मीपणा !

Subscribe

भाजपचे सर्वात जास्त 105 आमदार असून फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावे लागले आणि 57 आमदार असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेत. भाजप सोडताना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे आज हेच म्हणत आहेत. ‘‘फडणवीस यांचा ‘मी’पणा लोकांना आवडला नाही. ‘आम्ही’ म्हटलं असतं तर फरक पडला असता. ते सर्वांना सोबत घेऊन जात नाहीत. फडणवीसांना अहमपणा नडला. सत्ता असताना तुम्ही तुमच्या बरोबरच्या लोकांबरोबर कसे वागता हे सत्ता नसताना तुमच्या लक्षात येते. माझ्यापेक्षा कोणी मोठे नाही आणि माझ्याइतके जगात कोणाला कळत नाही, अशी आत्मप्रौढी तुमच्यात येऊ लागते तेव्हा तुमचा प्रवास हा मीपणाकडे सुरू होतो. तेच आज फडणवीसांच्या बाबतीत दिसून येते.

चाळीस वर्षे एकाच पक्षात राहून आणि त्यातली 34 वर्षे विरोधी पक्षातील नेते म्हणून काम करणे सोपे काम नव्हते. प्रखर पक्षनिष्ठा, स्वतःवरचा विश्वास आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांची साथ असल्याशिवाय हे सोपे नव्हते. विरोधी पक्षनेते म्हणून एकदा विधानसभेत उभे राहिले की तास तीन तास हातात फार कागद नसताना एखादा विषय मुळासकट उकरून काढत साताधार्‍यांना घाम फोडण्याची ताकद नाथाभाऊंमध्ये दिसली. शिवाय कार्यकर्ता असो किंवा पत्रकार आपुलकीने त्याची चौकशी करत चहा पाजताना पाच दहा मिनिटे त्यांनी आपले होऊन गप्पा मारल्या नाहीत, असे कधी झाले नाही. मी आणि माझ्या अनेक पत्रकार साथींनी नाथाभाऊंच्या आपलेपणाचा हा अनुभव घेतलाय. विधानसभा अधिवेशनात एखाद्या महत्वाच्या प्रश्नावरील चर्चेनंतर खडसे यांच्याकडे जाऊन बसले आणि तो विषय समजून घेतल्यानंतर ते प्राध्यापक होऊन इतके तल्लीन होऊन सांगत की, आपला विद्यार्थी कधी झाला हे आपल्यालाच कळत नसे. तसेच एखाद्या बातमीवर प्रतिक्रिया किंवा माहिती हवी असल्यास त्यांना फोन लावल्यावर त्यांनी तो उचलला नाही असे कधी झाले नाही. ते कुठे कार्यक्रमात व्यस्त असले तरी आवर्जून नंतर फोन करणार. ‘काय काम आहे, बोला’, हा त्यांचा आश्वासक सूर मला नेहमीच सकारात्मक वाटला. तुम्ही कुठल्या मोठ्या की, छोट्या वर्तमानपत्रात काम करता, हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नव्हते. माणूस महत्वाचा होता.

तिच गोष्ट सुधीर मुनगंटीवार यांची. भाजपच्या या नेत्याकडेही मला कायम मनाचा मोठेपणा जाणवला. कधीही, कुठेही भेटा आणि त्यांना कितीही मोठे काम असो दोन मिनिटे उभे राहून ते तुमच्याशी बोलणार. ते चंद्रपूरला असो की, गडचिरोलीला. फोन उचलणारच किंवा परत फोन करणार. नाथाभाऊ आणि मुनगंटीवार यांच्याप्रमाणे 2014 च्या आधी म्हणजे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस सर्वांशी आपुलकीने वागत, फोन घेत, भेटत, माहिती देत, विषय समजावून सांगत. पण, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर मात्र आधीचे देवेंद्र राहिले नाहीत. त्यांना टीका सहन होईना. आपले आणि आपले नसलेले असे पत्रकारांचे दोन गट करून त्यांनी दुहीची बीजे पेरली. आपल्या जवळच्या पत्रकारांकडून स्वतःची प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांच्या देहबोलीतून ते दिसायला लागले. समोरच्याला ते किंमत देईनासे झाले. जे त्यांच्या वागण्यात दिसू लागले तेच त्यांच्या बोलण्यात भासू लागले. शंकर महादेवन ब्रेथलेस गातो तसा श्वास रोखून धरल्यासारखा भाषणे करताना त्यात अहमपणा दिसू लागला. सक्षम नेतृत्व, चांगले व्यतिमत्व, अभ्यासू वृत्ती आणि बारा चौदा तास स्वतःला झोकून देत काम करण्याची अफाट क्षमता असताना त्यात मीपणा आला… आणि आज काय परिस्थिती आहे?

- Advertisement -

भाजपचे सर्वात जास्त 105 आमदार असून फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावे लागले आणि 57 आमदार असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेत. भाजप सोडताना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे आज हेच म्हणत आहेत. ‘‘फडणवीस यांचा ‘मी’पणा लोकांना आवडला नाही. ‘आम्ही’ म्हटलं असतं तर फरक पडला असता. ते सर्वांना सोबत घेऊन जात नाहीत. फडणवीसांना अहमपणा नडला. सत्ता असताना तुम्ही तुमच्या बरोबरच्या लोकांबरोबर कसे वागता हे सत्ता नसताना तुमच्या लक्षात येते. माझ्यापेक्षा कोणी मोठे नाही आणि माझ्याइतके जगात कोणाला कळत नाही, अशी आत्मप्रौढी तुमच्यात येऊ लागते तेव्हा तुमचा प्रवास हा मीपणाकडे सुरू होतो. तेच आज फडणवीसांच्या बाबतीत दिसून येते. देवेंद्र मुख्यमंत्री व्हायच्या आधी खडसे यांच्याबद्दल 40 वर्षात एकाचही वाईट मत आलं नव्हतं. पण सत्ता येताच त्यांना हेतुपुरस्पर त्रास दिला गेला. तिकिट दिलं नाही याचं त्यांना दुःख नव्हतं.

पण आरोप केले याचं दु:ख आहे. भाजप पक्षात ते काही आयते आले नव्हते. ‘‘अंजली दमानिया यांनी माझ्या विरोधात विनयभंगाची केस दाखल केली. फडणवीस यांनी त्याला परवानगी केली. नेतृत्व करतात त्यांच्यावर राग असतो. देवेंद्र नेतृत्व करायचे त्यामुळं माझा त्यांच्यावर राग आहे. आमचा दोष नसताना आमचा राजीनामा घेतला. ज्यांच्यावर आरोप होते असे अनेकजण मंत्रिमंडळात घेतले. काही गुन्हा नसताना मला शिक्षा का? माझं जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला तोंडावर एक बोलायचं आणि मागून माझ्याविषयी वेगळं षङ्यंत्र केलं गेलं. आज यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला उद्या हे बलात्काराचा गुन्हा दाखल करतील. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझ्या परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली, असं खडसे सांगतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातील सूर हा गेल्या पाच एक वर्षे जे काही सहन करावे लागले त्या मनीच्या वेदना होत्या… शेवटी तर विधानसभेचे तिकीट नाकारून खडसेंना पार वृद्धाश्रमात पाठवण्यात आले.

- Advertisement -

हे एका खडसे यांच्याबाबत झाले का? तसे मुळीच नाही. फडणवीस यांच्या वाटेतील किंवा भविष्यात त्यांना डोईजड होईल अशी पुसटशी कल्पना आलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत ते झालय. हा मीपणाच होता. ‘मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री’, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात बोलून दाखवलं आणि तिथून त्यांची पक्षात उलटी गिनती सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमधला बहुजनांचा चेहरा म्हणून पंकजाकडे पाहिलं जात होतं. मात्र, तरीही पंकजा यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचं समजलं जाणारं महिला बाल विकास, जल संधारण आणि ग्राम विकास खातं मिळालं. त्यातही जलयुक्त शिवार हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने पंकजा यांच्याकडचं जल संधारण काढून राम शिंदे यांना देण्यात आलं. त्यामुळे पंकजा विरुद्ध देवेंद्र असा संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला. पंकजा यांनाही विधानसभेत तिकीट मिळाले नसते, पण तसे झाले असते तर बहुजन समाजाचा रोष ओढवून घ्यावा लागला असता. तिकीट मिळाले पण निवडणुकीत पंकजा पडतील अशी व्यवस्था झाली, अशी पंकजांच्या समर्थकांच्या मनात शंका असेल तर त्यांचे काय चुकले.

निवडणुकीतील आपल्या सहकारी पक्षाचे उमेदवार कसे पडतील, यावर ताकद खर्च होत असेल तर आपल्या पक्षाच्या दोन चार उमेदवारांना ठरवून पाडायला कितीसा वेळ लागतो. त्यानंतर निशाण्यावर होते विनोद तावडे. गृहमंत्री बनण्याचं स्वप्न बघणार्‍या तावडे यांना शिक्षण मंत्री बनवून अडगळीत टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यात भर म्हणजे पुढील काळात मंत्रिमंडळ विस्तारात तावडेंकडून वैद्यकीय आणि प्राथमिक शिक्षण खातं काढून घेण्यात आलं. हे कमी म्हणून निवडणुकीत तर तावडेंना तिकीटच डावलून पुरती नाचक्की करण्यात आली. तसेच फडणवीसांच्या नेतृत्वात पालकमंत्री म्हणून विदर्भ एकहाती सांभाळणार्‍या चंद्रशेखर बावनकुळेंचेही तिकिट कापण्यात आले. थेट नितीन गडकरींच्या मध्यस्थीनंतरही बावनकुळेंना न्याय मिळाला नाही. तीच गोष्ट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदींचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय असलेले प्रकाश मेहता. एसआरएमध्ये फडणवीसांच्या नावाने घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर फडणवीसांनी भर सभागृहात हात वर केले आणि मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी लावली. आता चौकशीच्या फेर्‍यात अडकल्याचं कारण पुढे करत मेहतांचा निवडणुकीतून पत्ता कापला. अशा पद्धतीने फडणवीस यांनी इतर पक्षातील अनेक दिग्गजांना आयात करून एकीकडे पक्षाचं इलेक्टोरल मेरिट वाढवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ भाजपवर आली.

आजचा भाजप हा वाजपेयी-अडवाणी यांचा भाजप नाही. हा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा भाजप आहे. एखाद्यास काही द्यावयाचे असेल तर ते त्याच्या किंवा तिच्या उपयुक्ततेइतकेच असेल, कणभरही अधिक असणार नाही आणि उपयुक्तता संपुष्टात आल्यास हे दिले दान परत घ्यायलाही हा आजचा भाजप मागेपुढे पाहणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त दोन डझन पक्ष गुण्यागोविंदाने राहिले हा ताजा इतिहास आहे. ममता, समता ते जयललिता इतकी व्यापक ती रालोआ होती. पण सध्याच्या रालोआ मित्रपक्षांतील अवघा एक साथीदार तूर्त नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात आहे. तो म्हणजे रामदास आठवले. बेरजेच्या राजकारणात आजच्या भाजपला शिलकीत सत्ता राहात असेल तर आणि तरच अर्थ असतो. अन्यथा नाही. त्यामुळे अकाली दलासारखा त्या पक्षाचा सर्वात जुना सहकारी पक्ष सोडून गेला तरी भाजपवर काहीही परिणाम झालेला नाही.

इतकेच काय, त्याआधी शिवसेना या सर्वात आद्य आघाडी पक्षाशीही भाजपचा सराईतपणे काडीमोड झाला. आता बिहार निवडणुकीत भाजप हाच खेळ नव्याने खेळताना दिसतो. पण, राजकारण हे काही बुद्धिबळ नाही. म्हणून त्याच्या पटावरील घोडे अडीच घरेच जातील असे नाही. प्रसंगी ते किती मोठी मजल मारू शकतात, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे. उद्या बिहारातही तशी वेळ आल्यास नितीशकुमार हेच खुद्द लालूपुत्रांशी हातमिळवणी करणार नाहीत वा यादव-कुमार-पासवान हे तिघे भाजपच्या विरोधात एकत्र येणारच नाहीत, असे नाही. तेव्हा आपल्या या आत्मनिर्भरता आजाराचा उतारा हा सहयोगी पक्षांची आत्मनिर्भरता असू शकतो, हे भाजपने लक्षात घ्यावे. राजकारणात वारे बदलायला वेळ लागत नाही. सर्वसाधारणपणे पक्षाच्या खडतर काळात नेते सोडून जातात. पण आघाडी घटक पक्ष आणि खडसे यांच्यासारखे नेते भाजपचा सूर्य तळपत असताना पक्षत्याग करीत आहेत, हे चांगले लक्षण नाही. माणसांना सोसणे हे चांगल्या राजकारण्याचे आद्य कर्तव्य असते.

वाजपेयी आणि अडवाणी यांनी आपल्या आणि दुसर्‍या पक्षांच्याही माणसांना सोसले म्हणून तर दोन खासदारांचा भाजप सत्ताधारी होऊ शकला. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये मीपणा कधी दिसला नाही. मात्र, आता वर केंद्राच्या सत्तेत मोदी आणि शहा यांच्यात तो दिसत होता म्हणून तो आपल्यातही दिसला पाहिजे आणि आपल्यापेक्षा कोणीच मोठा होता कामा नये, असे फडणवीस यांना वाटत असेल तर या अहमपणाला त्यांनी आताच आवर घालायला हवा. कारण त्यांना भविष्यात एक मोठा नेता म्हणून पुढे यायचे असेल तर आपल्या माणसांना सोसत मोठे करण्याचे मोठे मन त्यांना करावे लागेल. अन्यथा दुसर्‍याचे वर्तुळ लहान करण्याच्या मीपणात ते स्वतः कधी अधिक लहान होऊन जातील, हे त्यांचे त्यांनाच कळणार नाही…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -