घरफिचर्ससारांशभाजपचे मिशन, दोन्ही गटांसाठी टेन्शन !

भाजपचे मिशन, दोन्ही गटांसाठी टेन्शन !

Subscribe

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी मुंबईत येऊन गेले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल फुंकले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले. भाजपा आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या त्यांनी घेतलेल्या बैठकीत पक्षाचे नेमके लक्ष्य काय आहे ते स्पष्ट झाले. भाजपाने मुंबई महापालिकेसाठी १५० जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आता हे लक्ष्य गाठताना समोर शिवसेना असेल आणि सोबतही शिवसेना असेल. त्यामुळे भाजपचे हे मिशन शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे टेन्शन वाढवणारे आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावर ३३ वर्षांपूर्वी १९८९ मध्ये शिवसेना आणि भाजपाची पहिल्यांदाच युती झाली होती. तसे पाहिले तर, १९८४ पासूनच दोन्ही पक्षांचे सूर जुळले होते. पण भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे या युतीचे शिल्पकार ठरले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपाचा देशभरात विस्तार करण्याचा प्रयत्न या नेत्यांचा होता. महाराष्ट्रात शिवसेना हा समविचारी पक्ष असल्याने त्यांच्या मदतीने राज्यात पाय रोवता येतील, हा विचार यामागे होता. एकमेकांना बरोबर घेऊनच पुढे जायचे, हे त्यावेळी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पुढील सर्व निवडणुका, (२०१४ पर्यंतच्या) दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढविल्या. राज्यातील १९९०च्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी शिवसेनेने १८३ तर भाजपाने १०४ जागा लढवल्या. त्या निवडणुकीत शिवसेनेला ५२ आणि भाजपाला ४२ जागा मिळाल्या होत्या. १९९५ मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला बदलला शिवसेनेने १७१ तर, भाजपाने ११७ जागा लढवल्या. त्यात शिवसेनेने ७३ आणि भाजपाने ६५ जागा जिंकून सत्ता स्थापन केली.

त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये अनुक्रमे शिवसेनेने १६१ व १६३ जागा तर, भाजपाने ११७ व १११ जागा लढविल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेनेने अनुक्रमे ६९ व ६२ तर भाजपाने ५६ व ५४ जागा जिंकल्या. १९९९च्या निवडणुकीत दोघांना मिळून १२५ जागा मिळाल्या. तेव्हाही नुसत्या वाटाघाटी झाल्या. परंतु तोडगा निघाला नाही. त्यावेळी भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होता आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव चर्चेत होते, असे सांगण्यात येते. काँग्रेस व त्याचवर्षी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून सरकार स्थापन केले. २००४ मध्ये देखील जास्त जागा जिंकणार्‍या शिवसेनेकडेच विरोधी पक्षनेतेपद होते. पण नारायण राणे हे जवळपास १३ आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडल्याने भाजपाने या पदावर दावा केला; पण शिवसेनेने नकार दिला. १९९५ ला सत्ता उपभोगल्यानंतर दोन्ही पक्षांची महत्वाकांक्षा वाढल्याचे दोन्ही निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले.

- Advertisement -

अशातच २००९ ची निवडणूक भाजपासाठी विशेष ठरली. शिवसेनेने १६० जागा लढवून ४५ जागांवर विजय मिळविला तर, भाजपाने ११९ जागांपैकी ४६ जागा (शिवसेनेपेक्षा एक जास्त) जिंकल्या आणि विरोधी पक्षनेते पद मिळविले. तेव्हापासूनच भाजपाचा खुंटा बळकट होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली होती. याच जोरावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जास्त जागांची मागणी केली आणि अर्थातच, शिवसेनेने नकार दिला. याची परिणती म्हणून युती तुटली. त्यावेळची परिस्थिती भाजपाला अनुकूल असल्याने भाजपाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या, पण स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. एवढ्या वर्षाच्या एकोप्यामुळे शिवसेनेची साथ मिळेल, अशी भाजपाला अपेक्षा होती. त्यामुळे भाजपा पुन्हा शिवसेनेकडे डोळे लावून बसली. त्यानुसार दोघांनी पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन केली खरी, पण मनातील कटूता दोघेही दूर करू शकले नाहीत.

राज्यात २०१९ च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. लोकसभा निवडणूक भाजपाने एकहाती जिंकली असली तरी, २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा विशेष प्रभाव दाखवू शकली नाही. हे ध्यानी घेता भाजपाने शिवसेनेबरोबर पुन्हा युती केली. पण भाजपाची बदलत जाणारी भूमिका आणि २०१४ मध्ये युती तुटणे, या सर्वांचे उट्टे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर काढला. परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत, शिवसेनेने भाजपाला एकाकी पाडले. सर्वाधिक १०६ जागा जिंकूनही भाजपा सत्तेपासून दूरच राहिला.

- Advertisement -

अशातच शिवसेनेच्या अंतर्गत जी खदखद होती, तिला भाजपाने हवा दिली आणि सेनेत उभी फूट पडली. अडीच वर्षांच्या कारभारानंतर ठाकरे सरकार कोसळले. शिवसेनेतीलत फुटीर गटाला सोबत घेत भाजपाने सरकार स्थापन केले. आता ठाकरेंची शिवसेना ही ओळख पुसण्यासाठी फुटीर गटाची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. अर्थातच, त्याला भाजपाची काही प्रमाणात साथ आहेच. आमदारांच्या पात्रतेबरोबरच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ‘पटक देंगे’ची भाषा बोलणारे अमित शहा यांनी आता थेट आस्मान दाखवण्याची भाषा वापरली आहे. शिवाय, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी सांगायचे की, ‘शिवसेना राम है और हम लक्ष्मण’. कालपरत्वे त्यात बदल झाला आणि ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणू लागले. पण आता अमित शहा थेट, ‘भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही’, असे म्हणून मोकळे झाले. म्हणजेच, हा काडीमोड कायमचाच आहे, हेच ध्वनित होते. याच दृष्टीने भाजपच्या येथील नेत्यांसमोर मिशन १५० चे उद्दिष्ट ठेवले आहे. यात ज्यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले तो शिंदे गट आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की, ‘मुंबई मनपात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता येणार.’ पण वास्तव मात्र वेगळे असू शकते.

शिवसेनेत बंडाचे निशाण फडकवताना शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनाप्रमुख्यांच्या ‘हिंदुत्वा’चा मुद्दा लावून धरला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्याच मतदारसंघात पक्षविस्तार करीत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. मात्र, मुंबईच्या राजकारणात भाजपाचा दबदबा निर्माण करण्याचे आदेश अमित शहा यांनी दिला आहे आणि याबाबत शिंदे गट मौन बाळगून आहे. विशेष म्हणजे, पनवेल येथील भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे’, असे वक्तव्य केले होते. त्याबाबतही शिंदे गट मौन बाळगून होता आणि आताही आहे.

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपाशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजपा राहील, असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेल्या महिन्यात बिहारमध्ये केले होते. अमित शहा यांनी मुंबईत मांडलेली भूमिका हा त्याचाच पुढचा भाग आहे. त्यांनी स्थानिक भाजपा नेते आणि मुंबईत मिशन १५०चे लक्ष्य ठेवले आणि त्याचबरोबर ‘मुंबईतील राजकारणात भाजपाचा दबदबा’ ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. यातून निष्कर्ष काय काढायचा?

युद्ध जिंकायचे ते शत्रूच्या भूमीत आणि शत्रूच्या शस्त्रांनीच, असे जे सांगितले जाते, हीच भूमिका भाजपाची तर नव्हे ना? कारण भाजपाने या महाभारताची सुरुवात २०१७ पासूनच सुरू केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी २०१७ च्या निवडणुकीत तसेच अलीकडेच माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना ‘कौरव’ आणि भाजपा ‘पांडव’ असा उल्लेख केला होता. फक्त यावेळी ‘कर्ण’ हीच व्यक्तिरेखा वेगळी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कर्ण’ असा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता. म्हणजेच, कधीकाळी आपलेच आप्त असलेल्यांबरोबर हे युद्ध रंगणार आहे.

भाजपाकडून ‘शतप्रतिशत भाजपा’चा प्रयत्न सुरू असला तरी, ज्या बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भूमिका भाजपाने जाहीर केली, त्याच बिहारमधून मुख्यमंत्री नितीश कुमारांनी भाजपाविरोधात विरोधकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत ते पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. त्यामुळेच त्यांचा जदयू भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. पण नंतर त्यांनी पुन्हा भाजपाशी हातमिळवणी केली. पण आता भाजपा आपला पक्ष फोडत असल्याचा आरोप करून दुसर्‍यांदा काडीमोड घेतला आणि भाजपामुक्त भारतासाठी त्यांनी बिगुल फुंकले आहे. भाजपामुक्त झाल्यामुळे आपल्या चेहर्‍यावर हसू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२४ ला भाजपाला सत्तेवरून दूर करणे कठीण नाही, केवळ विरोधकांमध्ये एकजूट असली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने ते कामालाही लागले आहेत. एकूणच भाजपाने एका ठिकाणी दाब देण्यास सुरुवात केला असला तरी, दुसर्‍या बाजूने त्याच्या प्रतिक्रियेची वाफ नितीश कुमारांच्या रुपाने बाहेर पडत आहे. आता ती कितपत प्रभावी ठरते, हे काळच ठरवेल.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -