– सुजाता बाबर
समुद्री परिसंस्था माणसाला आकर्षित करण्याची अनेक कारणे आहेत. समुद्राच्या निळ्या पाण्याचा रंग आणि त्यात जडलेली शांतता माणसाच्या मनाला एक वेगळाच अनुभव देतात. समुद्राच्या गाभ्यात असलेल्या विविध जैविक जीवनाच्या रूपांमध्ये एक अनोखे आकर्षण आहे. रंगीबेरंगी मासे, शिंपले, शैवाल, समुद्रातील प्राणी हे सर्व एकत्र येऊन समुद्राच्या परिस्थितिकी तंत्राचा समतोल साधतात. यामुळे समुद्राच्या प्रणालीचा गहन अभ्यास करण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची आवश्यकता लक्षात येते. या परिसंस्था जितक्या सुंदर आहेत तितक्याच हवामान बदलासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात.
या परिसंस्था वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकतात. निळा कार्बन म्हणजे विशेषत: खारफुटी, समुद्री गवत आणि मीठाच्या दलदलीसारख्या समुद्री म्हणजे परिसंस्थांद्वारे पकडून आणि साठवून ठेवलेला कार्बन होय! या परिसंस्था कार्बन डायऑक्साइड शोषण्यात अत्यंत कार्यक्षम आहेत. यामुळे जागतिक उष्मा नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे या परिसंस्था. ज्याप्रमाणे जंगलांना पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील समुद्री परिसंस्था कार्बन साठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
उदा. खारफुटी हे जगातील सर्वात प्रभावी कार्बन साठे आहेत. पृथ्वीच्या केवळ 0.1 टक्के भूभाग क्षेत्रावर खारफुटी पसरलेल्या असल्या तरी त्या एकट्या समुद्री परिसंस्थांमधील 10 टक्के कार्बन साठवतात. तसेच उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्टपेक्षा समुद्री गवत कुरणे प्रति हेक्टर जास्त कार्बन ट्रॅप करू शकतात. उथळ किनारपट्टीच्या भागात पाण्याखालील वनस्पती कार्बन शोषून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. निळा कार्बन हवामान बदलासाठी महत्त्वाचा का आहे? निळ्या कार्बन परिसंस्थांचे मुख्य कार्य म्हणजे त्या कार्बन शोषक आहेत. त्या वातावरणातील कार्बन शोषून वनस्पती आणि गाळात साठवण करतात. हा कार्बन शतकानुशतके किंवा अगदी सहस्राब्दी काळापासून साठवलेला आहे. याचमुळे निळ्या कार्बन परिसंस्था वातावरणातील हरितगृह वायू कमी करण्यासाठी आणि जागतिक उष्मा कमी करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहेत.
पण त्यांची भूमिका केवळ कार्बन साठवण्यापुरती मर्यादित नाही. निळ्या कार्बन परिसंस्था आपल्याला हवामानाशी संबंधित आपत्तीपासून संरक्षण करतात. खारफुटी नैसर्गिक बफर म्हणून काम करतात, वादळे, तुफानी लाटा आणि धूप यांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात. ते त्सुनामी, पूर आणि चक्रीवादळ यांचा प्रभाव कमी करतात. या घटना हवामान बदलामुळे वारंवार होत आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की खारफुटी या वादळाचा प्रभाव 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात! समुद्री गवतदेखील खूप उपयुक्त असते. कार्बन पकडून ठेवण्यापलीकडे, ते मासे आणि इतर समुद्री प्राण्यांच्या वाढीस मदत करतात. समुद्री जीवनासाठी रोपवाटिका म्हणून काम करतात. ते समुद्रतळ स्थिर करतात आणि त्यांच्या मुळांसह गाळ अडकवून किनारपट्टीची धूप थांबवतात. असे असले तरी या परिसंस्थांना महत्त्वपूर्ण धोक्यांचा सामना करावा लागतो. किनारपट्टी विकास, कोळंबी शेती आणि शहरी विस्तारासाठी खारफुटीची साफसफाई केली जाते. प्रदूषण, बोटींची वाहतूक आणि किनारी बांधकाम यामुळे समुद्रातील गवताची कुरणे धोक्यात आली आहे. जेव्हा ही परिसंस्था नष्ट होते तेव्हा केवळ त्यांची कार्बन साठवण क्षमताच नष्ट होते असे नाही तर त्यांच्यामध्ये पूर्वी साठवलेला कार्बन पुन्हा वातावरणात सोडला जातो आणि हवामानाचे संकट आणखी वाढते.
इंडोनेशियामध्ये जंगलतोडीमुळे खारफुटी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहेत. त्या पुनर्संचयित केल्या जात आहेत. इंडोनेशिया सरकार, स्थानिक समुदाय आणि स्वयंसेवी संस्था कार्बन साठवण्यासाठी, किनारपट्टीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि माशांचा साठा सुधारण्यासाठी खारफुटीची लागवड करत आहेत. 2030 पर्यंत सहा लाख हेक्टर खारफुटीचे जंगल पुनर्संचयित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताचा सागरी किनारा जवळपास 7500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि महत्त्वपूर्ण निळ्या कार्बन परिसंस्थांचे घर आहे. गुजरात आणि सुंदरबनमधील खारफुटीची जंगले कार्बन साठवण्यात आणि किनारपट्टीच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुंदरबनमध्ये दरवर्षी 75 लक्ष टन कार्बनचा साठा असण्याचा अंदाज आहे! हवामान बदल कमी होण्यास आणि किनारी भागांचे वादळांपासून संरक्षण करण्यात याची मोठी मदत होते.
भारतातील सागरी गवताची कुरणे, विशेषत: मन्नारच्या आखातातील आणि अंदमान निकोबार बेटांवर, कार्बन साठवण आणि सागरी जैवविविधतेसाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत. या परिसंस्थांना किनारपट्टीचा विकास आणि प्रदूषणामुळे धोके आहेत. यावर उपाय म्हणून भारताने नॅशनल अॅक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजद्वारे निळ्या कार्बन परिसंस्थांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात किनारी पर्यावरण संवर्धनासाठी धोरणे आहेत. निळ्या कार्बनचे जागतिक महत्त्व वाढत्या प्रमाणात ओळखले जात आहे. 2021च्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत जागतिक उत्सर्जन कमी करण्यासाठी निळा कार्बन हा प्रमुख उपाय म्हणून अधोरेखित करण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारखे देश त्यांच्या उत्सर्जन-कपात धोरणांचा एक भाग म्हणून समुद्री परिसंस्थांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी त्यांच्या हवामान धोरणांमध्ये आधीच निळा कार्बन समाविष्ट करत आहेत.
निळ्या कार्बनच्या परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायदेखील महत्त्वपूर्ण आहेत. स्थानिक लोकांना त्यांच्या किनारपट्टीच्या परिसंस्थेची सखोल माहिती आहे. ते गेली अनेक वर्षे खारफुटी, समुद्री गवत आणि मिठाच्या दलदलीवर अवलंबून आहेत. बर्याच क्षेत्रांमध्ये हे समुदाय संवर्धन प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत. पारंपरिक ज्ञानाचा निर्णय प्रक्रियेत समावेश केला जावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निळ्या कार्बनची क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी हे प्रयत्न अपुरे आहेत. खारफुटी पुनर्संचयित केल्याने वनीकरण किंवा कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानसारख्या पद्धतींवर येणारा खर्च कमी होऊ शकतो. स्थानिक समुदायांना सामील करून आणि त्यांचे ज्ञान एकत्रित करून प्रभावी आणि टिकाऊ पर्याय मिळतील. निळ्या कार्बनला प्राधान्य देऊन हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतो, समुद्रकिनारी लवचिक समुदाय तयार करू शकतो आणि सागरी जीवनाचे रक्षण करू शकतो. यातून पर्यावरण आणि मानवता या दोन्ही गोष्टी साध्य होतील. निळ्या कार्बनची क्षमता आणि हवामान बदलासाठी निसर्गाचा छुपा पर्याय आपल्यासाठी मोलाचे ऐवज आहेत!