Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश भाऊ भोगले

भाऊ भोगले

भाऊचा विचार करताना त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. त्याचं न जाणवणार अस्तित्व डोळ्यासमोर आलं. भाऊचा मुलगा प्रकाश आणि मी एकाच वयाचे. प्रकाश वर्षा-सहा महिन्याचा असतानाच त्याची आई म्हणजे भाऊची बायको गेली. तेव्हाच भाऊच्या संसाराची इतिश्री झाली. मग प्रकाशचं संगोपण एकट्या भाऊनं केलं. आईविना वाढणारं पोरं गावात उनाडक्या करत फिरायचं. भाऊ आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी आपल्या हिश्श्याला आलेल्या जमिनीत कधी भात, कुळीथ पिकवत असे. या सर्व लवाजम्यावर भाऊ भोगले वाडीत रहात असे.

Related Story

- Advertisement -

एखाद्या माणसाचा मृत्यू हा मनाला चटका लावून जातो. आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येऊन जातात,ज्यांच्या असण्याने किंवा नसण्याने आपल्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. पण त्या माणसाची अनुपस्थिती कुठेतरी आपल्याला जाणवते. थोडक्यात त्या व्यक्तीच्या मृत्यूने समाजात पोकळी वगैरे निर्माण होत नसली तरी एखादं काम अडून राहण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

अशाच एका सकाळी वॉट्सअ‍ॅप उघडला आणि सगळ्या ग्रुपवरचे मेसेजेस वाचले. बहुतेक पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर मस्त पाऊस पडत होता. अशा कुंद वातावरणात गावातल्या मुलांच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील एका बातमीने मी कमालीचा अस्वस्थ झालो. त्या ग्रुपवर वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीचं कात्रण होतं. बातमीचा मथळा ठळक अक्षरात छापला होता. आयनलातला वृध्द बेपत्ता. बातमीवरून डोळे फिरवत असताना त्या बातमीतल्या वृध्दाचं नावं कळलं -भाऊ भोगले..
अरे !! आपला भाऊ!!. आपल्या गावातला, नव्हे आपल्या वाडीतला भाऊ भोगले बेपत्ता झाला? कुठे गेला असेल ?. त्या परीस्थितीत लगेच गावी फोन लावला. पण दुर्दैवाने गावी कोणाला ही बातमी माहीत नव्हती. आश्चर्याची गोष्ट होती, कारण कोणत्या घरात खट् झालं तरीही वाडीत सर्वांना कळत. असं असताना एवढी मोठी वाडीतल्या माणसाची बेपत्ता होण्याची बातमी अजून वाडीत विशेषतः आमच्या घरात कळली नाही? पावसा-पाण्याच्या दिवसात अशा बातम्या नाही कळत. तरीही आश्चर्य वाटतं मी फोन ठेवला.

- Advertisement -

अजून एक दहा-पंधरा मिनिटाचा कालावधी निघून गेला. दरम्यान मी ही बातमी आईला सांगितली, तिने अरे!!! असो भाऊ कितीदा धापू झालो हा! जायत खयं येयत..एवढं बोलून तिने विषयावर पडदा टाकला. तेवढ्यात गावावरून फोन आला. त्यावरून कळलं की भाऊ भोगले गेले आठ दिवस आपल्या मुलाकडे कणकवलीला गेला होता. दोन दिवस झाले तो घरी पोचला नाही म्हणून त्याच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मी भावाने दिलेली बातमी ऐकली. तरी एक प्रश्न मनात राहून-राहून येत होता तो म्हणजे भाऊ गेला कुठे ?….

भाऊचा विचार करताना त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. त्याचं न जाणवणार अस्तित्व डोळ्यासमोर आलं. भाऊचा मुलगा प्रकाश आणि मी एकाच वयाचे. प्रकाश वर्षा-सहा महिन्याचा असतानाच त्याची आई म्हणजे भाऊची बायको गेली. तेव्हाच भाऊच्या संसाराची इतिश्री झाली. मग प्रकाशचं संगोपण एकट्या भाऊनं केलं. आईविना वाढणारं पोरं गावात उनाडक्या करत फिरायचं. भाऊ आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी आपल्या हिश्श्याला आलेल्या जमिनीत कधी भात, कुळीथ पिकवत असे. या सर्व लवाजम्यावर भाऊ भोगले वाडीत रहात असे. लहानपणी नदीवर आंघोळीला जाताना बरोबर भाऊच्या पक्याला म्हणजे प्रकाशला घेऊन जात असू. कारण पक्याला नदीची चांगली माहिती. त्यात सोमवार आणि गुरुवार हे दिवस सोडले तर पक्या दररोज ताटल्या लावायचा. ताटल्या लावणे हा नदीत माशे पकडण्याचा एक प्रकार आहे. त्याचं असं असतं. ताटली किंवा लहान टोप घेतात त्याच्या आत धान्याच्या कोंड्यासारखा एखादा पदार्थ ठेवतात. जेणेकरून त्या कोंड्याच्या वासाने नदीतले माशे त्या भांड्याजवळ येतात. या भांड्याला वरून कापड बांधतात आणि त्या कापडाला भोक पाडतात.

- Advertisement -

माशे (सिंधुदूर्गात असो वा गोव्यात मासे न म्हणता माशे असचं म्हटलं जातं)कोंडा खाण्यासाठी कापडातून भांड्यात शिरकाव करुन घेतात, पण बाहेर पडता येत नसल्याने आतच रहातात ..पक्या ताटल्या लावण्यात वाकबगार , पण सकाळी नदीवर आंघोळीला जायच्या अगोदर भाऊ सर्व तयारी करून ठेवत असे. दुपारी आंघोळ झाली की पक्या नदीतून ताटल्या काढून मिळालेले माशे साफ करत असे. आम्ही मुंबयची येडा त्वाँड वर करुन पक्याचं कसब बघायचो. घरी जायच्या अगोदर भाऊ दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी सांबार्‍याची तयारी करून म्हणजे वाटप करून ठेवी. पक्याने आणलेले माशे पुन्हा साफ करून भाऊ झकास माशाचं तिखलं बनवत असे. मग त्या साराभाताचं कधी-कधी भाऊकडे जेवण व्हायचं. मोठा झाल्यावर मी मांसाहार सोडला.

कधी भाऊकडे जाऊन बसलो की भाऊ लहानपणीची आठवण सांगे, इतर कोणी गाववाले तिथे असतील तर भाऊ सांगायचा ह्या वैभवान माझ्या हातचा तिखला खाल्ल्यान हा! आता ह्यो सोवळो भट झालो. गावातल्या कित्येक लोकांनी भाऊकडे उकडा भात आणि तिखलं खाल्लं असेल याची मोजदाद नाही. पण गावातल्या माणसांच्या दृष्टीने भाऊ म्हणजे दारूडा-पोरांना नादी लावणारा. वास्तविक त्याचं असं होतं पूर्वी गावात एवढ्या सर्रासपणे कोणी मद्यपान करत नसे. अशा कामासाठी जागा हवी असायची. ती भाऊकडे मिळायची. भाऊकडे बाकी कोणाचाच वावर नसायचा. त्यामुळे दुपारी पत्ते खेळायला पोरं भाऊकडे जमायची, मग पत्त्याचा डाव रंगायचा आणि मद्यपान देखील व्हायचे. दिवस-दिवस एखादं पोरग भाऊकडे पडलेलं असायचं. त्या पोराची आई भाऊला शिव्यांची लाखोली वहायची, पण भाऊ ऐकून घ्यायचा. तो पोरगा नशेतून उठला की भूक-भूक करायचा, मग भाऊ त्याला भात आणि कालवण वाढायचा. एकंदरीत त्या दोन खोल्यांच्या भाऊच्या घरात माणसांचा राबता असायचा.

भाऊची आठवण सर्वांना यायची ती श्रावण महिन्यात. श्रावण सुरू झाला की वेगवेगळ्या सणांना सुरुवात व्हायची. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. गावातल्या सर्व गावकर्‍यांना भाऊ नागोबा बनवून द्यायचा. नाग म्हणजे गावचं आराध्य दैवत, गावचं कुलदैवत. भाऊ फारच छान नागोबा बनवायचा. हा नागोबा घरोघरी पुजला जाई. पण या नागोबाने भाऊवर काम कृपेचं छत्र धरलं नाही. गणपतीच्या दिवसात वाडीत सर्वाकडे भजनं व्हायची तसं भाऊकडेसुद्धा व्हायचं. सर्वांकडे भजनानंतर पुरणाची करंजी असायची तशी भाऊकडे पण मिळायची. घरात स्री नाही म्हणून भाऊच्या करंजी करण्यात कधी खंड पडला नाही.

तरूण वयात मोडलेला संसार कधी पुन्हा जोडलाच नाही. त्यामुळे मन रमवण्यासाठी व्यसनांचा आधार घ्यावा लागला. या सर्वात कुठेतरी पक्याची आणि पर्यायाने स्वत:ची परवड झाली. भाऊ तसा पोरात पोर होऊन खेळला, त्यांच्याशी बागडला. भाऊचा एक पाय अधू होता. त्यामुळे कुठे फिरायचं असेल तर भाऊ पायात बुट घालत असेल. गावात एखाद्याला नावाची पदवी बहाल करणं म्हणजे एक प्रकारचे कौतुक असतं. भाऊ कधीतरी मद्यधुंद अवस्थेत असेल तर सर्रास जुनी हिंदी गाणी म्हणायचा. मन डोले रे तन डोले..हे भाऊच आवडत गाणं. आजही हे गाणं कुठं लागलं की भाऊची आठवण येते. भाऊ म्हणजे अट्टल दारूडा नव्हता, पण गावात कुणी मद्य घेत असेल किंवा कुणी मद्याच्या धुंदीत असेल तर लोक काय आज भाऊ गोपाळ वाटता?? भाऊ गोपाळ असणे म्हणजे मद्यपान करणे हा आमच्या गावातल्या लोकांनी वाक्प्रचार निर्माण करुन आपल्या मराठी भाषेच्या वृध्दीत भर टाकली.

भाऊ खुलायचा तो गोमुच्या खेळात. एका वर्षी भाऊने स्त्री पात्र केलं. कधी दहीकाल्यात विविध पात्र रंगवली. पुढे पक्या कणकवलीत कुठे कामाला लागला आणि आपल्या बायको -मुलासह तो तिथे स्थायिक झाला. भाऊ घर सांभाळत आयनलात राहिला. आधीच कधी भाऊची दृष्टी गेली, पण एका डोळ्याने त्याला सगळी माणसं दिसत. कधी काठी टेकत टेकत, पायात एक बुट घालून, अंगात मळकं टी-शर्ट आणि खाली हाफ-पॅन्ट घातलेल्या भाऊची आणि माझी वडाच्या झाडखाली भेट झाली. भाऊ डोळ्याने अधू झाल्याने मी त्याला विचारले काय भाऊ! वळाखलंस? भाऊने किंचित हसत अरे डोळे गेले म्हणून तुका ईसरान काय? असा काय गपगप लगीन केलस? अरे भाऊ! काय तु. तुका म्हायती ना. माझी बायको आपल्या कडची नाय, त्यात मर्‍हाट्याची पण नाय!

म्हायती हा माका! पण तु काळजी करु नको, मी माणसा वळाखतंय! डोळे फुटले पण कान नाय फुटले,असं काही बोलून भाऊ निघून गेला.

भाऊला लोकांनी काही म्हणो, पण भाऊचं मन साफ होतं. मनात कोणाबद्दल राग नव्हता. कोणाबद्दल असुया, ईर्षा नव्हती, त्याच्याकडे बापाचं शुद्ध मन होतं. भाऊ गेल्याने कोणाचं काही जात नाही, पण पाणंदीतून जाताना भाऊ ये भाऊ म्हटल्यावर हा म्हणून हाक द्यायला कोण नसेल. आता गावात डिश टीव्हीच्या जमान्यात मन डोले रे तन डोले रे ..सारखी गाणीदेखील ऐकायला येणार नाहीत.

भाऊच्या बेपत्ता झाल्यावर दोन दिवसांनी गावाहून फोन आला. कणकवलीच्या नदीत भाऊची बॉडी मिळाली. पक्याकडे मुक्कामाला असताना भाऊ संध्याकाळी बाहेर पडला आणि बहुतेक पाय घसरून नदीत पडला. पुढे एक-दोन दिवसांनी मासे पकडायला गेलेल्या पोरांना झाडाला अडकलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास केला. प्रकाशने पोलिसांना दिलेल्या वर्णनाशी आणि सापडलेल्या मृतदेहात साम्य आढळलं आणि सापडलेला मृतदेह भाऊचा आहे, यावर शिक्कामोर्तब झालं. मृतदेह ताब्यात घेतला. गावातल्यांनी आयुष्यभर वेगवेगळ्या झळीत पोळलेल्या भाऊला मृताग्नी देऊन त्याची इहलोकीचा प्रवास संपवला.

भाऊ भोगले कोणी मोठा माणूस मुळीच नव्हता, पण कोकणातल्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता. तो जास्त शिकला नव्हता, पण लोकांना भूक लागली की विद्वत्तेचे चार धडे देण्यापेक्षा भुकेलेल्याच्या पोटात चार घास घालावे हे त्याला कळायचं. भाऊ गेला आणि पाणंदीतून जाताना चुलीवर शिजणार्‍या माशाच्या कालवणाचा वास येणं आता बंद झालंय. पुढच्या वर्षी नागपंचमीला नागोबा कोण बनवणार? की गाववाले कणकवलीच्या तेली गल्लीतून विकतचे नागोबा आणून नागपंचमी पुजतील?…आणि भाऊ भोगले म्हणून कोण एक वेडा पीर इथे रहात होता हेही विसरतील??…ग्रामसंस्कृती बदलते आहे, अशा बदलणार्‍या गावात भाऊ भोगले कोणाच्या लक्षात राहणार!..

- Advertisement -