Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश सोशल मीडियावरील ब्लॅकमेलिंग !

सोशल मीडियावरील ब्लॅकमेलिंग !

काही वस्तूंच्या कंपन्यांकडून मेसेज किंवा फेसबुकवर जाहिरात दिसते. आपण त्याकडे सहज म्हणून पाहतो. त्याला गांभीर्याने घेत नाही. पण येणारे हे मेसेज फेक असतात व आपली फसवणूक करतात. हे मेसेज का येतात त्याचे कारण आपल्या मोबाईलमधील अ‍ॅपमध्ये आपण ऑडिओ आणि व्हिडिओची परमिशन दिलेली असते. आता हीच बाब आपल्या इतर वैयक्तिक जगण्याच्या बाबतीत पाहायला मिळते. मित्र-मैत्रिणींसोबत ज्यावेळी आपण व्हिडिओकॉलद्वारे संवाद साधतो. त्या वेळी अशी एखादी लिंक मेसेजद्वारे येते व त्याद्वारे आपला वैयक्तिक व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियाच्या व्हायरल जगात कोणतीच गोष्ट गुपित राहत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या प्रत्येक हालचालींवर, वैयक्तिक संभाषणावर आणि खाजगी कृतींवर आपल्याच हातातील मोबाईलचे लक्ष आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय..? किंवा ते कसे..? हो अगदी बरोबर.. यात नवीन काहीच नाही. हे मान्य जरी केले तरी सांगायचा मुद्दा हाच की तुमचा मोबाईलच तुमच्या सर्व खाजगी गोष्टींना व्हायरल करत असतो. आता ते कसे..? हे थोडे समजून घेऊयात. ज्या वेळी आपण नवीन मोबाईल खरेदी करतो. त्यावेळी आपल्याला मोबाईल सुरु करण्यासाठी (क्टिव्हेट) ईमेल-आयडी द्यावा लागतो. नेमकी त्याचवेळी आपण आपली पन्नास टक्के माहिती दिलेली असते.

कारण आपला ईमेल-आयडी हा सर्वच कामांसाठी आपण वापरतो. याचाच फायदा मोबाईलमधील इतर अ‍ॅप कंपन्या घेतात. तुम्ही मित्रांसोबत एखाद्या वस्तूच्या बाबतीत सहज चर्चा करता. त्या वेळी तुम्हाला त्या वस्तूंच्या कंपनीकडून मेसेज किंवा फेसबुकवर जाहिरात दिसते. पण आपण त्याकडे सहज म्हणून पाहतो. त्याला गांभीर्याने घेत नाही. पण येणारे हे मेसेज फेक असतात व आपली फसवणूक करतात. हे मेसेज का येतात त्याचे कारण आपल्या मोबाईलमधील अ‍ॅपमध्ये आपण ऑडिओ आणि व्हिडिओची परमिशन दिलेली असते. आता हीच बाब आपल्या इतर वैयक्तिक जगण्याच्या बाबतीत पाहायला मिळते. मित्र-मैत्रिणींसोबत ज्यावेळी आपण व्हिडिओकॉलद्वारे संवाद साधतो. त्या वेळी अशी एखादी लिंक मेसेजद्वारे येते व त्याद्वारे आपला वैयक्तिक व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या आहारी गेल्यानंतर नुकसान अटळ आहे. हे मी माझ्या प्रत्येक लेखामध्ये वारंवार सांगत आलोय. दोन दिवसांपूर्वी मला माझ्या मित्राचा पुण्यावरून फोन आला. घाबरलेल्या आवाजात तो बोलला महत्वाचं बोलायचं आहे. थोडा वेळ दे. आणि तो बोलायला लागला. तो सांगत होता. एक अडल्ट वेबसाईटची (पॉर्न) लिंक मेसेजद्वारे आली. मी त्यावर क्लिक केल्यावर माझा मोबाईल नंबर मागितला. अनवधानाने माझ्याकडून दिला गेला. काही वेळानंतर मला मुलीचा प्रोफाईल असणारा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मला अगदी जवळच्या मित्रासारखं तिने तीच पर्सनल लाइफ शेअर केलं. सहानुभूतीपर मीसुद्धा तिला माझ्या वेळेनुसार बोललो. दुसर्‍या दिवशी पुन्हा आम्ही चॅटींग करत होतो. संध्याकाळच्या वेळी मला व्हिडिओ कॉल करू का..? असा मेसेज आला. मी होकार कळवला. थोडावेळ चेहरा दाखवला व नंतर कॉल कट करून पुन्हा मेसेजवर आम्ही बोललो. त्यानंतर पुन्हा तिचा व्हिडिओ कॉल आला. तिच्या भावना ती व्यक्त करत होती. पॉर्न प्रकारातील काही व्हिडिओ आणि फोटोसुद्धा तिने मला पाठवले.

मी पुन्हा तिला व्हिडिओ कॉलवर थोडा वेळ बोललो. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कॉल बंद झाल्यानंतर मला व्हॉट्सअ‍ॅपला माझा चेहरा एडिट करून पॉर्न प्रकारातला व्हिडिओ पाठवला. आणि त्या खाली मेसेज लिहिला की अठ्ठावीस हजार रुपये माझ्या अकाउंटवर जमा कर. नाहीतर हा व्हिडिओ मी तुझ्या फेसबुकवरील सर्व मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करेन. एका दमात त्याने सर्व प्रकरण मला सांगितलं. मी त्याला शांत केलं.आणि समजावून सांगितलं की सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधून रीतसर अर्ज दाखल कर. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी तो नंबर ब्लॉक केला. त्याला समजावून सांगितले की, अशा फेक वेबसाईटच्या आहारी यानंतर जाऊ नको. आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकून तो मित्र तिथून बाहेर पडला. या गोष्टीवर कुतूहल म्हणून मी माझ्या काही पोलीस अधिकारी मित्रांना फोन केला. आणि अशा इतर प्रकरणांबद्दल माहिती घेतली. त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार मला कळाले. काही केसेस तर अशा होत्या की, दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत ब्लॅकमेलरनी पैसे मागवले होते. आणि ते दिले गेले होते. अखेर स्वतःची इज्जत प्यारी म्हणून तक्रारदारांनी पैसे दिले होते. पण वारंवार होणारी पैशांची मागणी म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

- Advertisement -

अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इनकोडिंग आणि डिकोडिंग प्रकारातले मेसेज किंवा लिंक आपल्या मोबाईलवर म्हणजेच एखाद्या अ‍ॅपमार्फत आली तर त्यावर क्लिक न करता ती लिंक किंवा मेसेज तात्काळ डिलीट करणे कधीही चांगले. अशा गुन्हेगारांचा पत्ता कोणत्याच प्रकरणात शक्यतो सापडत नाही. एक तर मल्टी नेटवर्क आणि दुसरे म्हणजे बँकेमार्फत पत्ता शोधला तर त्या पत्त्यावर अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी राहत नाही. असे अनेक प्रकार सध्या उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

अशा वाईटप्रवृत्तींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण एखाद्या वेळी चुकून असा प्रकार आपल्यासोबत घडतो. अशावेळी तात्काळ सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल. सध्या ऑनलाईन शिकवणीमुळे वेगवेगळ्या अ‍ॅपचा व वेबसाईटचा वापर विद्यार्थी करत आहेत. किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलींना काही गोष्टींचे कुतूहल असते. याचाच फायदा हॅकर घेतात. त्यामुळे आपल्या पाल्यांना सांगायला हवे की, अशा फेक मेसेज आणि वेबसाईटला भेट द्यायची नाही. मध्यंतरी काही प्रकार 14 ते 18 वयोगटातील मुलामुलींसोबत घडले. यामध्ये काहींनी मानसिक ताणतणावामुळे आत्महत्या केलेल्या पाहायला मिळाल्या. तर काही आजही या प्रकरणातून सावरलेले नाहीत. त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात पालकांनी अधून-मधून मुलांचा मोबाईल हातात घेऊन, त्यावर तो काय सर्च करतो किंवा लेक्चर सुरू असताना थोडे लक्ष दिले तर योग्य मार्ग मिळेल. काही प्रकरणे तर पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत. कारण लोक काय म्हणतील..? समाजात आपली बदनामी होईल.. या भीतीपोटी तक्रार दाखल केली जात नाही.

पण यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतःहून समोर आले पाहिजे. सोशल मीडिया हा आपला मित्र आहे. पण अयोग्य वापर केला तर शत्रू होण्यास वेळ लागणार नाही. अलीकडे काही बदल होतायत जे चांगले आहेत. त्याचा स्वीकार करूयात. आपण आपल्या खासगी गोष्टींना खासगी ठेवणे कधीही चांगले. काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. ज्या प्रत्यक्ष भेटून बोलायच्या असतात. हे विसरून चालणार नाही. अन्यथा गैरफायदा घेणारी टोळी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. एनक्रिप्टेड मेसेजचा वापर करूनच आपलं संभाषण सोशल मीडियावर करावे. जेणेकरून सोशल मीडियाच्या व्हायरल जगात आपल्या काही गोष्टी गुपित राहतील.

-धम्मपाल जाधव
-(लेखक युवा विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisement -