घरफिचर्ससारांशवास्तवाशी संबंध निव्वळ योगायोग : भुज

वास्तवाशी संबंध निव्वळ योगायोग : भुज

Subscribe

15 ऑगस्ट म्हणजे देशभक्ती उफाळून येण्याचा दिवस, याच निमित्ताने देशभक्ती दाखवणारा एखादा सिनेमा प्रदर्शित केला की, तो सुपरहिट होतोच असं समीकरण बनलंय. यामागे काही कारणदेखील आहेत. सुट्टी असल्यानं लोक सिनेमे बघतात आणि देशावर सिनेमा असल्याने त्याचा रिव्यू लिहिताना समीक्षकदेखील फार त्रास घेऊ इच्छित नाही, कारण रिव्यू खराब दिला तर देशातील लोकांच्या भावना दुखावण्याचे चान्सेस अधिक असतात. पण भुज सिनेमाबद्दल अशा कुठल्याही बाबींचा विचार न करता व्यक्त होणं, मला यासाठी महत्वाचं वाटतं की या सिनेमाला नाकारून प्रेक्षकांनी हे सिद्ध केलंय की, केवळ भारत माता की जय, असा संवाद सिनेमात आणि सैनिकांवर सिनेमा आहे म्हणून आम्ही सिनेमा बघत नसतो.

सिनेमा सत्य घटनेपासून प्रेरित आहे, कथानक मनोरंजनाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेलं आहे. ‘भुज’ सिनेमाच्या सुरुवातीलाच ही एक ओळ आपल्याला वाचायला मिळते. हल्ली जिथं प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर लोकांच्या भावना दुखावल्या जातात, तिथं अशा प्रकारचा संदेश सुरुवातीला देऊन टाकला की, आपण काहीही करायला मोकळे असा समज बहुधा भुज सिनेमांच्या निर्मात्यांना झाला असावा आणि त्यातूनच बनला भुज सिनेमा. प्रचंड प्रतिक्रियावादी झालेल्या भारतीय समाजात चित्रपट निर्मात्यांना कलात्मक स्वातंत्र्य तितकं उरलेलं नाही, हे सत्य आहे. कधी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तर कधी सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच इतिहासात मोडतोड केल्याचा, चुकीचा इतिहास पसरविल्याचा आरोप केला जातो, त्यावरून मग वादविवाद होतात. अशा प्रकारच्या वादांना फार महत्व दिल जावं असं मला तरी वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की कलात्मक स्वातंत्र्याच नाव घेऊन मनोरंजनाच्या नावाखाली इतिहासाचं नाव घेऊन जर काहीही सिनेमात दाखवलं गेलं तर प्रेक्षकांना ते पटत नाही आणि त्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया नक्की येतात. भुज सिनेमा हा 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धातील एका प्रसंगावर आधारित आहे, असं सांगण्यात आलंय.

भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा लोकांसमोर यावी त्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. 15 ऑगस्ट म्हणजे देशभक्ती उफाळून येण्याचा दिवस, याच निमित्ताने देशभक्ती दाखवणारा एखादा सिनेमा प्रदर्शित केला की, तो सुपरहिट होतोच असं समीकरण बनलंय. यामागे काही कारणदेखील आहेत. सुट्टी असल्यानं लोक सिनेमे बघतात आणि देशावर सिनेमा असल्याने त्याचा रिव्यू लिहिताना समीक्षकदेखील फार त्रास घेऊ इच्छित नाही, कारण रिव्यू खराब दिला तर देशातील लोकांच्या भावना दुखावण्याचे चान्सेस अधिक असतात. पण भुज सिनेमाबद्दल अशा कुठल्याही बाबींचा विचार न करता व्यक्त होणं, मला यासाठी महत्वाचं वाटतं की या सिनेमाला नाकारून प्रेक्षकांनी हे सिद्ध केलंय की, केवळ भारत माता की जय, असा संवाद सिनेमात आणि सैनिकांवर सिनेमा आहे म्हणून आम्ही सिनेमा बघत नसतो. सैनिक आणि भारतमातेच्या नावाखाली केवळ निर्मात्यांचे गल्ले भरून आमच्या माथी भुजसारखं काही मारणार असाल तर ते आम्ही नाकारतो, म्हणूनच भुजबद्दल लिहिणं गरजेचं आहे.

- Advertisement -

भारतीय सैन्याच्या अनेक अशा शौर्यकथा आहेत ज्या समोर आणण्यासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग केला गेला, काही वेळा थोडी अतिशयोक्ती झाली असली तरी निर्मात्यांचा उद्देश प्रामाणिक असल्याने प्रेक्षकांनी ते प्रयोग स्वीकारले आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. देशभक्तीच्या या ऑगस्ट महिन्यात आपल्या भेटीला 3 असे सिनेमे आले आहेत, ज्यात 2 सिनेमे हे सत्य घटनांवर आधारित आहेत. सिनेमा बनवताना महत्वाची असते ती कथा, अशी कथा ज्याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, जी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, सुदैवाने रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमांना अशा कथा मिळाल्या. कारगिल हिरो कॅप्टन बत्रा असोत किंवा विंग कमांडर विजय कर्णिक या दोन्ही शूरवीरांच्या कथांमध्ये ते सर्व होतं, जे एका प्रेक्षकाला सिनेमामध्ये हवं असतं. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात भुज एयरबेसवर पाकिस्तान एयरफोर्सने हल्ला करून रनवे उध्वस्त केला, त्यावेळी विजय कर्णिक यांनी जवळील गावच्या महिलांना एकत्र करून रनवे तयार केला, ज्यासाठी महिलांनी स्वतःची घरं पाडून धावपट्टीवरचे खड्डे भरले आणि रनवे दुरुस्त केला. पाकिस्तानी सैनिकांना रोखण्यासाठी मर्यादित काळात मोठ्या शौर्याने केलेल्या या कामामुळे देशावर येणारे मोठे संकट टळले.

या प्रसंगात सर्वकाही होतं जे याला उत्तम सिनेमा बनवू शकते. पण का कुणास ठाऊक ? निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला आपल्या स्क्रिप्टवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी अति अनावश्यक असा सगळा मसाला कथेत टाकून एका उत्तम कथेचा बट्ट्याबोळ केला. यातील सर्वात अधिक खटकणारी गोष्ट म्हणजे सर्वकाही ओव्हर द टॉप दाखवून, कथेबद्दलची प्रेक्षकांची विश्वासार्हता गमावणं. अजय देवगण सिरीयस रोल्स उत्तम करतो, सिनेमातही त्याच काम चांगलं आहे, पण म्हणून त्यालाच सगळं काही करावं लागत असेल तर कसं चालणार? म्हणजे हल्ला होतो तेव्हा विमानांवर फायर करण्यापासून ते पाकिस्तानच्या गुप्तहेरांना शोधून मारेपर्यंत, महिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी 3/4 मिनिटांची कविता म्हणण्यापासून ते बुलडोझर चालविण्यापर्यंत सगळं काही एकटा विजय कर्णिक करताना दिसतो. अजय देवगण सोबत सिनेमात संजय दत्त, एमी विर्क, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर यांसारखी अनेक मोठी नावं आहेत आणि ही नावं मोठी आहेत हे दाखवून देण्यासाठी दिग्दर्शकाने प्रत्येकाला वेगळा इंट्रो दिलाय. विळ्याने बिबट्या कापत सोनाक्षी येते, बॉक्सिंग खेळत शरद केळकर, उंटासोबत वाळवंटातून पाकिस्तानी सैनिकांना कापत संजय दत्त आणि कमांडो ट्रेनिंग घेत नोरा फतेह येते. प्रत्येक पात्राला दिलेला असा फिल्मी इंट्रो यामुळे आपली कथेशी नाळ तुटते आणि कथा रटाळ बनते.

- Advertisement -

अनेकवेळा दिग्दर्शकाला कथा जशास तशी मांडता येत नाही म्हणून तो कथेत काही बदल करतो आणि ते करायला काहीही हरकत नसते, पण तो बदल प्रेक्षकांच्या पचनी पडणारा असावा. उदाहरणादाखल तान्हाजी या अजय देवगणच्याच सिनेमात एक प्रसंग आहे, तान्हाजी मालुसुरे यांना गडावर चढण्यासाठी घोरपडींनी मदत केल्याची आख्यायिका आहे, पण ही घटना खरी वाटावी म्हणून दिग्दर्शकाने घोरपडीच्या जागी घोरपडे बंधू नावाचे पात्र आणले, याने इतिहासात काही बदल झाला नाही, उलट विश्वासार्हता वाढली, जे पडद्यावर दिसलं ते सत्य वाटलं. याउलट भुज सिनेमात अतिशयोक्ती घुसवून हीच विश्वासार्हता गमावण्याचं काम केलंय. आता ही अतिशयोक्ती एका ठिकाणी केली असती तर समजलंदेखील असतं, पण वारंवार हेच दाखविण्यात आलंय. उदाहरण म्हणून एक सांगतो, अजय देवगण पाकिस्तानच्या लपलेल्या हेरांना मारण्यासाठी एकटा बंदुकीविना निघतो. लपून त्यांच्या गप्पा ऐकतो, त्याचा आवाज होतो म्हणून ते लोक रायफल घेऊन तयार होतात आणि याला दारासमोर स्टीलच्या मोठ्या ताटात वाळत घातलेल्या लाल मिरच्या दिसतात, अंधार असतो.

हा गॉगल घालून दरवाजा उघडतो, मिरच्यांची पावडर बनते आणि तेच चिली पावडर सगळ्या (?) हेरांच्या डोळ्यात जाऊन अचानक सगळ्या रायफल समोर सोडून छताच्या दिशेने फायर होतात. स्टीलचे मोठे ताट अजय देवगणची शिल्ड बनते आणि कॅप्टन अमेरिकासारखा तो सगळ्या रायफलधारी हेरांना मारतो, शेवटी एक जण उरतोच. त्याच्या हातात पिस्तुल असतं जे तो अजय देवगणवर रोखतो, (पण बोट ट्रिगरवर ठेवत नाही, कारण गोळी चालविलीजाण्याची भीती असते म्हणून ) एका क्षणात पिस्तुल त्याच्या हातातून अजयच्या हातात येते आणि ती फाईट अजय देवगण जिंकतो. आता हा फायटिंग सिन बाघी, एक था टायगर, रेस थ्री मध्ये असता तर समजू शकलो असतो, पण हा अशा एका सिनेमात आहे, जो सत्य घटनेवर आधारित असण्याचा आव आणतो. फक्त हाच एक सिन सिनेमात आहे असं मुळीच नाही. प्रत्येक दुसरा सिन सिनेमात असाच बनवला गेलाय की, तो सिनेमा पूर्णपणे काल्पनिक वाटून सत्य घटनादेखील काल्पनिक वाटायला लागते.

भुजमध्ये कोणालाच कोणाचा मेळ नाहीये, एयर फोर्सचा अधिकारी हेरांना मारायला जातोय, एयर फोर्सचा पायलट गरज नसताना सैनिकांना भाषण देतोय आणि कहर म्हणजे फक्त त्याचं भाषण ऐकून 250 च्या जागी 500 लोक युद्धाला जायला तयार होतात. एक संजय दत्त आहे जो फक्त कुर्‍हाडीने लढतोय, ज्याचे कष्ट पाहून पाकिस्तानी सेनासुद्धा बंदूक सोडून चाकूने त्याला मारायला येते आहे. एक नोरा फतेह आहे जी तिच्या कृत्रिम अभिनयातून देशभक्ती शिकवतेय, ती भारताची हेर आहे जिच्या भावाला पाकिस्तानने चौकात दगडं मारून ठार केलंय. शेवटी भावाप्रमाणे तिलाही मारावं म्हणून एका रात्रीत तशीच तयारी केली जाते, मोहरमसारखा सिन तयार करून तिला दगड मारले जातात. एक अजय देवगणचा बॉस आहे, जो प्रत्येक फोनमध्ये मेरा शेर उदास क्यो है ? असं म्हणतो. एक पाकिस्तानचा याया खान आहे जो म्हणतो ये वहीं हिंदुस्ता है ना, जिसको 400 साल तक हमने अपनी जुतों की नोक पर रखा. तान्हाजी हिट झाला म्हणून अजय देवगन आहे जो प्रत्येक दुसर्‍या वाक्याला मराठा, मराठा म्हणून उगाच मन जिंकण्याचा प्रयत्न करतो.

असा हा सिनेमा जेव्हा संपतो तेव्हा प्रत्येक प्रेक्षक सुटकेचा निश्वास सोडतो. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात जे काम भारतीय सैन्याने, भुज एयरबेसवर विजय कर्णिक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलं, जे काम सुंदरबेन आणि पगिने केलं ते सर्व भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावणार होतं. जे शौर्य प्रत्येक भारतीय सैनिकाने दाखविलं, ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावं म्हणून असे देशभक्तीपर सिनेमे बनविले जातात, जेणेकरून इतिहासाप्रती प्रेक्षकांना आवड निर्माण होईल. पण भुजसारख्या सिनेमामुळे हीच विश्वासार्हता मागे पडते आणि प्रत्येक सिनेमाचा वास्तवाशी तिळमात्र संबंध नाही असं वाटायला लागतं. म्हणून अशा सिनेमांना नाकारणं गरजेचं आहे, देशभक्तीच्या नावाखाली भारतीय प्रेक्षक काहीही खपवून घेत नाही, याचं उदाहरण प्रस्थापित करणं गरजेचं आहे. ते झालं तरच पुन्हा चांगल्या कथा समोर येथील, माहीत नसलेल्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा वाढेल अन्यथा हे असे खेळ चालूच राहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -