्यावर आणलेले स्त्रीवादी सिनेमे त्यामुळेच वेगळे होते.

रॉय यांच्या ‘सुजाता’मध्ये केवळ स्त्रीवादी सोशिकपण नव्हते…अस्पृश्यता, स्त्री पुरुषांमधील भावनिक आणि सामाजिक पातळीवर फरकही त्यातून गडदपणे समोर आला होता. एका अस्पृश्यांच्या दुर्लक्षित वस्तीत मजूर मातापित्यांच्या घरात सुजाता (नूतन) चा जन्म होतो. साथीच्या आजारात तिच्या मातापित्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपेक्षित आयुष्यांचं ओझं लादूनच सुजाताचं जगणं सुरू होतं. हे ओझं स्वीकारायला या मजूर मातापित्यांच्या वस्तीतील कुणीही तयार होत नाही. छोट्या सुजाताला उपेंद्रनाथ चौधरी (तरुण बोस) आणि चारु (सुलोचना) या सुखवस्तू, परंतु संस्कारी कुटुंंबाकडे आणलं जातं. उपेंद्रनाथ आणि चारू यांच्या घरी सुजाता वाढू लागते, या दाम्पत्याची मुलगी रमा (शशीकला) आणि सुजाता या दोघींच्या संगोपनात कायम फरक केला जातो. रमाचं पालन मुलगी म्हणून केलं जातं तर सुजाताचं पालन दयाभावनेतून केलं जातं. त्यामुळे मातापित्यांवरील रमाचा असलेला हक्क अधिकार अणि कौटुंंबिक प्रेमाचा ओलावा यात दोघींच्या संगोपनात कायम फरक राहतो. सुजाताचं अस्पृश्य जातीत जन्म घेणं ही बाब हा फरक कायम गडद करत राहते. त्यामुळेच समाज, कुटुंब अशा सर्वच बाबतीत एक प्रकारचे तुटलेपण हा सुजाताच्या जगण्याचा भाग होऊन जातो. त्यातून बालसुलभ इच्छा असतानाही सुजाताचं शिक्षण बंद केलं जातं, त्यातूनच पुढे हळूहळू दुभंगलेल्या मनाची सुजाता पडद्यावर उलगडत जाते.

- Advertisement -

उपेंद्रनाथ चौधरींच्या घरात सुजाता आणि रमा मोठ्या होतात. त्यासोबत त्यांच्यातील दरीही विस्तारत जाते. अस्पृश्य जातीतील हे जगण्याचं ओझं फेकून देण्यासाठी सुजाता एका वादळी रात्री घराबाहेर पडते. जीवन आणि मरणाच्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी ‘महात्म्या’च्या मूर्तीखाली कोरलेले शब्द तिला दिशा दाखवतात.

प्रतीकांचा वापर करून प्रसंग जिवंत करण्यात हातखंडा असलेल्या बिमल रॉय यांनी ‘सुजाता’ साकारताना प्रतीकांचाही वापर केला आहे. संबोधीच्या शोधात असलेले तथागत बुद्ध एकाग्र मनाने चिंतन करत आहेत. जगातल्या सत्याचे आकलन झाल्याशिवाय एकाग्रता ढळू द्यायची नाही. हा बुद्धांचा निर्णय मानवी शरीराची गरज असलेली भूक मोडून काढतो. त्यावेळी बुद्धांना खीरदान करणारी चांडाळ कुळातील सुजाता ही अस्पृश्य असते. हीच सुजाता बुद्धांच्या धम्माचा उपासक आनंदला पाणी देते. त्यावेळी तिची माणूस म्हणून ओळख होते. चित्रपटातील सुजातालाही तिची माणूस म्हणून ओळख करून देण्याचे काम अधिरबाबू (सुनील दत्त) करतात. यातूनच या दोघांमध्ये हळूवार नाते आकार घेऊ लागते.

- Advertisement -

अधिरबाबू आणि सुजाता यांच्यातल्या प्रेमाचे बंध घट्ट होत असतानाच सुजाताचे अस्पृश्य जातीत जन्म घेणे दोघांच्या जीवनात वादळ निर्माण करते. अधिरबाबूंची आत्या गिरीजाबाला (ललिता पवार) या दोघांच्या लग्नाला नकार देते. अस्पृश्य असलेल्या मुलीशी लग्न केल्याने धर्म भ्रष्ट होणार असल्याची भीती तिला आहे. अधिर माणसाची ओळख माणूस म्हणून असल्याचे आत्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. या दरम्यान, अधिरचे लग्न उपेंद्रबाबूंची मुलगी रमाशी करण्याचे ठरवले जाते. अस्पृश्य मुलीला घरात घेऊन मोठे केल्याची किंमत चुकवण्याची वेळ सुजातावर येते आणि ती अधिरसोबत लग्न करण्यास नकार देते. चित्रपटाच्या शेवटपर्यंत एक प्रकारचे तुटलेपण रेखाटण्यात बिमल रॉय यशस्वी झाले आहेत.

अस्पृश्य मुलगी असल्याचे समजल्यावर प्राध्यापक असलेले पंडित भवानी शंकर शर्मा (असित सेन) यांचे घरातून निघून जाणे. अस्पृश्य जातीतील लोकांशी फारकत घेताना विज्ञानाचा दिशाभूल करणारा आधार घेऊन मत रेटणे, हा प्रसंग उच्चवर्णीयातील वैचारिक दांभिकता उघड करतो.सुजाताचे विधुरासोबत लग्न ठरवण्यासाठी गिरिबाला आत्याकडून होणारे प्रयत्न, उपेनबाबूंची पत्नी चारूकडून रमा आणि सुजाताच्या संगोपनात न कळत होणारा फरक आदी प्रसंगातून या तुटलेपणाशी प्रेक्षकही जोडला जातो. सांजवेळी अधिर आणि सुजाताची नदीतीरावर होणारी भेट, स्वत:ला एक ओझं मानणार्‍या सुजाताला माणूस असल्याची अधिरने करून दिलेली जाणीव अशा अनेकविध तरल प्रसंगाचा पट म्हणूनही या चित्रपटाची वेगळी ओळख सांगता येईल. चित्रपटातील स्त्रीवाद हा स्त्रीत्वातील सोशिकतेशी निगडित असतानाच तो अस्पृश्यतेच्या गहन विषयालाही हात घालतो. त्यामुळेच या चित्रपटाबद्दल विचार करताना स्त्रीवादाच्या पुढे जाऊन विचार करावा लागतो. फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शन, चित्रपट, कथा अशा सर्वच आघाड्यांवर बाजी मारणारी ही ‘सुजाता’ मनावर खोल परिणाम करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -