घरफिचर्ससारांशबॉलीवूडला बॉयकॉटचं ग्रहण

बॉलीवूडला बॉयकॉटचं ग्रहण

Subscribe

आधीच कोरोना काळात दोन वर्षे मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले होते. यामुळे या क्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे काम करणार्‍या हजारो कलाकार आणि कर्मचांर्‍यावर उपासमारीची वेळ आली. अनेक चित्रपट रखडले तर अनेक चित्रपट निर्माते कोरोनामुळे देशोधडीला लागले आहेत. त्यातच लॉकडाऊन काळात मोठ्या पडद्यांची जागा ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतल्याने बॉलीवूडला जबरदस्त आर्थिक फटका बसलाय. कमी बजेटमध्ये ओटीटीवर वेबसिरिज आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच थिएटरमध्ये जाण्यापेक्षा घरात ओटीटीवर चित्रपट वेबसिरिज बघणे कमी धावपळीचे आणि कमी खर्चिक असल्याने थिएटर रिकामी पडली आहेत. अशावेळी #BoycottBollywood ट्रेंडमुळे उरली सुरली बॉलीवूड इंडस्ट्री मोडकळीस येण्याच्या वाटेवर आहे.

सध्या सोशल मीडियावर #Boycott या शब्दाचे पेव फुटले आहे. हॅशटॅग बॉयकॉट या नावाने बॉलीवूडच्या ठराविक चित्रपट आणि कलाकारांना काहीजणांकडून टार्गेट केले जात आहे. त्यातही #BoycottLaalSinghChaddha, #BoycottRakshabandhan, #BoycottDarlings, #BoycottBollywood हे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे सार्वजनिक आवाहनच एक गटाकडून जनतेला केले जात आहे. तर मागचा पुढचा विचार न करता किंवा त्याची दुसरी बाजू न बघता अनेकजण या बॉयकॉट कल्चरमध्ये सामील होत आहेत. बॉलीवूडला लागलेलं बॉयकॉटचं हे ग्रहण आहे. हे सगळं धक्कादायक आहे.

सोशल मीडियावरचा हा विरोध आता थेट चित्रपटगृह आणि सेटवर पोहचला आहे. #BoycottBollywood चे समर्थन करण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर तर कधी चित्रपटाच्या सेटवर जाऊन तोडफोड करणे, पोस्टर्स फाडणे, जाळणे, धिंगाणा घालणे अशाही घटना घडू लागल्या आहेत. यामुळे जनेतचा हा वाढता विरोध बघून देशात अनेक ठिकाणी स्क्रीनवरून चित्रपटच हटवण्याची नामुष्की थिएटर मालकांवर आली आहे. तर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने सेलिब्रिटीही धास्तावले आहेत. परिणामी दिवसाला कोट्यवधींची, अब्जावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या बॉलीवूडमध्ये निराशेचे आणि चिंतेंचे नभ दाटू लागले आहेत. कारण #BoycottBollywood च्या नावाखाली ही मंडळी कधी कोणाला लक्ष्य करतील याचा नेम नाहीये.

- Advertisement -

खरं तर एखाद्या चित्रपट, सेलिब्रिटीला विरोध करण्याचा हा नवा ट्रेंड आहे. बघायला गेलं तर #Boycott हा साधा शब्द आहे. पण याच शब्दांनी आता एखाद्या कलाकाराची कार्यकीर्दच नाही तर अख्खी बॉलीवूड इंडस्ट्रीच संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं अगदी ताज उदाहरण मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या अभिनेता आमिर खानचा लालसिंह चड्ढा चित्रपट. चित्रपट उत्तम आहे. आमिर तर उत्कृष्ट अभिनेता आहेच. त्यामुळे त्याने ही भूमिकाही दमदारपणे सादर केली. पण हॅशटॅग टोळक्याचा आमिरवर राग असल्याने त्यांनी सुरूवातीपासूनच त्याच्याविरोधात बॉयकॉटची बोंब मारायला सुरुवात केली होती. त्याचा फटका लालसिंह चड्ढाला बसलाच. चित्रपटाला आणि आमिरला मिळणारा वाढता विरोध बघून ४ दिवसात बॉक्सऑफिसवर लालसिंह चड्ढाने फक्त ३८ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. या चित्रपटाच्या निर्मितीवर एकूण खर्च झाला होता १८० कोटी रुपये. आणि नफा अवघा ३८ कोटी.

अभिनेता अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला पण बॉयकॉटचे ग्रहण लागले. यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच त्याला विरोध होऊ लागला. या चित्रपटासाठी निर्मात्याने खर्च केले ७० कोटी पण चित्रपटाच्या चौथ्या दिवसापर्यंत गल्ला जमला तो फक्त ८.२ कोटी रुपयांचा. आलियाचा डार्लिंग्सलाही विरोध झाला. कारण त्यात पतीने पत्नीवर केलेल्या अत्याचाराची अतिशोयक्ती दाखवण्यात आली असा आरोप करण्यात आला. तसेच आलियाने पुरुषांवर टीकाही केली. यामुळे बॉयकॉट टोळक्याने आलियावरही बहिष्कार घाला असे आवाहन केले. यामुळे चित्रपटाच्या नकारात्मक प्रसिद्धीचा डार्लिग्सला फटका बसला. प्रेक्षकांनी सोशल मीडियावरच्या या टोळक्याचे म्हणणे ग्राह्य मानून थिएटरकडेच पाठ वळवली आणि आलियाचा डार्लिग्स सपशेल आपटला. खरं तर या सेलिब्रिटीज आणि चित्रपटावर बहीष्कार घालण्याचे मूळ हे बॉयकॉट टोळक्याच्या डोक्यात आधीच घर करून बसलेले आहे. फक्त त्याचा सूड म्हणा किंवा त्या कलाकाराचा करेक्ट कार्यक्रम म्हणा नियोजनपद्धतीने योग्य वेळी केला जात आहे.

- Advertisement -

बॉलीवूड चित्रपटांची यातील कलाकारांची भुरळ अख्ख्या जगाला पडते. कारण भारतीय सिनेमाच्या कथा, त्यातील नाच गाणी, रंगीबेरंगी कपडे घालून वावरणारे कलाकार बघायला अनेकांना आवडतात. कारण हॉलिवूडमध्ये असे कलरफूल काहीही नसते. यामुळे बॉलीवूड कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. त्यात कलाकाराचा धर्म बघून कोणीही त्या कलाकाराचा फॅन झालेला ऐकवत नाही. यामुळेच मराठमोळ्या धगधग गर्ल माधुरी दीक्षितचे देशात जेवढे चाहते आहेत त्याच्या कैकपटीने परदेशात आहेत. गानसम्राज्ञी दिवंगत लतादीदींच्या आवाजाचे कोट्यवधी चाहते परदेशी आहेत. कारण कलाकारांचा धर्म हा कलाच असतो. त्याला जातीभेदाच्या धर्मांच्या चाळण्या नसतात. कला सादर करणे हेच त्यांना ठाऊक असतं. हे काही वर्षांपूर्वी आपल्याकडेही दिसत होतं. मात्र सध्या वारे वेगळ्याच दिशेने वाहू लागले आहेत. यामुळे सगळीकडेच आता जातीधर्म, उच्चनीच याच्या चौकटी येऊ लागल्या आहेत. #BoycottBollywood सारखे सोशल कॅम्पेन करून एखाद्या व्यक्ती विरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे. बॉलीवूडचे कलाकार आता यात नकळत अडकू लागले आहेत.

आमिर खान तसा मितभाषी. पण तो सोशल वर्क करत असतो. तेही कसलाही गाजावाजा न करता. तो उत्तम अभिनेताही आहे, पण २०१५ मध्ये देशात घडलेल्या घटनांवर बोलताना एका मुलाखतीत आमिरने देशात असहिष्णुता वाढल्याचे विधान केले. तसेच पत्नीला आता देशात राहण्यास भीती वाटत असल्याने परदेशी स्थायिक होणार असल्याचे सांगितले होते. आमिरच्या या विधानावरून त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात आली. देशात सुरक्षित वाटत नसेल तर देश सोडून जा, असा सल्ला आमिरला नेटकर्‍यांनी दिला. तेव्हापासून हिरो असलेला आमिर व्हिलन झाला. तो कायमचा. यादरम्यान त्याने केलेल्या सामाजिक कार्यावरही पुरता बोळा फिरलाय. लाल सिंह चड्ढाने तर त्याच्याविरोधात देशात एक गट निर्माण झाल्याचे अधोरेखीत केले आहे.

त्याआधी २६/११ हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे देशात पाकिस्तानी क्रिकेटर्सला आयपीएल सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली. पण २००९ मध्ये कोलकाता नाईट रायडरचा मालक असलेल्या शाहरुखने मात्र आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना स्थान द्यायला हवं असे विधान केलं. त्यावेळीही शाहरुख विरोधात देशात लाट उसळली. त्याचे चित्रपट बहिष्कृत करण्याची मागणी करण्यात आली. त्याचा फटका शाहरुखला बसला.

या घटनांपासूनच देशात ठराविक धर्माविरोधात किंवा देशविरोधी कारवाया करणार्‍यांच्या बाजूने बोलल्यास संबंधित व्यक्तीविरोधात एक गट सक्रिय झाला. २०२० साली बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. पण त्याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी केला. त्यासाठी बॉलीवूडमधील बडे अभिनेते आणि घराणेशाहीला जबाबदार ठरवण्यात आले. तेव्हाही स्टारक़िड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याचे सोशल कॅम्पेन करण्यात आले. #BoycottBollywood,#JusticeForSushantSinghRajput, #BoycottbollywoodCompletely, #JusticeForSSR , #SushantSinghRajput, ट्रेंड झाले. याचा फटका साहजिकच बॉलीवूडला बसला.

यात करण जौहरसारख्या मोठ्या चित्रपट निर्मात्यांनाही टीकेचा सामना करावा लागला. सुशांत सामान्य कुटुंबातून बॉलीवूडमध्ये आला होता. त्याचा तिथे कोणीही गॉडफादर नव्हता. त्याने त्याच्या सहज, सुंदर अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड काबीज केलं. यामुळे त्याचे स्पर्धक वाढले. त्यातूनच त्याची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याचं राजकारणही करण्यात आलं. पण तेव्हापासूनच जसे बॉलीवूडमध्ये दोन गट पडले तसेच देशातही चित्रपट प्रेक्षकांचेही दोन गट पडले. ज्याचा फटका आज बॉलीवूडला बसत आहे.

आधीच कोरोना काळात दोन वर्षे मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले होते. यामुळे या क्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे काम करणार्‍या हजारो कलाकार आणि कर्मचांर्‍यावर उपासमारीची वेळ आली. अनेक चित्रपट रखडले तर अनेक चित्रपट निर्माते कोरोनामुळे देशोधडीला लागले आहेत. काहीजण तर अजूनही आर्थिक डबघाईतून सावरलेले नाहीत. त्यातच लॉकडाऊन काळात मोठ्या पडद्यांची जागा ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतल्याने बॉलीवूडला जबरदस्त आर्थिक फटका बसलाय. कमी बजेटमध्ये ओटीटीवर वेबसिरिज आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्याच्या तुलनेत संपूर्ण कुटुंबासह घरात ओटीटीवर चित्रपट वेबसिरिज बघणे कमी धावपळीचे आणि कमी खर्चिक असल्याने थिएटर रिकामी पडली आहेत. अशावेळी #BoycottBollywood ट्रेंडमुळे उरली सुरली बॉलीवूड इंडस्ट्री मोडकळीस येण्याच्या वाटेवर आहे. बॉलीवूडवर हजारो कर्मचार्‍यांचे घर चालत असल्याने या क्षेत्राला बसलेला हा फटका सामान्य व्यक्तीवर उपासमारीची वेळ आणतोय.

कारण या क्षेत्रात उत्पन्नाची कुठलीच शाश्वती नसल्याने आज जे कमवाल तेच भविष्यासाठी राखून ठेवणे भाग असते. यामुळे एखाद्या कलाकाराविरोधात भूमिका घेताना त्याला बॉयकॉट करण्याआधी त्याच्या चित्रपटात पडद्यामागे काम करणार्‍या शेकडो कर्मचार्‍यांचाही विचार करायला हवे. तसेच आज फक्त बॉलीवूडच नाही तर विविध क्षेत्रात स्वतंत्र मत असणार्‍या व्यक्ती आहेत. राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे. यामुळे जर एखाद्या व्यक्तीने प्रवाहाविरोधी मत प्रदर्शित केल्यास त्याच्यावर कायमचा बहिष्कार टाकण्याआधी किंवा तसे आवाहन करण्याआधी प्रत्येकाने सारासार विचार करायला हवा. प्रत्येक व्यक्ती ही त्या त्या प्रसंगानुसार घटनेनुसार व्यक्त होत असते. यामुळे जर एखाद्याने कधी काळी विरोधी किंवा आक्षेपार्ह विधान वा कृत्य केले असेल तर त्यामागची परिस्थिती समजून घेणे गरजेचे असते. केवळ रागातून अर्धवट माहितीतून सोशल मीडियासारखे दुधारी शस्त्र वापरून त्याला आयुष्यातून कायमचे उध्वस्त करण्याचा अट्टाहास करणे खरं तर आक्षेपार्ह आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -