घरफिचर्ससारांशजैवविविधतेला जपणे आपल्या हाती !

जैवविविधतेला जपणे आपल्या हाती !

Subscribe

एखाद्या वनस्पतीबद्दलची पोस्ट आहे, ज्यात काहीतरी चमत्कारिक, अविश्वसनीय गोष्ट सांगितली आहे. तेव्हा त्या वनस्पतीच्या नावाने गुगलवर माहिती तपासता येते. त्या विषयात काम करणारी एक दोन तरी ओळखीची माणसे असतील तर त्यांना विचारून खात्री करता येते. मात्र ही तसदीदेखील घेतली जात नाही. अमुक एखादी वनस्पती घरासमोर असू नये, त्यामुळे कॅन्सर होतो अशी पोस्ट येते. मग लगेच ती दिवसभरात वेगवेगळ्या गटातून दहाबारा वेळा येऊन आपल्यावर आदळते. अनेकजन डोळेझाकपणे त्यांच्याकडे त्या वनस्पती असतील तर त्या काढून फेकतात.

जैवविविधता हा व्यापक विषय आहे. सोशिअल मीडियामुळे जैवविविधता शिक्षणात खूप मदत झाली आहे. विषयाची ओळख, संवर्धनाचे वेगवेगळे प्रयोग, पद्धती समजून घेणे. या माध्यमामुळे सृष्टीमधील अनेक अद्यात गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने समजून घेणं सोप्पं झालं आहे. आपल्या परिसरातील झाडे, वेली, गवत, फुलपाखरे, पक्षी अशा अनेक जैवविविधता घटकांची ओळख करून घेण्यात माध्यमांची मदत झाली आहे, होते आहे. ह्या प्रत्येक घटकांत आवड आणि अभ्यास असणारी मंडळी आपलं स्वतंत्र गट बनवतात. त्यावर माहितीची, अनुभवांची नियमित देवाण घेवाण होते.

मला आज एक नवीनच फुलपाखरू दिसलं. मग त्याचं फोटो मिळवून फुलपाखरू अभ्याकांच्या गटात शेअर केलं. मग लगेच त्याचं नाव, कुळ समजलं. मग गटातील काहींनी मला एक होमवर्कही दिला. तुला अमुक फुलपाखरू दिसलं न. आता मग तू त्या परिसराचं नीट निरीक्षण कर. तुला अमुक अमुक वनस्पती नक्की आढळतील. मग यावरून गटातील दुसर्‍या एकाने दोन दिवसांनी स्वतःच्या घरी, मोकळ्या जागेत त्या वनस्पती लावल्याची माहिती दिली. असं हळूहळू काठावर असलेल्या लोकांत जैवविविधता घटकाबद्दलची आवड, निरीक्षणांची सवय जडू लागते आहे.

- Advertisement -

अशा गटात एक दोन तरी तज्ञ मंडळी असतात. ज्यांना विषयाची सखोल माहिती असते. शिवाय निसर्ग निरीक्षण त्यातील एथिक्सची समज असते. त्यामुळे गटातील सदस्यांची ह्या विषयातील समज वाढत असते. एखाद्या पक्ष्याचा फोटो गटात आला. तर मग त्यावर चर्चा होते, कोणता पक्षी आहे, त्याचा आधिवास कोणते आहे. फोटोग्राफरने फोटो काढताना किती जवळून फोटो घेतले आहेत. पक्ष्याच्या अंड्यांचे फोटो घेतले असतील तर कोणत्या कॅमेर्‍यात घेतले. त्यातून अंदाज येतो की तो घरट्याच्या किती जवळ गेला होता. मग तज्ञ लोक अशा लोकांना शिक्षित करतात. अभ्यास किंवा आवड म्हणून फोटो काढत असताना एखाद्या जैवविविधता घटकाच्या किती जवळ जायचंय. इतर कोणती काळजी घ्यायची आहे. ह्याबद्दल हळूहळू गटांतील लोकांची समज विकसित होते. त्यांच्या वर्तन व्यवहारात बदल घडतात.

जैवविविधतेत असे अनेक घटक आहेत, ज्याची अवैध तस्करी केली जाते. दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या घटकाबद्दल समाजात काही चुकीच्या समजुती पसरलेल्या असतात. अमुक तमुक पक्ष्याची अंडी, प्राण्याचं शिंग, किंवा एखादा साप हे गुप्त धन शोधण्यास उपयोगी आहेत. तसे बाबा बुवा पण ढीगभर असतात. असणारच न. त्याचं दुकान चालते. लोक गुडघ्याने विचार करून ते सांगतील तसं करायला तयार असतात. मग तस्करी सुरु होते. दुर्मिळ आणि धोक्यातील घटकांचे नुकसान सुरू होते. अशा जैवविविधता घटकांचे फोटो किंवा त्याचं आढळ ही उठसूठ सर्वांना माहिती झाली, तर अशा गोष्टींच्या शोधात असलेल्या चोरट्या शिकारी लोकांचे फावते. म्हणून अनेकदा अशा गोष्टी सार्वत्रिक करणे धोक्याचे असते. तेव्हा गटातील समज असलेल्या लोकांनी पुढाकार घेऊन अशी माहिती विशिष्ट गटापुरती सीमित ठेवावी. बहुतेकदा तसं केलंही जाते.

- Advertisement -

जैवविविधता घटका संबंधी त्या-त्या विषयातील तज्ञ, अभ्यासक, आवड असणारी लोकांच्या गटात बर्‍यापैकी विषयाला अनुसरून चर्चा होते. त्यात एक समन्वय असतो. माहितीचे विश्लेषण, माहितीवर विविध मतांची चर्चा होत असते. अशा गटाशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व इतर सोशिअल मीडियावर वेगवेगळे हितसंबंधी गट असतात. भलेही ते त्यांच्या निश्चिती उद्देशातून सुरु झालेली असतील, अनेकदा त्यात जैवविविधता घटकाला घेऊन अनेक पोस्टी शेअरली जातात. फॉरवर्डली जातात.

अतिशय दुर्मिळ असं उंबराचे फुल आहे, दर्शन घ्या, पुढे पाठवा, सर्वांना लाभ घेऊ द्या. दर बारा वर्षांनी उमलणार्‍या फुलाचे दर्शन घ्या, माणसाची आकृती असलेलं दुर्मिळ फुलं, दर 15 वर्षात हिमालयात फुलतात, ह्याचे दर्शन घेऊन तुम्ही धन्य व्हाल, पाच फना असलेला नाग, पन्नास लोकांना पाठवा मग श्रीमंती येईल असं एक ना अनेक मेसेजेस येऊन धडकतात. अनेक लोक लाईक करतात. पुढे पाठविण्याची प्रक्रिया निरंतर चालते. अनेकदा ह्या गोष्टी दुर्लक्ष्य करण्याजोग्या असतात. मात्र काहीवेळा त्या जैवविविधता विघातक, लोकांची चुकीची समज घडविणार्‍या असतात. चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता ह्या शेवटच्या दशकात अगदीच कमकुवत झाली आहे. त्याला तशी व्यवस्थात्मक कारणे आहेत. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनसारख्या ख्यातनाम संस्थांच्या मंचावरून देशातील सर्वोच्य नेते मंडळी अगदी बिनडोक विधाने करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासले तर त्या क्षणभरही टिकणार नाहीत. नेत्यांनी भाषण करताना अशा गोष्टी बोलणे एक वेळ समजून घेता येईल, मात्र तेथील स्वतःला वैज्ञानिक समजणारी मंडळी निमुटपणे ऐकून घेतात तेव्हा अशा गोष्टींना समाजात प्रतिष्ठा मिळत असते. ह्या गोष्टी सार्वजनिक चर्चा विश्व, त्यांची गुणवत्ता हे निश्चित करीत असतात. ह्यातून लोकांची विचार करण्याची सवय जाऊन, त्यात भक्तीभाव रुजतो आहे, रुजवला जातो आहे.

एखाद्या वनस्पतीबद्दलची पोस्ट आहे, ज्यात काहीतरी चमत्कारिक, अविश्वसनीय गोष्ट सांगितली आहे. तेव्हा त्या वनस्पतीच्या नावाने गुगलवर माहिती तपासता येते. त्या विषयात काम करणारी एक दोन तरी ओळखीची माणसे असतील तर त्यांना विचारून खात्री करता येते. मात्र ही तसदीदेखील घेतली जात नाही. अमुक एखादी वनस्पती घरासमोर असू नये, त्यामुळे कॅन्सर होतो अशी पोस्ट येते. मग लगेच ती दिवसभरात वेगवेगळ्या गटातून दहाबारा वेळा येऊन आपल्यावर आदळते. अनेकजन डोळेझाकपणे त्यांच्याकडे त्या वनस्पती असतील तर त्या काढून फेकतात.

अलीकडे रानभाजी विषयाला घेऊन अगदी स्तोम सुरुय. ज्यांचा अशा भाज्यांशी फारसा प्रत्यक्ष संबंध नसतो, तेही ह्या विषयावर भरभरून बोलतात. काहीतरी चुकीची माहिती फॉरवर्ड करीत असतात. अमुक रानभाजी खूपच पौष्टिक आहे, रोगनिवारक आहे, अशी माहिती समजते. मग त्या भाजीच्या मागे धावाधाव. कुठे मिळेल ही भाजी. एखाद्या बाजारात मिळते असं कळलं की मग त्या बाजारात चौकशी सुरु होते. जंगलात, कड्या कपारीत फिरणारी आदिवासी, शेतकरी बांधवांनी कधी काळी आपल्या भुकेवर मात करण्यासाठी शोधलेली ही भाजी बाजारात येते. मग क्रयवस्तूंच्या ह्या जगात ती विकली जाते. मग चक्र सुरु होते. त्या परिसरातील त्या भाज्यांचे अस्तिवच धोक्यात येईल इतक्या प्रमाणत व त्या प्रकारे त्या तोडल्या जातात. एखाद्या भाजीबद्दल वस्तूनिष्ठ आणि अनुभवजन्य माहिती मिळवणे, त्यांची लागवड शक्य असेल तर करणे. जास्तीचे स्तोम न माजवता जमेल तेव्हा त्या भागात जाऊन एखादे वेळी आस्वाद घेणे, ह्यात गैर काहीही नाही. मात्र अगदीच त्या भाजीशिवाय आता आपले जगणे शक्य नाही अशा स्वरुपात चर्चा घडवून, त्या वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आणणे चुकीचे आहे.

सोशिअल मीडियाने जैवविविधता शिक्षणात अनेकअंगाने योगदान दिले आहे. ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, गैरसमज किंवा खोटी माहिती पसरवली जात आहे, त्याला रोखता येईल. जैवविविधता क्षेत्रात काम करणारी मंडळी थोडी सक्रीय असतील तर त्यांना अशा प्रकारांना अटकाव घालणे, कमी करणे सहज शक्य असते.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -